झेलम परांजपे यांनी त्यांची शाळा राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय का घेतला?

झेलम परांजपे शाळा

फोटो स्रोत, facebook

सध्या संपूर्ण भारतात राम मंदिराच्या उद्घाटनाचं वातावरण आहे. त्यानिमित्ताने देशातल्या सहा राज्यांनी सुटीही जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही राज्य शासनाने सुटी जाहीर केली आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयाने सुद्धा ओपीडी दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

मात्र ओड़िसी नृत्यांगना आणि साने गुरुजी विद्या मंदिर शाळेच्या संचालिका यांनी मात्र त्यांची शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या शाळेच्या मुलींचा फोटो फेसबुकवर त्यांनी हा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला.

त्या म्हणतात, “आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं.....सरकारी GR शेवटच्या क्षणी येतो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. राम लल्ला सुध्दा खूश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर.... आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार...”

झेलम परांजपे

फोटो स्रोत, Facebook

त्यांच्या या निर्णयावर फेसबुकवर जोरदार टीका झाली. त्याबद्दलही त्यांनी भूमिका पुन्हा एक फेसबुक पोस्ट लिहून जाहीर केली आहे.

त्या म्हणतात, “माझ्या दोन दिवसा पूर्वीच्या पोस्ट मुळे थोडा गैरसमज झाला आहे तो मी दूर करू इच्छिते. शाळा चालू राहणार हा निर्णय आमचा आहे, मुलींचा स्वतःचा नाही.”

काही प्रसारमाध्यमांमध्ये मुलींनी स्वत:हून शाळेत न जाण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या.

त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

तसंच त्यांनी ट्रोल्सना देखील उत्तर दिलं आहे.

त्या म्हणतात, “ज्या लोकांनी troll केले आहे, त्यांची गैरसमजूत दूर करण्यास त्यांना सांगू इच्छिते...,माझं रामाशी काहीही वावगं, वाकडं नाही ..राम मंदिर होतंय, supreme court निर्णय आहे, या घटनेशी देखील माझं काही वावगं नाही.

गीत रामायण सारखे आणि तुलसी रामायण सारखे अतिउत्तम काव्यावर आम्ही नृत्य सादर केले आहे. लोकांना ते भावले आहे.

तसेच, आम्ही वसंत बापट यांच्या "देह मंदिर चित्त मंदिर" आणि साने गुरुजींच्या "खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे" या गीतांवर देखील नृत्य सादर केली आहेत. आणि ते ही लोकांना भावले आहे.

हा निर्णय म्हणजे कुठल्या एका पक्षाने कुठल्या दुसऱ्या पक्षाला विरोध नाही केलेला.

सांगण्याचा मुद्दा असा की जे पटत नाही त्याचा विरोध करावा.

शेवटच्या क्षणी सुट्टी जाहीर करणे पटले नाही, विरोध केला, troll झाले.

१९७५ साली आणीबाणी जाहीर झाली, पटलं नाही, विरोध केला, तुरुंगात गेले.

बास्स एवढेच....”

Facebook पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Facebook पोस्ट समाप्त

या प्रकरणी बीबीसी मराठीनेही त्यांच्याशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, “ हा जीआर अगदी वेळेवर आला. आमच्या शाळेतील दहावीच्या मुलांची परीक्षा सुरू आहे. अशा परिस्थितीत सुटी देणं योग्य नाही असं आमचं मत झालं. हा निर्णय सर्वसहमतीने घेण्यात आला आहे. याच दिवशी नाही तर इतरही सार्वजनिक सुटीच्या दिवशी आम्ही शाळेत येतो. उदा. गांधी जयंती. त्या दिवशी मुद्दाम शाळेत येतो. जेणेकरून मुलांना गांधीजींबद्दल नीट माहिती मिळेले.

त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी वेगळा नाही. मी कोणत्याही देवाच्या विरोधात नाही हे मी पुन्हा सांगते असं त्या म्हणाल्या. हा संपूर्णपणे प्रशासकीय कारणासाठी घेतलेला निर्णय आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.

झेलम परांजपे कोण आहेत?

झेलम परांजपे या प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना आहेत. माजी मंत्री सदानंद वर्दे आणि राष्ट्र सेवा दलाच्या नेत्या सुधा वर्दे हे त्यांचे आई-वडील होत.

वसंत बापट आणि रमेश पुरव यांच्या मार्गदर्शनात झेलम परांजपेंनी राष्ट्र सेवा दलातील नृत्यनाटिकांमध्ये काम केलं होतं. पुढे गुरू शंकर बहेरा यांच्याकडून त्यांनी ओडीशी नृत्याचे धडे गिरवले.

अनेक मानद महोत्सवांमध्ये त्यांनी ओडिसी नृत्याचं सादरीकरण केलं आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे. नृत्य क्षेत्रातल्या त्यांच्या सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय.

झेलम परांजपे

फोटो स्रोत, Facebook

राज्यात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याखाली सुटी देण्यात आली आहे. या कायद्याच्या कलम 26 नुसार विशेष प्रसंगांना राज्य सरकारला सुटी देण्याचा अधिकार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)