You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'डोळ्यांदेखत तान्हुल्यांचा जीव जातोय, पण आम्ही काहीच करू शकत नाही'
- Author, योगिता लिमये
- Role, अफगाणिस्तान प्रतिनिधी
तीन महिन्यांचा तैयबुल्लाह शांत, निस्तेज पडला आहे. त्याची आई निगर बाळाच्या नाकाजवळची ऑक्सिजनची नळी बाजूला घेऊन नाकाखाली बोट धरून बघते. बाळाचा श्वास जाणवतोय की....?
आपल्या मुलगा अखेरच्या घटका मोजतो आहे, हे लक्षात येताच तिला रडू कोसळतं.
अफगाणिस्तानातल्या ज्या रुग्णालयातलं हे चित्र आहे तिथे एकही व्हेंटिलेटर चालू स्थितीत नाही ही वस्तुस्थिती आहे.
तान्ह्या बाळांच्या नाकावर बसेल असे ऑक्सिजन मास्कच उपलब्ध नाहीत, त्यामुळे आजारी बाळांच्या माताच नर्सचं काम करत आपल्या हातानेच ऑक्सिजनची नळी बाळाच्या नाकापाशी धरतात. प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने आईला हेही काम करावं लागत आहे.
UNच्या (संयुक्त राष्ट्र)आकडेवारीनुसार, अफगाणिस्तानात दररोज 164 बालकांचा मृत्यू प्रतिबंध होऊ शकतो अशा आजारांनी होतो. योग्य औषधोपचार मिळाले तर असे आजार सहज बरे होऊ शकतात.
ही आकडेवारी भीषण आहे. पण हा अंदाज आहे. ठोस आकडा नाही.
खरंतर अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील घोर प्रांतातल्या मुख्य हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तिथल्या बालरोग विभागात प्रवेश केलात तर हा आकडेवारीचा अंदाज कमीच आहे की काय असं वाटायला लावणारं वातावरण दिसेल.
प्रत्येक बेडवर एकेक नव्हे तर कमीत कमी दोन आजारी लहान मुलं दिसतील. बालरुग्णांनी या खोल्या भरून गेल्या आहेत. न्यूमोनियाने ती एवढीशी मुलं पुरती खंगून गेलेली दिसतील. आणि अशा 60 आजारी मुलांची देखभाल करायला फक्त 2 नर्स आहेत.
एका खोलीत तर आम्हाला किमान डझनभर तान्ही बाळं गंभीर अवस्थेत दिसली. खरंतर अशा गंभीर प्रकृतीच्या मुलांना अतिदक्षता विभागात किंवा क्रिटिकल केअर युनिटमध्ये सततच्या देखरेखीखाली ठेवणं आवश्यक आहे. पण या हॉस्पिटलमध्ये ते अशक्यच आहे.
आणि असं सगळं असलं तरी घोरमधलं हे रुग्णालय त्या परिसरात उपलब्ध असणारं 'सर्वोत्तम' उपचार मिळण्याची शक्यता असणारं सार्वजनिक हॉस्पिटल आहे.
अफगाणिस्तानातल्या एकंदर परिस्थितीचा यावरून अंदाज येऊ शकतो. या देशात सार्वजनिक आरोग्यसेवा कधीच पुरेशी नव्हती.
त्यात ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर तर आरोग्यसेवेला मिळणारा परकीय मदत निधीही पूर्णपणे गोठवण्यात आला.
गेल्या 20 महिन्यांपासून आम्ही अफगाणिस्तानातल्या वेगवेगळ्या शहरांमधून हॉस्पिटल आणि दवाखाने पाहात हिंडलो आणि संपूर्ण वैद्यकीय यंत्रणाच मोडकळीला आल्याचं स्पष्ट दिसलं.
आता तालिबान्यांनी नवा फतवा काढत स्वयंसेवी संस्थांसाठी (NGO)स्त्रियांनी काम करण्यावर बंदी घातली आहे. म्हणजे आता मानवतावादी काम करणाऱ्या संस्थांचं काम आणखी अवघड होणार आहे. याचा अर्थ आणखी बाळं आणि लहान मुलांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं.
