रेझा पहलवी : इराणमधील आंदोलनांदरम्यान चर्चा होत असलेले राजपुत्र कोण आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बीबीसी न्यूज पर्शियन
इराणचे शेवटचे शाह (राजे), यांचे निर्वासित पुत्र रेझा पहलवी यांनी मोठ्या प्रमाणात नवं आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. गुरुवारी हे आंदोलन होणार आहे. इराणमध्ये अलीकडे झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं.
रेझा पहलवी हे इराणच्या शाह यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. इराणमध्ये 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर शाह यांना पदच्युत करण्यात आलं होतं.
रेझा पहलवी यांनी सोशल मीडियावर दिलेल्या एका संदेशात म्हटलं की, अलीकडेच झालेल्या आंदोलनांमधील लोकांचा सहभाग 'अभूतपूर्व' होता.
त्यांनी असंही म्हटलं आहे की "या आंदोलनामुळे सरकार खूप घाबरलं आहे आणि आंदोलनं थांबवण्यासाठी पुन्हा एकदा इंटरनेट बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा बातम्या मिळाल्या आहेत."
इराणची उभारणी करण्यात पुन्हा एकदा भूमिका बजावू पाहणाऱ्या या माजी युवराजाबद्दल नेमकी काय माहिती आहे?
इराणमधील त्या प्रसिद्ध मयूर सिंहासनाचा वारसा मिळवण्यासाठी किंवा इराणचा राजा होण्यासाठीच, रेझा पहलवी यांची लहानपणापासून जडणघडण झाली होती.
मात्र 1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीमध्ये रेझा पहलवी यांच्या वडिलांची राजेशाही संपुष्टात आली होती. त्यावेळी रेझा अमेरिकेत लढाऊ वैमानिकाचं (फायटर पायलट) प्रशिक्षण घेत होते.
अमेरिकेतील वास्तव्य
रेझा पहलवी यांचे वडील मोहम्मद रेझा शाह पलहवी यांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं हे त्यावेळेस रेझा पहलवी दुरून पाहत होते.
कधीकाळी त्यांच्या वडिलांना पाश्चात्य मित्र राष्ट्रांचा पाठिंबा होता. मात्र इराणमधील त्यांची राजवट उलथवून टाकण्यात आल्यानंतर दुसऱ्या देशात आश्रय मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला होता आणि अखेर कर्करोगानं इजिप्तमध्ये मृत्यू झाला होता, हे सर्व रेझा यांनी पाहिलं होतं.
अचानक सत्ता हातातून गेल्यामुळे हा तरुण युवराज राहिला नाही. तर, त्यांना आपला म्हणता यावा, असा देशही राहिला नव्हता. हद्दपार झाल्यावर, कमी होत जाणाऱ्या विश्वासू, हितचिंतक आणि समर्थकांवर ते अवलंबून होते.
नंतरच्या दशकांमध्ये, या कुटुंबावर एकापेक्षा अधिक वेळा शोकांतिका ओढवली.
रेझा पहलवी यांची लहान बहीण आणि त्यांचा भाऊ या दोघांनीही आत्महत्या केली. परिणामी ते एका अशा शाही कुटुंबाचे प्रतिकात्मक प्रमुख बनले होते. ते इतिहासाचा भाग झाल्याचं अनेकांनी मानलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
रेझा आता 65 वर्षांचे आहेत. ते पुन्हा एकदा त्यांच्या देशाच्या उभारणीत, भवितव्य घडवण्यात भूमिका शोधत आहेत.
वॉशिंग्टन डीसीजवळच्या एका शांत उपनगरात राहतात. ते प्रसिद्धीपासून दूर राहणारे असून त्यांना सहज भेटता येतं असं त्यांचे समर्थक म्हणतात.
ते अनेकदा पत्नी यास्मिन यांच्यासोबत स्थानिक कॅफेमध्ये जातात. तेव्हाही त्यांच्यासोबत कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते.
2022 मध्ये एका व्यक्तीनं रेझा पहलवी यांना विचारलं होतं की, ते स्वतःला इराणमध्ये होत असलेल्या आंदोलनाचे नेते म्हणून पाहतात का? त्यावर रेझा आणि यास्मिन यांनी एकाच सुरात "बदल आतूनच झाला पाहिजे" असं उत्तर दिलं होतं.
एक निर्णायक वळण
मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचा सूर अधिक स्पष्ट आणि दृढ झाला आहे. 2025 मध्ये इस्रायलनं इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले होते.
त्यानंतर पहलवी यांनी पॅरिसमधील एका पत्रकार परिषदेत, इस्लामिक प्रजासत्ताक कोसळलं तर हंगामी सरकारचं नेतृत्व करण्यास ते तयार आहेत, असं जाहीर केलं होतं.
तेव्हापासून त्यांनी एका हंगामी सरकारची 100 दिवसांच्या योजनेची रूपरेषा मांडली.
