आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात, ताण टाळण्यासाठी विद्यार्थी-पालकांनी हे लक्षात ठेवावं

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आज(11 फेब्रुवारी) पासून बारावीच्या लेखी परीक्षा सुरु झाल्यात. तर 21 फेब्रुवारीपासून दहावीच्या लेखी परीक्षाही सुरु होतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी महाराष्ट्रातले लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात.

आजकालच्या स्पर्धेच्या युगात परीक्षा आल्या की परीक्षांचा अभ्यास, परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा तणाव याची चर्चाही सुरु होते.

मागच्या काही वर्षांपासून परीक्षांचा हंगाम सुरु होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील 'परीक्षा पे चर्चा' करत असतात. थोडक्यात काय तर देशाच्या पंतप्रधानांपासून ते परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच याबाबत चर्चा सुरू असते.

पण मुळात हा परीक्षेच्या विषयावरून तणाव का निर्माण होतो? परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे?

गुणांवर आधारित शिक्षणपद्धतीमुळे तणाव

मुलांवर निश्चितच परीक्षांचा ताण येत आहे, असं मत बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

"माझ्यामते त्याची तीन मुख्यं कारणं आहेत. एक म्हणजे शिक्षणाच्या चांगल्या संधींच्या प्रमाणात मुलांची संख्या खूप जास्त आहे. Supply खूप अधिक आहे आणि त्याच्या तुलनेत शिक्षणाच्या provisions कमी आहेत. याचाच परिणाम म्हणजे चांगल्या संस्थांमधील संधींसाठी जास्त गुण मिळवण्याचा दबाव वाढत जातो.

दुसरी गोष्ट आपल्याकडे शिक्षणावर आधारित करिअरच्या संधींनाच आजही मोठ्या प्रमाणावर समाजमान्यता आहे.

खेळ, संगीत, चित्रकला अशा कलागुणांच्या आधारे निर्माण होणाऱ्या उदरनिर्वाहाच्या संधी या फारशा प्रस्थापित नाहीत. या कलांमधील शिक्षण घेऊन पुढे काय, असा प्रश्न आजही विचारला जातो."

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

मुलांमध्ये परीक्षेचा तणाव येण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचंही डॉ. आशिष देशपांडे यांनी आवर्जून नमूद केलं.

"माध्यमांमधून यशस्वी मुलांच्या ज्या गोष्टी समोर येतात, त्याचीच अपेक्षा पालक आपल्या मुलांकडून करतात. Excellence या गोष्टीचं प्रचंड आकर्षण पालकांमध्ये दिसून येतंय.

म्हणजे मुलगा क्रिकेट खेळत असेल तर त्यानं सचिन तेंडुलकरच व्हायला हवं असं वाटतं. मार्कांच्या बाबतीतही पालकांचा हाच अट्टाहास दिसून येतो."

कसा दूर कराल तणाव?

डॉ. आशिष देशपांडेंनीही मुलांमधलं परीक्षांचं दडपण कमी करण्यासाठी काय करता येईल, यासंबंधी काही गोष्टी आवर्जून सांगितल्या.

1. शाळांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करायला हवा. सुदृढ मानसिक आरोग्यासाठी खेळ, कला, वाचन यांचं महत्त्वदेखील शाळांनी ओळखायला हवं.

मुलांच्या कलागुणांना वाव देणारा, त्यांच्यामधील pro-social skills चा विकास होईल असा अभ्यासक्रम तयार करणं ही आताची गरज आहे.

आम्ही गोरेगाव येथील नंदादीप शाळेत हा उपक्रम राबवत आहोत. इथं पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, भाषा या विषयांप्रमाणेच 'मौजे'चाही क्लास असतो. या वर्गात आम्ही मुलांमधील सामाजिक कौशल्यं कशी वाढीस लागतील याचा विचार करतो.

2. मुलं जे काही करत आहेत, ते त्यांना आवडायला हवं याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर अशा ठराविक क्षेत्रात गेला म्हणजेच त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल हा न्यूनगंड मुळातच पालकांनी मनातून काढायला हवा. तरच मुलांमधली मार्कांची भीती कमी करता येईल.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

3. दहावी-बारावीच्या मार्कांचा जो बाऊ केला जातो, तो काही प्रमाणात कमी झाला आहे. पण त्याची जागा आता वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांनी घेतली आहे.

या परीक्षांचं प्रस्थ कमी करण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रांची माहिती पालकांनी आणि मुलांनीही करून घ्यायला हवी. मुलांचा कल ओळखून आवडीचं शिक्षण देण्यासाठी Aptitude Test चा पर्याय अवलंबायला हवा.

4. महाराष्ट्रात आठवीपर्यंत कोणालाही नापास न करण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळेही दहावीच्या मुलांना मोठ्या प्रमाणावर परीक्षेचा ताण येताना दिसतो.

परीक्षा नसणं एकवेळ समर्थनीय आहे, पण मुलांचं मूल्यमापनच न होणं चुकीचं आहे. आठवीपर्यंत अनुत्तिर्ण न करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचं टेन्शन मॅनेजच करता येत नाही.

कोणत्याही सरावाविना ही मुलं नववी-दहावीतच परीक्षांना सामोरं जावं लागतं. हे म्हणजे मुलांना सरावाविना पाण्यात ढकलल्यासारखं आहे.

मुलांना या तणावातून बाहेर काढण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत असं मत अनुराधा पाटील यांनी व्यक्त केलं.

5. "दहावी-बारावी म्हणजे शेवटची परीक्षा नाही. हा एक टप्पा आहे. तो नक्कीच महत्त्वाचा आहेच. पण दहावीतले मार्क सर्वस्व आहेत, असं मुलांच्या मनावर बिंबवणं चुकीचं आहे.

त्यांना हसत-खेळत परीक्षेच महत्त्व सांगितलं पाहिजं. घरात दहावीसाठी वेगळी वातावरण निर्मिती करण्यापेक्षा घरातलं वातावरण नेहमीसारखं ठेवलं तरच मुलांच्या मनावरचं दडपण कमी होईल.

मुलांना तणावविरहित ठेवण्यासाठी योगा, ध्यानधारणा, छंद जोपासणं या गोष्टींकडेही पालकांनी लक्ष द्यायला हवं," असं अनुराधा पाटील यांनी म्हटलं.

6. अनेक घरात मुलांवर अभ्यासाचं दडपण आणून पालक मात्र निवांत टीव्हीसमोर बसतात असं चित्र दिसत असल्याचं अनुराधा यांनी नमूद केलं. "हे चुकीचं आहे. मुलांच्या अभ्यासात पालकांनीही सहकार्य करायला हवं.

अगदी त्यांच्यासोबत अभ्यासाला बसायला हवं असं नाही. पण सहजपणे येता-जाता त्यांच्याशी संवाद साधणं, अभ्यासाच्या नियोजनात त्यांना मदत करणं हेसुद्धा मुलांना रिलॅक्स ठेवायला मदत करू शकतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

हेही नक्की वाचा