You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉक्टर जी : स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या पुरुषाचं आयुष्य कसं असतं?
- Author, वंदना
- Role, भारतीय भाषांच्या एडिटर
"काही लोकांना वाटतं की महिलांच्या शरीरात काय घडतंय हे एक महिलाच समजू शकते. आता मी एक पुरुष स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ज्ञ आहे. मी कधी गरोदर राहिलो नाही तर याचा अर्थ असा नाही की गरोदर महिलांवर उपचार करू शकत नाही. हे म्हणजे असं म्हणण्यासारखं झालं की मी मानसिक रोगांचा सामना केला असेल तरच मी सायकॅस्ट्रिस्ट होऊ शकतो."
हे म्हणणं आहे डॉ पुनीत बेदी यांच. ते गेल्या 30 वर्षांपासून दिल्लीत स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत.
मुळात जेव्हाही स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञांचा उल्लेख येतो, लोकांच्या डोळ्यासमोर महिला डॉक्टर उभी राहाते. अनेकजणी महिला स्त्रीरोग तज्ज्ञांना आपल्या समस्या मोकळेपणाने सांगतात.
- भारतात पुरुष स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञांवर बंदी नाहीये.
- काही राज्यांमध्ये पुरुष स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञांना नोकरी देऊ नका अशा प्रकारचे आदेश निघाले होते, ते कोर्टाने फेटाळून लावले.
- रुग्णाच्या अंतर्गत तपासणीबाबत नियम आहेत.
- अंतर्गत तपासणी करायची असेल तर त्या महिलेची परवानगी हवी.
- पुरुष स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञ तपासणी करत असेल तर त्यावेळी तिथे महिला नर्स किंवा महिला नातेवाईक उपस्थित असणं गरजेचं.
कसं असतं पुरुष स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञाचं आयुष्य? एक पुरुष असून महिलांच्या अत्यंत खाजगी बाबींचा भाग होणं? याच विषयावर हिंदी 'डॉक्टर जी' नावाचा एक हिंदी सिनेमाही आला होता.
पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञांशी बोलणं शरमेची बाब नाही
मेडिकल कॉलेजमध्ये एकमेव मुलगा स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञ बनण्याचा अभ्यास करतोय. महिलांवर तो कसा उपचार करणार हीच काळजी त्याला भेडसावतेय. आपलं डिपार्टमेंट बदलून घेण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतोय.
आयुष्मान खुरानाच्या 'डॉक्टर जी' ची ही कथा आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती.
जेव्हा तो मुलगा आपल्या प्राध्यापकांना (शेफाली शाह) म्हणतो की स्त्रीरोगांबद्दल रुग्ण महिला डॉक्टरकडे जायला प्राधान्य देतात तेव्हा त्या म्हणतात, "बाई-पुरुष काही नसतं, डॉक्टर फक्त डॉक्टर असतात."
'लेबर रूममध्ये गेलो तर घरचे नाराज व्हायचे'
चित्रपटात काय आहे त्याबद्दल तर बोललो आपण पण प्रत्यक्षात पुरुष गायनकोलॉजिस्ट काय विचार करतात?
डॉक्टर अमित टंडन आग्र्याचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. या क्षेत्रात येण्याबद्दल ते सांगतात, "लहानपणी आम्ही कायम एक किस्सा ऐकायचो की कसं आमच्या आग्र्यातले प्रसिद्ध डॉक्टर किशोर अग्रवाल यांना नेपाळच्या राजांनी खास आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळेस पाचारण केलं होतं. आणखी एक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होते त्यांना मोठमोठे उद्योगपती खास बोलवायचे. तेव्हा हे तर लक्षात आलं होतं की पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञांना मागणी आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की समाजाच्या प्रत्येक स्तरात पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञांना स्वीकारलं जातं नाही."
सुरुवातीला आलेल्या आव्हानांबद्दल डॉक्टर अमित टंडन म्हणतात, "मला स्वतःला सिद्ध करावं लागलं. माझी आईही गायनोकोलॉजिस्ट आहे. सुरुवातीला जेव्हा महिला पेशंट यायच्या तेव्हा महिला डॉक्टरलाच प्राधान्य द्यायच्या. त्यांचा संकोच पाहून माझ्या आईनेही सांगितलं की तू महिला पेशंटची अंतर्गत तपासणी करू नको."