हद्दपार होऊन निर्वासित म्हणून जगल्यानं जे धडे मिळाले आहेत आणि वडील जे काम 'अपूर्ण' सोडून गेले आहेत, त्यातून हा नवीन आत्मविश्वास आला असल्याचं ते सांगतात.
"भूतकाळ किंवा भूतकाळातील स्थिती पुन्हा आणण्यासाठी हे नसून, इराणच्या सर्व लोकांचं लोकशाही भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे," असं ते पॅरिसमध्ये पत्रकारांना म्हणाले होते.
राजेशाही कुटुंबात वाढले
रेझा पहलवी यांचा जन्म ऑक्टोबर 1960 मध्ये तेहरानमध्ये झाला होता. शाह यांना आधी दोन लग्न झालेली असूनही वारसदार मिळाला नव्हता. त्यानंतर झालेले रेझा हे त्यांचे एकमेव पुत्र होते.
शाह यांचे पुत्र असल्यामुळे रेझा यांचं संगोपन अतिशय अभिजात, शाही वातावरणात झालं.
रेझा यांना शिकवण्यासाठी खासगी शिक्षक होते. लहानपणापासूनच त्यांना राजेशाही सांभाळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
रेझा 17 वर्षांचे असताना त्यांना लढाऊ वैमानिकाचं (फायटर पायलट) प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील टेक्सासमध्ये पाठवण्यात आलं होतं.
मात्र परत येऊन त्यांनी शाह यांच्या राजवटीत काम करण्यापूर्वीच, त्यांच्या वडिलांची म्हणजे मोहम्मद रेझा शाह पलहवी यांची राजवट इस्लामिक क्रांतीनं उलथवून टाकली होती.
तेव्हापासून, रेझा पहलवी अमेरिकेतच राहतात.
त्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला. नंतर त्यांनी वकील असलेल्या आणि इराणी-अमेरिकन असलेल्या यास्मिन यांच्याशी लग्न केलं. या विवाहातून त्यांना तीन मुली आहेत, नूर, इमान आणि फराह.
विभाजनवादी सत्तेचा वारसा
निर्वासित म्हणून राहत असताना, रेझा पहलवी हे राजेशाहीच्या समर्थकांसाठी एक प्रभावशाली प्रतीक ठरले आहेत. अनेकजण पहलवी यांच्या कालखंडाला वेगानं आधुनिकीकरण होण्याचा आणि पाश्चात्य देशांशी घनिष्ठ संबंधांचा काळ मानतात.
तर इतर काहीजण त्याला सेन्सॉरशिप आणि भयानक सावाक गुप्त पोलिसांचा काळ म्हणून आठवतात.
सावाक गुप्त पोलिसांचा वापर मतभेद दडपण्यासाठी केला जात असे. मानवाधिकारांचं उल्लंघन ही जणू त्यांची ओळख बनली होती.
रेझा पहलवी यांच्या इराणमधील लोकप्रियतेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चढ-उतार होत राहिले आहेत.
त्यांनी 1980 मध्ये इजिप्तमधील कैरोमध्ये एक प्रतिकात्मक राज्याभिषेक समारंभ आयोजित केला होता. तिथे त्यांनी स्वत:ला शाह घोषीत केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्या राज्याभिषेकाचा फारसा व्यावहारिक परिणाम नसला, तरीही काही विरोधकांच्या मते, त्यामुळं रेझा पहलवी यांच्या सध्याच्या लोकशाही सुधारणांच्या संदेशाचा प्रभाव कमी होतो.
त्यांनी विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. यात नॅशनल काऊन्सिल ऑफ इराण फॉर फ्री इलेक्शन्सचा समावेश आहे. 2013 मध्ये ही आघाडी सुरू करण्यात आली होती.
यापैकी बहुतांश आघाड्यांना अंतर्गत मतभेद आणि इराणमध्ये असलेला मर्यादित प्रभाव यामुळे संघर्ष करावा लागला आहे.
काही निर्वासित विरोधी गटांच्या उलट, पहलवी यांनी सातत्यानं हिंसाचार नाकारला आहे आणि मुजाहिदीन-ए खलक (एमईके) सारख्या सशस्त्र गटांपासून अंतर राखलं आहे.
त्यांनी वारंवार, शांततामय सत्तांतर करण्यासाठी आणि इराणची भविष्यातील राजकीय व्यवस्था ठरवण्यासाठी राष्ट्रीय सार्वमत घेण्याची मागणी केली आहे.
परदेशातील वाद
पहलवी यांनी 2023 मध्ये इस्रायलला दिलेल्या वादग्रस्त भेटीमुळं त्यांच्याबद्दलच्या मतांमध्ये ध्रुवीकरण झालं. पहलवी यांनी तिथे होलोकॉस्टच्या स्मृती कार्यक्रमात भाग घेतला आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली.
गेल्या काही वर्षांमध्ये पहलवी यांच्याकडं पुन्हा लक्ष वेधलं गेलं आहे.
