'आजपर्यंत 10 हजार बाळंतपणं केली, एकही मृत्यू झाला नाही'

    • Author, प्रमिला कृष्णन
    • Role, बीबीसी तमीळ प्रतिनिधी

“मी 10 हजार बाळंतपणं यशस्वीपणे केली आहेत. सगळी बाळंतपणं नैसर्गिकरित्या झाली आहेत. या बाळंतपणात एकही मृत्यू झाला नाहीये,” खतिजा बिबी त्यांच्या 33 वर्षाच्या कारकिर्दीकडे वळून पाहात होत्या. अतिशय अवघडलेल्या अवस्थेतल्या महिलांची त्यांनी सोडवणूक केली होती.

हा तो काळ होता, जेव्हा भारत सर्वाधिक माता मृत्यूदर असलेल्या देशांच्या रांगेतून सरासरी मृत्यूदरापर्यंत येऊन ठेपत होत्या.

मोठ्या, संयुक्त कुटुंबाकडून लहान कुटुंबांकडे झालेला प्रवास त्यांनी पाहिला होता. मुलींना नकोसं न मानता त्यांच्या जन्माचं स्वागत करण्यापर्यंत समाजाच्या मानसिकतेत झालेला बदल अनुभवला होता.

दक्षिण भारतातील एका आरोग्य केंद्रात 90 च्या खतिजा यांनी कामाला सुरूवात केली, तेव्हा त्या पहिल्यांदा गरोदर होत्या.

“मी सात महिन्यांची गरोदर होते, पण तरीही मी इतर महिलांना मदत करत होते. दोन महिने मॅटर्निटी ब्रेक घेतल्यानंतर मी लगेचच कामावर रूजू झाले,” खतिजा सांगत होत्या.

“प्रसूती वेदना सुरू झाल्यावर बायका किती घाबरतात हे मला माहितीये. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं मन शांत करणं याला माझं प्राधान्य असतं.”

खतिजा यांची उंची बेताचीच, पाच फूट आहे. त्यांच्या चेहऱ्यावर शांत भाव असतात.

चेन्नईपासून 150 किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे असलेल्या विल्लूपुरम गावात त्यांचं क्लिनिक आहे.

या छोट्याशा क्लिनिकमध्ये सिझेरियन करण्यासाठीच्या पुरेशा सोयीसुविधा नाहीयेत. त्यामुळे जेव्हा एखादी गुंतागुंतीची केस येते, तेव्हा त्या गरोदर बाईला जिल्हा रुग्णालयात पाठवतात.

आईकडून मिळालेला समृद्ध वारसा

आई झुलेखा हे खतिजा यांचं प्रेरणास्थान. त्या गावातील दाई होत्या.

“मी लहानपणी इंजेक्शनच्या सीरिंजसोबत खेळायचे. हॉस्पिटलच्या वासाचीही मला सवय झाली होती.”

खेडेगावातल्या गरीब-कमी शिकलेल्या बायकांना आरोग्यसुविधा पुरविणाऱ्या आपल्या आईच्या कामाचं महत्त्व खतिजा यांना अगदी लहानपणीच समजलं होतं.

त्या काळात सुसज्ज हॉस्पिटल अतिशय कमी संख्येनं होती. त्यामुळे जवळपास सगळ्याच आर्थिक स्तरातल्या बायका या बाळंतपणासाठी सरकारी आरोग्य सुविधांवर अवलंबून होत्या. आता आपण त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रं म्हणतो.

“जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा एक डॉक्टर, सात मदतनीस आणि दोन इतर नर्सेस होत्या,” खतिजा सांगतात.

“पहिल्या काही वर्षांत कामही खूप जास्त असायचं. मला मुलांकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. मला कोणत्याही कौटुंबिक समारंभाला जाता यायचं नाही. पण त्या दिवसांनी मला खूप काही अनुभव दिले आणि खूप काही शिकवलं.”

1990 भारतात माता मृत्यूदर हा 10 हजार जन्मांमागे 556 मृत्यू होता. त्याच वर्षी भारतात 1 हजार जन्मांमागे 88 अर्भकांचा मृत्यू झाला होता.

सध्याच्या सरकारी आकडेवारीनुसार माता मृत्यूदर हा 10 हजार जन्मांमागे 97 होता. त्याच वर्षी भारतात 1 हजार जन्मांमागे 27 अर्भकांचा मृत्यू झाला होता.

सरकारी आरोग्यसेवा आणि महिलांमधील साक्षरतेचं वाढतं प्रमाण यांमुळे ही प्रगती झाल्याचं खतिजा सांगतात. या सगळ्या बदलांमधला खतिजा या सक्रीय घटक होत्या आणि भारताचा वाढता जननदर त्यांनी स्वतः पाहिला आहे.

एरव्ही, खतिजा दिवसाला एक किंवा दोन बाळंतपणं करतात. पण त्यांना त्यांचे खूप धकाधकीचे दिवसही आठवतात.

“8 मार्च 2000 हा माझ्या आयुष्यातला सर्वांत धकाधकीचा दिवस होता. आंतरराष्ट्रीय महिला दिन होता आणि मी क्लिनिकमध्ये गेले तेव्हा लोक मला शुभेच्छा देत होते. दोन महिलांना प्रसूतीवेदना होत होत्या आणि त्या माझी वाट पाहात होत्या. मी त्यांच्या बाळतंपणासाठी मदत केली. तेवढ्यात अजून सहा महिला आमच्या क्लिनिकमध्ये आल्या.”

खतिजा यांच्यासोबत तेव्हा एकच मदतनीस होती, पण तो सगळा ताण विसरला गेला.