इकडे घोरच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही पाहिलं की, आवश्यक सोयी-सुविधा आणि डॉक्टर नसूनही तैयबुल्लाहचा जीव वाचवण्यासाठी ते शक्य होईल ते सर्व प्रयत्न करत होते.
बाळाला तपासायला डॉ. अहमद समादी यांना पाचारण करण्यात आलं. ते आले तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर तणाव आणि थकवा स्पष्ट दिसत होता. त्यांनी स्टेथेस्कोप तैयबुल्लाहच्या छातीशी लावला आणि त्यांना अगदी सूक्ष्म ठोके ऐकू आले.
एडिमा नावाची नर्स धावत जाऊन ऑक्सिजन पंप घेऊन आली. तो तैयबुल्लाहच्या तोंडावर लावून त्यातून प्राणवायू त्याला देण्यात आला. डॉ. समादी यांनी त्यांच्या हातांचे अंगठे त्याच्या इवल्याशा छातीवर दाबून फुफ्फुसांना चालना द्यायचा प्रयत्न केला.
तैयबुल्लाहचे आजोबा घवासद्दीन हे सगळे प्रयत्न हताशपणे पाहात होते. आपल्या नातवाला न्युमोनिया झाल्याचं आणि तो कुपोषित असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं.
"आमच्या चारसद्दा नावाच्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून इथे घोरमध्ये हॉस्पिटलमध्ये आणायला दगडधोंड्याचा रस्ता कापत आठ तास लागले", घवासद्दीन म्हणाले.
यांचं कुटुंब जगण्यापुरता कोरडा पाव मिळवू शकेल इतपत कमावतं. त्यांनी पै न पै गोळा करून हॉस्पिटलपर्यंतचा प्रवासखर्च भागवला होता.
त्यांच्या या लाडक्या नातवाला वाचवायची शर्थ चार तास सुरू होती. सुलतानी नावाची दुसरी नर्स अखेर निगरकडे हताशपणे वळून तैयबुल्लाह गेला, असं म्हणाली.
एक क्षण त्या खोलीत पसरलेली शांतता कापत निगरचे हुंदके तेवढे ऐकू आले. तिच्या बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळून घवासद्दीनकडे देण्यात आलं. मग ते कुटुंब त्याचं कलेवर घेऊन घराकडे निघाले.
तैयबुल्लाह वाचू शकला असता. त्याला झालेला आजार बरा होण्यासारखा होता.
"मी एक आईसुद्धा आहे. माझ्या डोळ्यादेखत असं बाळ दगावतं तेव्हा माझाच मुलगा दुरावतोय असं वाटतं. बाळासाठी रडणाऱ्या माऊली पाहिल्या की माझं हृदयही द्रवतं. माझ्या विवेकाला ठेच बसते," नर्स सुलतानी सांगते. तिला या हॉस्पिटलमध्ये खूप वेळा 24 तासांची शिफ्ट करावी लागते.
"इथे प्रशिक्षित स्टाफ नाही. विशेषतः महिला कर्मचारी खूप कमी आहेत. आमच्याकडे पुरेशी साधनसामग्री नाही. आमच्याकडे एवढे गंभीर आजार झालेली मुलं येतात की पहिल्यांदा कुणाकडे लक्ष द्यावं हेच कळत नाही. डोळ्यांदेखल तान्हुली दगावतात आणि आम्ही फारसं काहीच करू शकत नाही. "
अवघ्या काही मिनिटात शेजारच्या खोलीतून एका छोट्या मुलाची प्रकृती गंभीर झाल्याचं समजलं. त्याच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क घालण्यात आला, तरीही श्वास घेण्याची त्या जिवाची धडपड स्पष्ट दिसत होती.
दोन वर्षाच्या गुलबदनला जन्मतःच हृदयरोग होता. पेटंट डक्टस आर्टेरिऑसस नावाचा हृदयदोष होता. याच हॉस्पिटलमध्ये सहा महिन्यापूर्वी तिच्या आजाराचं निदान झालं होतं.