2017 च्या सरकारच्या विरोधातील आंदोलनांमध्ये 'रेझा शाह, तुमच्यावर दैवी कृपा राहो' अशा प्रकारच्या, त्यांच्या आजोबांचा संदर्भ देणाऱ्या घोषणा पुन्हा ऐकू येऊ लागल्या.
2022 मध्ये पोलीस कोठडीत महसा अमिनीच्या हत्येमुळे देशभरात आंदोलनं सुरू झाली. त्यानंतर रेझा पहलवी पुन्हा प्रसारमाध्यमांच्या प्रकाशझोतात आले.
इराणच्या विभक्त किंवा विस्कळीत झालेल्या विरोधकांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर सावधगिरीनं रस दाखवला गेला. मात्र त्यांना तो टिकवून ठेवता आला नाही.
टीकाकारांचा युक्तिवाद आहे की चार दशकं परदेशात राहिल्यानंतर देखील त्यांना अजून एखादी टिकणारी संघटना किंवा स्वतंत्र प्रसारमाध्यम तयार करता आलेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलला 2023 मध्ये दिलेल्या वादग्रस्त भेटीमुळे त्यांच्याबद्दल मतांमध्ये आणखी ध्रुवीकरण झालं.
पहलवी होलोकॉस्टच्या स्मारक कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भेटले होते.
काही इराणी लोकांनी याकडे व्यावहारिक संपर्क म्हणून पाहिलं, तर काहींनी याकडे इराणच्या अरब आणि मुस्लीम मित्रांना दूर किंवा वेगळं करणारी कृती म्हणून पाहिलं.
अलीकडेच इस्रायलनं इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर, पहलवी यांना कठीण प्रश्नांना तोंड द्यावं लागलं.
बीबीसीच्या लॉला कुएन्सबर्ग यांना दिलेल्या मुलाखतीत, त्यांना विचारण्यात आलं होतं की नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या इस्रायलच्या हल्ल्यांना ते पाठिंबा देतात का.
यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की, सर्वसामान्य इराणी लोकांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही. 'इराणमधील राजवटीला कमकुवत करणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं' इराणमधील अनेकजणांकडून स्वागत केलं जाईल, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यांमुळं वाद निर्माण झाला.
अनिश्चित भविष्य
पहलवी हे सध्या स्वत:ला भावी राजा म्हणून नाही तर, राष्ट्रीय सलोखा निर्माण करण्यासाठीचे प्रतिकात्मक नेते म्हणतात.
इरामध्ये मुक्त निवडणुका व्हाव्यात, कायद्याचं राज्य असावं आणि महिलांना समान हक्क असावेत या दिशेनं इराणची वाटचाल होण्यासाठी त्यांना मदत करायची आहे, असं ते सांगतात.
इराणमध्ये राजेशाही पुन्हा प्रस्थापित करायची की प्रजासत्ताक स्थापन करायचं, याचा अंतिम निर्णय देशव्यापी मतदानावर सोडणार असल्याचं ते सांगतात.
त्यांचे समर्थक त्यांच्याकडे, ओळख असलेला एकमेव विरोधी नेता आणि शांततामय बदलासाठी दीर्घकाळ कटिबद्धता असलेला नेता म्हणून पाहतात.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
तर टीकाकारांच्या मते, ते परदेशी पाठिंब्यावर खूप जास्त अवलंबून आहेत. इराणमधील अनेक दशकांच्या राजकीय गोंधळ, अनिश्चिततेनंतर अतिशय थकलेले इराणमधील लोक कोणत्याही निर्वासित नेत्यावर विश्वास ठेवण्यास तयार आहेत का, असा प्रश्न टीकाकार उपस्थित करतात.
इराणचं सरकार पहलवी यांना एक धोका म्हणून सादर करतात. त्यामुळे खुल्या राजकीय वातावरणाशिवाय आणि विश्वासार्ह निवडणुकांशिवाय पहलवी यांना नेमका किती पाठिंबा आहे, हे मोजणं अशक्य आहे.
काही इराणी लोकांना पहलवी यांच्या कुटुंबाबद्दल अजूनही प्रचंड आदर आहे. इतरांना लोकशाहीच्या आवरणाखाली का होईना, एका न निवडलेल्या शासकाच्या जागी दुसऱ्या शासकाला आणण्याबद्दल भीती वाटते.
पहलवी यांच्या वडिलांचं पार्थिव कैरोमध्ये दफन करण्यात आलेलं आहे. राजेशाहीचे समर्थक एक दिवस त्यांना इराणमध्ये प्रतीकात्मकदृष्टया परत आणलं जाईल, या गोष्टीची वाट पाहत आहेत.
निर्वासित युवराजांना तो दिवस पाहायला मिळेल की नाही, स्वतंत्र इराण पाहायला मिळेल की नाही? भूतकाळाशी संघर्ष करत असलेल्या या राष्ट्राबद्दलच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











