जेव्हा एक फारसी लेखक सोमनाथ मंदिराचं रहस्य जाणून घेण्यासाठी ब्राह्मण झाला होता

फोटो स्रोत, Alamy
- Author, मिर्झा एबी बेग
- Role, बीबीसी उर्दू, दिल्ली
जगभरात एखाद्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता त्याच्या पदव्यांवरून ओळखली जाते. पण 100 वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात एखाद्याची शैक्षणिक पात्रता त्यानं 'गुलिस्तां' आणि 'बोस्तां' हे ग्रंथ वाचले आहेत का, यावरून तपासली जात असे.
ही दोन्ही पुस्तके एखाद्या पदवीपेक्षा कमी नव्हती. सज्ञान होईपर्यंत गुलिस्तां आणि बोस्तां हे ग्रंथ वाचल्याचा उल्लेख अनेक महत्त्वाच्या लोकांच्या चरित्रांमध्ये आढळतो.
ही दोन्ही पुस्तके जवळपास 750 वर्षांपूर्वी तेराव्या शतकात अबू मोहम्मद मुस्लेह उद्दीन बिन अब्दुल्ला शिराझी यांनी लिहिली होती. जी आजही वापरात आहेत.
त्यांना शेख सादी किंवा सादी शिराझी या नावानं ओळखलं जात असे. ते इराणमधील शिराझ शहरातून येत असल्यामुळे त्यांना शिराझी म्हणून ओळखलं जायचं.
गुलिस्तानच्या 'बनी आदम आझाई यक दीगरन्द' या कवितेची ही ओळ इराणच्या नाण्यावर लिहिली गेली आहे. सर्व मानव एकमेकांचे अंश आहेत, असा या ओळीचा अर्थ आहे.
2005 मध्ये इराणकडून न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाला एक गालिचा भेट देण्यात आला. त्यावर ही संपूर्ण नज्म चितारण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
याबाबत संयुक्त राष्ट्र संघाचे माजी अध्यक्ष बान की मून म्हणाले होते, "संयुक्त राष्ट्रांच्या आतील दरवाजाच्या भिंतीला सजवणारा एक भव्य गालिचा आहे. ही इराण देशवासीयांची भेट आहे. या गालिचावर महान पर्शियन कवी सादी यांचे अप्रतिम शब्द लिहिले गेले आहेत."
कोलकाता विद्यापीठातील पर्शियनचे प्राध्यापक मोहम्मद शकील यांच्या मते, 700 वर्षांनंतरही जर एखादा कवी इतका महत्त्वाचा आणि समकालीन असेल तर त्याला ‘बुलबुल-ए-शिराझ’ आणि 'शब्दों का पैगंबर' का म्हणू नये?
सुरुवातीचं जीवन
मोहम्मद शकील सांगतात की, सादीचा अर्थ भाग्यवान आहे आणि त्यांची आजपर्यंतची लोकप्रियता त्याचं उदाहरण आहे.
शेख सादी यांच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, पण त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये स्वत:बद्दल जे काही सांगितलं आहे, त्या आधारे त्यांच्या जीवनाविषयी चांगली माहिती मिळते आणि ती पुरेशी आहे, असं शकील सांगतात.
'सनादीद-ए-अजम' या पर्शियन इतिहासाच्या पुस्तकात त्यांच्या जन्माविषयी म्हटलंय की, सादी यांचा जन्म 1200 च्या पहिल्या दशकात शिराजमध्ये झाला आणि जवळजवळ ते 100 वर्षे जगले.

फोटो स्रोत, Alamy
पण, इतर इतिहासकारांनी त्यांचं वय 81 ते 82 वर्षे सांगितलं आहे. त्यांच्या मते, सादी यांचा जन्म 1210 च्या आसपास झाला आणि मृत्यू 1291-92 मध्ये झाला.
प्रसिद्ध उर्दू कवी आणि इतिहासकार अल्ताफ हुसेन हाली यांनी त्यांच्या 'हयात-ए-सादी' या पुस्तकात लिहिलंय, सादी यांचं वडिलांच्या आदेशानं शिक्षण सुरू केलं होतं आणि त्यांना शिक्षणापेक्षा अध्यात्माची जास्त आवड होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच सादी यांच्यावर अध्यात्माचं गारुड होतं.
वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा ते त्या काळातील सर्वांत लोकप्रिय शैक्षणिक संस्था ‘मदरसा निजामिया’मध्ये गेले तेव्हा त्यांना शैक्षणिक आवड निर्माण झाली.
विद्यार्थीदशेत सुफी नृत्यापासून दूर
हाली लिहितात की, शेख सादी लहानपणापासूनच सुफी स्वभावाचे होते. विद्यार्थीदशेत ते नियमितपणे वजद आणि समा (सूफी कव्वाली आणि नृत्य) संमेलनात जात असत.
त्यांचे शिक्षक इब्न जौजी यांनी त्यांना अशा संमेलनांमध्ये जाण्यास मनाई केली होती. पण, त्यांना ते इतकं आवडत की या प्रकरणात कोणाच्याही सल्ल्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नसे.
ते सांगतात की, एके दिवशी एका मजलिसमध्ये अतिशय कर्कश आवाज असणाऱ्या कव्वालाशी त्यांची गाठ पडली आणि त्या अप्रिय कार्यक्रमात संपूर्ण रात्र काढावी लागली.
कार्यक्रम संपल्यानंतर सादी यांनी आपली पगडी काढली, खिशातून एक दिनार (स्थानिक चलन) काढला आणि या दोन्ही गोष्टी कव्वालाला दिल्या.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकन तत्त्ववेत्ता आणि कवी वाल्डो इमर्सन म्हणतात, सादी यांच्या काळात पुस्तके प्रकाशित करण्याची फारशी व्यवस्था नव्हती. तिथं लोक ज्ञान आणि विवेकाच्या बाबी कशा हाताळतील?
त्यांनी लिहिलंय, "ज्या देशात ग्रंथालय नव्हते आणि मुद्रणालय नव्हते, तिथं लोक जुमल्यांमध्ये ज्ञान आणि शहाणपण व्यक्त करायचे."
विवेक आणि आशेचा कवी
विवेकाच्या अशा गोष्टी सादी यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात आढळतात. इमर्सन लिहितात की, त्यांचे लेखन तितकेच प्रभावी आणि विनोदी आहे.
त्यांच्या मते, सादी हे लिखानातून वाचकामध्ये एक आशा निर्माण करतात.
सादी यांची तुलना प्रसिद्ध इंग्रज कवी लॉर्ड बायरनशी करताना इमर्सन लिहितात, "बायरनची कोरडी शैली आणि सादी यांची विवेकबुद्धी यात किती फरक आहे?
"आपल्या पर्शियन भाषेत ते सर्व वर्गांशी बोलतात आणि होमर, शेक्सपियर, सर्वेंटिस आणि मोन्टेन यांच्याप्रमाणे आधुनिक आहे."
'गझलचा पैगंबर'
शायरीतील तीन पैगंबरांपैकी शेख सादी यांना 'गझलचे पैगंबर' म्हटलं जातं.
प्रसिद्ध पर्शियन कवी जामी यांनी लिहिलंय की, "आता कोणताही पैगंबर येणार नसला तरी कवितेचे तीन पैगंबर आहेत. अबायतची फिरदौसी (कवितेचा एक प्रकार), कसीदाची अन्वरी (स्तुतीची कविता) आणि सादी यांची गझल."
प्रोफेसर शकील यांनी बीबीसीला सांगितलं की, गेल्या शतकात पूर्वेतील त्यांचा प्रभाव कमी झाला आहे, मात्र पश्चिमेकडील कवींची प्रशंसा वाढली आहे. हाफिज आणि रुमी यांच्याबरोबरच सादी यांच्या लेखनालाही ताकदवान मानलं गेलं आहे.
सादी यांनी केवळ काव्यातच नव्हे तर गद्यातही आपली अविट छाप सोडली असून मानवाला जेव्हा जेव्हा मानवतेची गरज असेल, तेव्हा त्यांचे शब्द लोकांना मार्गदर्शन करतील, असं शकील सांगतात.