डॉक्टरांच्या मते, हा जन्मजात हृदयदोष दुर्मीळ नाही. उपचारांनी बरा करणं आधुनिक वैद्यकात सहज शक्य आहे. पण त्यासाठीची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा घोरच्या या मुख्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही. त्यासाठीचे औषधोपचारसुद्धा इथे नाहीत.
गुलबदनची आजी अफवा गुल तिचे छोटेसे हात खाली धरून ठेवत होती. कारण ती छोटी मुलगी आपल्या चेहऱ्यावरच्या मास्कला हात लावून खाली खेचत होती.
"आम्ही तिला काबूलला घेऊन जाण्यासाठी पैसे जमवले खरे. पण शस्त्रक्रियेचा खर्च आम्हाला परवडणारा नव्हता. म्हणून तिला परत आणावं लागलं", ती सांगते. त्यांनी काही आर्थिक मदत मिळवण्यासाठी स्वयंसेवी संस्थाही गाठली. त्यांची नोंदणी केली गेली पण त्यानंतर पुढे काहीच झालं नाही.
गुलबदने वडील नवरोझ तिच्या कपाळावर हळूवार थोपटत होते. आपल्या मुलीला श्वास घ्यायलाही किती त्रास होतो आहे हे पाहून तिचा त्रास थोडा तरी सुसह्य व्हावा म्हणून प्रयत्न करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. ओठ मुडपून मधूनच उसासा टाकत होते.
गुलबदन नुकतीच बोलायला लागली असल्याचं ते म्हणाले. तिचा पहिला शब्द, ती त्यांना कशी हाका मारते, कुटुंबातल्या इतरांशी कशी बोलायचा प्रयत्न करते... हे सगळं ते सांगत होते.
"मी कामगार आहे. मजुरीतून मिळणारं उत्पन्न ठराविक असं नसतं. माझ्याकडे पैसा असता तर पोरीची अवस्था अशी झाली नसती. मला या क्षणी एक कप चहा विकत घेणंही परवडू शकत नाही अशी परिस्थिती आहे", हताशपणे ते म्हणाले.
डॉ. समादींना मी विचारलं, गुलबदनला किती ऑक्सिजनची गरज आहे.
"मिनिटाला दोन लिटर", ते म्हणाले. "आणि जर हा सिलिंडर रिकामा झाला आणि दुसरा आपल्याला वेळेत मिळाला नाही, तर तिचा जीव जाईल."
आम्ही थोड्या वेळाने गुलबदनला बघायला पुन्हा त्या खोलीत आलो त्यावेळी नेमकं तेच घडलं होतं. ऑक्सिजन सिलिंडर संपला आणि त्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता.
हॉस्पिटलमधलं ऑक्सिजन निर्माण करणारं युनिट पुरेसा ऑक्सिजन निर्माण करू शकत नव्हतं. कारण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विजेची कमतरता होती. फक्त रात्रीच वीज असते. ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक असणारा कच्च्या मालाचा पुरवठा सातत्याने होतच नाही.
आम्ही तिथे होतो तेव्हाच्या काही तासांत दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यांना झालेले आजार बरे करणं आणि त्याचा परिणाम म्हणून होणारे हे अपमृत्यू रोखणं शक्य होतं. हे सगळं डोळ्यादेखत पचवणं भयंकर अवघड होतं. पण डॉ. समादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी हे आता नित्याचं झालं होतं.
"हे सगळं दररोज बघताना मला प्रचंड त्रास होतो, मी निराश होतो. दररोज आम्ही घोरमधले किमान एक-दोन लाडके जीव गमावतो आहोत. आता याची सवय व्हायला लागली आहे, हे भीषण आहे", डॉक्टर म्हणाले.
रुग्णालयातल्या वेगवेगळ्या खोल्यांमधून फिरताना आजारी, मरळून गेलेली लहान मुलं दिसत होती. जेमतेम वर्षाच्या साजादचे श्वास जड झाले होते. त्याला मेनिंजायटिस आणि न्यूमोनिया झाला होता.
दुसऱ्या बेडवर इरफान पडला होता. त्याला श्वास घेणं अधिक कठीण व्हायला लागलं तेव्हा त्याची आई झिया राह हिला आणखी एक ऑक्सिजन पाइप देण्यात आला. ती नळी ती आपल्या मुलाच्या नाकाजवळ लावून बसली होती.
