सद्दाम हुसैन यांच्याकडील 'संहारक अस्त्रां'चा शोध जो कधी पूर्ण झाला नाही, कारण...

सद्दाम हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गॉर्डन कोरेरा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इराकवरील हल्ल्याला वीस वर्षं पूर्ण झाली. इराककडे ‘संहारक अस्त्रं’ असल्याचा दावा करत हा हल्ला करण्यात आला होता. याच दाव्यामुळे ब्रिटनलाही इराकविरुद्धच्या या मोहिमेत सहभागी होण्याचं कारण मिळालं होतं.

या संहारक अस्त्रांच्या शोधाबद्दलचे नवीन खुलासे बीबीसीच्या ‘शॉक अँड वॉर : इराक 20 इयर्स ऑन’ या नवीन सीरीजमधून समोर आले आहेत. इराकविरुद्धच्या मोहिमेत प्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या शेकडो लोकांशी साधलेल्या संवादावर ही सीरीज आधारित आहे.

एमआय 6 चे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेव्हा 2001 च्या शेवटच्या महिन्यात सांगितलं गेलं की, इराकसोबत युद्ध करण्याबाबत अमेरिका गंभीर आहे, तेव्हा त्यांना धक्का बसला होता.

ही घटना आठवून अमेरिकेचा गुप्तचर विभाग सीआयएनचे इराक ऑपरेशन ग्रुप प्रमुख लुईस रुएडा सांगतात, “त्यांना टेबलवर बसल्या बसल्या तिथेच हार्ट अटॅक येईल असं मला वाटलं. ते जर कोणी सज्जन गृहस्थ असते, तर येऊन मला कानशिलातच लगावली असती. ही बातमी लगेचच ब्रिटनमध्ये टेन डाऊनिंग स्ट्रीटला (पंतप्रधान निवासस्थान) पोहोचली. ती राजनयिक अधिकाऱ्यांऐवजी हेरांकडूनच कळली असावी.”

एमआई 6 चे तत्कालिन प्रमुख सर रिचर्ड डियरलव्ह यांनी बीबीसीला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, ब्रिटनच्या पंतप्रधानांना इराकवरील हल्ल्याबद्दल सांगणारी पहिली व्यक्ती ते होते.

ते सांगतात, “मी पंतप्रधानांना सांगितलं की, आवडो किंवा न आवडो पण तुम्ही आता तयारीला लागायला हवं. अमेरिका हल्ल्याची तयारी करत आहे, असं दिसतंय.”

ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआई 6 तिच्या इतिहासातील सर्वांत विवादास्पद आणि वाईट पद्धतीने गुंतविणाऱ्या मोहिमेत सहभागी होणार होती.

अमेरिकेसाठी सद्दाम हुसैनला सत्तेवरून हटविण्याचा मुद्दा हा संहारक अस्त्रांपेक्षा जास्त महत्त्वाचा होता.

रुएडा सांगतात, “जर सद्दाम हुसैनकडे रबर बँड आणि पेपरक्लिप असती तरी आम्ही इराकवर हल्ला केला असता.”

ब्रिटनला इराककडे असलेले रासायनिक, जैविक आणि आण्विक अस्त्रं जास्त धोकादायक वाटत होती.

युके सरकारला या संहारक अस्त्रांबाबत खात्रीलायक माहिती नव्हती, असा आरोप अनेकदा केला जातो. पण त्यावेळेच्या मंत्र्यांचं म्हणणं होतं की, आमच्या हेरखात्याने ही अस्त्रं असल्याची माहिती दिली होती.

युकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी सांगितलं होतं की, “मला जी गुप्त माहिती मिळाली होती, ती समजून घेणं गरजेचं होतं. मी त्या माहितीवर विश्वास ठेवला होता.”

जिम वॅटसन

फोटो स्रोत, Jim Watson

इराकवरील हल्ल्याच्या आदल्या रात्रीबद्दलही ब्लेअर यांनी सांगितलं. आपण संयुक्त गुप्तचर समितीकडे ही माहिती योग्य असल्याबाबत निर्वाळा मागितला होता. या समितीची चूक झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका करणं ब्लेअर टाळतात.

