'आय लव्ह मोहम्मद'चं आवाहन करणारे तौकीर रजा खान कोण आहेत? बरेलवी मुस्लीम कोणाला म्हणतात?

मौलाना तौकीर रजा खान

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मौलाना तौकीर रजा खान (संग्रहित छायाचित्र)

शुक्रवारी (26 सप्टेंबर) उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' मोहिमेच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळेस पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली होती.

या प्रकरणात 50 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष आणि चर्चेत असलेले इस्लामी विद्वान अहमद रजा खान यांचे वंशज मौलाना तौकीर रजा खान यांचा समावेश आहे.

65 वर्षांचे तौकीर रजा खान हे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षाचे 'मास्टरमाईंड' असल्याचं बरेली पोलिसांचं म्हणणं आहे.

तर तौकीर रजा खान यांनी म्हटलं आहे की, बरेलीत जेव्हा ही घटना घडत होती, तेव्हा ते त्यांच्या घरात नजरकैद होते.

कानपूरमध्ये 'आय लव्ह मोहम्मद'चा बॅनर लावण्यावरून एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर देशभरात अनेक शहरांमध्ये मुस्लीम समुदायानं 'आय लव्ह मोहम्मद' मोहीम चालवली आणि अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली.

याच संदर्भात बरेलीमध्ये इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना तौकीर रजा यांनी शुक्रवारी (26 सप्टेंबर) लोकांना बरेलीतील इस्लामिया मैदानात जमण्याचं आवाहन केलं होतं.

बरेली पोलिसांचं म्हणणं आहे की, जमावाला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र लोकांनी बॅरिकेडिंग तोडून इस्लामिया मैदानात पोहोचण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळेस पोलीस आणि निदर्शकांमध्ये झटापट झाली आणि पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला.

बरेली पोलिसांनी सांगितलं की, तौकीर रजा खान आणि इत्तेहाद-ए-मिल्लतच्या इतर पदाधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय लोकांना इस्लामिया मैदानात जमण्याचं आवाहन केलं होतं.

वाद आणि अटक

बरेली पोलिसांनी शुक्रवारी (26 सप्टेंबर) झालेली झटापट आणि हिंसाचाराशी निगडित प्रकरणात 10 एफआयआर नोंदवण्यात आहेत. त्यातील सात एफआयरमध्ये तौकीर रजा खान यांचं नाव आहे.

त्यांना अटक करून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. अर्थात तौकीर रजा खान तुरुंगात जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.

याआधी 2010 मध्ये उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या कार्यकाळातदेखील त्यांना धार्मिक हिंसाचार भडकावण्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.

2010 मध्ये देखील बरेलीमध्ये जुलूस-ए-मोहम्मदी (बारावफात) वर निघणाऱ्या मिरवणुकीच्या वेळेस हिंसाचार झाला होता.

त्यावेळेस उत्तर प्रदेश पोलिसांनी मौलाना तौकीर रजा यांना अटक करून तुरुंगात पाठवलं होतं.

त्यावेळेस बरेली शहरात कर्फ्यू लागला होता आणि तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी नंतर या प्रकरणातील तौकीर रजा खान यांच्या विरोधातील तपास बंद केला होता.

बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी 26 सप्टेंबरच्या घटनेसंदर्भात गंभीर आरोप लावले आहेत

फोटो स्रोत, @bareillypolice

फोटो कॅप्शन, बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी 26 सप्टेंबरच्या घटनेसंदर्भात गंभीर आरोप लावले आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अर्थात, तौकीर रजा खान यांच्यावरील हा पहिलाच खटला नव्हता. त्यांच्यावर पहिला खटला बरेली पोलीस ठाण्यात 1982 मध्ये दंगल भडकावल्याचा गुन्ह्याअंतर्गत दाखल झाला होता.

शुक्रवारी (26 सप्टेंबर) झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात सात एफआयआरमध्ये नाव येण्याआधी त्यांच्याविरोधात 10 खटले होते.

2023 मध्ये तौकीर रजा खान यांनी हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याचं आवाहन केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात मुराबाद पोलिसांनी दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या आरोपाखाली खटला दाखल केला होता.

अर्थात या प्रकरणात त्यांना अटक झाली नव्हती.

तौकीर रजा खान भारतातील मुस्लिमांशी निगडीत मुद्द्यांवर उघडपणे बोलत आले आहेत. तसंच त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत देखील राहिले आहेत.

2015 मध्ये तौकीर रजा खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचं आवाहन केलं होतं.

2023 मध्ये हरियाणात कथित गोरक्षकांनी मुस्लीम तरुणांची हत्या केल्यावर त्यांनी त्याच्या विरोधात तिरंगा यात्रा काढण्याचं आवाहन केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं.

तौकीर रजा खान भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत असतात आणि त्याच्याशी निगडित अनेक वक्तव्यं त्यांनी केली आहेत.

