You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
7 वर्षं बाळ होण्यासाठी प्रयत्न, आयव्हीएफद्वारे दिला एकाचवेळी 5 बाळांना जन्म
- Author, रविप्रकाश
- Role, बीबीसीसाठी
- Reporting from, रांची
झारखंडच्या सर्वात मोठ्या सरकारी दवाखान्यात 22 मेला दुपारी एका महिलेने पाच बाळांना जन्म दिला.
रांचीतल्या राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) या हॉस्पिटलमध्ये अंकिता कुमारी आणि प्रकाश कुमार साव सध्या आनंदात आहेत कारण लग्नानंतर जवळपास सात वर्षांनी त्यांना बाळं झालीयेत. पण या आनंदात काही चिंताही डोकावताहेत.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की या चिमुकल्या आणि त्यांच्या आईची तब्येत सध्या ठीक आहे, पण तरी त्यांना पुढचे काही आठवडे दवाखान्यात घालवावे लागतील.
त्यांच्या मुलींना दोन वेगवेगळ्या हॉस्पिटल्सच्या निओनेटल आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे.
अंकिता कुमारी रिम्समध्ये गेल्या 7 मे पासून दाखल झाल्या आहेत आणि स्त्री व प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ शशिबाला यांच्या युनिटमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
प्रसुतीपूर्व चाचणीत डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की त्यांच्या गर्भात एकाहून अधिक बाळं आहेत.
22 च्या दुपारी त्यांना अचानक प्रसवकळा सुरू झाल्या आणि अर्धा तासाच्या आत त्यांनी एकेक करून पाच मुलींना जन्म दिला.
डॉ शशिबाला यांच्या टीमचा भाग असलेलया डॉ. बुलुप्रिया यांनी म्हटलं की रिम्समध्ये पहिल्यांदाच पाच मुलांचा एकाचवेळी जन्म झाला आहे. याआधी एका महिलेने एकावेळी चार मुलांना जन्म दिला होता, पण तो विक्रम आता तुटलाय.
डॉ बुलुप्रिया यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, “असे प्रसंग कधी कधीच येतात. पण यात खूप आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. जगभरात अशा प्रकारच्या प्रसुती होत असतात. गर्भात एकपेक्षा अधिक अंडी तयार होणं ही सामान्य प्रक्रिया आहे. यामुळे काही धोका नाही, पण त्या अंड्यांपासून जर एकापेक्षा अधिक भ्रूण तयार झाले तर वेळेआधी प्रसुती आणि बाळांचं वजन कमी असण्याचा धोका संभवतो.”
“जे नैसर्गिकरित्या आईवडील बनू शकत नाहीत त्यांच्यासाठी आयव्हीएफ कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही.”
“अंकिता गेल्या सात वर्षांपासून आई बनू शकत नव्हती. त्यामुळे हजारीबागच्या कोणत्यातरी दवाखान्यातून त्यांनी आयव्हीएफ केलं होतं. कित्येक महिने ते दांपत्य डॉक्टरांच्या देखरेखीखाली होतं. तिथे झालेल्या तपासणीत गर्भात एकापेक्षा जास्त भ्रूण असल्याचं कळलं मग त्यांना रिम्समध्ये रेफर करण्यात आलं.”
“अंकिता आमच्याकडे आली तेव्हा 28 आठवड्यांची गरोदर होती. आमची इच्छा होती की तिचे दिवस पूर्ण व्हावेत, पण तिची वेळेपूर्वी प्रसुती झाली. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी की तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली, सिझर करावं लागलं नाही.”
“आमच्या सीनियर डॉ. नीलम आणि त्यांच्या टीमने अंकिताची प्रसुती केली. तिची तीन बाळं सरळ आणि दोन उलटी (पायाकडून) जन्माला आली. या दरम्यान अंकिताची प्रकृती स्थिर होती. तिची प्रकृती अशीच राहिली तर काही आठवड्यांनी तिला डिस्चार्ज देऊ. पण तिच्या मुलींना मात्र काही आठवडे दवाखान्यात घालवावे लागू शकतात.”
