सोमनाथ मंदिर आणि इस्लामपूर्व काळात अरबस्थानात पूजा केल्या जाणाऱ्या देवींचा काही संबंध आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शकील अख्तर,
- Role, बीबीसी उर्दू, नवी दिल्ली
सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण झाली. अनेकदा आक्रमणं होऊनही पुन्हा हे मंदिर उभं राहिल्याच्या निमित्ताने भाजपने स्वाभिमान पर्वची घोषणा केली आहे. त्यामुळं सध्या या मंदिराची चर्चा आहे.
गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेले सोमनाथ मंदिर हे देशातील सर्वात महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे.
इतिहास सांगतो की, 1026 मध्ये महमूद गझनीच्या आक्रमणात सोमनाथ मंदिर पहिल्यांदा उद्ध्वस्त झाले होते.
1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या नूतनीकरणासाठी मदत केली.
1951 मध्ये मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर राजेंद्र प्रसाद यांना उद्घाटनासाठी बोलावले गेले.
त्यांनी नेहरूंचा सल्ला मानला नाही आणि देशाचे राष्ट्रपती म्हणून उद्घाटन समारंभाला हजेरी लावली आणि अधिकृतपणे उद्घाटन केले.
सोमनाथ मंदिराच्या वेबसाईटवरील माहितीनुसार (पूर्वी ते गुजरातच्या जुनागड जिल्ह्यात होते) : "भगवान शिवाच्या 12 प्राचीन ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले मंदिर आहे. भगवान कृष्णाने आपली अंतिम यात्रा याच मंदिरातून केली होती."
त्या काळातील इतिहासकारांच्या मते, किनारपट्टीवर असलेले हे मंदिर महमूदच्या काळात गुजरातचे एक अतिशय भव्य मंदिर होते. महमूद गझनीने केवळ हे दगडी मंदिर लुटलेच नाही, तर मंदिरातील मूर्तींचीही तोडफोड केली.
गझनीच्या दरबारी कवींचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन
महमूद गझनीच्या काळातील आणि त्यानंतरच्या सुलतानशाही काळातील अनेक महत्त्वाच्या इतिहासकारांनी पुस्तकांत गझनीच्या सोमनाथवरील आक्रमणाचा उल्लेख केला आहे.
सोमनाथ मंदिरातील मूर्तीचा उल्लेख अनेकदा "मनात" आणि "लात" असा करण्यात आला आहे.
इस्लामपूर्वी, 'लात' आणि 'मनात' या अरबांच्या दोन मुख्य देवी होत्या. त्यांना "देवाच्या कन्या" मानलं जात होतं. त्यांच्या मूर्ती काबामध्ये ठेवल्या होत्या. तसेच मक्का आणि मदिना यांच्या दरम्यान असलेल्या एका शहरात मनातची मोठी मूर्ती बसवली होती.

फोटो स्रोत, Getty Images
इस्लामच्या आगमनानंतर इतर मूर्तींसोबत या मूर्तीही हटवण्यात आल्या.
दोन समकालीन इतिहासकार आणि महमूद गझनीच्या कवींनी सोमनाथवरील आक्रमणाचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले आहे. फारुकी सिस्तानी हा त्या काळातील एक मोठा कवी होता आणि तो वेगाने विस्तारणाऱ्या गझनीच्या दरबाराशी जोडलेला होता.
तो 'कसिदा' म्हणजे स्तुतीकाव्य लिहिण्यात पारंगत होता. त्यात राजाच्या पराक्रमाचे अतिशयोक्ती आणि कल्पनेवर आधारित वर्णन केलेले असायचे.
फारुकी सांगतात की, गझनीने सोमनाथवर हल्ला केला तेव्हा तो त्याच्यासोबत होता, पण त्याने मंदिर पाडल्याचा कोणताही स्पष्ट किंवा सुसंगत उल्लेख केलेला नाही.
अरबस्थानातील देवी आणि सोमनाथ यांचा संबंध काय?
गुर्देझी हेही आणखी एक समकालीन इतिहासकार होते. त्यांनी 30 वर्षांनंतर 'झैन-उल-अखबार' या पुस्तकात सोमनाथच्या घटनेचा सविस्तर उल्लेख केला. सिस्तानी आणि गुर्देझी या दोघांनीही सोमनाथ मंदिरावरील गझनीच्या हल्ल्याचे एका विचित्र पद्धतीने समर्थन केले.
