You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रॅगिंगचं रॅकेट फोडण्यासाठी कॉन्स्टेबल बनली विद्यार्थिनी, गोष्ट एका अंडरकव्हर ऑपरेशनची
जुलै महिन्यातला पावसाळी दिवस. नवी दिल्लीतल्या अँटी रॅगिंग हेल्पलाईनवर एक फोन आला.
फोन करणाऱ्यांनी इंदूरहून बोलत असल्याचं सांगितलं. मेडिकल स्टुडंट होते.
कॉलेजमधले सीनियर्स हॉस्टेलमध्ये रुमवर बोलावतात. शिवीगाळ करतात, थोबाडीतही मारतात असं त्यांचं म्हणणं होतं.
वर्गातल्या मुलींना त्रास द्यायला लावतात. उशीवर सेक्स पोझिशन्स करून दाखवायला लावतात असं फोनवरुन बोलणाऱ्या मुलांनी सांगितलं.
भीतीमुळे त्यांनी स्वत:चं आणि त्रास देणाऱ्या सीनियर्सचं नाव सांगितलं नाही. ते बोलताना घाबरलेले जाणवत होते.
ही गंभीर स्वरूपाची तक्रार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. ते कॉलेज होतं महात्मा गांधी मेमोरिअल मेडिकल कॉलेज.
सूत्रं हलली आणि इंदूरमधल्या संयोगिता गंज पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.
याप्रकरणाचा उलगडा कसा करायचा हे मोठंच आव्हान पोलिसांपुढे होतं. कॉलेज तसंच हॉस्टेल प्रांगणात बाहेरची व्यक्ती दाखल झाली तर ठळकपणे वेगळी दिसते.
अशा परिस्थितीत पीडित लोक कोण हे ओळखून त्यांच्याशी बोलून दोषींपर्यंत कसं पोहोचायचं हा यक्षप्रश्न होता.
“सुरुवातीला आम्ही कॉलेजात गेलो, विद्यार्थ्यांशी बोललो. पण कुणीही पुढे आलं नाही”, असं संयोगिता गंज पोलीस स्थानकाचे तेहझीब काझी यांनी सांगितलं. काही महिने तसेच गेले.
कोणीही आमच्याकडे तक्रार दाखल केली नाही किंवा येऊन काय घडलं ते सांगितलं नाही. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी अंडरकव्हर ऑपरेशन हाती घेण्याचा निर्णय घेतला.
मेडिकल स्टुडंट वाटेल, शंका येणार नाही अशी व्यक्ती आत पाठवून माहिती गोळा करणं आवश्यक होतं. त्यावेळी 25 वर्षीय शालिनी चौहान यांचं नाव समोर आलं.
पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत शालिनी यांनी हे आव्हान पेलण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी खाकी वर्दीऐवजी कॉलेज स्टुडंट व्हायचं होतं.
पीडित मुलंमुली आणि त्रास देणारे जिथे आहेत त्या कॉलेज कॅम्पसमध्ये वावरून शिताफीने माहिती मिळवायची होती. यात प्रचंड धोका होता. थोडासा संशय आला असता तरी सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलं असतं
त्यांनी कॉलेजला जाणाऱ्या मुलींसारखा पोशाख केला. त्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जायच्या. वेगवेगळ्या वर्गातल्या मुलामुलींशी बोलायच्या.
पोलीस असल्याची जराही शंका येऊ न देता त्या वावरायच्या. कॅन्टीनच का निवडलं याबद्दल त्यांनी सांगितलं. “कॅन्टीनमध्ये सगळ्या वर्गांची मुलंमुली येतात. कोण खातंयपितंय याकडे लक्ष जात नाही. मी कुठल्या वर्गात आहे हे तिथे कळत नव्हतं. तिथे आयडी कार्ड चेक केलं जात नाही.
अर्थात एवढं सगळं करूनही तिथे जाऊन माहिती मिळवणं सोपं नव्हतं. सुरुवातीला मुलामुलींना माझी शंका यायची. मी पोलीस आहे हे कळलं तर सगळंच कठीण होऊन बसलं असतं. त्याची भीती वाटायची. मी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं सांगायचे. मी नेमक्या कोणत्या वर्गात आहे हे कळू दिलं नाही”.
