गरोदरपणात केशर खाल्लं तर खरंच गोरं बाळ जन्माला येतं?

    • Author, डॉ. रोम्पिचारला भार्गवी
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी

जेव्हा अमूल्यानं मुलाला जन्म दिला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तिने तिच्या गोंडस बाळाला स्पर्श केला आणि गेल्या 24 तासांत तिनं भोगलेल्या सर्व वेदना नाहीशा झाल्या, असं तिला वाटलं.

तिला वाटू लागलं जणू तिचा पुनर्जन्म झाला आहे. सिझरऐवजी बाळाला सर्वसाधारण पद्धतीनं जन्म देण्याचा तिनं निर्णय घेतला होता.

बाळाची प्रकृती, वजन, रंगरूप या गोष्टींमुळे अमूल्याच्या मनात प्रश्नाचं काहूर माजलेलं असतानाच तिची सासू आणि नणंद हॉस्पिटलच्या रूममध्ये आल्या. पहिला प्रश्न त्यांनी तिला विचारला तो होता बाळाच्या रंगाबाबत.

दोघी जणी तिला विचारू लागल्या की, "तू गरोदर असताना केशर घातलेलं दूध तर प्यायली होती ना? असं सावळं मूल कसं काय जन्मलं?'

इथेच न थांबता सासू सांगू लागली की कसं तिच्या मुलीनं केशर घातलेलं दूध प्याल्यामुळे तिने गोऱ्या गोमट्या बाळाला जन्म दिला. त्यांचं बोलणं आणि विचारणं सुरूच होतं. बोलण्याचं रूपांतर वादात झालं आणि त्यांच्यात अक्षरशः बाचाबाची सुरू झाली.

मग मी तिथं आले आणि बाळाचा रंग कसा ठरतो ही गोष्ट समजावून सांगू लागले.

मी त्यांना सांगितलं की केशरच्या दुधाचा आणि बाळाच्या रंगाचा काही एक संबंध नाही. मग प्रश्न असा येतो की त्वचेला रंग नेमका कसा मिळतो.

बाळाच्या त्वचेचा रंग हा त्याच्या पालकांच्या रंगावरून, अनुवांशिकतेवरून आणि त्वचेतल्या मेलानिनच्या प्रमाणावरून ठरतो. अल्ट्रावॉयलेट किरणांपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने त्वचेमध्ये मेलानिनचं उत्पादन होत असतं.

तसंच जे लोक विषुववृत्तापासून जवळ राहतात त्यांचं रंग गडद असतो. जे लोक विषुववृत्तापासून दूर राहतात त्यांचा रंग उजळ असतो. याला मेलानिनही देखील तितकाच जबाबदार आहे.

जो पहिला माणूस पृथ्वीवर जन्मला होता, त्याचा रंग हा गडद होता आणि तो अफ्रिकेत जन्मला होता. स्थलांतर, वेगवेगळ्या संस्कृतीतील लोकांमध्ये लग्न आणि नातेसंबंध दृढ होणं, म्युटेशनमुळे म्हणजे आपल्या जीन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्वचेचा गडद असलेला रंग उजळ झाला. त्याचं कारण हे केशरचं दूध नव्हतं.

वास्तवात कुठलाच रंग चांगला किंवा वाईट नसतो. पण रंगामुळं भेदभाव होतो ही गोष्ट वाईट आहे. रंग कुठलाही असो, पण माणसाच्या भावभावना तर एकच असतात ना.

"तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली का, की बाळाला जन्म देण्यासाठी तुमच्या सुनेनं किती कष्ट घेतले." मी त्या बाळाच्या आजीला विचारलं.

हे सर्व ऐकून अमूल्यानं तिच्या बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि आपल्या मांडीवर घेतलं.

हे वाचलं का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)