पर्शियन पुस्तकांमध्ये सोमनाथला "सो-मनात" म्हटले गेले आहे. सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याच्या संदर्भात, त्या काळातील इतिहासकारांनी 'इस्लाम येण्यापूर्वी पूजल्या जाणाऱ्या मूर्तींचा नाश करणारा' असं महमूदचं वर्णन केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
फारुकी सिस्तानी यांच्या मते, "सोमनाथ हा शब्द 'सु-मनात' या शब्दाचा अपभ्रंश होता, जो अरबी देवी 'मनात'शी जोडलेला होता. इस्लामपूर्व काळात अरबस्थानात मनातची पूजा केली जात असे. त्याकाळी अरब लोक लात, उज्जा आणि मनात यांना 'देवाच्या कन्या' म्हणून पूजत असत. इस्लामच्या आधी येमेन, सीरिया, इथिओपिया, इजिप्त आणि इराकचे लोक काबामध्ये हजसाठी येत असत आणि तवाफनंतर मनातच्या स्थानांना भेट देत असत."
लात, मनात आणि उज्जा यांच्या मूर्ती काबामध्ये होत्या आणि त्यांचे स्थान इतर मूर्तींपेक्षा वरचे होते.
फारुखी आणि गुर्देझी यांच्या मते, इस्लामच्या प्रेषितांनी या मूर्ती नष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण मनातची मूर्ती तेथून चोरून गुजरातच्या किनारपट्टीवरील काठियावाड भागात पाठवण्यात आली, तिथे लोक मूर्तीपूजा करत असत.
इतिहासकार रोमिला थापर त्यांच्या 'सोमनाथ: द मेनी वॉइसेस ऑफ हिस्ट्री' या पुस्तकात लिहितात की, "मनातची पूजा एका लांब काळ्या दगडाच्या रूपात केली जात असल्याचे कुठे तरी नमूद आहे. मात्र, अरबस्थानात तिच्या मूर्ती स्त्रीच्या रूपात होत्या. कदाचित हे इतिहासकार सोमनाथमधील शिवलिंगाच्या रूपात असलेल्या काळ्या दगडाला पाहून गोंधळले असावेत किंवा हा हल्ल्याचे समर्थन करण्याचा एक प्रयत्न असावा."
त्या काळातील सुफी फरीदुद्दीन अत्तार यांनी लिहिले की, "सोमनाथचे भक्त मानत असत की त्यांची मूर्ती इतकी शक्तिशाली आहे की गझनी तिला नष्ट करू शकणार नाही."
सोमनाथ नष्ट करण्यामागे गझनीचा हेतू काय होता?
त्या काळातील सुफी फरीदुद्दीन अत्तार यांनी सोमनाथच्या मूर्तीचा संबंध इस्लामपूर्व अरबस्थानात पूजल्या जाणाऱ्या 'लात' देवीशी जोडला. अत्तार यांनी पुढे लिहिले की, जेव्हा मूर्ती तोडली गेली, तेव्हा तिच्या आतून मोठ्या प्रमाणात हिरे आणि दागिने सापडले.
तेराव्या शतकातील इतिहासकार इब्र अल-अशीर यांनी त्यांच्या 'अल-कमल अल-तारीख' या पुस्तकात लिहिले की, महमूदचा मूर्ती तोडण्यामागचा एक हेतू, 'मूर्ती अजिंक्य आहे' हा हिंदुंनी केलेला दावा चुकीचा सिद्ध करणे हा होता.
त्यांच्या लिखाणानुसार, "असे म्हटले जायचे की या मूर्तीची पूजा केल्याने लोकांचे आजार बरे होतात. मंदिर दगडाच्या पायावर बांधले होते आणि त्याला 56 लाकडी खांब होते. मंदिरात शिवलिंगाच्या रूपात मोठी मूर्ती होती. मंदिरात 1000 ते 2000 ब्राह्मण आणि 300 देवदासी व संगीतकार होते जे मूर्तीच्या सेवेत असायचे."
त्या काळातील इतर मंदिरांच्या तुलनेत हे वर्णन खूपच अतिशयोक्ती वाटते.

