दहावीची बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा होणार? CBSE चे नवीन बदल काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. तसेच, या वर्गांच्या परीक्षा पद्धतीतही बदल करण्यात आले आहेत.
सीबीएसई बोर्डाच्या नवीन नियमांनुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.
याशिवाय, बोर्ड परीक्षा घेण्याचा कालावधी आणि काही विषयांमध्ये द्विस्तरीय अभ्यासक्रमाचा पर्याय देणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश देखील या नवीन नियमावलीत असणार आहे.
सीबीएसईने हे स्पष्ट केलं आहे की, नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये असणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे बदल करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा होणार असल्याचंही मंडळाने सांगितलं आहे.


वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा, काय आहेत नवे नियम?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (1 मार्च) या नवीन बदलांचा मसुदा जाहीर केला आहे. नवीन नियमांनुसार दहावीच्या वर्गासाठी दोनदा बोर्डाच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.
यानुसार, विद्यार्थी एका किंवा दोन्ही बोर्ड परीक्षांना बसण्याचा पर्याय निवडू शकतात आणि जर त्यांनी नंतरची बोर्ड परीक्षा निवडली तर ते ज्या विषयांमध्ये पुढे अभ्यास करू इच्छित नाहीत ते विषय सोडूनही देऊ शकतात.
दोन बोर्ड परीक्षांच्यामध्ये एक अंतरिम परीक्षासुद्धा होणार आहे.
तसेच यापूर्वी बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी 32 दिवस लागत होते आता हा कालावधी कमी करून 16 ते 18 दिवसांवर आणला जाणार आहे.
वर्षातली पहिली बोर्डाची परीक्षा 17 फेब्रुवारी ते सहा मार्च दरम्यान घेतली जाणार आहे आणि दुसरी बोर्ड परीक्षा 5 मे ते 20 मे दरम्यान घेण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ असा होतो की दोन विषयांच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एक किंवा दोन दिवसांचा अवधी मिळणार आहे. सध्या दोन परीक्षांमध्ये पाच ते दहा दिवसांचं अंतर असतं.

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्या टप्प्याचा निकाल 20 एप्रिल पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्याचा निकाल 30 जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
या नियमांवर शाळा, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सामान्य लोकांसह सर्व पक्षांकडून मते मागवण्यात आली आहेत. 9 मार्चपर्यंत याबाबतच्या सूचना बोर्डाला देता येणार आहेत.
मसुद्यातील प्रस्तावानुसार या पुढच्या शैक्षणिक वर्षात हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत.
अभ्यासक्रमात काय बदल केले आहेत?
नवीन नियमांनुसार 9 वी आणि 10 वीच्या विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये दुहेरी पर्यायी अभ्यासक्रम लागू करण्यास बोर्डाच्या नियामक मंडळाने मंजुरी दिलेली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये दोन काठिण्यपातळींची निवड करता येईल. नववी आणि दहावीत शिकणारे विद्यार्थी या विषयांसाठी स्टॅण्डर्ड आणि अॅडव्हान्स असे पर्याय निवडता येतील.
पुढील वर्षी हा पर्याय नववीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना 2028 पासून ही निवड करता येणार आहे. विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारावी म्हणून विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांमध्ये असा पर्याय देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवेश परीक्षांसाठी चांगली तयारी करता येईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये गणितासह सगळ्याच विषयांसाठी दोन काठिण्यपातळीचा पर्याय देता येऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. ज्यामध्ये विद्यार्थी स्टॅण्डर्ड आणि अॅडव्हान्स असे पर्याय निवडू शकतात.
पुढील वर्षांपासून इयत्ता 9 वी मध्ये लागू होणाऱ्या विज्ञान आणि सामाजिक शास्त्राच्या दोन-स्तरीय अभ्यासक्रमासाठी पुस्तके तयार करण्याची जबाबदारी एनसीईआरटीला देण्यात आली आहे.
