जगातील पहिल्या कृत्रिम मानवी भ्रूणाची निर्मिती, पण शास्त्रज्ञांच्या नैतिकतेवर होतेय टीका

शास्त्रज्ञांनी पहिलं कृत्रिम (सिंथेटिक) मानवी भ्रूण तयार केलं आहे. मात्र अंडी आणि शुक्राणूंशिवाय तयार करण्यात आलेल्या या भ्रूणामुळे शास्त्रज्ञांवर नैतिक टीका देखील केली जात आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, काही आठवड्यांच्या या कृत्रिम भ्रूणांमुळे मानवी विकासाच्या टप्प्यांबद्दल आणखीन सूक्ष्म माहिती घेता येणं शक्य होईल. शिवाय काही महिन्यांपूर्वीच गरोदर राहिलेल्या स्त्रियांचा गर्भपात का होतो हे जाणून घेण्यास मदत होईल.

सध्या या भ्रूणांचं बाळांमध्ये रुपांतर करण्याची योजना नसली तरी भविष्यात या क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे नैतिक आणि कायदेशीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर जेम्स ब्रिस्को म्हणाले की, लोकांची भीती दूर करण्यासाठी या विभागातील संशोधन अत्यंत सावध आणि खूप काळजीपूर्वक, पारदर्शकपणे करणं आवश्यक आहे.

इंटरनॅशनल सोसायटी फॉर स्टेम सेल रिसर्चच्या वार्षिक बैठकीत शास्त्रज्ञांनी मानवी कृत्रिम भ्रूण विकसित करण्याची घोषणा केली आहे.

मानवी कृत्रिम भ्रूणांना "एम्ब्रियो मॉडेल" देखील म्हणतात. ही मानवी भ्रूणांची प्रतिकृती असून वास्तवता ते भ्रूण नाहीत.

केंब्रिज विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रयोगशाळेतील प्राध्यापिका मॅग्डालेना झेरनिका-गॉट्ज यांनी हे कृत्रिम भ्रूण विकसित केले आहेत.

या संशोधनाचा संपूर्ण तपशील अद्याप प्रकाशित झालेला नसून हा अहवाल वैज्ञानिक तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र बऱ्याच संशोधकांनी या अहवालाच्या महत्त्वावर भाष्य करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

कृत्रिम भ्रूणांची निर्मिती स्त्रीबीज आणि शुक्राणूंच्या संमिश्रणातून होण्याऐवजी स्टेम सेलपासून केली जाते.

धडधडणारे हृदय

स्टेम सेल्सपासून कोणतीही पेशी बनवण्याची क्षमता असते. याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्यापासून कृत्रिम भ्रूण तयार करता येऊ शकते.

मानवी शरीरातील एखादा भाग वापरून भ्रूण तयार करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. याव्यतिरिक्त याला पूर्णपणे कृत्रिमही म्हणता येणार नाही. प्रयोगशाळेतील पारंपरिक भ्रूणांमधून या पेशींची निर्मिती करण्यात आली आहे.

प्राध्यापक झेरनिका-गोएट्झ यांनी गार्डियन वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, "हे खरोखरच खूप अद्भुत आहे. या कृत्रिम भ्रूणांचा विकास पूर्णपणे स्टेम सेल पासून करण्यात आलाय."

याआधी त्यांनी कृत्रिम उंदराचे भ्रूण विकसित केले होते, ज्यात त्या भ्रूणाचा मेंदू आणि हृदय धडधडत होतं.

दुसरीकडे चीनमधील शास्त्रज्ञांनी माकडांच्या मादीमध्ये कृत्रिम भ्रूणांची गर्भरोपण केले होते. मात्र ही गर्भधारणा अयशस्वी ठरली. हे कृत्रिम भ्रूण सामान्य भ्रूणांसारखे नसतात.

मात्र, त्यांच्या संशोधनात या भ्रूणांचा वापर कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

प्राध्यापक ब्रिस्को म्हणाले की, "स्टेम सेल्स पासून बनवलेल्या मानवी भ्रूणांचे हे मॉडेल आयव्हीएफ थेरपीसाठी पर्याय म्हणून वापरणं सहज शक्य होईल."

मात्र ते वापरताना त्याच्या वापराविषयीची मानकं आणि मार्गदर्शक तत्त्वं स्पष्ट असावीत.

बहुतेक देशांमध्ये मानवी भ्रूण संशोधनासाठी 14 दिवसांचा कालावधी दिलेला असतो. मानवी अंड्याचे गर्भामध्ये रूपांतर करून त्या गर्भाच्या वाढीसाठी 14 दिवस दिले जातात.

जगभरातील शास्त्रज्ञांच्या मते, हे विकसित भ्रूण 14 दिवसांपेक्षा जास्त काळ बाहेर राहता कामा नये.

पण 'एम्ब्रियो मॉडेल' हे कायदेशीर नसल्यामुळे त्याला कायदे लागू होतातच असं नाही.

यावर बर्मिंगहॅम विद्यापीठाचे डॉ. इल्देम अकरमन म्हणाले की, "14 दिवसांनंतरही या पेशी वाढवता येतील यासाठी लागणारं तंत्रज्ञान विकसित करू. कारण यातून मानवी विकासाच्या उत्क्रांतीबद्दल अधिक जाणून घेता येईल."

वंध्यत्व समजून घेण्यास मदत होईल

हे संशोधन पुढे जावं यासाठी ब्रिटनमधील कायदेशीर आणि नैतिक तज्ञ यावर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

संशोधकांना आशा आहे की, या कृत्रिम भ्रूणांमुळे मानवी जीवनाच्या सुरुवातीचा टप्पा समजून घेण्यास हातभार लागेल.

यावर मँचेस्टर विद्यापीठाचे प्राध्यापक रॉजर स्टर्मे म्हणाले की, "मानवी विकासाच्या या टप्प्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. बऱ्याचदा स्त्रियांचा याच कालावधीत गर्भपात होतो. यामुळे आपल्याला वंध्यत्व समजून घेण्यास मदत होईल. शिवाय कमी कालावधीत गर्भपात का होतात हे समजून घेता येईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)