इतर मंत्र्यांनी मात्र आपल्या मनात त्यावेळी शंका निर्माण झाल्याचंही म्हटलं होतं.

तत्कालीन परराष्ट्र मंत्री जॅक स्ट्रॉ सांगतात, “तीन बैठकांमध्ये मी रिचर्ड डियरलव्ह यांना प्रश्न विचारले आणि त्यांच्या गुप्तचर सूत्रांबद्दल विचारलं होतं.”

“माझ्या मनात याबद्दल एक अस्वस्थता होती. पण प्रत्येकवेळी डियरलव्ह यांनी सांगितलं की, माहिती देणारा एजंट विश्वसनीय आहे.”

पण जॅक स्ट्रॉ सांगतात की, पण नेत्यांनी याची जबाबदारी घेणं आवश्यक होतं. कारण अंतिम निर्णय तर तेच घेणार होते.

जेव्हा बीबीसीने त्यांना विचारलं की, इराकबद्दलची माहिती हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश वाटतं का? याचं उत्तर मात्र त्यांनी नकारार्थी दिलं.

इराकमध्ये अस्त्रं होती आणि ती लपवून सीरियात पाठवली गेली, असंच त्यांना अजूनही वाटतं.

सद्दाम हुसैनकडे संहारक अस्त्रं होती?

रिचर्ड डियरलव

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ब्रिटनचे तत्कालिन सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांचे समन्वयक सर डेव्हिड ओमंड यांनी सांगितलं की, हे एक मोठं अपयश आहे.

सद्दाम हुसैनकडे संहारक अस्त्रं आहेत, यावरच तज्ज्ञांचं लक्ष वेधून घेण्यात आलं. ज्यांना हे पटत नव्हतं अशा लोकांना बाजूला केलं गेलं.

ही गोष्ट काळजीची असल्याचं एमआय 6 मधील काही लोकांचं म्हणणं होतं.

इराकमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, आम्ही जे करतोय ते चुकीचं असल्याचं आम्हाला वाटलेलं.

एका जुन्या अधिकाऱ्याने 2002 बद्दल बोलताना म्हटलं, “कोणतीही विश्वसनीय अशी गुप्त माहिती नव्हती, तरीही इराकमधील संहारक अस्त्रांचा आणि त्यापासून असलेल्या धोक्यांचा विषय पुन्हा उपस्थित करण्यात आला.”

“मला असं वाटतंय की, ही एकच अशी गोष्ट होती जी सरकारच्या दृष्टीने इराकमधील संहारक अस्त्रांच्या वैधतेचा मुद्दा सिद्ध करू शकणार होती.”

हे सगळं तेव्हा होत होतं, जेव्हा सप्टेंबर 2002 मध्ये डोझियरची योजना बनवली गेली होती.

गुप्तचर यंत्रणेतील एक सत्र एका मेसेजचा उलगडा करण्याची गोष्ट आठवून सांगतात. त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं की, या गुप्तचर यंत्रणेची भूमिका ही केवळ ब्रिटीश जनतेला इराकवरील कारवाईसाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याहून जास्त नव्हती.

मोबाईल लॅबचा विकास?

लंडन

फोटो स्रोत, Dan Kitwod

फोटो कॅप्शन, लंडनमधील MI6 चं मुख्यालय

12 सप्टेंबर 2002 या तारखेला सर रिचर्ड डियरलव्ह डाऊनिंग स्ट्रीटला एका नवीन सूत्राने दिलेली बातमी घेऊन आले. या सूत्राने सांगितलं होतं की, सद्दाम हुसैन यांनी संहारक अस्त्रांचा कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती लवकरच देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.

या सूत्राची विश्वासार्हता तपासली गेली नाही आणि त्याने दिलेली माहितीही तज्ज्ञांपर्यंत पोहचविण्यात आली नाही. मात्र, त्याचे तपशील पंतप्रधानांना पुरवले गेले.

आपण डाउनिंग स्ट्रीटचे (युकेचे पंतप्रधान) निकटवर्तीय बनलो होतो, हे आरोप मात्र सर रिचर्ड फेटाळून लावतात.

पुढच्या काही दिवसांत या नवीन सूत्राकडून कोणतेही पुरावे दिले गेले नाहीत. शेवटी तर त्याच्याकडे काही पुरावे नसावेतच असा निष्कर्ष काढला गेला.

