You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॅशिंग महिला बॉडीगार्ड जिनं पाकिस्तानात घुसून सैन्यालाही चकवले
- Author, टीम बॉलर
- Role, बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज
यूकेतील एका तरुणीला पाकिस्तानात फसवून नेण्यात आलं आहे. ती 3 महिन्यांची गरोदर आहे. एका खोलीत तिला पलंगाला बांधून ठेवण्यात आलं आहे. बलात्कार, मारहाण यांना ती रोज समोर जात आहे. एक दिवस एक कार अचानक गेट तोडून आत घुसते. या कारमधील एक डॅशिंग महिला या तरुणीला सोडवते. दोघी या ठिकाणाहून बाहेर पडतात. तोच पाकिस्तानचं सैन्य पाठलाग करत येतं. थरारक पाठलाग सुरू होतो. सैनिकांना मागे टाकून ही कार भारत-पाकिस्तान सीमेजवळ येते. हिमालयातील जंगलात, डोंगररांगात ही डॅशिंग महिला आणि ही तरुणी धावत आहेत. तोवर भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांत गोळीबार सुरू होतो. गोळ्यांना गुंगारा देत, दोघी जंगल तुडवत धावत सुटतात. अखेर ही महिला, या तरुणीला घेऊन भारताच्या हद्दीत पोहोचते आणि नंतर सुरक्षितपणे तिला घरी पोहोचवते.
ही कथा चित्रपटातील नाही. हे खरोखर घडलं आहे. ही डॅशिंग महिला आहे जॅकी डेव्हिस. युरोपमधील पहिली महिला बॉडीगार्ड. जी महिला इतकं थ्रिलिंग आयुष्य जगली आहे, तिच्यावर सिनेमा बनला नाही तरच नवल.
जॅकीने या क्षेत्रात त्यांनी 30 वर्षं काम केलं आहे. या कार्यकाळात त्यांनी राजघराण्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि अनेक सेलेब्रिटींसाठी अंगरक्षक म्हणून काम केलं आहे.
शिवाय त्यांनी अपहरण झालेल्यांची सुटका आणि हेरगिरीही केली आहे. त्यांच्या आयुष्यावरूनच प्रेरणा घेत नेटफ्लिक्स नवा सिनेमा घेऊन येत आहे. त्यात नोमी रॅपेस यांची मुख्य भूमिका आहे.
त्या सांगतात, "जेव्हा मी या व्यवसायात आले त्यावेळी इथे पुरुषांची मक्तेदारी होती. ते माझ्यावर महिला अधिकारी किंवा लहान मुलांची जबाबदारी सोपवायचे. हे फारच विचित्र होतं. कारण त्यातले अनेक जण स्वतः वडील होते आणि मी तर आईही झालेले नव्हते."
जॅकी आधी पोलीस खात्यात होत्या. मात्र कामात वैविध्य असल्याने 1980मध्ये त्यांनी खाजगी सुरक्षा सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणतात, "मला अधिक जोखीम असलेलं काम हवं होतं. हेरगिरी आणि तपासही करायचा होता."
त्याकाळी बीबीसीवर 'बॉडीगार्ड' नावाची मालिका खूप लोकप्रिय झाली होती. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की त्याकाळी अंगरक्षक असण्याला खूप हाय-प्रोफाईल समजलं जावू लागलं. या मालिकेतील कथानक खूपच साहसी, नाट्यपूर्ण वळणं असलेलं आणि दोन मुख्य पात्रांमधील प्रेमसंबंध दाखवणारं होतं.
"तांत्रिकदृष्ट्या मालिका उत्कृष्ट होती. चांगलं नाट्य होतं. मात्र या मालिकेत दाखवलेले प्रेमसंबंध प्रत्यक्षात दुर्मीळ असतात. खऱ्या आयुष्यात असं काही घडलं तर तुम्हाला घरी पाठवलं जातं," जॅकी सांगतात.
आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने त्या जगभर फिरल्या. पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहिल्या. मात्र त्या म्हणतात, "दिवसातले 12 ते 16 तास उभे राहून सतत विचार केल्यानंतर या गोष्टी ग्लॅमरस वाटत नाहीत. यात आणखी भर म्हणजे या व्यवसायाचा खासगी आयुष्यावरही फार परिणाम होतो. अनेकदा तुम्हाला आठ-दहा आठवडे घरीसुद्धा जाता येत नाही."
