हेरगिरी की वकिली : ती तरुणी अमेरिकेत काय करत होती?

अमेरिकन सरकारने एका 29 वर्षीय रशियन तरुणीला हेरगिरीच्या आरोपावरुन अटक केली आहे. राजकीय गटांमध्ये शिरकाव करून रशियासाठी माहिती गोळा केल्याचा आरोप या तरुणीवर आहे.

मारिया बुटिना या रशियन तरुणीनं प्रथम रिपब्लिकन पक्षासोबत संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिनं बंदुकीच्या वापराच्या मुद्द्यावर वकिली करण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती अमेरिकेतील माध्यमांनी दिली आहे.

अमेरिकेत 2016मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांत रशियानं हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती म्युलर यांच्यामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, रशियन तरुणीचा या निवडणूक प्रकरणाशी काही संबंध नाही, असा तिच्या वकिलांचा दावा आहे.

ही महिला क्रेमलिनमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार अमेरिकेत काम करत असल्याचा संशय आहे.

बुटिना यांचे वकील रॉबर्ट डिस्क्रोल यांनी याबाबत सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं. यात त्यांनी म्हटलं आहे की, "माझी अशील मारिया बुटिना ही रशियन गुप्तहेर नाही. ती एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी असून तिला शिक्षणाच्या मदतीने व्यवसाय सुरू करायचा आहे."

ते पुढे म्हणाले की, "तिच्या विरोधातील आरोप खूप फुगवून लावण्यात आले आहेत. तिनं आतापर्यंत कोणत्याही अमेरिकी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. उलट मारिया गेल्या काही महिन्यांपासून इथल्या सरकारी यंत्रणांना सहकार्य करत आहे."

अमेरिकेतल्या डीपार्टमेंट ऑफ जस्टीस (DOJ)कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मारिया वॉश्गिंटनमध्ये राहत असून रविवारी तिला अटक करण्यात आली. बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तिला जेलमध्येच राहावं लागणार आहे.

FBIचे स्पेशल एजंट केविन हेल्सन यांनी सोमवारी याबद्दल निवेदन प्रसिद्ध केलं. यात त्यांनी म्हटलं आहे की, मारियाला रशियन हितसंबंध वाढवण्यासाठी अमेरिकी राजकारण्यांमध्ये खासगी संबंध वाढवण्यास सांगण्यात आलं होतं.

मारियानं आपल्या कामाची माहिती सरकारला देणं आवश्यक होतं. कारण, इथल्या 'फॉरेन एजंट रजिस्ट्रेशन अॅक्ट'अंतर्गत असं करणं आवश्यक असल्याचं सरकार पक्षाचं म्हणणं आहे.

कोण आहे मारिया?

अमेरिकेच्या न्याय विभागाने कोणत्याही राजकीय पक्षाचं किंवा राजकीय व्यक्तीचं नाव न घेता सांगितलं की, मारियानं बंदुकीच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एका संघटनेसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला होता.

नॅशनल रायफल असोसिएशन (NRA) ही अमेरिकेतली सर्वांत मोठी गन लॉबी आहे. मारिया या गन लॉबीतल्या काही प्रमुख व्यक्तींच्या संपर्कात असल्याचं अमेरिकी माध्यमांनी यापूर्वीच प्रसिद्ध केलं होतं.

मारिया बुटिना ही मुळातली सायबेरियातली आहे. अमेरिकेन युनिर्व्हसिटीत स्टूडंट व्हिजावर ती अमेरिकेत आली आहे. इथे येण्यापूर्वी तिनं 'राईट टू बेअर आर्म्स' नावाचा समूह बनवला होता.

यापूर्वी मारियानं रशियन सरकारसोबत काम करत नसल्याचा दावाही केला होता.

'द वॉश्गिंटन पोस्ट'मधल्या वृत्तानुसार, रशियन बँकर आणि पूर्वीचे सिनेटर अॅलेक्झांडर टोर्शिन यांची सहकारी म्हणून मारियानं काम केलं आहे. टोर्शिन यांच्यावर अमेरिकी ट्रेजरीकडून एप्रिलमध्येच निर्बंध लादण्यात आले होते.

टोर्शिन नॅशनल रायफल असोसिएशनचे आजीव सदस्य आहेत. तसंच, मारियानं 2014पासून अमेरिकेत NRAच्या झालेल्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती.

मारियानं ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. तसंच, यावेळी ट्रंप यांची रशियाबाबत काय नीती असेल हे जाणून घेण्याचाही तिनं प्रयत्न केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)