You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी श्वेतवर्णीय मुलाला दत्तक घेतलं, पण लोक म्हणतात याला तू चोरून आणलंय'
- Author, मेघा मोहन
- Role, जेंडर अँड आयडेंटिटी करस्पाँडंट
आंतरवर्णीय दत्तक कथांच्या बहुतांश प्रकरणांमध्ये श्वेतवर्णीय (व्हाईट) पालक हे कृष्णवर्णीय (ब्लॅक) किंवा आशियाई (आशिया खंडातील) मुलांना दत्तक घेत असल्याचं दिसून येतं.
पण जेव्हा याच्या उलटं घडतं आणि कृष्णवर्णीय किंवा आशियाई पालक हे श्वेतवर्णीय मुलांना दत्तक घेतात, त्यावेळी सर्वसामान्यांबरोबरच अधिकारीही त्याबाबत बऱ्याच शंका उपस्थित करतात.
सात वर्षांचा जॉनी चांगलाच चिडलेला होता. तो काहीसा उदास होता आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली होती. त्यात नॉर्थ कॅरोलिनाच्या शार्लोटमध्ये डिनरसाठी गेलेला असताना जॉनी खेळण्यासाठी असलेल्या पार्कमध्ये दुसऱ्या एका मुलाशी भांडत असल्याचं पीटरनं पाहिलं.
त्यामुळं आपल्या दत्तक मुलाच्या रागाचा स्फोट होऊन काही गोंधळ होण्याआधीच पीटरला जॉनीला तिथून घेऊन जायचं होतं. त्यामुळं मुलाला उचलून पीटरनं घाईनं बिल दिलं.
पीटर जॉनीला घेऊन कारकडं निघाला, त्यावेळी जॉनी रागात असल्यानं प्रचंड चीडचीड करत होता. पीटरनं कारचा दरवाजा उघडण्यासाठी त्याला खाली उतरवलं, तेव्हाही त्याचा राग कमी झालेला नव्हता.
त्याचवेळी एक महिला त्यांच्याकडं आली. ती त्यांच्याकडं एकटक पाहत होती.
"या मुलाची आई कुठे आहे?" असं तिनं विचारलं.
त्यावर पीटरनं "मी याचा वडील आहे," असं उत्तर दिलं.
महिला एक पाऊल मागं सरकली आणि पीटरच्या कारसमोर उभी राहिली. तिनं नंबर प्लेटकडं पाहिलं आणि तिचा फोन बाहेर काढला.
"हॅलो, पोलिस," ती शांतपणे बोलत होती.
"इथं एक कृष्णवर्णीय व्यक्ती आहे, मला वाटतंय तो एका लहान श्वेतवर्णीय मुलाचं अपहरण करतोय," असं त्या म्हणाल्या.
जॉनी अचानक शांत झाला आणि तो पीटरकडे पाहू लागला. पीटरनं त्याला मुलाला उचलून जवळ घेतलं आणि ठीक आहे, असं त्याला म्हणाला.
लोनली प्लॅनेट या ट्रॅव्हल साईटवर कबालेचं या प्रचंड धूळ असलेल्या शहराचं वर्णन आहे ते असं, "अशी जागा, जिथून लोक शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात," असं करण्यात आलं होतं. रवांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या सीमेजवळील युगांडामध्ये हे ठिकाण जवळपासच्या अनेक नॅशनल पार्ककडं जाण्याच्या मार्गावरील एक महत्त्वाचं केंद्र आहे.
पीटर यांच्या मनात, आजही त्यांच्या गावाबद्दलच्या अनेक वेदनादायी आठवणी ताज्या आहेत.
गरीब कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले होते. लहानपणी ते त्यांच्या आठ सदस्यांच्या कुटुंबासह दोन खोल्या असलेल्या झोपडीत राहत होते आणि जमिनीवर झोपत होते.
"आमच्यासाठी फार आशायदायी असं काहीच नव्हतं. जेवण म्हणावं तर, फक्त बटाटे आणि सूप असायचा. फारच नशीब चांगलं असेल, तर बीन्स मिळायचे," असं ते सांगतात.
दारू आणि हिंसा ही पीटर यांच्या दैनंदिन जीवनातील वास्तविकता होती. त्यापासून दूर जाण्यासाठी, पीटर नातेवाईकांच्या घरी पळून जायचे. काही मीटर अंतरावरच त्यांचं घर होतं.
