चंद्रयान-3 : चंद्रावर 14 दिवसांत अंधार पडेल, मग विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचं काय होईल?

फोटो स्रोत, ANI
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं (ISRO) चंद्रयान-3 बुधवारी (23 ऑगस्ट) दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरलं. या ऐतिहासिक मोहिमेची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
या मोहिमेअंतर्गत इस्रोने एक लँडर आणि एक रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलेलं आहे. त्याला अनुक्रमे विक्रम आणि प्रज्ञान असं नाव देण्यात आलेलं आहे.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सहा उपकरणांनी सज्ज करण्यात आलेलं आहे. या सर्वांचं काम चंद्रावर वेगवेगळे प्रयोग करणं, माहिती गोळा करणं असं असणार आहे.
पण हे काम केवळ पुढचे 14 दिवसच केलं जाईल. कारण विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर यांचं आयुष्य इतक्या दिवसांचच आहे.
सौरऊर्जेवर चालणारे विक्रम आणि प्रज्ञान
इस्रोनेही आपल्या वेबसाईटवर विक्रम आणि प्रज्ञान यांची मोहिम केवळ 14 दिवसच चालेल, असं सांगितलेलं आहे. पण असं कशामुळे?
याचं कारण म्हणजे विक्रम आणि प्रज्ञान हे सौर ऊर्जेवर चालणारे आहेत. दोघेही सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाचं रुपांतर ऊर्जेत करून आपलं काम चालवतात.
तुम्ही विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे फोटो पाहिले असतील, तर त्यांच्यावर लावलेल्या सोलर पॅनेलनी नक्कीच तुमचं लक्ष वेधून घेतलं असेल.
विक्रम लँडरला तिन्ही बाजूंनी सोलर पॅनेल लावण्यात आलेलं आहे. त्याला योग्य प्रमाणात प्रकाश मिळत राहावा, अशी त्याची रचना करण्यात आली आहे.
पण असं केवळ पुढील 14 दिवसच शक्य आहे. कारण त्यानंतर चंद्रावरील हा भाग अंधारात जाईल.

फोटो स्रोत, ANI
चंद्रावरचा एक दिवस हा पृथ्वीवरच्या 14 दिवसांइतका लांब असतो. चंद्रावर विक्रम लँडर उतरलेल्या भागात 23 ऑगस्ट रोजी सूर्योदय झाला होता. याच्या 14 दिवसांनंतर म्हणजेच 5-6 सप्टेंबर रोजी याठिकाणी सूर्यास्त होईल.
यानंतर चंद्रावरील तापमानात मोठी घट होईल. पृथ्वीवर वातावरण असल्यामुळे रात्रीच्या वेळी सूर्यास्त झाल्यानंतरही पृथ्वी उबदार राहते. पण चंद्रावर अशा प्रकारचं वातावरण नसल्यामुळे इथे सूर्यास्त होताच हा भाग प्रचंड थंड होतो आणि सूर्योदय होताच तापमानात मोठा बदल होतो.
इस्रो प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितलं, “सूर्यास्त होताच येथील सर्व परिसर अंधारात गडप होईल. तापमान वजा 180 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरेल. या तापमान स्थितीत ही यंत्रणा सुरक्षित राहणं शक्य नाही.
14 दिवस टिकण्याची शक्यता किती?
14 दिवसांची लांबलचक रात्र संपल्यानंतर या परिसरात पुन्हा एकदा सूर्य उगवेल. यानंतर तापमानात वाढ पाहायला मिळू शकेल.
पण त्यावेळी हा सूर्योदय पुन्हा एकदा विक्रम आणि प्रज्ञान यांना जिवंत करू शकतो का?
इस्रोचे प्रमुख डॉ. सोमनाथ याबाबत म्हणतात, “या तापमानात लँडर आणि रोव्हर सुरक्षित राहण्याची शक्यता खूपच कमी आहे.

फोटो स्रोत, ANI
पण, जर 14 दिवसांनंतरही यंत्रणा योग्यरित्या काम करत असल्यास आम्ही खूपच आनंदी असू. जर हे पुन्हा सक्रिय झाले, तर आम्ही पुन्हा आमचं काम सुरू करू शकतो. त्यामुळे ते व्हावं ही आमचीही अपेक्षा आहे.”
पण चंद्रावर पुन्हा एकदा दिवस उजाडल्यानंतर प्रज्ञान आणि विक्रम सक्रिय झाले नाहीत, तर काय होईल?
इंटरनेटवर चंद्रयान-3 शी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांनी एक प्रश्न सातत्याने विचारला आहे. तो म्हणजे प्रज्ञान आणि विक्रम पृथ्वीवर पुन्हा परत येऊ शकतात का?
तसंच, ते चंद्रावरून मातीचे नमुने घेऊन येणार आहेत का, याबाबतही लोकांना प्रचंड उत्सुकता आहे.
या प्रश्नाचं उत्तर आहे – नाही.
विज्ञानाशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन बऱ्याच काळापासून करत असलेले ज्येष्ठ पत्रकार पल्लव बागला हे या प्रश्नाचं विस्ताराने उत्तर देतात.
ते म्हणतात, “ही मोहीम चंद्राचे नमुने गोळा करण्यासाठीची मोहीम नाही. तर, या मोहिमेत पाठवण्यात आलेलं उपकरण हे लेझरच्या मदतीने माहिती गोळा करून ती पृथ्वीवर पाठवण्यात येईल. या माहितीचं विश्लेषण करून चंद्रावरील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सध्या तरी चंद्रावर यान पाठवून तिथून नमुने घेऊन येण्याचं तंत्रज्ञान भारताकडे नाही. नुकतेच चीनने हे काम यशस्वीरित्या पार पाडलं होतं. त्यांच्यापूर्वी अमेरिका आणि रशियाने हे काम केलं आहे.”
माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू
यानातून प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर चंद्रावर सोडण्यात आलं तेव्हा ते परत येणार नाहीत, हे गृहित धरूनच मोहिमेचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार आता माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ते 14 दिवस चंद्रावर राहतील आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती कशी पाठवता येईल, यासाठी प्रयत्न करतील.