फोटो स्रोत, MUSEUMSOFINDIA.GOV
तेराव्या शतकातील प्रसिद्ध पर्शियन कवी शेख सादी यांनीही त्यांच्या 'बुस्तान' या प्रसिद्ध पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. शेख सादी दावा करतात की, त्यांनी सोमनाथला भेट दिली होती, पण याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत.
त्यांनी लिहिले, "ही मूर्ती हस्तिदंताची बनलेली असून अत्यंत सुंदर आहे. तिला मनात देवीप्रमाणे दागिन्यांनी सजवले आहे. ही मूर्ती इतकी प्रमाणबद्ध आणि छान बनवली आहे की, अनेक लोक ती पाहण्यासाठी येतात."
तेराव्या शतकातील इतिहासकार मिन्हाजुद्दीन सिराज यांनी 'तकाबात नासिरी' या पुस्तकात सोमनाथचा उल्लेख करताना लिहिले की, "महमूदने हजारो मंदिरांचे मशिदीत रूपांतर केले होते. त्याने सोमनाथमधून मनातची मूर्ती सोबत आणली आणि तिचे चार तुकडे केले. त्यातील दोन तुकडे गझनीच्या राजवाड्यात आणि मशिदीत लावले आणि एक-एक तुकडा मक्का व मदिनेला पाठवला."
सोमनाथची मूर्ती गझनीच्या राजवाड्यात नेली होती का?
महमूद गझनीच्या इतिहासकारांना त्याला केवळ मूर्तीभंजक म्हणून नाही, तर भारतातील 'इस्लामिक राजवटीचा संस्थापक' म्हणून खलिफाच्या नजरेत मोठे करायचे होते.
अल्-बिरुनीने देखील लिहिले आहे की, सोमनाथ मंदिरातील दगडाच्या मूर्ती आणि ठाणेसरच्या पितळी मूर्ती तोडून गझनीच्या राजवाड्यात नेल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
दोन शतकांनंतर, हबीब अल-सियार या दुसऱ्या एका इतिहासकाराने सोमनाथचा उल्लेख एक मोठे मंदिर म्हणून केला आणि त्यांच्या मते तिथे 'लात'ची मूर्ती होती. महिन्यातून काही रात्री लोक इथे जमा होत असत.
बीबीसीशी बोलताना प्रसिद्ध भारतीय इतिहासकार इरफान हबीब म्हणाले की, हिंदू परंपरा आणि कथांमध्ये सोमनाथबद्दल असा कोणताही उल्लेख नाही.
ते म्हणाले, "मुस्लिम इतिहासकारांनी हे खूप अतिशयोक्ती करत सांगितले आहे. शेख सादी यांनी सोमनाथबद्दल अनेक निराधार कथा पसरवल्या आहेत. अलाउद्दीन खिलजीच्या काळात इतिहासकारांनी या कथा आणखी वेगवेगळ्या स्वरूपात सादर केल्या."
काही आधुनिक इतिहासकार गझनीच्या इतिहासकारांच्या अशा लिखाणाचं कारण स्पष्ट करतात.
ते म्हणतात की, महमूद गझनीच्या इतिहासकारांना खलिफासमोर त्याची प्रतिमा केवळ 'मूर्तीभंजक' म्हणून नाही, तर भारतात 'इस्लामिक राज्य' स्थापन करणारा अशी निर्माण करायीच होती.
मात्र, अरबांनी याच्या कित्येक शतके आधीच देशाच्या काही भागावर राज्य प्रस्थापित केले होते.
सोमनाथ मंदिर किती वेळा उद्ध्वस्त झाले?
रोमिला थापर लिहितात की, त्यानंतर मुघल सम्राट अकबराने मंदिरात शिवलिंगाच्या पूजेला परवानगी दिली आणि मंदिराच्या देखभालीसाठी अधिकारी नियुक्त केले.
अकबरचा इतिहासकार अबुल फझल फैजी याने सोमनाथचा उल्लेख करताना महमूदच्या आक्रमणाला "धर्मांधांकडून केलेली पावित्र्याची लूट" असे म्हटले आहे.