"एकीकडं आमच्यासाठी तिथं एक विस्तारित असं मोठं कुटुंब होतं. मुलांना मोठं करण्यासाठी गाव गरजेचं असतं हे मी शिकलो. पण ते सर्वकाही अत्यंत अराजकता असलेलं होतं," असं पीटर सांगतात.
वयाच्या 10 वर्षी पीटरनं या सर्वापेक्षा बेघर होणं बरं असं ठरवलं. त्यामुळं हाताच्या मुठीत शक्य होईल, तेवढी नाणी घेऊन तो बस स्टॉपच्या दिशेनं पळाले.
"इथून सर्वात लांब कोणती बस जाते?" त्याठिकाणी बसची वाट पाहणाऱ्या महिलेला त्यानं विचारलं. त्या महिलेनं एका बसकडे बोट दाखवलं. पीटरला त्यावर काय लिहिलं आहे हे वाचणंही, शक्य झालं नाही, तरीही तो त्या बसमध्ये बसला. ती बस 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या युगांडाच्या राजधानीकडं जात होती.
पीटर जवळपास एका दिवसाचा प्रवास करून कंपालामध्ये उतरले, तेव्हा रस्त्याच्या कडेला लावलेल्या बाजाराच्या स्टॉलच्या दिशेनं तो गेले. त्यांनी त्याठिकाणी असलेल्या दुकानदारांना विचारलं की जेवण मिळण्यासाठी काही काम मिळेल का?
त्यानंतरची काहीवर्ष चिमुकला पीटर रस्त्यावरच राहिला. इतर बेघर मुलं त्याचे मित्र बनले आणि ते सगळे एकमेकांमध्ये त्यांची कमाई किंवा जेवण वाटून घेत होते.
पीटर सांगतात की, त्यांनी त्यावेळी जीवनातील एक महत्त्वाचं कौशल्य शिकलं होतं, ते म्हणजे लोकांमध्ये असलेला दयाळूपणा एका क्षणात ओळखणे.
असेच एक दयाळू व्यक्ती होते, जॅक्स मासिको. आठवड्याभराच्या खरेदीसाठी ते बाजारपेठेत जायचे. परतण्याआधी ते नेहमी पीटरला गरम जेवण विकत घेऊन द्यायचे.
जवळपास वर्षभरानंतर मासिको यांनी पीटरला, 'तुला शिकायला आवडेल का', असं विचारलं. पीटरनं हो म्हटलं आणि मासिको यांनी स्थानिक शाळेत त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली.
सहा महिन्यांनंतर पीटरचं अभ्यासात मन रमत असल्याचं पाहून, मासिको आणि त्यांच्या कुटुंबानं त्याला त्यांच्याबरोबरच राहण्यास सांगितलं.
जॅक्स मासिकोमध्ये पीटरला एक अशी व्यक्ती मिळाली होती, जी त्याला अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणं वागणूक देत होती. त्याची परतफेड पीटर शाळेत अत्यंत चांगली कामगिरी करून करत होते. त्यातूनच पीटरनं अमेरिकन विद्यापीठाची शिष्यवृत्तीदेखील मिळवली.
जवळपास वीस वर्षांनंतर आता पीटर अमेरिकेमध्ये स्थायिक झाले आहेत. ते सध्या चाळीशीत आहेत. ते एका सामाजिक संस्थेसाठी काम करतात. ही संस्था युगांडामधील वंचित समुदायाला मदत करण्यासाठी दात्यांना त्याठिकाणी नेण्याचं काम करते.
अशाच एका प्रवासादरम्यान त्यांनी एक श्वेतवर्णीय कुटुंब त्यांच्या दत्तक मुलीसह प्रवास करत असल्याचं पाहिलं. त्यावरून पीटर यांना जाणीव झाली की, ज्याप्रकारे युगांडामधील मुलांना घराची गरज आहे, त्याचप्रकारे अमेरिकतही काही मुलं आहेत.
पीटर जेव्हा उत्तर कॅरोलिनाला परतले, तेव्हा ते एका स्थानिक दत्तक संस्थेकडं गेले. त्याठिकाणी त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
"तुम्ही दत्तक मुलाचे तात्पुरते पालक बनण्याबाबत (काही काळासाठी बेघर मुलांचा सांभाळ करणं) विचार केला आहे का?" असं त्या संस्थेतील महिलेनं त्यांची माहिती लिहून घेताना विचारलं.
"पण मी सिंगल आहे," असं पीटर म्हणाले.