ते पुढे म्हणतात, "ज्या महिला घरच्या पुरुषांव्यतिरिक्त बाहेरच्यांशी फारसं बोलत नाही त्या एका तरूण मुलाशी, भले तो डॉक्टर का असेना बोलताना संकोचणारच. सुरुवातीला मी जेव्हा लेबर रूममध्ये जायचो तेव्हा महिला पेशंटच्या नातेवाईकांना आक्षेप असायचा. हे सगळ्यांत मोठं आव्हान होतं. पण मग नंतर ती महिला तिच्या नातेवाईकांना सांगायची की प्रसुती दरम्यान मी तिची किती काळजी घेतली तेव्हा त्यांचा दृष्टीकोन बदलायचा."
"जेव्हा तुम्ही अवघडलेल्या महिलेचा जीव वाचवता, तिच्या बाळाची सुरक्षित प्रसुती करता. अविवाहित मुलींच्या स्त्रीरोग संदर्भातल्या समस्या दूर करता ज्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य सोपं होतं तेव्हा हळूहळू त्या महिलांचा तुमच्यावर विश्वास बसत जातो आणि मग पुरुष-महिला डॉक्टर हा भेद संपतो."
पुरुष डॉक्टरकडे जाताना काय विचार मनात येतो?
डॉक्टर पुनीत आपल्या अनुभवातून सांगतात की, "सामाजिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे समाजात अजूनही असंच समजलं जातं की जर महिला त्यांच्या प्रजनन, गुप्तांग किंवा गरोदरपण याबद्दल पुरुष डॉक्टरशी बोलल्या तर ती त्यांच्यासाठी शरमेची गोष्ट आहे. त्यांना ही अतिखाजगी गोष्ट वाटते. पण एक डॉक्टर म्हणून हे सांगू इच्छितो की तुम्हाला मासिक पाळी संदर्भात काही तक्रारी असतील तर तो त्रास न्यूमोनिया किंवा दुसऱ्या आजारासारखाचा आहे. तुम्हाला चांगला प्रशिक्षित डॉक्टर हवा असेल तर महिला-पुरुष याबद्दल विचार करू नका."
कदाचित यावरच या सिनेमा भाष्य करतो.
या सिनेमात स्त्रीरोग तज्ज्ञ बनण्याचा अभ्यास करणारा आयुष्मान एका ठिकाणी म्हणतो की पेशंट हा विचार करत नाही की डॉक्टर तर डॉक्टर असतात, पुरुष किंवा महिला नाही.
पण यावर त्याच्या प्राध्यापक उत्तर देतात की, "आधी तू तर तसा विचार करायला लाग. तुला तो मेल टच (पुरुषी स्पर्श) मागे सोडावा लागेल."
या पुरुष स्पर्शाबद्दल मी जेव्हा डॉक्टर पुनीत यांच्याशी बोलले तेव्हा ते म्हणाले की, "पुरुष डॉक्टरांही संपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण मिळालेलं असतं की महिला पेशंटशी कसं वागायचं. जेव्हा आम्ही अशी तपासणी करतो तेव्हा जेवढी गरज असेल शरीररावरच्या तेवढ्याच भागावरचे कपडे बाजूला केले जातात. आम्हाला हेही सांगितलेलं असतं की संवेदनशील रितीने कसं वागायचं. डॉक्टर्स चांगले, वाईट असे दोन्ही प्रकारचे असतात. यात लिंगाचा प्रश्न येत नाही."
डॉक्टर फक्त डॉक्टर असतात...
अभिनेत्री रकुलप्रीत आणि शेफाली शाह यांनी या सिनेमात महिला गायनोकोलॉजिस्टची भूमिका केली आहे.
दिल्लीत वाढलेली रकुल प्रीतने आपल्या अनुभवांबद्दल सांगताना म्हटलं होतं, "आता संकोच वाटत नाही, पण हे खरंच की जेव्हा मी किशोरवयीन होते तेव्हा मला फार संकोच वाटायचा की मी पुरुष गायनोकोलॉजिस्टकडे कशी जाऊ. एकदा मला डॉक्टरकडे जायचं होतं आणि ते पुरुष होते. मला प्रश्न पडला की मला काय होतंय ते त्यांना कसं सांगू? अगदी घरातही महिला आपल्या आरोग्यविषयक समस्यांविषयी मोकळेपणाने बोलत नाहीत. पण हळूहळू माझा दृष्टीकोन बदलला.
मुंबईत वाढलेल्या शेफालीचं मत वेगळं होतं.
