उत्तर प्रदेश : 4 पाय, 1 डोकं, 4 हात असलेली बाळं का जन्मतात?

    • Author, मीना कोटवाल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

2018 मध्ये उत्तर प्रदेशात चार पाय आणि दोन लिंग असलेलं बाळ जन्माला आलं होतं. मात्र जन्माच्या दोनच दिवसांत ते दगावलं. गोरखपूरमधील सहजनवा गावातली ही घटना आहे. पण असं का होतं? यामागं नेमकं विज्ञान काय आहे?

इथल्या सरकारी दवाखान्यात 15 सप्टेंबर 2018ला या बाळाचा जन्म झाला होता. हे बाळ दोन दिवसांतच दगावल्याची माहिती या कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांनी बीबीसीला दिली.

"चार पायांसोबतच दोन लिंग असल्याने ते शी-शू करू शकत नव्हतं," अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित आईचे सोनोग्राफी रिपोर्ट नॉर्मल होते, असंही त्यांनी सांगितलं होतं. यामागचं विज्ञ बीबीसीनं केलेली बातमी पुन्हा शेयर करत आहोत.

आजार की आश्चर्य?

भारतात अशा बाळांना वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. कुणी त्यांना शुभ मानतात कुणी अशुभ, तर कुणी त्याला दैवी मानतात. मात्र अशा बाळांचा जन्म खरंच काही दैवी प्रकार आहे की हा आजार आहे?

मॅक्स हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. कपिल विद्यार्थी म्हणतात की यात काहीच आश्चर्य नाही.

खरंतर अशा घटना या जुळ्या मुलांशी संबंधित असतात. आईच्या गर्भात बीज आल्यानंतर अनेक समस्या उद्भवू शकतात. गर्भात जर जुळी मुलं असतील आणि ती पूर्ण विकसित होऊ शकली नाही, तर अशा समस्या निर्माण होतात.

"अशा प्रकारांमध्ये स्त्रीबीजाचा जेवढा भाग जोडलेला असतो तेवढा विकसित न होता उर्वरित भागाची वाढ होते आणि शरीराचे इतर अवयव तयार होतात. म्हणजेच स्त्रीबीज पूर्णपणे वेगळं झालं नाही तर बाळ जन्मल्यावर त्यांचे काही अवयव जोडले गेलेले असू शकतात."

ते म्हणतात, "आईच्या गर्भात एका स्त्रीबीजीचे दोन पूर्णपणे वेगळे भाग झाले तर जुळी मुलं होतात. आणि जर स्त्रीबीज पूर्ण विभाजित नाही झालं तर दोन प्रकारची जुळी मुलं होऊ शकतात."

दोन प्रकारची जुळी मुलं

मॅक्स हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. पी. धर्मेंद्र म्हणतात की गोरखपूरमध्ये जन्माला आलेलं बाळ हे 'पॅरासेटिक ट्विन' आहे. सोप्या शब्दात समजून सांगताना डॉ. धर्मेंद्र म्हणतात, "जुळी मुलं होणार होती. मात्र काही कारणांमुळे त्यांची पूर्ण वाढ होऊ शकली नाही. त्यांच्या शरीरातील काही अवयवांचीच पूर्ण वाढ झाली. अशाप्रकारे पूर्ण वाढ न झाल्यमुळे एकाच बाळाचे जास्तीचे अवयव बनले."

याच पद्धतीचे 'कन्जाइंड ट्विन'सुद्धा असतात. अशा बाळांची वाढ तर पूर्ण होते. मात्र त्यांच्या शरीरातला एक भाग किंवा काही भाग जोडलेला असतो.

दोन्ही प्रकारच्या जुळ्या बाळांमध्ये ऑपरेशन करून त्यांना वेगळं करावं लागतं.

बाळांच्या शरीराच्या खालचा भाग जोडला गेला असेल तर ऑपरेशनने तो वेगळा करता येतो. पण पाठीच्या कण्याचा भाग जोडला असेल तर मात्र ही शस्त्रक्रिया कठीण असते, असं ते सांगतात.

यावर उपचार काय?

आईच्या गर्भात असं बाळं वाढत असेल तर त्याची आधीच माहिती मिळू शकते आणि आईवडिलांची इच्छा असेल तर गर्भपातही केला जाऊ शकतो.

डॉक्टर सांगतात, गर्भधारणेच्या चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात केलेल्या सोनोग्राफीमध्ये बाळ कसं आहे, हे कळतं.

डॉ. धर्मेंद्र सांगतात की अशा प्रकारांमध्ये आणखी एक पद्धत वापरली जाते.

ते म्हणतात, "आईच्या गर्भात एकापेक्षा जास्त भ्रूण असतील आणि त्यातील एकाची योग्य वाढ होत नसेल तर एक उपाय करता येतो. जे भ्रूण वाढत नाही त्याची वाढ इंजेक्शनने थांबवता येते. त्यामुळे जे भ्रूण चांगलं वाढतं आहे त्याला आईकडून चांगलं पोषण मिळते. आईकडून मिळणारं पोषण सर्व बाळांमध्ये विभागलं जातं आणि कोणतंच बाळ पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही, म्हणून ही दक्षता घ्यावी लागते."

जुळी मुलं होण्याची कारणं

बालरोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र यांना वाटतं की IVFमुळे (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन IVF) जुळी मुलं होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

ते म्हणतात, "IVFमुळे आईच्या गर्भात एकापेक्षा जास्त भ्रूण सोडलेली असतात. ज्यामुळे जुळी मुलं होण्याचं प्रमाण वाढलं आहे."

IVFमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिलन प्रयोगशाळेत केलं जातं. यातून तयार झालेलं भ्रूण आईच्या गर्भात सोडलं जातं.

मात्र डॉ. धर्मेंद्र हेसुद्धा सांगतात की IVFमुळे जुळी मुलं होण्याचं प्रमाण वाढलं असलं तरी नैसर्गिकरीत्या गर्भधारणा झालेल्या स्त्रियांमध्येदेखील जुळी मुलं होऊ शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)