"तर काय? याठिकाणी अशी अनेक मुलं आहेत, जे एखाद्या रोल मॉडेलच्या किंवा त्यांच्या जीवनात पित्याची जागा घेणाऱ्याच्या शोधात आहेत," असं त्या महिलेनं म्हटलं.
त्यावेळी उत्तर कॅरोलिना राज्यामध्ये त्यांच्याशिवाय फक्त दुसऱ्या एका सिंगल पुरुषानं दत्तक पालक बनण्यासाठी अर्ज केलेला होता.
फॉर्म भरला, तेव्हा पीटर यांना वाटलं होतं की त्यांना आपोआप त्यांच्यासारख्या आफ्रिकन, अमेरिकन मुलांचा पर्याय उपलब्ध होईल. पण त्यांच्याकडं जे पहिलं मुलं आलं त्याला पाहून त्यांना धक्काच बसला. तो एक पाच वर्षांचा श्वेतवर्णीय मुलगा होता.
"त्यावेळी मला जाणीव झाली की, सर्वच मुलांना घराची आवश्यकता असते. त्यात रंग ही त्यासाठीची पात्रता ठरता कामा नये," असं पीटर म्हणाले.
"माझ्याकडे दोन अतिरिक्त बेडरूम होत्या. गरज असलेल्या कुणालाही मी घर उपलब्ध करून ते द्यायला हवं होतं."
"ज्याप्रकारे मासिको यांनी मला संधी दिली, तसंच काहीतरी इतर मुलांसाठी करण्याची मला इच्छा होती."
त्यानंतर नऊ वर्षांच्या कालखंडामध्ये जवळपास नऊ मुलं पीटर यांच्याबरोबर राहिली. त्यांच्या दत्तक घेतलेल्या कुटुंबात जाण्यापूर्वी असलेल्या मधल्या काळात काही महिन्यांसाठी ही मुलं पीटरच्या घरी राहत होती. त्यात श्वेतवर्णीय, कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक अशा सर्वांचाच समावेश होता.
"पण मी एका गोष्टीसाठी तयार नव्हतो. ती म्हणजे मुलं सोडून जातात तो कठीण क्षण. ही अशी गोष्ट आहे, ज्यासाठी तुम्ही कधीही तयार होऊ शकत नाहीत," असं ते म्हणाले.
पीटर मुलांना स्वतःसोबत ठेवताना एक गेल्यानंतर आणि दुसरा येण्याच्या आधी मधल्या काळात मोठं अंतर ठेवायचे. कारण पुढच्या येणाऱ्या मुलांसाठी भावनिकदृष्ट्या आपण उपलब्ध असायला हवं, असं त्यांना वाटत होतं.
त्यामुळंच जेव्हा पीटर यांना एका शुक्रवारी रात्री उशिरा दत्तक संस्थेमधून अँथनी नावाच्या मुलाचा राहण्यासाठी जागेची तातडीनं गरज असल्याचा फोन आला, तेव्हा पीटर यांनी नकार दिला होता.
"आधीचं मूल जाऊन अवघे तीन दिवस झाले होते. त्यामुळं मी नाही म्हटलो. कारण मला किमान दोन महिन्यांचा अवधी हवा होता. पण त्यांनी मला सांगितलं की, हे जरा वेगळं प्रकरण आहे. त्याच्याबाबतीत एक दुर्घटना घडली होती. त्यामुळं त्यांना फक्त वीकेंडपुरतं त्याच्यासाठी राहण्याचं ठिकाण हवं होतं. तोपर्यंत याबाबत काहीतरी तोडगा काढणार होते."
इच्छा नसतानाही पीटर यांनी होकार दिला आणि उंच, गोरा, पिळदार शरीर, कुरळे तांबडे केस असलेला अँथनी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी अँथनी आणि पीटर नाश्ता करण्यासाठी बसले.
"तू मला पीटर म्हणू शकतो," असं पीटर त्या मुलाला म्हणाला.
त्यावर, "मी तुम्हाला डॅड म्हणू शकतो का?" असं उत्तर अँथनीनं दिलं.
पीटर यांना धक्का बसला. त्यानंतर दोघं क्वचितच एकमेकांशी बोलले. पीटरला अँथनीच्या भूतकाळाबाबत काहीही माहिती नव्हती तरीही त्यांना त्याच्याबाबत आपलेपणा वाटला.
