अयातुल्लाह खोमेनी: सलमान रश्दी यांना मारून टाकण्याचा फतवा काढणारे हुकूमशहा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
3 जून 1989...इराणचे धर्मगुरू आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला मौसावी खोमेनी यांचं निधन झालं. इराणचा 80 वर्षांचा इतिहास बघायला गेलं तर ते असे एकमेव नेते होते ज्यांचा अगदी सामान्य परिस्थितीत मृत्यू झाला.
नाहीतर याआधीच्या इराणच्या प्रमुखांना आपल्याच देशातून निर्वासित व्हावं लागलं तर कधी मारेकऱ्यांच्या हातून मृत्यू पत्करावा लागला. खुमैनीचं निधन झाल्यावर इराण सरकारने त्यांना हजरत मोहम्मद आणि इमामांनंतरचे सर्वात अलौकिक पुरुष असल्याची उपाधी दिली होती.
खोमेनीचा जन्म 24 सप्टेंबर 1902 रोजी इराणमधील खोमेन शहरात झाला. लोकांशी अगदी मोजकंच बोलणाऱ्या खोमेनीनी वयाच्या सहाव्या वर्षापासूनच कुराण वाचायला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी कोम शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
अयातुल्ला बनल्यावर खोमेनी यांनी इराणचे शाह आणि त्यांच्या अमेरिका संबंधांबाबत टीका करायला सुरुवात केली होती. ज्याचा परिणाम खोमेनीची हकालपट्टी करण्यात आला.
तिथून अयातुल्ला तुर्कीला रवाना झाले. त्यानंतर इराक आणि नंतर फ्रान्स असा प्रवास केला.
बीबीसी फारसीचे चाहते

फोटो स्रोत, Getty Images
फ्रान्समध्ये असताना खोमेनीच्या दिवसाची सुरुवात पहाटे 3 वाजता व्हायची. म्हणजे सकाळचा नमाज पठण करण्याआधी जो वेळ मिळायचा तो ते वाचनात घालवायचे.
सात वाजता नाश्ता करण्यापूर्वी ते परदेशी वृत्तपत्रांचे फारसी भाषांतर वाचायचे.
बकर मोईन त्यांच्या ' खोमेनी: द लाइफ ऑफ अयातुल्ला' या पुस्तकात लिहितात, "त्याच्या पुढचे तीन तास ते इराणमधील बातम्या आणि त्यांच्या वैयक्तिक विषयांवर चिंतन करायचे. पुन्हा दहा ते बारा वाजेपर्यंत प्रार्थना करायचे. एक वाजता जेवून झाल्यावर ते तासभर वामकुक्षी घ्यायचे. तीन वाजल्यानंतर दोन तास राजकीय कामकाज बघण्यात घालवायचे. त्यांना दिवसभरात जेव्हा केव्हा वेळ मिळायचा तेव्हा ते जवळच्या गावात फिरायला जायचे."
फ्रान्समध्ये त्यांना सरकारी सुरक्षा होती त्यामुळे शक्यतो एकट्याने बाहेर जाणं व्हायचं नाही. नऊ वाजता त्यांचा दिवस संपायचा आणि ते आपल्या कुटुंबियांसोबत जेवण करायचे.
यानंतर ते परदेशी रेडिओ स्टेशन्सचे विशेषतः बीबीसीच्या फारसी सेवेचे रेकॉर्डिंग ऐकायचे. आपल्या नातवंडांसोबत खेळताना ते जास्त आनंदी असायचे.
इराणच्या शाहला सत्तेवरून हटवलं

फोटो स्रोत, Getty Images
खोमेनी यांनी इस्लामिक समाजातील स्त्रियांसाठी खूप प्रतिगामी भूमिका घेतली असली तरी त्यांची आपल्या पत्नी आणि कुटुंबाप्रती समर्पणाची भूमिका होती.
त्यांच्या मुलीने एकदा इराणी टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीत सांगितलं होतं की, "त्यांनी आजवर आमच्या आईला पाण्याचा एक ग्लास देखील मागितला नाही."
1979 च्या सुरुवातीस इराणमध्ये अराजकता पसरली होती, अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती, तेल उत्पादनावर गंभीर परिणाम झाला होता. देशाच्या राजधानीत डाव्या उजव्यांमध्ये रक्तरंजित लढाई सुरू होती. आणि अशा परिस्थितीत खुमैनी यांनी इराणच्या शाहाला सत्तेवरून खाली खेचलं होतं.