काही लोकांना माहितीच्या बदल्यात पैसे हवे असावेत किंवा सद्दामला सत्तेवरून दूर करण्याच्या कटाचा ते भाग असावेत, अशी शक्यता होती.

सर रिचर्ड सांगतात, “जानेवारी 2003 मध्ये मी जॉर्डनमध्ये सद्दामच्या गुप्तचर यंत्रणेतील एका व्यक्तीला भेटलो. अमेरिकेला चकवून जैविक अस्त्रांवर काम करण्यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या मोबाईल लॅबच्या कामात आपण असल्याचा त्याचा दावा होता.”

याच व्यक्तिच्या दाव्यांमुळे अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. परंतु यानंतर लगेचच अमेरिकन सरकारने एक सूचना प्रसिद्ध करत या माहितीवर विश्वास ठेवता येणार नसल्याचं सांगितलं.

‘कर्व्हबॉल’ नावाचं सांकेतिक नाव असलेल्या एका सूत्रावर अमेरिका आणि ब्रिटनच्या सरकारचा विश्वास होता. त्यानेही मोबाईल लॅबबद्दल माहिती दिली होती.

संहारक अस्त्रांची चौकशी

2003 च्या युद्धाच्या काही आठवडे आधी मी हलब्जा गावाचा दौरा केला होता आणि स्थानिक लोकांना त्या दिवसाबद्दल बोलताना ऐकलं जेव्हा सद्दाम हुसैनच्या सैन्याने त्यांच्यावर रासायनिक अस्त्रांचा मारा केला होता.

नंतर इराकमधील एका शास्त्रज्ञाने माझ्याशी बोलताना सांगितलं होतं की, सद्दामने 1990 च्या दशकाच्या सुरूवातीला संयुक्त राष्ट्रांच्या इन्स्पेक्टरकडून ‘क्लीन चीट’ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हत्यारं नष्ट करण्याचे आदेश दिले होते.

त्याच शास्त्रज्ञाने सांगितलं की, नंतर पुन्हा सद्दामने हा कार्यक्रम हाती घेतलेला असू शकतो. पण इराकने असलेली अस्त्रं नष्ट केली होती. अर्थात, आपल्याकडे अजूनही अशी अस्त्रं आहेत, जी आपण इराणविरोधात वापरू शकतो, हा भ्रम कायम ठेवण्याचाही इराकचा प्रयत्न असावा.

सद्दाम हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे जेव्हा इराककडे सगळी अस्त्रं नष्ट केल्याचा पुरावा मागितला तेव्हा त्यांना तो देता आला नाही.

2002 च्या शेवटी संयुक्त राष्ट्रांचे इन्स्पेक्टर या अस्त्रांच्या चौकशीसाठी पुन्हा एकदा इराकला आले. जिथे मोबाईल लॅबची संयंत्रं असतील असा दावा करण्यात आला होता, त्या जागा अजूनही आठवत असल्याचं त्यातील काहीजणांनी बीबीसीला सांगितलं.

जानेवारी 2003मध्ये सर रिचर्ड यांना टोनी ब्लेअर यांनी गंमतीने म्हटलं होतं की, “माझं भविष्य तुमच्या हातात आहे. कारण ही संहारक अस्त्रं शोधण्याचा दबाव वाढत चालला आहे.”

सर रिचर्ड यांना हे फारच निराशाजनक वाटलं होतं. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या इन्स्पेक्टरवरच पुरेशा कार्यक्षमतेनं काम न केल्याचा आरोप केला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या रासायनिक आणि जैविक कार्यक्रमांचं नेतृत्व करणारे हान्स ब्लिक्स यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, 2003च्या सुरूवातीला अस्त्रं आहेत, असंच मला वाटत होतं. पण नंतर त्यांच्या अस्तित्वावर शंका निर्माण व्हायला लागली. आम्हाला ठोस पुरावे शोधायला अजून वेळ हवा होता, पण तो मिळाला नाही.

ही गोष्ट गुप्तहेर आणि राजकीय नेते दोघांसाठीही दीर्घ आणि खोलवर परिणाम करणारी होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)