त्या दोघांनी कुकींग करत आणि गप्पा मारत तो वीकेंड एकत्र घालवला. ते मॉलमध्ये गेले आणि पीटरनं त्याला काही कपडे घेऊन दिले. त्यांनी एकमेकांची अगदी नेहमीप्रमाणे विचारपूस केली. कशाप्रकारचे जेवण आवडते, कशा प्रकारचे चित्रपटत आवडतात, असं त्यांनी एकमेकांना विचारलं.
"आम्ही दोघंही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की, आम्ही एकमेकांबरोबर किती फिट आहोत."
सोमवारी जेव्हा संस्थेतील कर्मचारी आला, तेव्हा पीटरला अँथनीची कहाणी समजली.
अँथनी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून दत्तक पालक गृहात राहत होता. तो चार वर्षांचा होता तेव्हा एका कुटुंबानं त्याला दत्तक घेतलं होतं.
पण आता, सात वर्षांनंतर अँथनीचे दत्तक पालक त्याला हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेले होते.
"मला विश्वासच बसत नाही," असं पीटर म्हणाले.
"ते सांगूनही गेले नाहीत. त्यांनी कारण सांगितलं नाही आणि ते परतही आले नाहीत. त्यामुळं मला मेल्यासारखं झालं. लोक असं कसं करू शकतात?
"अँथनीच्या जीवनामुळं मला माझ्या बालपणीच्या आठवणी आल्या. वयाच्या 10 व्या वर्षी कंपालाच्या रस्त्यावर मी होतो, तसाच हा मुलगा आहे. त्याला कुठेही जायला मार्ग नाही. त्यामुळं मी त्या कर्मचाऱ्याकडं वळलो आणि म्हटलो, त्याला शाळेत पाठवण्यासाठी मला कागदपत्रांची पूर्तता करून द्या म्हणजे सर्वकाही ठिक होईल."
पीटरनं अँथनीकडं पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की, त्या मुलानं चांगलीच दूरदृष्टी दाखवली होती.
"लक्षात घ्या, त्यानं मला भेटताच डॅड म्हटलं होतं. या मुलाला माहिती होतं की, मी त्याचा डॅड बनेल."
अँथनीला दत्तक घेतलेले पालक कँट्री कोर्ट इथं सह्या करण्यासाठी गेले होते. त्यामुळं अँथनी इतर कुटुंबांबरोबर राहण्यासाठी उपलब्ध होता.
पीटर म्हणाले की, "आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत, हे आम्हाला दोघांनाही लगेचच कळलं होतं असं मला वाटतं."
त्यानंतर वर्षभराच्या आतच पीटरनं अँथनीला अधिकृतरित्या दत्तक घेतलं.
आम्ही दोघं आमच्या जीवनात व्यवस्थित रुळायला लागतो होतो. त्यावेळी अँथनीला त्यांच्या वडिलांच्या युगांडामधील जीवनाबद्दल जाणून घ्यायचं होतं, असं पीटर सांगतात. कारण आता तो त्याचाही वारसा होता. अँथनी पीटर यांना काटोगो सारखे नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यात मदत करायचा.
अँथनीनं शाळेत पीटरची त्याच्या मित्रांबरोबर ओळख करून द्यायला सुरुवात केली.
"हे माझे वडील आहेत," असं अँथनी सांगायचा. त्यावेळी अनेकदा मित्रांच्या चेहऱ्यावरील संभ्रमाच्या भावनांची तो मजाही घेत असायचा.
पण त्यांच्या जीवनात काही कठीण क्षणही होते. एका सुटीच्या दिवशी विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी अँथनीला अडवले आणि त्याचे आई वडील कुठे आहेत, अशी विचारणा केली.
अँथनीनं पीटरकडे इशारा केला आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी लगेचच अधिक चौकशी आणि विचारपूस करायला सुरुवात केली. अँथनीला त्यावेळी थेट वर्णद्वेषाची जाणीव झाली होती, त्यामुळं तो प्रंचंड चिडला होता. पण पीटर यांनी त्याला शांत केलं.
"मी तुझा डॅड आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. पण माझ्यासारख्या दिसणाऱ्या लोकांना नेहमीच चांगली वागणूक मिळत नाही," असं पीटर यांनी 13 वर्षांच्या अँथनीला सांगितलं.
"माझ्याबरोबर असं वागणाऱ्या लोकांवर चिडणं हे तुझं काम नाही. तर माझ्यासारखे दिसणारे जे लोक आहेत, त्यांच्याशी आदरानं वागणं हे तुझं काम आहे," असं ते अँथनीला म्हणाले.