शालिनी यांच्यावर दुहेरी जबाबदारी होती. पीडित कोण आहेत ते हुडकून त्यांना बोलतं करणं आणि त्याचवेळी आरोप कोण आहेत त्यांचा माग काढणं. कारण बाहेरुन काही कळत नव्हतं. तक्रारदार पोलीस स्थानकात येत नव्हते त्यामुळे त्यांची माहिती मिळणंही कठीण होतं.
शालिनी विद्यार्थी होऊन वावरत असताना पुरुष पोलीस कर्मचारी साध्या वेशात आजूबाजूला असत. कॉलेजजवळच्या कॅफेत हे कर्मचारी होती.
काहींना कॅन्टीनमध्ये काम करतोय असं भासवलं. कॉलेजच्या लोकांना अंडरकव्हर ऑपरेशन सुरू आहे हे माहिती होतं पण नक्की कोण कुठल्या भूमिकेत आहे याची कल्पना नव्हती.
पोलीस साध्या वेशात कॅम्पसमध्ये वावरत आहे एवढी माहिती कॉलेज प्रशासनाला होती.
विश्वास कसा संपादित केला?
शालिनी चौहान यांनी 2014-15 मध्ये पोलीस दलात प्रवेश केला. “मला खूपच काळजी घ्यावी लागली. मी खूप प्रश्न विचारले असते तर माझ्याबद्दल संशय बळावला असता. दोषींना मी पोलीस आहे कळलं असतं तर कदाचित त्यांनी आधी ज्यांना त्रास दिला त्यांनाच पुन्हा त्रास दिला असता,” असं त्या सांगतात.
"सुरुवातीला काही दिवस मी रॅगिंग किंवा त्रासाबद्दल बोललेच नाही. मी खाणंपिणं, क्लासेस, मेडिकल सायन्स याविषयीच बोलायचे. मग मी सीनियर्स कसे असतात, कसे वागतात याविषयी विचारणा करायला सुरुवात केली. कॅन्टीनमध्ये नेहमी गर्दी असते. प्रश्न विचारतेय, माहिती काढतेय असं कुणाला वाटलं तर मी तिथून निसटून जात असे."
"माझ्यासाठी हा खूप काही शिकवणारा अनुभव होता. अशा पद्धतीने वेशांतर करुन, ओळख बदलून मी कधी अशी संवेदनशील केस सोडवू शकेन असं वाटलं नव्हतं. मला तर गुप्तहेर असल्यासारखंच वाटलं", असं शालिनी सांगतात.
जवळपास दोन महिने शालिनी कॉलेजला जात राहिल्या. मुलामुलींचा विश्वास जिंकून त्यांनी माहिती काढून घेतली. या सगळ्याचा परिणाम म्हणजे रॅगिंग करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.
या विद्यार्थ्यांवर भारतीय दंड संहितेअंतर्गत कलम 294 , 341, 506 , 323 लावण्यात आली.
शालिनी यांनी पीडित मुलामुलींनाही गाठून त्यांच्याकडून नक्की काय घडलं हे समजून घेतलं. कथित पीडित मुलांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत.
शिक्षणासाठी आईवडील मुलांना कॉलेजात पाठवतात. रॅगिंगसारख्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचत नाहीत. हा ताण सहन न झाल्यामुळे काही विद्यार्थी आत्महत्याही करतात.
काही वेळेला मुलं नैराश्येच्या गर्तेत अडकतात. त्यामुळे अशा प्रकरणांच्या मुळाशी जाऊन आरोपींना पकडणं आवश्यक असतं.
कुठल्याही परिस्थितीत रॅगिंग होणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे असं शालिनी यांनी सांगितलं.
महात्मा गांधी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता संजय दीक्षित यांनी सांगितलं, “या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. जे विद्यार्थी वसतीगृहात राहातात त्यांच्यावर आम्ही लक्ष टेवतो. मात्र कँपसबाहेरुन येणाऱ्या मुलांवर आणि भाड्याच्या घरात राहाणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवता येत नाही, त्यामुळेच हे प्रकरण समोर आलं.”
संजय दीक्षित यांच्या मते, विद्यार्थ्यांना वेळोवेळी रॅगिंगपासून दूर राहाण्यासाठी सांगितलं जातं.
कॉलेज आवारात विद्यार्थी म्हणून कॉन्स्टेबल येण्याबद्दल ते म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी सुरू आहे हे माहिती होतं, मात्र अशाप्रकारे विद्यार्थीनीच्या रुपात येत असल्याबद्दल आपल्याला माहिती नव्हती.”