फोटो स्रोत, AN
पल्लव बागला याबाबत म्हणतात, “चंद्रयान-3 चंद्रावर पोहोचल्यानंतर इस्रोचे प्रमुख डॉ. सोमनाथ यांच्याशी माझी चर्चा झाली. ते म्हणाले की, या 14 दिवसांत जे काम होणार होतं, ते तेव्हाच सुरू झालं. तिथले फोटोही येण्याच प्रक्रियाही सुरू झाली आहे.”
विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच काही वेळाने एक व्हीडिओ जारी करण्यात आला. यामध्ये लँडर उतरतानाची दृश्ये आहेत. इतकंच नव्हे तर नुकतेच सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये प्रज्ञान रोव्हर हे विक्रम लँडरच्या बाहेर येताना दिसतं.
पण, केवळ तेथील पृष्ठभागावर उतरून फोटो काढण्याशिवाय ही उपकरणे चंद्रावर आणखी काय करणार आहेत?
पुढील 14 दिवसांत काय होईल?
या 14 दिवसांतले 2 दिवस आधीच उलटून गेले आहेत. आता उरले आहेत एकूण 12 दिवस. गेल्या दोन दिवसांत या उपकरणांची टेस्टींग करण्यात आली.
इस्रोकडून सतत येत असलेल्या अपडेट्समध्ये या उपकरणांमधील सर्व यंत्रणा योग्यरित्या काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बागला सांगतात, “लँडर उतरलेल्या ठिकाणी सध्या दिवस आहे. रोव्हरची यंत्रणा सौरऊर्जेवर आधारित असल्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतर हे काम करणं बंद होईल. यामधील बॅटरींमध्ये ऊर्जा उरलेली नसेल. त्यामुळे इस्रोने तत्काळ या दिशेने काम सुरू केलं आहे.”

फोटो स्रोत, ANI
नासाच्या माहितीनुसार, चंद्रावरील दक्षिण ध्रुव हा अतिशय गूढ असा परिसर आहे. त्याठिकाणी काम करणं अत्यंत कठीण आहे.
मग येणाऱ्या काळात प्रज्ञानला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल?
बागला म्हणतात, “इस्रोच्या वतीने एक फोटो नुकताच जारी करण्यात आला. त्यामध्ये विक्रम लँडरचा एक पाय दिसतो. इतर पायही सुरक्षित आहेत. तसंच ज्या भागात हे लँडर उतरलं, तो परिसरही समतल दिसत आहे. त्यामुळे रोव्हर याठिकाणी आपलं काम योग्यरित्या पार पाडू शकतं.”
सहा पायांच्या रोव्हरचं वजन मात्र 26 किलो आहे. ते अत्यंत सावकाश गतीने चालतं.
बागला पुढे सांगतात, “प्रज्ञान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर चालेल. याठिकाणी आजपर्यंत कोणत्याच देशाचं उपकरण जाऊ शकलं नव्हतं. त्यामुळे इथून पाठवलेली माहिती नवी आणि विशेष असणार आहे.”
हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाच्या रासायनिक संरचनेबाबत सांगेल. या जमिनीत कोणते तत्व किती प्रमाणात उपलब्ध आहेत, हे आपल्याला समजेल. तसंच चंद्राचं भूगर्भशास्त्र सर्वच ठिकाणी एकसारखं नाही. आजवर चंद्राचे जे काही तुकडे आले, ते भूमध्य क्षेत्रातून आलेले आहेत. त्यामुळे नव्या ठिकाणाहून येणाऱ्या माहितीत नाविन्य असेल.”
हे काम रोव्हरवर लावण्यात आलेलं LIBS म्हणजेच लेजर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप करेल.
हे एक अत्याधुनिक उपकरण आहे, ज्याचा उपयोग कोणत्याही ठिकाणाचं तत्व, गुणवैशिष्ट्य समजून घेण्यासाठी केला जाऊ शकतो.
यामधून चंद्राच्या पृष्ठभागावर अत्यंत तीव्र लेजर सोडला जाईल. त्यामुळे येथील माती वितळून प्रकाश उत्सर्जित करेल. त्याच्या वेवलेंथ चं विश्लेषण करून LIBS या ठिकाणचे रासायनिक तत्व आणि घटकांचं विश्लेषण करेल.
रोव्हरवर लावलेलं LIBS चंद्रावर मॅग्नेशियम, अल्यूमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियन, कॅल्शियम, टायटेनियम आणि आयर्न यांसारख्या घटकांची उपलब्धता तपासेल.
रोव्हरवर लावण्यात आलेलं आणखी एक उपकरण म्हणजेच APXS अर्थात अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर.
हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरच्या मातीत असलेल्या रासायनिक संयुगांची माहिती घेईल.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