फोटो स्रोत, Alamy
अमेरिकन तत्त्ववेत्ता, लेखक आणि कवी राफ वाल्डो इमर्सन यांनी सादी यांच्यावरील त्यांच्या लेखात खंत व्यक्त केलीय की, सादी यांची पाश्चात्य जगाशी ओळख करून देण्यास उशीर झाला.
यामागे अनेक कारणं असली, तरी त्यांची ओळख थोडी आधी झाली असती तर साहित्याची दिशा आणि गती वेगळी राहिली असती.
त्यांनी आपल्या लेखात लिहिलंय, "सादी यांच्याकडे हाफिजची काव्यात्मक कल्पनाशक्ती नसली तरी त्याच्याकडे बुद्धिमत्ता, व्यावहारिक भावना आणि नैतिक भावना आहे. त्यांच्याकडे शिकवण्याचा स्वभाव आहे आणि फ्रँकलिनप्रमाणे प्रत्येक घटनेतील नैतिक पैलू काढण्याचे कौशल्य आहे. ते मैत्री, प्रेम आणि शांतीचे कवी आहेत."
पर्यटनात इब्न बतूताशी स्पर्धा
सादी यांच्याबद्दल म्हटलं जातं की, त्यांनी 30 वर्षे शिक्षणात, 30 वर्षे प्रवास-पर्यटनात तर 30 वर्षे शिराजमध्ये एकांतात घालवली.
त्यांच्या प्रवासाविषयी, ख्वाजा अल्ताफ हुसेन हाली यांनी सरगोरा वस्ली यांचा हवाला देत लिहिलंय की, "आम्ही इब्न बतूताशिवाय शेख सादी यांच्यापेक्षा जास्त पूर्वेकडील इतर कोणत्याही पर्यटकाविषयी ऐकले नाही. त्यांनी भारत, आशिया कोचक (तुर्कस्तानचा एक भाग) इथिओपिया, इजिप्त, सीरिया, पॅलेस्टाईन, आर्मेनिया, अरेबिया, इराण आणि इराक पर्यंत प्रवास केला.”
पण शेख यांनी चार वेळा भारताला भेट दिल्याचं त्यांनी नमूद केलंय आणि त्यांचं हे विधान अतिशयोक्तीपूर्ण मानलं जातं.
त्यांनी 'गुलिस्तां' आणि 'बोस्तां'मध्ये जे लिहिलं त्यानुसार अल्ताफ हुसेन हाली लिहितात की, ते पूर्वेला खोरासान, तुर्कस्तान आणि तातार येथे गेले आणि बल्ख (अफगाणिस्तान) आणि काशगर (चीन) येथे राहिले.
दक्षिणेला सोमनाथला गेले आणि तिथं बराच काळ राहून मग पश्चिम भारतात फिरून समुद्रमार्गे अरबस्तानला गेले.
ते मंगोल सैन्याच्या कैदेतही राहिले. त्यांनी गुलिस्तांमध्ये आपल्या कैदेची एक घटना लिहिली आहे, ती अशी: ते दमास्कसच्या लोकांवर नाराज होऊन पॅलेस्टाईनच्या जंगलात राहू लागले. जिथून त्यांना ख्रिश्चनांनी पकडले. त्या वेळी शहराच्या संरक्षणासाठी त्रिपोलीमध्ये एक खंदक खोदला जात होता. तिथं त्यांना ज्यू कैद्यांसोबत खंदक खोदण्याच्या कामाला लावण्यात आलं.

फोटो स्रोत, MOHAMMAD SHAKEEL
त्याच वेळी हलब (सीरिया) येथील एक व्यक्ती तिथून जात असताना त्यानं सादी यांना ओळखलं आणि दहा दिनार देऊन त्यांची तुरुंगातून सुटका केली. तर100 दिनार मेहेर देऊन स्वतःच्या मुलीचं त्यांच्यासोबत लग्न लावून दिलं.
सादी यांनी या महिलेसोबत काही वेळ घालवला. पण, पत्नीच्या वाईट वागणुकीमुळे ते नाराज झाले. एकदा बायकोने त्यांना टोमणे मारले की, माझ्या वडिलांनी दहा दिनार देऊन खरेदी केलेला तूच आहेस ना? त्यावर उत्तर देताना शेख म्हणाले, अर्थात मी तोच आहे, ज्याला दहा दिनारांना खरेदी केले आणि 100 दिनारांना विकले.