रोमिला थापर यांनी लिहिले आहे की, औरंगजेबाने 1706 मध्ये, त्याच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी, अकबराच्या राजवटीच्या जवळपास 100 वर्षांनंतर सोमनाथ मंदिर पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सोमनाथ मंदिर मोडकळीस आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
1842 च्या अफगाण मोहिमेत ब्रिटीश सैन्याचे मोठे नुकसान झाले. ब्रिटिशांनी प्रतिहल्ला केला आणि गझनीहून चंदनाच्या लाकडाचा एक दरवाजा सोबत आणला.
त्यांनी दावा केला की हा सोमनाथ मंदिराचा दरवाजा होता, जो महमूद गझनीने पळवून नेला होता. ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध भडकवण्यासाठी याचा वापर केला.
लॉर्ड एलेनबरो यांनी या दरवाजा परत आणण्याला 'अपमानाचा बदला' असं म्हटलं.
लॉर्ड बरो म्हणाले, "ब्रिटिश सरकारने तुमच्या प्रेमाला कसा प्रतिसाद दिला आहे ते पाहा. त्यांनी तुमचा सन्मान हाच स्वतःचा सन्मान मानला आहे. आपल्या सामर्थ्याने त्यांनी सोमनाथचा तो दरवाजा परत आणला आहे, जो कित्येक वर्षांपासून अफगाणांसाठी विजयाचे प्रतीक होता."
पण ब्रिटिशांनी आणलेल्या या दरवाजाचा सोमनाथ मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचं नंतर संशोधनात स्पष्ट झालं होतं.
स्वातंत्र्याच्या वेळी, जुनागडच्या मुस्लीम नबाबाने पाकिस्तानात सामील होण्याची घोषणा केली, पण तिथल्या बहुसंख्य हिंदू जनतेने या निर्णयाविरुद्ध बंड केले.
नबाब पाकिस्तानात पळून गेला आणि जुनागड संस्थानाचा कारभार भारत सरकारकडे सोपवला.
सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार
तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी 1947 मध्ये जुनागडला भेट दिली. ते सोमनाथ मंदिर पाहण्यासाठीही गेले. त्यावेळी मंदिरात केवळ काही दगडाचे खांब शिल्लक होते आणि ते पूर्णपणे पडक्या अवस्थेत होते.
त्यांनी जुनागडमधील एका मोठ्या जाहीर सभेत सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची घोषणा केली.
कॅबिनेटने याला मंजुरी दिली, पण जेव्हा सरदार पटेल आणि दुसरे काँग्रेस नेते कन्हैयालाल माणेकलाल मुन्शी महात्मा गांधींकडे पाठिंबा मागायला गेले, तेव्हा गांधीजी म्हणाले, "मंदिराचा जीर्णोद्धार सरकारी पैशाने होऊ नये, जनतेने त्याचा खर्च उचलला पाहिजे."
मे 1951 मध्ये सोमनाथ मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले, तेव्हा मंदिर ट्रस्टने राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना उद्घाटनासाठी आमंत्रित केले.

फोटो स्रोत, Getty Images
इतिहासकार रामचंद्र गुहा त्यांच्या 'इंडिया आफ्टर गांधी' या पुस्तकात लिहितात की, पंतप्रधान नेहरू यामुळे नाराज झाले होते.
नेहरूंनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले, "सोमनाथ मंदिराच्या मोठ्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्याची तुमची कल्पना मला आवडलेली नाही. हे फक्त मंदिरात जाण्यापुरते मर्यादित नाही. कोणीही मंदिरात जाऊ शकतं, पण ज्या घटनेचे अनेक राजकीय अर्थ निघू शकतात अशा कार्यक्रमात सहभागी होणे योग्य नाही."
राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना उत्तर दिले की, राष्ट्रपती म्हणून मला मंदिर उद्घाटन करण्यात काहीही चुकीचे वाटत नाही.
त्यानंतर ते सोमनाथला गेले आणि त्यांनी मोठ्या थाटामाटात नव्याने बांधलेल्या सोमनाथ मंदिराचे उद्घाटन केले.
एका महिन्यानंतर नेहरूंनी त्यांना लिहिले, "मला सोमनाथबद्दल चिंता वाटत आहे. मला भीती होती तसे आता या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त होत आहे.
आपल्या धोरणावर टीका होत आहे की, एक धर्मनिरपेक्ष देश अशा कार्यक्रमाशी स्वतःला कसे काय जोडू शकतो जो मुळात धार्मिक पुनरुज्जीवनवादाचा आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