इराणमध्ये क्रांती सुरू झाल्याचं पाश्चिमात्य देशांच्या पचनी पडलं नव्हतं. कारण इराणमध्ये राजकीय परिस्थिती अत्यंत स्थिर असल्याचं जगाला वाटत होतं. त्यामुळे इराणच्या शाहने आपली गादी सोडणं असेल किंवा खोमेनीचा सर्वोच्च धर्मगुरू म्हणून उदय असेल, सगळ्या गोष्टी एका दिवसात घडल्या नव्हत्या.
खजिना ताब्यात घेण्यात शाहाला अपयश

फोटो स्रोत, Getty Images
इराणी शाहच्या काळात इराण पाश्चिमात्य देशांच्या पंखांखाली होता आणि अयातुल्ला यांनी नेहमीच याला उघड विरोध केला. याच कारणामुळे त्यांना 1962 मध्ये अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे ते देशाचे हिरो ठरले.
त्यांनी तुर्की, इराक, फ्रान्स असा प्रवास केला. या देशांमध्ये राहून त्यांनी आपल्या समर्थकांची मोट बांधली आणि शाहला सत्तेवरून खाली खेचण्याचं आवाहन केलं.
1979 साल उजाडेपर्यंत शाहच्या लोकप्रियतेला आहोटी लागली होती. संपूर्ण देशात जाळपोळ, निदर्शनं, संप सुरू झाले.
आता इराण सोडलं पाहिजे असं शाहने मनोमन ठरवलं. पण त्यांनी 16 जानेवारीपर्यंत तेहरान काही सोडलं नाही. आपल्यासोबत शाही खजिना नेता येईल म्हणून शाहाने इतके दिवस इराण मध्येच काढले.
मोहम्मद हेकाल त्यांच्या 'द रिटर्न ऑफ द अयातुल्ला' या पुस्तकात लिहितात, "खरं तर राज्याभिषेकादिवशी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने जे दागदागिने घातले होते ते त्यांना सोबत न्यायचे होते. त्यांनी रॉयल गार्ड्सना कित्येकदा बँकेच्या दारात पाठवलं, शाही तिजोरी जबरदस्तीने खोलण्याचा प्रयत्नही केला पण हाती काहीच लागलं नाही."
"सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाही तिजोरी जमिनीपासून 20 मीटर खोल तयार करण्यात आली होती. तिजोरीची माहिती असणारे बँकेचे अधिकारी गायब होते. अखेर शाही तिजोरी सुरक्षित ठेवण्यासाठी शाह यांनी घेतलेली खबरदारी त्यांच्याच अंगलट आली. आणि दागदागिन्यावर पाणी सोडून त्यांना इराण सोडून निघावं लागलं."
त्याकाळी या दागिन्यांचा 500 अब्जांचा विमा उतरवला होता. हा खजिना आजही इराणच्या बँकेत सुरक्षित आहे.
अनेक देशांचा शाहला आश्रय देण्यास नकार

फोटो स्रोत, Getty Images
इजिप्तच्या अधिकृत दौऱ्यावर जात असल्याच्या थाटात शाहने इराण सोडलं. सुरुवातीला त्यांना जॉर्डनला जायचं होतं पण जॉर्डनच्या राजाने त्याची विनंती नम्रपणे नाकारली.
त्यानंतर शाहाचा ताफा नाईल नदीवरील अस्वान रिसॉर्टवर पोहोचला. तिथे त्यांनी इराणचे शासक असल्याच्या थाटात प्रवेश केला. तिथे त्यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात यांच्यासोबत तीन दिवसीय शिखर परिषद घेतली.
त्याच ठिकाणी त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांचीही भेट घेतली. इजिप्तमध्ये पाच दिवस घालवल्यानंतर शाह 22 जानेवारीला मोरोक्कोची राजधानी माराकेशच्या दिशेने रवाना झाले.
माराकेशमध्ये पाच दिवस राहून नंतर अमेरिकेला जाण्याची त्यांची योजना होती. पण त्यांच्या जावयाने आणि अमेरिकेतील इराणच्या राजदूताने निरोप दिला की, अमेरिकेने आपला विचार बदलला असून इथे तुमचं स्वागत होणार नाही.