त्यानंतर काही दिवसांनी त्या संस्थेनं पीटर यांना बोलावलं आणि ते काही दिवसांसाठी जॉनी नावाच्या (बदललेले नाव) सात वर्षांच्या मुलाचा सांभाळ करू शकतात का? अशी विचारणा केली. कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याला एका दत्तक कुटुंबाची गरज होती. अँथनी प्रमाणेच जॉनीही लवकरच त्यांच्यात रुळला आणि त्याच्या दत्तक भावाच्या पावलावर पाऊल ठेवतं तोही पीटर यांना "डॅड" म्हणाला.
जॉनी हा सरळ केस आणि गोऱ्या रंगामुळं आणखी सुंदर आणि आकर्षक दिसत होता. पण त्यामुळं पीटरबरोबर असताना अधिक संशयास्पद नजरा त्याच्याकडं रोखत होत्या.
त्यामुळंच रेस्तरॉबाहेर जाताना पाहून त्या महिलेनं पोलिस बोलावल्याचं पीटर यांना फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं. पोलिसांना पीटर जॉनीचे पालक आहेत हे, समजण्यासाठी अगदी काही मिनिटंच लागली. पण त्या घटनेनं जॉनीला धक्का बसला.
पीटरनं त्याला समजावलं की, अशाप्रकारच्या घटना या वारंवार घडणारच आहेत, कारण तो कृष्णवर्णीय आहे आणि जॉन श्वेतवर्णीय होता.
या प्रकाराबाबत पीटर आणि अँथनी यांच्यात आधीच बोलणं झालेलं होतं.
मे महिन्यात जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर त्यांच्यामध्ये 'ब्लॅक लाईव्हज मॅटर'विषयावर दीर्घ आणि भावनिक चर्चा झाली होती. पोलिसांनी त्यांना अडवलं तर मोबाईल फोन रेडी ठेवायचा, असं पीटरनं अँथनीला सांगून ठेवलं होतं.
"कृष्णवर्णीय असल्यानं पोलीस मला घेऊन जाण्याआधी मी कोण आहे हे समजावण्यासाठी माझ्याकडे 10 सेकंद असतील," असं पीटर म्हणाले होते.
"मी अँथनीला नेहमी सांगतो, 'पोलिसांनी मला अडवलं तर लगेच फोन काढून रेकॉर्डींग करायचं.' कारण मला माहिती आहे, तोच माझा एकमेव साक्षीदार असेल आणि माझ्याकडे जीव वाचवण्यासाठी फक्त 10 सेकंद असतील."
"मला वाटतं की, त्याला ते समजलं आहे. कारण आम्ही अमेरिकेत आहोत आणि मी त्यांच्यापेक्षा वेगळा दिसतो. त्यामुळं मला वेगळी वागणूक दिली जाते.
"पण श्वेतवर्णीय पालक जेव्हा कृष्णवर्णीय मुलं दत्तक घेतात, तेव्हा मात्र त्यांना अशा प्रकारच्या तणावाचा किंवा संशयास्पद स्थितीचा सामना करावा लागत नाही."
इन्स्टिट्यूट फॉर फॅमिली स्टडिजच्या संशोधक मानसशास्त्रज्ञ आणि सिनियर फेलो निकोलस झिल यांच्या मते, अमेरिकेत कृष्णवर्णीय कुटुंबांच्या तुलनेत श्वेतवर्णीय कुटुंबांकडून दुसऱ्या वर्णातील मुलांचा दत्तक घेण्याची शक्यता अधिक असते.
2016 च्या उपलब्ध आकडेवारीचा विचार करता कृष्णवर्णीय कुटुंबांकडून श्वेतवर्णीय मुलांना दत्तक घेण्याचं प्रमाण अवघं 1% आहे. 92% प्रकरणांमध्ये ते कृष्णवर्णीय मुलांनाच दत्तक घेतात. त्याउलट 11% श्वेतवर्णीय कुटुंब वेगवेगळ्या वर्णातील मुलांना दत्तक घेतात. त्यात कृष्णवर्णीय मुलांचं प्रमाण 5% आहे, असं झिल म्हणतात.
"सध्या कृष्णवर्णीय कुटुंबांनी श्वेतवर्णीय मुलांना दत्तक घेण्याचं प्रमाण हे अत्यंत दुर्मिळ आहे. कदाचित त्याचं कारण अमेरिकेच्या दत्तक यंत्रणेमध्ये अजूनही असलेले सांस्कृतिक पूर्वग्रह हे असू शकतं."