ती म्हणते, "मला कधी संकोच वाटला नाही, कारण डॉक्टर शेवटी डॉक्टर असतात. त्यात स्त्री, पुरुष, तृतीयपंथी कोणीही असलं तरी फरक पडत नाही. जर माझी महिला विद्यार्थी चांगलं काम करत नसती तर मी तिला म्हणाले असते की लूज द फिमेल टच. आता राहाता राहिला प्रश्न समाजाचा तर कोणताही चित्रपट एखाद्या मुद्द्यावर चर्चा सुरू करू शकतो, लोकांना बोलायला प्रवृत्त करू शकतो, पण एका चित्रपटाने पूर्ण समाजाचा दृष्टीकोन बदलणं ही जरा जास्तच मोठी अपेक्षा आहे."
या दोन्ही अभिनेत्रींची मतं डॉक्टर बेदी आणि डॉक्टर टंडन यांनी सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा देते की भारतातल्या उत्तर भागात महिलांमध्ये हा संकोच जास्त आढळतो.
जेव्हा कोर्टाची पायरी चढावी लागली
पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञांना वेळोवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
2016 साली राजस्थान सरकारने आदेश काढला की स्त्रीरोगांवर शक्य तिथे फक्त महिला डॉक्टर्स उपचार करतील. अर्थात डॉक्टरांच्या प्रखर विरोधानंतर राजस्थान सरकारला हा आदेश मागे घ्यावा लागला.
2010 साली एक वाद झाला होता आणि यात अलाहाबाद हायकोर्टाला मध्यस्थी करावी लागली होती. कोर्टाने म्हटलं की स्त्रीरोग तज्ज्ञ महिला किंवा पुरुष कोणीही असू शकतं.
या प्रकरणी उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूरमध्ये स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञाच्या सरकारी पदासाठी जाहिरात निघाली होती आणि जाहिरातीत म्हटलं होतं की फक्त महिला डॉक्टर्स यासाठी अर्ज करू शकतात.
याविरोधात एक पुरुष डॉक्टर कोर्टात गेले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव जयेश लेले म्हणता की भारतीय कायद्यानुसार पुरुष डॉक्टरांनी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करण्यावर बंदी नाहीये, पण त्यांच्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना आहेत. जसं की महिलेची अंतर्गत तपासणी करताना महिला पेशंटची संमती असणं गरजेचं आहे.
त्यातूनही जर कायदेशीर तक्रार उद्धभवली तर ती निवारण्यासाठी एक समिती असते जिथे महिला आणि डॉक्टर आपआपली बाजू मांडू शकतात.
स्त्रीरोग तज्ज्ञ बनण्यासाठी आलेला एकमेव मुलगा
पुन्हा वळूया सिनेमाकडे. याचं दिग्दर्शन केलं होतं अनुभूति कश्यपनी तर कथा लिहिली आहे सौरभ भारतने.
सौरभकडे बीडीएस (डेंटल) डिग्री आहे पण नंतर ते आपली प्रॅक्टीस सोडून सिनेमा क्षेत्रात आले.
हा सिनेमा त्याला का लिहावासा वाटला याची कहाणीही रंजक. सौरभची पत्नी गायनोकोलॉजिस्ट आहे. जेव्हा ती शिकत होती आणि सौरभ तिला भेटायला गेला तेव्हा तिच्या बॅचमध्ये सगळ्या मुली होत्या, त्या सगळ्यांमध्ये फक्त एक मुलगा होता.
तेव्हा सौरभने विचार केला त्या मुलाचे अनुभव काय असतील? यातूनच ही कथा सुचली.
योगायोगाने मी काही दिवसांपूर्वीच 2015 साली आलेला एक कानडी चित्रपट पाहात होते. याचा हिरोसुद्धा स्त्रीरोग तज्ज्ञ आहे.
अर्थात हा सिनेमाचा मुख्य प्लॉट नाहीये. पण या चित्रपटात एक सीन आहे ज्यात दाखवलंय की कशा प्रकारे हिरो एका जोडप्याची मदत करतो, एका नव्या जीवाला या जगात आणल्यानंतर त्याचा आनंद आणि एका नवजात बाळाला वाचवू न शकल्याचं दुःख यात दाखवलं आहे.
अशाच प्रकारे अनुभव सांगताना डॉक्टर पुनीत बेदी म्हणतात, "मी जेव्हा MBBS करत होतो तेव्हा माझा रस नवजात बालकाच जन्म या प्रक्रियेत होता त्यामुळे मी स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ज्ञ बनायाचं ठरवलं. याचा मला कधी पश्चाताप झाला नाही. माझ्या आजीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला होता. म्हणून माझे वडील म्हणायचे की इतर डॉक्टर एका माणसाचा जीव वाचवतात पण गायनोकोलॉजिस्ट आई-बाळासह संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करतात."