तीन आठवड्यांनंतर मोरोक्कोच्या शाहने त्याच्या एडीसीला इराणच्या शाहकडे पाठवलं. त्याच्याकरवी निरोप दिला की, आमच्या देशात तुम्हाला आश्रय देण्याची आमची प्रामाणिक इच्छा आहे, पण आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. त्यामुळे आमची इच्छा असूनही तुम्हाला शरण देता येणार नाही. पुढे 27 जुलै 1980 मध्ये इराणच्या शाहचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
तेहरान ताब्यात घेण्यासाठी खोमेनी पॅरिसहून निघाले
दुसऱ्या बाजूला 1 फेब्रुवारी 1979 च्या रात्री एक वाजता पॅरिस विमानतळावरून 'द मे फ्लॉवर' या खास चार्टर्ड बोईंग 747 विमानाने तेहरानच्या दिशेने उड्डाण केलं. या विमानात इराणच्या क्रांतीचे नायक अयातुल्ला रोहिल्ला खोमेनी होते. निर्वासित म्हणून 16 वर्ष बाहेरच्या देशात घालवल्यानंतर खोमेनी आपल्या मायदेशी परतत होते.
विमानात एकूण 168 प्रवासी होते. विमानावर हल्ला होऊ शकतो या भीतीने या विमानात कोणत्याही महिलामुलांना सहभागी करून घेतलं नव्हतं. आणि अशी शंका येणं स्वाभाविक होतं.
कॉन कॉफलिन त्यांच्या ' खोमेनीज घोस्ट' या पुस्तकात लिहितात, "इराणच्या हवाई दलाच्या वरिष्ठ कमांडरला खोमेनीना घेऊन येणारं विमान पाडायचं होतं. त्यांनी इजिप्तमध्ये शरण घेतलेल्या शाहशी संपर्क साधला, आणि विनापरवानगी इराणच्या हद्दीत घुसणारं खोमेनींचं विमान उडवण्याची परवानगी मागितली पण शाहने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही."
इजिप्तचे प्रसिद्ध पत्रकार मोहम्मद हैकाल त्यांच्या 'द रिटर्न ऑफ द अयातुल्ला' या पुस्तकात लिहितात की, "विमानात बसताच खोमेनी विमानाच्या वरच्या भागात गेले. तिथे त्यांनी वजू केली, नमाज पठण केलं आणि थोडं दही खाल्लं. त्यानंतर त्यांनी विमानाच्या जमिनीवर गादी टाकली, दोन पांघरूण घेतली आणि झोपले. अडीच तास झोप घेल्यानंतर त्यांनी पुन्हा नमाज पठण केलं आणि ऑम्लेटचा हलका नाश्ता केला."

फोटो स्रोत, Getty Images
विमानाच्या मागच्या भागात त्यांची माणसं आणि जवळपास 100 पत्रकार बसले होते. विमानाने इराणच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच एबीसी न्यूजचे प्रतिनिधी पीटर जेनिंग्स यांनी खोमेनी यांना विचारलं की, इराणमध्ये परत येऊन तुम्हाला कसं वाटतंय? यावर अयातुल्ला म्हणले, 'हिची' म्हणजे काहीच नाही.
त्यावर त्यांचे फारसी अनुवादक असलेल्या सादेग गोतबजादा यांनी आश्चर्याने आपल्या शब्दांवर जोर देत पुन्हा 'हिची?' असं विचारलं. त्यावर खोमेनी म्हणाले, 'हिच अहसासी नदरम'. म्हणजे मला काहीच वाटत नाहीये.
त्याच विमानात बीबीसी प्रतिनिधी जॉन सिम्पसन सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज फ्रॉम नो मॅन्स लँड’ या आत्मकथेत लिहिलं, “खुमैनी यांच्याबरोबर तेहरानला जाणं हा एक भीषण अनुभव होता. आमच्याबरोबर असलेल्या प्रवाशांना पूर्ण विश्वास होता की वायूसेना आमचं विमान पाडेल. विमानात काही वेळ आम्ही खोमेनी यांच्याशी संवाद साधला. ते फार बोलणारे गृहस्थ नव्हते. जेव्हा मी त्यांना एखादा प्रश्न विचारायचो तेव्हा ते खिडकीबाहेर पहायचे.”