2024 मध्ये त्यांना दिल्लीतील रामलीला मैदानात कार्यक्रम करण्यापासून अडवण्यात आलं होतं. त्यावेळेस त्यांनी वक्तव्यं केलं होतं की, "मुस्लिमांमध्ये आतल्या आत लाव्हा धुमसतो आहे. तो कसा तरी बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे, नाही तर त्याचा ज्वालामुखी होईल."

तर दिल्लीतील जहांगीरपुरीत हिंसाचार झाल्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईवर प्रश्न उपस्थित करत तौकीर रजा खान म्हणाले होते की पोलीस मुस्लिमांवर एकतर्फी कारवाई करते आहे.

ते म्हणाले होते, "मुस्लीम जर रस्त्यावर उतरले तर त्यांना कोणीही अडवू शकणार नाही."

शुक्रवारच्या (26 सप्टेंबर) घटनेनंतर बरेलीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शुक्रवारच्या (26 सप्टेंबर) घटनेनंतर बरेलीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे

मौलाना तौकीर रजा खान यांचा राजकीय प्रभाव जरी मर्यादित असला तरी, बऱ्याच मुस्लिमांवर त्यांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं.

मौलाना असनाद रजा म्हणतात, भलेही मुस्लीम तौकीर रजा खान यांच्यापासून राजकीय अंतर राखून असले तरी, त्यांच्या म्हणण्यावरून मत देत नसले, तरी मुस्लीम समुदाय त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जोडलेला आहे.

ते म्हणतात, प्रत्येक मुस्लीम पैंगबर मोहम्मदावर मनापासून प्रेम करतो. बऱ्याचशा मुस्लिमांसाठी हा फक्त धार्मिकच नाही तर भावनिक मुद्दा आहे. तौकीर रजा खान पैंगबर यांच्या सन्मानासाठी आवाज उठवत आले आहेत. सर्वसामान्य मुस्लीम याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडलेला आहे.

तर अन्वर अहमत म्हणतात, "मौलाना तौकीर रजा भलेही धार्मिक भूमिकेत राहिले नसतील, ते अधिक राजकीय व्यक्ती असतील, मात्र बऱ्याचशा मुस्लिमांसाठी ते बरेलीच्या दर्ग्याशी जोडलेला चेहरा आहे. अशा परिस्थितीत, ते जेव्हा आवाहन करतात तेव्हा लोक त्यांचं ऐकतात."

अन्वर अहमद म्हणतात की, असं वाटतं की यावेळेस मौलाना तौकीर रजा खान यांना परिस्थितीचं आकलन झालं नाही. त्या प्रशासनाच्या प्रतिक्रियेचा अंदाज आला नाही.

तौकीर रजा खान यांचा किती प्रभाव आहे?

तौकीर रजा खान प्रमुख धार्मिक कुटुंबाशी जोडलेले आहेत आणि राजकारणातदेखील सक्रिय आहेत. त्यांचे वडील रेहान रजा खान काँग्रेसच्या काळात एमएलसी (विधान परिषदेचे सदस्य) देखील होते.

अर्थात, त्यांच्या कुटुंबातील बाकीचे लोक राजकारणात फारसे सक्रिय नाहीत.

मौलाना तौकीर रजा खान यांनी 2001 मध्ये इत्तेहाद ए मिल्लत कौन्सिल म्हणजे आयईएमसी बनवला.

या प्रादेशिक राजकीय पक्षानं स्थानिक पातळीवर निवडणूक लढवली आणि विधानसभा निवडणुकीत देखील ते मैदानात उतरले.

आयईएमसी (ज्याची मान्यता गेल्या आठवड्यात रद्द करण्यात आली आहे) नं 2001 मध्ये त्यांच्या पहिल्या नगरपालिका निवडणुकीत अनेक जागा जिंकल्या होत्या.

आयईएमसीनं 2012 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार रिंगणात उतरवले होते.

बरेलीतील भोजीपुरा मतदारसंघातून निवडून येणारा पक्षाचा एकमेव आमदार नंतर समाजवादी पार्टीत गेला होता.

निदर्शनात सहभागी झालेल्या लोकांचा आरोप आहे की शुक्रवारी (26 सप्टेंबर) पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्यामुळे परिस्थिती चिघळली

फोटो स्रोत, Anubhav Saxena

फोटो कॅप्शन, निदर्शनात सहभागी झालेल्या लोकांचा आरोप आहे की शुक्रवारी (26 सप्टेंबर) पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्यामुळे परिस्थिती चिघळली

आयईएमसी पक्षाला बरेलीच्या बाहेर फारसा राजकीय प्रभाव पाडता आला नाही. मात्र, बरेलीमध्ये या पक्षाचा प्रभाव राहिला.

तौकीर रजा खान कधीही कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षात गेले नाहीत. मात्र, काँग्रेसपासून बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीला पाठिंबा देत आले आहेत.