“मी जेव्हा त्या दिवशी घरी जायला निघाले, तेव्हा माझ्या कानांवर बाळांचा रडण्याचा आवाज येत होता. ती सगळ्यांत सुंदर गोष्ट होती. आमच्या आरोग्य केंद्रावर खूप गर्दी जमली होती आणि सगळे खूप आनंदी झाले होते.”

त्यांनी जुळ्यांच्या 50 जोड्या या जगात आणल्या आणि एक तिळंही.

90 च्या दशकाच्या सुरुवातीला पोट खूप वाढलेली महिला क्लिनिकमध्ये आली होती. तिला खूप वेदना होत होत्या. खतिजा यांना वाटलं की, तिला जुळं आहे. तेव्हा तिच्या क्लिनिकमध्ये अल्ट्रासाउंड स्कॅनर नव्हते.

“पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाईला पुन्हा कळा सुरू झाल्या. तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला,” खतिजा सांगत होत्या.

त्या जेव्हा सगळी भांडी साफ करायला गेल्या, तेव्हा ती बाई पुन्हा वेदनेनं किंचाळायला लागली.

“मला तेव्हा खूप ताण आला. माझ्यासाठी ते नवीन होतं आणि माझी पुरेशी तयारी नव्हती. सगळी परिस्थिती पाहता, त्या बाईला जिल्हा रुग्णालयात पाठवणं पण शक्य नव्हतं.”

खतिजा यांनी त्या बाईच्या डोक्यावरून, पाठीवरून हळूहळू हात फिरवत तिला शांत करत आणलं. तिला तिसरं बाळ झालं.

खतिजा यांनी 10 हजार बाळांची बाळंतपणं केल्याला जिल्हा प्रशासनानेही दुजोरा दिला आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून पुरस्कारही दिला गेला आहे.

वेदना आणि दुःख

खतिजा सांगतात की, आता श्रीमंत घरातील महिला या खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याला प्राधान्य देतात. आता मुली सिझेरियनचाच आग्रहही धरतात.

“माझ्या आईने बाळंतपणात झालेले मृत्यूही पाहिले आहेत. सिझेरियनमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत,” खतिजा सांगतात.

“मी जेव्हा सुरूवात केली, तेव्हा बायकांना सर्जरीची भीती वाटायची. आता उलट चित्र आहे. आता अनेकींना नॅचरल डिलिव्हरीची भीती वाटते आणि त्या सर्जरीचा आग्रह धरतात.

खदिजा यांनी ही गोष्ट त्यांच्या कुटुंबातही पाहिली होती. आपल्या सुनेची नॅचरल डिलिव्हरी व्हावी असं त्यांना वाटत होतं. पण तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं.

“जर मी तिचं बाळंतपण केलं असतं, तर कदाचित सर्जरीची वेळ आली नसती. पण मी डॉक्टरांना दोष देत नाहीये. पण मला खरंच वाटतंय की, अनेकदा सी-सेक्शनची गरज नसते आणि योनी मार्गातून बाळाला जन्म देणं शक्य असतं, फक्त त्या महिलेने पूर्णपणे साथ द्यायला हवी.”

गेल्या तीन दशकांत ग्रामीण भागांमधलं उत्पन्नही वाढलं आहे. ही चांगली गोष्ट असली, तरी त्याचे काही तोटेही दिसत आहेत.

“बाळंतपणातील मधुमेह हा पूर्वी क्वचितच व्हायचा. पण आता तो अनेकींना होताना दिसतो.”

समाजाच्या मानसिकतेतही अनेक बदल झाले आहेत. आता अनेकदा नवरे बाळंतपणाच्या वेळी बायकोसोबत थांबायची विनंती करतात.

“मी चांगला आणि वाईट असा दोन्ही काळ पाहिलाय. जर मुलगी झाली, तर काही नवरे बाळाला आणि बायकोला बघायला पण यायचे नाहीत. दुसरी किंवा तिसरी मुलगी झाली तर काही बायकाच टाहो फोडून रडायच्या.”

90 च्या दशकात लिंगाधारित गर्भपात व्हायचे. या सगळ्या गोष्टींचं प्रमाण इतकं वाढलं की, सरकारने डॉक्टरांना बाळाचं लिंग सांगण्यावरच बंदी घातली होती.

तामिळनाडू सरकारने आई-वडिलांनी टाकलेल्या मुलींसाठी पाळणाघराची योजनाही सुरू केली होती.

“पण आता चित्र बदललं आहे,” खतिजा सांगतात. “आता अनेक जोडपी मुलगा किंवा मुलगी असा विचार न करता दोन मुलांवर थांबतात.”

खतिजा यांच्या पतीचं सात वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांची मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर मुलगा दुबईत मेकॅनिकल इंजिनिअर आहे. खतिजा यांच्या सुनेला त्यांचं उरलेलं सगळं आयुष्य त्यांच्या मुला-नातवंडांसह सुखासमाधानाने जगण्याची इच्छा आहे.

खतिजा 30 जूनला सेवानिवृत्त होत आहेत. रिटायरमेंटनंतर काय करायचं, हे त्यांनी अजून ठरवलं नाहीये. पण आपल्या आयुष्यात कशाची कमतरता जाणवत राहील, हे त्यांना माहितीये.

“मला नुकत्याच जन्मलेल्या बाळांच्या रडण्याचा आवाज नेहमी आठवले,” त्या सांगतात. “बाईला खरंतर खूप वेदनांमधून जावं लागतं. पण आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला की त्या सगळ्या वेदना विसरून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. ते पाहणं हा माझ्यासाठी खूप सुखद अनुभव असायचा. हा सगळा प्रवास माझ्यासाठी समाधानकारक होता.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)