अंकिता आणि प्रकाश
27 वर्षांच्या अंकिता झारखंड राज्यातल्या चतरा जिल्ह्यातल्या मलकपुर गावात राहातात. त्याचे पती प्रकाश साव उपजिविकेसाठी फळांची गाडी लावतात.
याआधी ते कोणत्यातरी हॉटेलमध्ये काम करत होते. नोकरी सुटली तेव्हापासून ते फळं विकतात. आपल्या भावंडांमध्ये ते सर्वात मोठे आहेत.
प्रकाश साव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “मी कधी विचार केला नव्हता की मला एकाचवेळी पाच मुली होतील. लग्नानंतर एवढ्या वर्षांनी मुलबाळ झालं म्हणून आम्ही खुश आहोत पण आता या मुलींचा जीव वाचवण्याची चिंतादेखील आहे. रिम्समध्ये बेड रिकामा नसल्यामुळे मला दोन नवजात मुलींना एका खाजगी दवाखान्यात दाखल करावं लागलं आहे. बाकी तीन मुली रिम्समध्ये आहेत.
“माझा प्रश्न असा आहे की जर माझी पत्नी गेल्या 16 दिवसांपासून इथे अॅडमिट होती तर रिम्स हॉस्पिटलने माझ्या मुलींना वाचवण्यासाठी बेडची व्यवस्था का केली नाही. सगळ्यांना माहिती होतं की माझ्या पत्नीच्या गर्भात पाच बाळं आहेत. काल रात्री अचानक मला सांगितलं गेलं की इथे निकयूमध्ये जागा नाहीये, तुम्ही दोन बाळांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी गरीब माणूस आहे, खाजगी दवाखान्याचा खर्च मला परवडू शकत नाही.”
रिम्सच्या मॅनेजमेंटने प्रकाश यांच्या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बालरोग विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्सचं म्हणणं आहे की निकयूचे बेड्स आधीपासूनच भरलेले होते. त्यामुळे त्याच दोन मुलींना खाजगी दवाखान्याच्या निकयूमध्ये अॅडमिट करायला सांगितलं.”
आपलं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की, “निकयूमध्ये बेड्सची संख्या मर्यादित असते. तिथे आधीपासूनच नवजात बाळं अॅडमिट आहेत. त्यांना तिथून काढता येणार नाही कारण त्यांची प्रकृती गंभीर आहे.”
ते पुढे म्हणाले, “अंकिताची मुदतपूर्व प्रसुती झाली आहे. मग व्हेंटिलेटर किंवा इन्क्युबेटर आधीपासूनच कसं आरक्षित ठेवणार? त्यामुळे त्यांच्या पतींचे आरोप योग्य नाहीयेत. मुलींना खाजगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला त्यांचा जीव वाचवण्यासाठी दिला होता. आमची प्राथमिकता मुलांवर उपचार करणं आहे, कोणावर अन्याय करणं नाही.”
आयुष्मान कार्डाचा लाभ
23 तारखेला रात्री या चिमुकल्यांचा जन्मदाखला तयार झाल्यानंतर त्यांचं नाव आयुष्मान कार्डमध्ये अधिकृतरित्या दाखल झालं. त्यामुळे त्यांना आता कोणत्याही खाजगी दवाखान्यात सध्या पैसे भरावे लागणार नाहीत.
पण प्रकाश यांचं म्हणणं आहे की रांचीत येऊन उपचार करणं, राहणं, खाणं, औषधं यात एवढे पैसे खर्च झालेत की त्यांना कर्ज घ्यावं लागलं.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार एकाचवेळी सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा रेकॉर्ड मोरक्कोच्या हलीमा सिसे यांच्या नावावर आहे.
त्यांनी 2021 साली एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला. यात 5 मुली आणि 4 मुलं होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)