गेल्यावर्षी संदीप आणि रिना मंडेर या ब्रिटीश दाम्पत्यानं भेदभाव प्रकरणी जवळपास 1 लाख 20 हजार युरोची रक्कम भरपाई म्हणून मिळवली होती. त्यांना बिगर आशियाई वंशाचं मूल दत्तक घेण्यास परवानगी दिली नाही आणि त्यातून भेदभाव झाला, असा निकाल न्यायालयानं दिला होता.
या दाम्पत्यानं सांगितलं की, त्यांना स्थानिक दत्तक संस्थेनं भारत किंवा पाकिस्तानातून मूल दत्तक घेण्यासाठी चौकशी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी खटला दाखल केला होता.
"युकेमध्ये अगदी स्पष्ट कायदा आहे. तो म्हणजे दत्तक देताना मुलांच्या संदर्भात वर्ण कोणता आहे, याचा विचार करता कामा नये," असं मॅकअॅलिस्टर फॅमिली लॉ फर्मचे निक हडसन म्हणाले. ही संस्था 20 वर्षांपासून मुलांच्या संदर्भातील कायद्यांबाबत काम करते.
"दत्तक घेणाऱ्यांशी जुळवताना वर्ण आणि संस्कृतीसंबंधीच्या पार्श्वभूमीचा विचार करण्याची अट कायद्यातून काढण्यात आली. कारण त्यामुळं श्वेतवर्णीय मुलांच्या तुलनेत इतर मुलांना खूप वाट पाहावी लागत होती."
त्यात आता मुलांच्या वैयक्तिक गरजेवरही अधिक विचार केला जातो, असंही ते म्हणाले. पण तसं असलं तरी मंडेरसारख्या कुटुंबांना अजूनही काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही त्यांनी म्हटलं.
"कायदा काय सांगतो आणि प्रत्यक्ष काय घडतं यात तफावत असू शकते," असं ते म्हणाले.
पीटर यांच्या मते, त्यांना नॉर्थ कॅरोलिनामध्ये अँथनीला दत्तक घेताना फार त्रास झाला नाही. कारण कदाचित त्याच्या वयामुळं ते अधिक सोपं गेलं असावं. झिल यांच्या मते, वयाच्या पाचव्या वर्षानंतर मुलांना कायमस्वरुपी घरात ठेवणं कठिण होतं.
पीटर अशा अनेक कृष्णवर्णीय कुटुंबांना ओळखतात, ज्यांना त्यांच्या वर्णाची मुलं उपलब्ध नसल्यानं दीर्घकाळ वाट पाहावी लागते.
"आपण समानता असलेल्या समाजात राहत नाही. पण मला या रुढी तोडण्याची इच्छा आहे. कृष्णवर्णीयांबाबत काही रूढ मान्यता आहेत. गुन्हेगार, विचित्र पालक अशा अनेक गोष्टी त्यांच्याबाबत विचार केल्या जातात. त्यामुळं मी माझ्या पालकत्वाबाबत एवढ्या स्पष्टपणे बोलतो. त्यासाठीच मी फेसबूक, इन्स्टाग्रामवर माझे आणि मुलांचे फोटो शेअर करत असतो."
त्यांनी दैनंदिन जीवनाबाबत माहिती देऊन इन्स्टाग्रामवर जवळपास एक लाख फॉलोअर्स मिळवले आहेत. Fosterdadflipper नावानं ते इन्स्टाग्रामवर आहेत. तसंच एबीसीज गुड मॉर्निंग अमेरिकामध्येही ते झळकले आहेत.
पीटर यांना मुलांना युगांडाला न्यायचं आहे. त्यांच्या वडिलांचं मूळ त्यांना पाहता यावं अशी पीटर यांची इच्छा आहे. मुलांच्या भवितब्याबाबत त्यांचे प्लॅन्स आहेत. पण इन्स्टाग्रामवर अनेकांनी चौकशी करूनही, रिलेशनशिपबाबत त्यांनी काहीही विचार केला नाही.
"माझ्या मुलांच्या जीवनात कायमस्वरुपी असं पुरुष व्यक्तिमत्त्व राहिलेलं नाही. सध्या त्यांना माझी पूर्ण आवश्यकता आहे. त्यांना जोपर्यंत गरज असेल, तोपर्यंत मी त्यांच्यासाठी उपलब्ध असेल," असं पीटर म्हणाले.
सर्व फोटो सौजन्य -पीटर
(जॉनीच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून त्याचं खरं नाव वापरलेलं नाही.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)