एकेकाळी बहुजन समाज पार्टीच्या जवळ राहिलेले तौकीर रजा खान यांनी 2007 मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला. नंतर ते समाजवादी पार्टीबरोबर गेले.

उत्तर प्रदेशात 2012 मध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टीचं सरकार स्थापन झालं. तेव्हा त्यांना राज्य मंत्र्याचा दर्जा देत उत्तर प्रदेश हॅंडलून कॉर्पोरेशनचा चेअरमन बनवण्यात आलं होतं.

अर्थात सप्टेंबर 2014 मध्ये त्यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारवर मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीयवादी दंगलीच्या वेळेस मुस्लिमांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत पदाचा राजीनामा दिला होता.

अहमद रजा खान यांचे वंशज

तौकीर रजा खान प्रसिद्ध इस्लामी विद्वानांच्या कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव फक्त बरेली किंवा जवळपासच्या जिल्ह्यांपर्यंत मर्यादित नाही. तर भारताच्या सीमेपलीकडे जिथे सुन्नी-सूफी इस्लामचा प्रभाव आहे, अशा देशांमध्येदेखील आहे.

अर्थात तौकीर रजा खान यांच्या राजकारणाचा प्रभाव बरेली आणि जवळपासच्या भागातच मर्यादित आहे.

तौकीर रजा खान 19 व्या शतकातील प्रसिद्ध इस्लामी विद्वान अहमद रजा खान यांच्या सहाव्या पिढीतील आहेत, हीच त्यांची सर्वात मोठी ओळख आहे.

बरेलीमध्ये आला हजरत नावानं प्रसिद्ध असलेल्या अहमद रजा खान यांचा दर्गा आहे. त्याच्याशी जगभरातील कोट्यवधी लोक जोडलेले आहेत.

प्रशासनाचं म्हणणं आहे की, 26 सप्टेंबरच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती

फोटो स्रोत, Anubhav Saxena

फोटो कॅप्शन, प्रशासनाचं म्हणणं आहे की, 26 सप्टेंबरच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती

तौकीर रजा खान यांचे मोठे भाऊ मौलाना शुब्हान रजा खान या दर्ग्याचे गद्दीनशी म्हणजे मुख्य सेवक आहेत.

अहमद रजा खान सुन्नी-सूफी इस्लामच्या प्रमुख सुधारणावादी धर्मगुरूंपैकी एक होते.

अहमद रजा खान यांनी अनेक धार्मिक पुस्तकंदेखील लिहिली आणि इस्लामच्या व्याख्या केल्या.

अहमद रजा खान यांनी इस्लाममध्ये जे सुधारणावादी आंदोलन सुरू केलं, त्याला बरेलवी आंदोलन म्हटलं गेलं आहे.

तसं पाहता बरेलवी इस्लाममध्ये एक पंथ नाही. तरीदेखील बरेचसे मुस्लीम त्यांची धार्मिक ओळख बरेलीशी जोडतात आणि स्वत:ला 'बरेलवी' म्हणतात.

अहमद रजा खान यांच्या बरेलवी आंदोलनानं मुस्लिमांना पारंपारिक सुन्नी इस्लाम आणि सूफीवादाकडे परतण्यास प्रेरित केलं. पैगंबर मोहम्मद यांच्याशी भक्तीमय प्रेम हे त्याचं केंद्र आहे.

याच कारणामुळे, भारतात जिथे-जिथे बरेलवी मुस्लिमांचा प्रभाव आहे, तिथे-तिथे बारावफात किंवा ईद-उल-मिलादुल नबीच्या प्रसंगी मिरवणुका निघतात.

पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठीच मुस्लिमांनी 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर, पोस्टर लावले.

बरेलवी इस्लामशी जोडलेले एक स्थानिक मौलाना असनाद रजा म्हणतात, "तौकीर रजा खान, आला हजरत अहमद रजा खान यांचे वंशज आहेत. त्यामुळेच बरेचसे मुस्लीम त्यांचा आदर करतात आणि त्यांचं ऐकतातसुद्धा."

अर्थात, बरेलीचा आला हजरत दर्गा धर्माच्या केंद्रस्थानी राहिला आहे, राजकारणाच्या नाही.

मौलाना असनाद रजा म्हणतात, "सुन्नी मुस्लीम, जे स्वत:ला बरेलवी देखील म्हणतात. त्यांच्यासाठी बरेलीचा दर्गा खूप महत्त्वाचा आहे. बरेलीचा दर्गा हे धार्मिक केंद्र आहे, ते राजकारणाचं केंद्र नाही. त्यामुळेच त्याचा धार्मिक प्रभाव आहे, मात्र राजकीय प्रभाव नाही."

तर बरेली शहरातीलच एक स्थानिक मुस्लीम अनवर अली म्हणतात, "बरेली किंवा जवळपासचे मुस्लीम तौकीर रजा खान यांचं म्हणणं ऐकतात कारण ते आला हजरत यांच्या कुटुंबातील आहेत आणि दर्ग्याशी जोडलेले आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)