ते बहुतेक भिकाऱ्यांसारखे बेघर राहिले आणि प्रवासात त्यांना खूप त्रास झाला. ते जिथं गेले तिथं त्यांनी काम केलं. 'नफखातुल अनस' मध्ये लिहिलंय की, शेख यांनी बैतुल मुकाद्दस आणि सीरियन शहरांमध्ये पाणी भरण्याचं आणि वाटपाचं काम दीर्घकाळ केलं.
'गुलिस्तां'मध्ये आपल्या दुःखाबद्दल ते लिहितात, "लोकांकडून आणि आभाळाकडून मला मिळालेल्या त्रासाबद्दल मी कधीच तक्रार केली नाही. पण जेव्हा माझ्या पायात बूट नव्हते आणि मी ते विकतही घेऊ शकत नव्हतो, तेव्हा मात्र माझा धीर सुटला.
या त्रासदायक अवस्थेत जेव्हा मी जामा मशिदीत पोहोचलो तेव्हा एक असा माणूस दिसला ज्याला पायच नव्हते. त्यावेळी मी देवाचे आभार मानले आणि आपले उघड्या पायांनाच वरदान मानलं."
भारत प्रवास आणि सोमनाथ मंदिराची स्थिती
बोस्तांच्या आठव्या अध्यायात भारताचा उल्लेख आहे. ते लिहितात, "जेव्हा मी सोमनाथला पोहोचलो, तेव्हा मला दिसले की, एका मूर्तीची पूजा करण्यासाठी हजारो लोक दूर-दूरवरून तेथे पोहोचतात आणि प्रार्थना करतात. मला आश्चर्य वाटले की एखादा प्राणी निर्जीवाची पूजा का करतो?
"हे जाणून घेण्यासाठी मी एका ब्राह्मणाशी मैत्री केली आणि त्याला विचारलं. तेव्हा त्या ब्राह्मणाने मंदिराच्या पुजाऱ्यांना कळवलं आणि सर्वांनी येऊन मला घेरलं. त्यावेळची परिस्थिती समजून मी तिथल्या मुख्य माणसाला म्हटलं की, मला स्वतःला या मूर्तीची भुरळ पडली आहे. पण मी इथं नवीन आहे आणि मला त्याचं रहस्य माहित नाही. म्हणूनच मला सत्य जाणून घ्यायचे आहे जेणेकरून मी त्याची समजूतदारपणे पूजा करू शकेन.
"त्यांना माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी मला रात्रभर मंदिरात राहण्यास सांगितलं. मी रात्रभर तिथंच राहिलो. पहाटे गावातील सर्व स्त्री-पुरुष तिथं जमले आणि मूर्तीने हात वर केला. जणू काही कुणी प्रार्थना करत आहे. त्यानंतर सर्वांनी जयजयकार करायला सुरुवात केली.
"लोक निघून गेल्यावर ब्राह्मण हसला आणि म्हणाला, आता काही शंका उरली नाही ना? मी मोठ्याने रडू लागलो आणि माझ्या प्रश्नावर मी दिलगिरी व्यक्त केली. सर्वांनी मला मूर्तीकडे नेलं. मी मूर्तीच्या हाताचं चुंबन घेतलं आणि वरवर पाहता काही दिवसांसाठी ब्राह्मण झालो.

फोटो स्रोत, Getty Images
"माझ्यावरील त्या लोकांचा विश्वास वाढल्यावर, एके दिवशी रात्री सर्वजण निघून गेल्यावर मी मंदिराचे दार बंद केले आणि मूर्तीच्या फलकाजवळ जाऊन काळजीपूर्वक इकडे-तिकडे पाहू लागलो.
तिथे मला एक पडदा दिसला. ज्याच्या मागे एक पुजारी लपला होता आणि त्याच्या हातात एक तार होती. ती तार तो ओढतो तेव्हा मूर्तीचा हात लगेच वर येतो आणि सामान्य लोक यालाच चमत्कार मानतात, हे मला माहिती पडलं.