या क्षेत्रातील सर्वांत जास्त धोकादायक काम म्हणजे 'हेरगिरी आणि बचाव मोहीम'.
यात जॅकी यांनी प्राविण्य मिळवलं आहे. एकदा तर काही मजुरांच्या सुटकेसाठीच्या एका मोहिमेत त्यांना बुरखा घालून इराकच्या रस्त्यांवर भीकदेखील मागावी लागली होती.
या व्यवसायात आपल्या ग्राहकाला असलेला संभाव्य धोका ओळखून त्यावर आधीच उपाययोजना आखून त्याचं रक्षण करावं लागतं. त्यामुळे काहीवेळा तर नाटक किंवा सिनेमात नसेल इतकं नाट्य खऱ्या आयुष्यात घडतं.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या बिझनेस डेली कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, "एकदा त्यांच्या मागे पाकिस्तानी सैनिक लागले आणि जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्या काश्मिरात भरकटल्या. त्यावेळी सीमेवर दोन्ही देशांमध्ये धुमश्चक्री सुरू होती आणि या गोळीबारात त्या अडकल्या होत्या."
एका 23 वर्षांच्या ब्रिटिश तरुणीला तिच्या नवऱ्याने फसवून पाकिस्तानात नेलं होतं. त्या मुलीच्या सुटकेसाठी आखण्यात आलेल्या मोहिमेतही त्यांना हेर म्हणून काम केलं.
त्या तरुणीच्या आईला माहिती मिळाली होती की तिला पाकिस्तानातील एका घरात बंदी बनवून ठेवण्यात आलं आहे. तिच्या आईने जॅकीकडे मदत मागितली.
रात्री जॅकी त्या तरुणीला ज्या घरात बंदी बनवण्यात आलं होतं, तिथे शिरल्या. त्या तरुणीला पलंगाला बेड्यांनी बांधून ठेवण्यात आलं होतं. जॅकी सांगतात, "ती तीन महिन्यांची गरोदर होती. तिच्यावर बलात्कार होत होते आणि मारहाणही व्हायची. तिला उपाशी ठेवलं जातं असे. मी तिला सांगितलं आम्ही परत येऊ आणि तुझी सुटका करू."
मात्र त्यांना अचानक समजलं की त्यांची हेरगिरी उघड झाली आहे. "बेनझीर भुत्तो, ज्यांच्यासाठी मी आधी काम केलं होतं, त्यांनी मला ओळखलं होतं. मी इथे कशासाठी आले आहे, ते त्यांना समजलं असावं."
मात्र यामुळे जॅकी आणि त्यांच्या टीमला योजनेची फेरआखणी करावी लागणार होती आणि त्यानुसार तात्काळ कारवाईसुद्धा करायची होती.
त्यांनी एका टॅक्सी ड्रायव्हरला पैसे देऊन त्या घराचं गेट तोडून गाडी आत घातली आणि त्या तरुणीची सुटका केली. यानंतर त्यांना भारतात जायचं होतं. मागे पाकिस्तानचे सैनिक लागलेले. जेवढं शक्य तेवढं अंतर गाडीतून पूर्ण करत त्या डोंगराळ भागात पोहोचल्या, इथला प्रवास त्यांना पायी पूर्ण करायचा होता.
जॅकी म्हणतात, "आम्हाला तर ट्रेनिंग देण्यात आलेलं असतं. शिवाय आम्ही शारीरिकदृष्ट्याही फिट असतो. मात्र माझ्यासोबत एक तीन महिन्यांची गरोदर मुलगी होती. तिला बेदम मारहाण झाली होती. ती उपाशी होती. तिच्या पायात फाटकी चप्पल होती आणि ती माझ्यासोबत पळत होती. खरंतर माझ्यासाठी ती खरी हिरो होती."
सुदैवाने काश्मीरमधल्या त्या गोळीबारातून सर्व बचावले आणि त्या मुलीला यशस्वीरीत्या तिच्या घरी पोहोचवण्यात आलं.
जॅकी सांगतात त्यांच्या तीन दशकांच्या व्यावसायिक कारकिर्दीत त्यांना दोन मोठ्या संधी मिळाल्या.