विमान उतरण्याआधी खोमेनी यांच्या विमानाने तेहरानला तीन चकरा मारल्या. शेवटी एक फेब्रुवारी सकाळी साडेनऊ वाजता खोमेनी यांचं विमान मेहराबाद विमानतळावर उतरलं. जसा विमानाचं दार उघडलं, तसं एक काळा साफा आणि पायघोळ पायजामा घातलेल्या एका बारीक चणीच्या माणसाने 16 वर्षानंतर त्यांनी चेहऱ्यावर इराणच्या थंड हवेचा झोत चेहऱ्यावर घेतला.
खोमेनी यांच्या स्वागतासाठी उसळली गर्दी

फोटो स्रोत, Getty Images
त्यांची एक बाही एअर फ्रान्सच्या एका कर्मचाऱ्याने पकडली होती. तिकडे खोमेनी यांच्या स्वागतासाठी इराणी लोकांचा पूर आला होता. त्यांना आधी आकाशी रंगाच्या मर्सिडिजमध्ये बसवण्यात आलं. मात्र लोकांची इतकी गर्दी झाली की त्यांना हेलिकॉप्टरमध्ये शिफ्ट करावं लागलं. जेव्हापर्यंत ते कारमध्ये होते तेव्हापर्यंत ज्या रस्त्यावरून ते जात होते त्याचं नाव विचारत होते. अनेक वर्षांआधी जेव्हा त्यांनी तेहरान सोडलं होतं तेव्हा आणि आत्ताच्या तेहरानमध्ये बराच फरक पडला होता.
तेव्हापर्यंत शाह यांच्या काळात प्रधानमंत्री शाहपूर बख्तियार यांनी राजीनामा दिला नव्हता. खोमेनी यांनी त्याकडे दुर्लक्ष करत मेहदी बजरगान यांना पंतप्रधान केलं.
मोहम्मद हेकाल लिहितात, “बख्तियार यांना दाखवायचं होतं की सत्तेवर अजूनही त्यांचाच ताबा आहे. त्यासाठी त्यांनी पूर्ण देशात कर्फ्यू लावला. जेव्हा खोमेनी यांनी हे ऐकलं तेव्हा त्यांनी कागदाचा एक तुकडा काढला आणि त्यावर फारशी भाषेत लिहिलं, ‘कर्फ्यूचं पालन करू नका.’
तो कागदाचा तुकडा प्रत्येक टीव्ही चॅनलवर दाखवण्यात आला. त्यानंतर पाहता पाहता लोक कर्फ्यूचा आदेशाचा विरोध करत रस्त्यावर निघाले. जनरल गराबघी यांनी नवनियुक्त पंतप्रधान बजगगान यांना फोन करून सांगितलं की तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवा म्हणजे लष्कराचं नियंत्रण त्याच्या हातात देता येईल.
जनरल नसीरी यांना गोळ्या घातल्या
11 फेब्रुवारीला जनरल गराबघी यांनी अचानक घोषणा केली की आता लष्कर राजकीयदृष्ट्या तटस्थ राहील. त्यांनी सर्व सैनिकांच्या तुकड्यांना बराकीत जाण्याचा आदेश दिला.
त्या दिवशी रस्त्यावर क्रांतिकारकांचा ताबा होता. बख्तियार यांनी त्यांचं पद सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते भूमिगत झाले. त्या दिवसापासून जुन्या सत्तेशी निगडीत सैनिक अधिकाऱ्यांना अटक होण्यास सुरुवात झाली.
डेस्मंड हॉर्नी यांनी त्यांच्या ‘द प्रिस्ट अँड द किंग’ मध्ये लिहिलं, “12 फेब्रुवारीच्या रात्री शाह यांचे अगदी खास असलेल्या आणि त्यांच्यासारख्याच कुख्यात गुप्तचर यंत्रणा सवाकचे प्रमुख असलेल्या जनरल नसीरी यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना जनरल रबी, नजी आणि खोलरोदाद यांच्याबरोबर 15 फेब्रुवारीच्या रात्री शाळेच्या एका छतावर गोळ्या घालण्यात आल्या.”