हिंदुस्थान टाइम्सच्या बातमीनुसार सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग म्हणाले, "दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये या दोन्ही विषयांमध्ये द्विस्तरीय अभ्यासक्रम लागू करण्यासाठी, नवीन मजकूर समाविष्ट केला जाणार आहे. अॅडव्हान्स पातळीची निवड केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेत अतिरिक्त प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्यांच्यासाठी एक वेगळी प्रश्नपत्रिका सुद्धा तयार केली जाऊ शकते."
2023च्या राष्ट्रीय शालेय शिक्षण आराखड्यानुसार सर्व वर्गांसाठी नवीन पुस्तकं तयार करण्याची जबाबदारी एनसीईआरटीकडे देण्यात आली होती. त्यानुसार एनसीईआरटीने 2023 मध्ये पहिली आणि दुसरीची पुस्तकं तयार केली. तसेच 2024 साली तिसरी आणि सहावीसाठी नवीन पुस्तकांची निर्मिती केली.
यावर्षी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीसाठी नवीन पुस्तकं येणार आहेत. राहुल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार 2026-2027 पासून नववीची नवीन पुस्तके येणार आहेत.
हे बदल का करण्यात आले?
एका वर्षात दोनदा बोर्डाची परीक्षा घेण्यामागचं कारण या नवीन बदलांच्या मसुद्यात सांगण्यात आलेलं आहे. त्यानुसार बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सोप्या व्हाव्या आणि या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वर्षभर शिकवणी आणि पाठांतर करावं लागू नये म्हणून हे बदल करण्यात आले आहेत. तसेच यामुळे विद्यार्थ्यांची मूळ क्षमता ओळखण्यास मदत होईल असंही म्हणण्यात आलं आहे.
या नवीन नियमांच्या पाठीमागे हाही हेतू आहे की, नियमित शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी अतिरिक्त प्रशिक्षणाची गरज पडू नये. आणि फक्त शाळेतला अभ्यास करून विद्यार्थी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावेत.
तसेच यामध्ये सांगत आलं आहे की, "बोर्डाच्या परीक्षेची दहशत संपुष्टात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना एकाच वर्षात दोनदा ही परीक्षा देण्याचा पर्याय असेल. यामध्ये एक मुख्य परीक्षा असेल आणि दुसरी परीक्षा विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना मार्कांमध्ये सुधारणा करण्याची संधी देईल."
गणितानंतर विज्ञानामध्ये द्विस्तरीय पर्याय देण्यामागे सुद्धा हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार आवडीचा विषय निवडण्याची संधी दिली जाईल. शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, असा पर्याय दिल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन जेईईची तयारी करायची आहे, त्यांना मदत होणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा सध्याचा अभ्यासक्रम पुरेसा नसल्याचं मानलं जातं. यामुळेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त कोचिंग क्लास लावावे लागतात असं बोर्डाचं मत आहे.
तथापि, एनसीईआरटीचे माजी संचालक जे. एस. राजपूत यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "या उपाययोजनाचा काही फायदा होऊ शकतो, परंतु विद्यार्थ्यांवरील कोचिंगचा भार कमी करण्यासाठी अनेक मूलभूत बदल करावे लागतील."
2019-2020पासून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त गणितामध्ये 'स्टॅण्डर्ड मॅथेमॅटिक्स' आणि 'बेसिक मॅथेमॅटिक्स' या दोन पर्यायांची निवड करता येत होती. या दोन्ही पर्यायांच्या अभ्यासक्रमात काहीही फरक नसला तरी गणिताच्या प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी मात्र वेगवेगळी असते.
दिल्ली पालक संघटनेच्या पदाधिकारी अपराजिता गौतम यांनी बीबीसीला सांगितलं, "गणितात हा प्रयोग करण्यात आला आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन गणिताची निवड करायची नसेल किंवा त्यांना इतर विषयांमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर ते बेसिक मॅथेमॅटिक्सची निवड करू शकतात."
त्या म्हणतात, "तसेच ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन प्रवेश परीक्षा द्यायच्या असतील किंवा गणितातच करियर करायचं असेल त्यांच्यासाठी दहावीपासूनच गणित विषयाची चांगली तयारी करण्याची संधी यामुळे मिळत आहे."