"हे गुपित उघड झाल्याचं पाहून पुजाऱ्यानं तिथून पळ काढला. मीही त्याच्या मागे धावलो आणि तो मला मारेल या भीतीने मी त्याला विहिरीत ढकललं. त्यानंतर लगेचच मी तिथून पळालो आणि येमेन मार्गे हिजाझ (अरेबिया) येथे पोहोचलो."
पण, पर्शियन साहित्याच्या अनेक समीक्षकांचं म्हणणं आहे की, सादी यांनी कधीच भारतात प्रवास केला नव्हता. त्यामुळे ही कथा निव्वळ कथा आहे, सत्य नाही, असंही ते म्हणतात.

फोटो स्रोत, GALLICA DIGITAL LIBRARY
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक अखलाक अहमद अहान यांनी बीबीसीला सांगितलं की, "बलबनच्या काळात तरुण अमीर खुसरो आणि त्यांचे मित्र हसन देहलवी हे मुलतानमधील राजकुमार मोहम्मद यांच्या दरबाराशी संलग्न होते आणि दोघेही सादी यांचे प्रशंसक आणि अनुयायी होते.
त्यांच्या म्हणण्यानुसार, राजकुमारानं सादी यांना आमंत्रित केलं, पण म्हातारपणामुळे त्यांनी माफी मागत येण्यास नकार दिला. पुढे हसन देहलवी यांना भारताचा सादी म्हटलं गेलं आणि खुसरो यांनी स्वत:चा वेगळा मार्ग धरला."
हाली यांचे 'हयात-ए-सादी' हे उर्दूतील सादी यांच्याविषयीचं पहिलं पुस्तक असून त्यात इतिहासाच्या अनेक गोष्टी अस्पष्ट असल्याचंही ते म्हणाले.
"सादी यांच्या जन्माच्या जवळपास 200 वर्षांपूर्वीच उद्ध्वस्त झालेल्या सोमनाथला भेट देण्यासाठी ते कसं काय गेले असतील?" असा सवाल ते करतात.
'गुलिस्तां'ची रचना
सादी यांनी आपल्या देशात परत आल्यानंतर एकांतवासात राहणं पसंत केलं. कारण सादी झंगीनंतर त्यांचा मुलगा कुतलाघ खान अबू बकर गादीवर बसला. त्यानं पर्शियाला समृद्ध बनवलं असलं तरी त्याच्या दरबारात अज्ञानी लोक विद्वानांच्या वेषात होते आणि विद्वान आपलं मत व्यक्त करण्यास घाबरत होते.
पण शिक्षण घेतलं आणि जगभर फिरलो पण उल्लेखनीय काम केलं नाही याची खंत साद यांना वाटू लागली.
ते एकांतात जीवन जगू लागले. पण नंतर मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी आपला संकल्प मोडला आणि ते घराबाहेर पडले.
असं म्हणतात की ते शेख सादी यांच्यासोबत वसंत ऋतूमध्ये शिराझमधील बाग-ए-बहिश्त येथे पोहोचले.
तिथं त्यांच्या मित्रानं त्यांच्यासाठी काही फुलं निवडली, पण शेख यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं

फोटो स्रोत, ARCHIVE.ORG
लेखक जोबैन बखदार यांच्या मते, सादी यांनी कवी आणि तत्त्वज्ञ खय्याम यांच्या शैलीत त्या गोष्टींचा क्षणभंगूर असा उल्लेख केला आणि आपल्या मित्राला सांगितलं की, ते एक पुस्तक लिहिणार आहेत. जे त्या फुलांसारखे कोमेजणार नाही, तर ते माहितीपूर्ण आणि मनोरंजक असेल.”
त्यामुळेच त्यांनी आपल्या निर्मितीला 'गुलिस्तां' असं नाव दिलं. फुलाचं आयुष्य पाच-सहा दिवसांचं असलं तरी त्याची निर्मिती सदाबहार असल्याचं त्यांनी पुस्तकात नमूद केलं आहे.
साद यांच्या मृत्यूची नेमकी तारीख कोणालाच माहीत नाही. पण ज्या दिवशी त्यांचा 'गुलिस्तां' हा ग्रंथ पूर्ण झाला, त्या दिवशी त्यांच्या समाधीवर भक्तांचा मेळा भरतो आणि जगभरातून लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