एका आठवड्याआधीच खोमेनी यांनी या शाळेला त्यांचं मुख्यालय केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
खोमेनी यांनी खटल्याच्या सुनावणीसाठी सादेक खलखली यांना नियुक्त केलं. त्यांनी खलखली यांना आदेश दिला की या लोकांना जे काही सांगायचं आहे ते ऐकून घ्या आणि त्यानंतर ‘त्यांना नरकाची रसीद द्या’
फ्रान्समध्ये अयातुल्लाह खोमेनी यांनी इराणमध्ये लोकशाही बहाल करण्याची इच्छा जाहीर केली होती. मात्र इऱाणच्या भूमीवर पाऊल ठेवताच त्यांचा पूर्ण केंद्रबिंदू इराणमध्ये कट्टरवादी इस्लाम राज्याच्या स्थापना हाच होता.
कॉन कफलिन लिहितात, “ या जनरल लोकांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना शाळेच्या छतावर घेऊन जाण्यात आलं. तिथे एक एक करत त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. तिथे खोमेनी यांना त्यांच्या मरण्याची बातमी मिळाली तेव्हा ते स्वत: त्यांचे मृतदेह पहायला गच्चीवर गेले आणि एक मिनिटभर तिथे थांबले. त्यानंतर मृतदेहांची फिल्म तयार केली आणि इराणच्या टेलिव्हिजनवर दाखवली गेली.
इस्लाममध्ये असलेल्या न्यायाच्या परंपरेची पाळंमुळे पुन्हा एकदा घट्ट होणार आहे असा संदेश या कृतीतून त्यांना द्यायचा होता.
त्या घटनेच्या काही दिवसानंतर तेहरान विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने टिप्पणी केली, ‘मी समजत होतो की खोमेनी इराणमध्ये लोकशाही आणू पाहत आहे. मात्र आता मला असं वाटत आहे की एका हुकुमशहाची जागा दुसरा हुकुमशाह घेत आहे.”
सलमान रश्दी यांना मारण्याचा फतवा

फोटो स्रोत, Getty Images
1989 मध्ये खोमेनी यांनी ‘सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी आणि प्रकाशनाशी निगडीत लोकांना मारण्याचा फतवा काढला. त्यांनी जगभरातील मुस्लिमांना अपील केली की सलमान रश्दी दिसले की त्यांना मारून टाका.
रश्दी यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला 26 लाख डॉलरचं बक्षिस देण्याचंही त्यांनी जाहीर केलं. या फतव्यामुळे त्यांना आयुष्यभर कडक सुरक्षाव्यवस्थेत रहावं लागलं.
3 जून 1989 ला खुमैनी यांचा मृत्यू झाला तेव्हा तेहरान रेडिओ च्या निवेदकाने रडत रडत ही बातमी दिली.
संपूर्ण देशात आणीबाणीची घोषणा झाली, टेलीफोन लाईन्स कापल्या गेल्या, सर्व विमानतळं बंद करण्यात आली आणि इराणच्या सीमा बंद करण्यात आल्या.
अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी झाले

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी इराणचे राष्ट्रपती रफसनजानी यांना वाटलं की खोमेनी यांच्या जाण्याने इराणमध्ये स्थैर्य येईल.
खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराला लाखो इराणी लोक सहभागी झाले. त्यांच्या पार्थिव शरीराला लोकांच्या अंतिम दर्शनासाठी एका वातानुकुलित डब्यात ठेवण्यात आलं. एका अंदाजानुसार 20 लाख लोक खोमेनी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले.
त्यावेळी इतरी गर्दी झाली की तेहरानच्या अग्निशमन दलाने लोकांवर पाण्याचा वर्षाव केला जेणेकरून गर्मी आणि श्वास कोंडल्याने त्यांचा मृत्यू होऊ नये.
शेवटी गर्दीपासून बचाव करण्यासाठी त्यांचं पार्थिव एका हेलिकॉप्टरमध्ये शिफ्ट करावं लागलं. हेलिकॉप्टर लँड झाल्यावर खुमैनी यांच्या पार्थिव शरीरावर लोकांनी ताबा मिळवला.
त्यांचा मृतदेह गुंडाळलेल्या पांढऱ्या चादरीला लोक फाडायला लागले. त्याचे तुकडे जतन करावे असा त्यामागे उद्देश होता.
त्यांच्या मृतदेहाचं दफन झालं तेव्हा कमीत कमी दहा हजार लोक जखमी झाले आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