नवीन बदल लागू करण्यात कोणत्या अडचणी आहेत?
अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत होऊ घातलेल्या या नवीन बदलांबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मात्र काही शंका आहेत. नवीन पुस्तकं येण्यास उशीर होत असल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया रखडण्याची शक्यता त्यांना वाटते आहे.
अपराजिता गौतम यांच्या मते नवीन बदल जोपर्यंत व्यवस्थित लागू होत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होणार नाहीत.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "सीबीएसईची नवीन पुस्तकं लवकर मिळत नाहीत ही सगळ्यात मोठी अडचण आहे. शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतरही तीन-तीन महिने ही पुस्तकं प्रकाशित होऊन विद्यार्थ्यांच्या हातात येत नाहीत."

फोटो स्रोत, Getty Images
पुस्तकं उशिरा प्रकाशित होणं ही सगळ्यात मोठी अडचण असल्याचं पालकांना वाटतं.
अपराजिता गौतम म्हणतात की, सीबीएसईशी संलग्न असलेल्या अनेक शाळा याचा फायदा घेत स्वतःची पुस्तके प्रकाशित करतात आणि पालकांना ती पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडतात.
त्या म्हणतात, "सर्वप्रथम, सीबीएसई बोर्डाच्या खाजगी शाळांना स्वतःची पुस्तके छापण्यास आणि अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ती शिकवण्यास बंदी घातली पाहिजे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सीबीएसईची पुस्तके सर्वांना वेळेवर उपलब्ध करून दिली जातील."
नवीन शैक्षणिक धोरणानुसार केल्या जाणाऱ्या बदलांमुळे नेमका किती परिणाम होईल आणि किती सुधारणा लागू केल्या जातील हे स्पष्ट होण्यास वेळ लागेल असं त्यांना वाटतं.
NCERT च्या माजी संचालकांना काय वाटतं?
NCERT चे माजी संचालक जे. एस. राजपूत यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, अभ्यासक्रम सोपा करावा अशी चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती कारण यामुळे अनेक मुले शाळा सोडतात.
त्यांच्या मते, मुलांच्या स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासाठी यशपाल समितीची स्थापना करण्यात आली. भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम खूप विस्तृत असल्याचे त्यात सुचवण्यात आले होते.
जे.एस. राजपूत म्हणतात, "माझ्या कार्यकाळात, आम्ही सहावी, सातवी आणि आठवीच्या वर्गांसाठी हे चार विषय एकत्रित केले होते आणि ते नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी देखील करायचे होते, परंतु त्यावेळी ते करता आलं नाही."
त्यांच्या मते, मुलांची आवड लक्षात घेऊन अभ्यासक्रमात नवीन बदल केले जात आहेत, हे खूप आधीच करायला हवं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "आपल्या शिक्षणातील सर्वात मोठी समस्या ही आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा जबरदस्तीने अभ्यास करावा लागतो, परंतु आपण मुलाची आवड आय आहे हेदेखील बघितलं पाहिजे."
मात्र यामुळे कोचिंगच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका होईल असं मला वाटत नाही.
ते म्हणाले, "शिक्षकांची लाखो रिक्त पदे भरल्याशिवाय मुलांचे कोचिंगवरील अवलंबित्व कमी होणार नाही आणि विशेषतः प्राथमिक शिक्षणात शिक्षकांची मोठी कमतरता आहे. नवीन शिक्षण धोरणातही हे मान्य करण्यात आलेलं आहे आणि अनियमित शिक्षकांच्या जागी नियमित भरती केली जाणार असल्याची चर्चा आहे."
"जर आपल्याला कोचिंगवरील मुलांचं अवलंबित्व कमी करायचं असेल, तर सर्वप्रथम आपल्याला शिक्षकांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि सर्वात जास्त विश्वास प्राथमिक शिक्षकांवर ठेवला पाहिजे, त्यांच्या सुविधा सुनिश्चित केल्या पाहिजेत आणि त्यांची भरती वेळेवर केली पाहिजे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











