नवजात बाळाला आईऐवजी बाबा स्तनपान देतात तेव्हा...

    • Author, रोझिना सिनी
    • Role, बीबीसी यूजीसी, सोशल न्यूज

ही घटना आहे अमेरिकेतील विस्कॉन्सिन इथली. एप्रिल नोयिबौआ आणि तिचा पती मॅक्सामिलियन यांच्यासाठी 26 जून हा दिवस फारच महत्त्वाचा होता. एप्रिल बाळाला जन्म देणार होती. पण हे इतकं सरळ नव्हतं. हॉस्पिटलमध्ये एप्रिलला दाखल केल्यानंतर घडलेल्या घटनांनी मॅक्समिलियनचं भावविश्व बदलून टाकलं.

एप्रिलला हाय ब्लड प्रेशरचा त्रास होता आणि रक्तदाब अचानक वाढल्यानंतर तातडीने सीझर करणं आवश्यक होतं. 26 जूनला तिनं मुलीला जन्म दिला. या बाळाचं नाव ठेवण्यात आलं रोझली. पण एप्रिलला पुन्हा फिट आल्यानंतर तिच्यावर पुढचे उपचार सुरू करणं क्रमप्राप्त होते. एप्रिलने अजून नवजात बाळाला जवळही घेतलेलं नव्हतं आणि तिला स्तनपानही देता आलं नव्हतं.

रोझलीचं वजन 3.6 किलो होतो. एप्रिलवर उपचार सुरू असल्याने तिला वडील मॅक्समिलियन यांच्याकडे देण्यात आलं.

मॅक्समिलियन म्हणतात, "नर्स बाळाला घेऊन बाहेर आली. मग आम्ही नर्सरीमध्ये गेलो. मी बाळाला घेऊन खाली बसलो. बाळाला माझ्या शरीराचा स्पर्श व्हावा म्हणून मी शर्ट काढून बसलो होतो."

बाळाला भरवण्यासाठी कृत्रिम दूध देण्याचं ठरलं. "नर्सने मला विचारलं मी माझे निपल खुले करून थोडं खरंखुरं वाटेल असं स्तनपानासारखं करू शकेन का? बाळासाठी ते चांगलं आहे. मला अशा अतरंगी गोष्टी करायला आवडतंच आणि मुलीसाठी मी नक्कीच काहीही करू शकतो. म्हणून मी लगेच हो म्हटलं."

बाबानं स्तनपान देण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. या नर्सने प्लास्टिकचं निपल (कृत्रिम स्तनाग्र) मॅक्समिलियन यांच्या छातीला बसवलं. या निपलला एक नळी बसवण्यात आली होती. ही नळी एका सिरिंजला जोडण्यात आली होती. या सिरिंजमधून कृत्रिम दूध दिलं जात होते. सिरिंज बाबाच्या खांद्यावर बसवण्यात आली होती.

"मी कधी स्तनपान देईन वगैरे विचारही केला नव्हता. बाळाला स्तनपान देणारा मी पहिलाच बाप असेन कदाचित. माझ्या सासूचा यावर विश्वासच बसला नाही आणि माझे आजोबा काही बोलूच शकले नाहीत हे ऐकून", मॅक्समिलियन सांगतात.

"माझ्या बाळाला पाहाताच एक क्षणात तिच्याशी कनेक्शन निर्माण झालं. मी तिला धरू शकलो आणि तिला स्तनपान करण्याचा सराव व्हावा यासाठी मी मदत करू शकलो असो मला वाटतं," असे ते म्हणाले.

बाळाला स्तनपान देतानाचे हे फोटो त्यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

फेसबुकवर त्यांच्या फोटोंचं अनेकांनी स्वागत केलं. त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही जणांनी या नर्सची स्तुती केली आहे. तर काही जणांनी मात्र तुम्ही दुधाची बाटली वापरू शकला असतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ही पोस्ट 30 हजारपेक्षा जास्त वेळा शेअर झाली आहे.

मॅक्समिलियन म्हणतात, "खऱ्या सुपरहिरो तर त्या नर्स आहेत. मी फक्त चांगला पिता होण्याचा प्रयत्न केला. अर्थात मातांनाही विसरता येणार नाही. मी हे त्यांच्यासाठीही केलं."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)