गालावरून ओघळणारे अश्रू आपल्या बाह्यांनी पुसत पुसत ती दोन्ही नळ्या स्थिर ठेवायचा प्रयत्न करत होती. बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद होते म्हणून पंचाईत झाली. नाहीतर इरफानला चार-पाच दिवस आधीच हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवं होतं, तिने हताशपणे सांगितलं.
याचा अर्थ अनेक जण हॉस्पिटलपर्यंत पोहोचूच शकत नाहीत आणि जे पोहोचतात ते वाचण्याची शाश्वती नसते त्यामुळे ते तिथे थांबत नाहीत.
नर्स सुलतानी सांगत होती, "दहा दिवसांपूर्वी इथे एक अतिगंभीर अवस्थेतलं बाळ दाखल झालं. आम्ही लगेच त्याला इंजेक्शन दिलं. पण त्याचा आजार बरं करणारं औषध काही आमच्याकडे नव्हतं. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला घरीच घेऊन जाणं पसंत केलं. तो मरणारच असेल तर आपल्या घरी त्यानं अखेरचा श्वास घ्यावा, असं त्याचे वडील मला म्हणाले."
घोरमध्ये आम्ही जे काही पाहिलं त्यातून तिथल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न समोर आले. 2021 पर्यंत वीस वर्षं सलग लाखो डॉलरची मदत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिळत असूनसुद्धा अफगाणिस्तानची आरोग्य व्यवस्था इतकी झपाट्याने कशी कोलमडली?
हा पैसा कुठे खर्च झाला? एका प्रांतातल्या मुख्य रुग्णालयात जर एकही व्हेंटिलेटर नसेल तर ही मदत कुठे खर्च झाली?
अफगाणिस्तानातल्या तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. त्यामुळे त्यांना थेट पैसे आता देता येत नाहीत. मग एक तात्पुरती सोय सध्या करण्यात आली आहे.
मानवतावादी संस्था आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पगार, औषधोपचाराचा खर्च, रुग्णांसाठी अन्न आदी गोष्टींसाठी निधी देतात. त्यावर घोर हॉस्पिटलसारखी व्यवस्था किमान तग धरून उभी आहे.
आता हा निधी आधीच अपुरा आहे आणि तो सुरू ठेवता येईल का याबाबतही शाश्वती नाही.
तालिबान्यांनी स्त्रियांवर घातलेली बंधनं, अफगाण स्त्रियांनी UN आणि स्वयंसेवी संस्थांसाठी काम करू नये असा फतवा हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणारे जाचक नियम आहेत.
त्यामुळे मदतनिधी देणाऱ्या संस्थांच्या दात्यांनीही हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे.
अफगाणिस्तानसाठी UN ने केलेल्या आवाहनापैकी फक्त 5 टक्क्यांएवढा निधी आतापर्यंत मिळाला आहे.
आम्ही नंतर घोर हॉस्पिटलनजिकच्या एका टेकडीवरच्या कब्रस्तानात गेलो. तिथे साधा रखवालदारही नव्हता.
मृत्यूनोंदणी, रेकॉर्ड वगैरे लांबची गोष्ट. कुणाची कबर कुठली आहे हे शोधणंही कठीण आहे पण मोठ्या कबरींच्या तुलनेत लहानांच्या कबरी वेगळ्या सहज नजरेत येतात.
तिथे पाहिलेलं प्रमाण व्यथित करणारं होतं. नवीन खोदलेल्या कबरींपैकी अर्ध्याहून अधिक कबरी लहान होत्या.
कब्रस्तानाच्या जवळच राहणाऱ्या एका इसमाने आम्हाला सांगितलं की, गेल्या काही काळात सर्वाधिक लहान मुलांचेच मृतदेह इथे दफनासाठी येत आहेत.
नेमक्या किती मुलांचा मृत्यू झाला ही आकडेवारी सांगणं कठीण असेल पण परिस्थिती किती भयावह आहे हे सांगणारे पुरावे मात्र सगळीकडे दिसतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)