यूकेमध्ये सध्या अनेक मुली या क्षेत्रात येत आहेत. मात्र तरीही पुरुषांच्या तुलनेत त्यांचं प्रमाण दहा पुरुषांमागे एक इतकंच आहे.
शिवाय ही सेवा घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. "दहशतवादामुळे लोकांच्या डोक्यात सुरक्षेचा मुद्दा असतोच," असं जॅकी म्हणतात.
राजकीय अस्थैर्य आणि पश्चिम आशिया, चीन आणि इतर देशांत अतिश्रीमंतांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ, यामुळे गेल्या काही वर्षांत या क्षेत्राची वाढ झपाट्याने झाली आहे.
युरोपियन सुरक्षा सेवा संघटनेचे आकडे सांगतात यूकेमध्ये 2.30 लाख तर युरोपियन महासंघात 11 लाख लोक या क्षेत्रात काम करतात. युरोपमध्ये तब्बल 44,000 खासगी सुरक्षा देणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र यातील काहीच प्रत्यक्ष अंगरक्षक म्हणून काम करतात.
यूकेमध्ये Security Industry Authority (SIA) ही नियामक संस्था आहे. खासगी परवाना आणि खासगी सुरक्षा नियमनाची जबाबदारी या संस्थेची आहे. नव्याने येणाऱ्या प्रत्येकाला आधी प्रशिक्षण घ्यावं लागतं.
त्या सांगतात, "खऱ्या अर्थाने तुमचं प्रशिक्षण कधीच संपत नाही आणि ठरवून दिलेलं प्रशिक्षण घेतलं की तात्काळ तुम्ही अंगरक्षक किंवा खासगी सुरक्षा अधिकारीही होत नाही."
"खासगी सुरक्षेत कुणी काम करत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही तुमच्या ग्राहकाचे मित्र नाही. तुम्हाला थोडं अंतर ठेवता आलं पाहिजे. जेणे करून त्यांना ज्यावेळी तुमची गरज असेल तुम्ही तिथे असाल आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा तिथून बाहेर पडू शकाल," असं त्या म्हणतात.
नेटफ्लिक्सवर येऊ घातलेला 'Close' हा चित्रपट स्वतः जॅकी यांच्यावर आयुष्यावर आधारित आहे. हा अॅक्शन-थ्रीलर चित्रपट आहे. जॅकी या चित्रपटाच्या कन्सल्टंटही आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक विकी ज्युसन म्हणतात, "जॅकी सोबत काम केल्याने सिनेमातील अॅक्शन सीन्स अगदी प्रत्यक्ष असतात तसे शूट करता आले. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं."
जॅकी म्हणतात, "अंगरक्षक म्हणजे काळे गॉगल्स आणि पिळदार शरीर अशीच प्रतिमा आपल्या डोक्यात असते. मात्र अंगरक्षक म्हणजे मजबूत शरीरयष्टी नव्हे तर कुशाग्र बुद्धिमत्ता आहे."
नव्याने येणाऱ्याला व्यवसायातील बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. उदाहरणार्थ मिशलान हॉटेल्समध्ये जेवताना कुठले काटेचमचे वापरावे आणि रिट्समध्ये दुपारचा चहा कसा घ्यावा. सभोवतालच्या वातावरणात मिसळण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
शिवाय तुम्हाला सध्या जगात काय चाललंय, याची माहितीही असायला हवी. जॅकींचा सल्ला आहे, "तुम्हाला नॅसडॅकबद्दलही बोलता आलं पाहिजे, फक्त The Only Ways Essexबद्दल (ब्रिटिश रिअॅलिटी शो) माहिती असून उपयोग नाही."
या व्यवसायात काहीवेळा जोखीमही उचलावी लागते. याला जॅकी नाकारत नाही, "मात्र नोकरीवर जाताना तुम्ही सतत काळजी करू शकत नाही," अशी भूमिका त्या मांडतात.
आपलं म्हणणं त्या अशा शब्दात मांडतात, "ज्या कामाचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं आहे, तेच तुम्ही करत असता. जेव्हा तुम्ही परत येता, तेव्हा तुम्हाला वाटतं, बापरे, हे मी काय केलं?"
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)