या क्षेत्रातली आव्हानं
पुनीत बेदी म्हणतात की पुरुष असो वा महिला, स्त्रीरोग तज्ज्ञ होणं एक व्रत घेतल्यासारखं आहे.
"दसरा-दिवाळी-होळी तुम्हाला 24 तास उपलब्ध राहावं लागतं. मी 25 वर्षांपासून या क्षेत्रात आहे आणि दिवसरात्र बांधील आहे. कारण एखाद्या बाळाचा जन्म कधीही होऊ शकतो. आम्हाला सांगितलं जातं की काहीही सेलिब्रेशन असो, पार्टी असो, तुम्ही ड्रिंक करू शकत नाही. गायनोकोलॉजीतली आणखी एक अडचण आहे, बाळाचा जन्म होताना काहीही कॉम्लिकेशन झाले तर कायदेशीर कारवाईचा धोका जास्त असतो."
असंच एक हायप्रोफाईल प्रकरण या वर्षी राजस्थान राज्यात घडलं होतं. एका महिला स्त्रीरोग तज्ज्ञाने आत्महत्या केली होती.
झालं असं की बाळाला जन्म दिल्यानंतर एका महिला रूग्णाचा मृत्यू झाला. स्थानिक नेत्यांनी हा मुद्दा उचलला आणि पोलिसांनी त्या महिला डॉक्टरविरोधात आयपीसीच्या 302 कलमाअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला.
या महिला डॉक्टरचं नाव होतं अर्चना शर्मा. त्यांच्या कुटुंबाचा दावा आहे की या प्रकरणामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आणि त्यांनी आत्महत्या केली.
डॉक्टर अर्चना शर्मा यांनी भावूक होऊन लिहिलेलं एक पत्र सापडलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, "मी माझ्या नवऱ्यावर, मुलांवर फार प्रेम करते. प्लीज माझ्या मृत्युनंतर यांना त्रास देऊ नका. माझी काहीही चूक नाही, मी कोणालाही मारलं नाही. पीपीएच कॉम्प्लिकेश झालं. यासाठी डॉक्टरला छळणं बंद करा. माझ्या मृत्युमुळे कदाचित माझं निर्दोषत्व सिद्ध होईल. डोन्ट हॅरॅस इनोसन्ट डॉक्टर्स."
'डॉक्टर आणि पेशंटचा एकमेकांवर विश्वास सर्वांत सुंदर गोष्ट'
या क्षेत्रात अडचणी आहेतच, पण तरीही यातली सगळ्यांत चांगली गोष्ट कोणती?
या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ टंडन म्हणतात, "पेशंट आणि डॉक्टरांना एकमेकांवर असलेला विश्वास. एक महिला रूग्ण तिच्या खाजगी आयुष्यात प्रवेश करण्याची तुम्हाला परवानगी देते. जेव्हा ती तिची अंतर्गत चाचणी करण्यासाठी तयार होते तेव्हा ती तुमच्यावर असलेला दृढ विश्वास दर्शवते. हा विश्वासच या क्षेत्रातली नितांत सुंदर गोष्ट आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर हा विश्वास कमावता येतो."
"हा विश्वास कमावण्यासाठी पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञांना कदाचित जास्त धैर्य दाखवावं लागतं. पण प्रसुतीनंतर जेव्हा मला एखादी महिला म्हणते की माझे टाके दुखत नाहीयेत तर ते माझं यश आहे. जेव्हा पोटावर चीर न देता मी महिलांची लेप्रोस्कोपी सर्जरी करू शकतो, तर ते माझं सामर्थ्य आहे. कारण परंपरागत विचार करणाऱ्या समाजात पोटावर चीर असली तर त्यांच्या लग्नात अडचणी येऊ शकतात. त्यांच्या सुखी भविष्यात आमचं काही योगदान असतं याचा आनंद आहे."
डॉ. पुनीत म्हणतात, "मला इतकंच वाटतं की सेक्शुअल मुद्दे असोत, गर्भारपणाच्या समस्या, मेनोपॉज... थोडक्यात महिलांच्या आरोग्याशी संबधित कोणताही मुद्दा असो, एक चांगला डॉक्टर निवडा - मग महिला असो वा पुरुष. एका नव्या जीवाला या जगात आणणं फार मोठी जबाबदारी असते. महिलांचं आरोग्य हा देशातला मुख्य मुद्दा असला पाहिजे, डॉक्टर कोण आहे हा नाही."
(या रिपोर्टसाठी मुंबईहून सुप्रिया सोगळे यांनी सहकार्य केलं आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)