टिंडरवरून अपहरण झालेल्या पुरूषांना पोलिसांकडे तक्रार नोंदवायला लाज वाटते...

आजकाल जगभरात मोठ्या प्रमाणावर डेटिंग अॅपची क्रेझ सुरू आहे. या डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेकांचं सूत जुळल्याचं आपण जसं ऐकतो अगदी तसंच डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेकदा फसवणूक होत असल्याचे किस्सेही कानावर येत असतात.

ब्राझीलमध्ये सुद्धा या डेटिंग अॅपची क्रेझ आहे. तिथलीच ही गोष्ट...

तिथल्याच एका लोकल डेटिंग अॅपवर एका पुरुषाची एका स्त्रीशी ओळख होते. दोघांमध्ये मॅसेज एक्सचेंज होतात. आता आपण प्रत्यक्षात भेटू असं या दोघांमध्ये ठरतं.

भेटीच्या ठरलेल्या ठिकाणी तो पुरुष जातो, पण समोर त्या स्त्रीऐवजी बंदूकधारी लोक दिसतात. त्या पुरुषाला हे लोक किडनॅप करतात. आसुसलेल्या भेटीचं रूपांतर एका भयानक अपहरणात होतं.

हे प्रकरण घडलं होतं ब्राझीलमधील सर्वांत मोठं आणि श्रीमंत शहर असलेल्या साओ पाउलोमध्ये. आणि हेच नाही बरं का, अशा प्रकारचे गुन्हे इथं सर्रास घडतात.

येथील सार्वजनिक सुरक्षा सचिव (एसएसपी) बीबीसीशी बोलताना म्हणाले की,

"टिंडर सारख्या डेटिंग अॅप्सवर बनावट खाती तयार करून लोकांना जाळ्यात ओढलं जातंय. स्थानिक पोलिसांनी अपहरणाचे जेवढे गुन्हे नोंदवले आहेत त्यापैकी 90 टक्के गुन्हे हे या डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून घडले आहेत."

एखाद्याचं अपहरण झाल्यावर त्याच्या बँक खात्यात पैसे नसले तर त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो.

साओ पाउलो शहर पोलिसांनी 2022 मध्ये 94 प्रकरणांमध्ये कारवाई केली असून यात सहभागी असलेल्या 250 हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली आहे.

40 वर्षांवरील अविवाहित पुरुष या अपहरणकर्त्यांच्या हिट लिस्टवर असतात.

साओ पाउलोमध्ये दास क्लिनिक नावाचं एक प्रतिष्ठित हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरला या डेटिंग अॅपच्या माध्यमातून जाळ्यात अडकवलं. भेटीसाठी बोलावून त्याला किडनॅप केलं आणि जवळपास 14 तास बंदिवासात ठेवण्यात आलं.

या अपहरणकर्त्यांनी डॉक्टरकडून सुमारे 14 हजार यूएस डॉलर उकळले आणि मगच त्याला सोडलं.

सावज कशा पद्धतीने हेरतात?

याबाबतीत साओ पाउलोच्या सार्वजनिक सुरक्षा सचिवांनी एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यात म्हटलंय की, हे अपहरणकर्ते आपलं सावज हेरण्यासाठी ऑनलाइन फूटप्रिंटचा अभ्यास करतात.

"हे अपहारणकर्ते सोशल मीडिया अकाऊंटवर श्रीमंतीचे देखावे करणाऱ्या पुरुषांना हेरतात. सोबतच त्यांच्या बरोबर असणाऱ्या इतर पुरुषांवर देखील नजर ठेऊन असतात."

अपहारणकर्त्यांच्या टोळ्या कशा चालतात, सापळे कसे रचले जातात याविषयी जाणून घेण्यासाठी बीबीसीने तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर काही गोष्टी सांगितल्या.

अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे टिंडरच्या माध्यमातून ही फसवणूक केली जाते. मग असे प्रकार रोखण्यासाठी या डेटिंग प्लॅटफॉर्मवर कोणती सुरक्षा साधने उपलब्ध आहेत यासाठी टिंडरशी संपर्क साधला. पण त्यांचा यावर कोणताच रिप्लाय आला नाही.

साओ पाउलोच्या उत्तर भागात काम करणारे लष्करी पोलिस लेफ्टनंट सांगतात की, बऱ्याचदा वयस्क आणि श्रीमंत अशा पुरुषांना जाळ्यात अडकवलं जातं.

ते पुढं सांगतात, "या पुरुषांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असतं, ते सिंगल आणि श्रीमंत असतात. गुन्हेगार या पुरुषांना गाळाला लावण्यासाठी टिंडरवर शौकीन मॅसेज करतात, आणि शक्य तितक्या लवकर भेटण्याची आर्जव करतात."

गुन्हेगार डेटिंग अॅप्सवर आपल्या सावजाची माहिती पाहतात, जसं की त्यांच्या व्यवसाय वैगरे. पण बहुतकरून या लोकांच्या इंटरनॅशनल ट्रिप्स, त्यांच्या गाड्या, बंगले याचे फोटो पाहिले जातात.

लेफ्टनंट पुढं सांगतात, "या भेटी सहसा दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी शहराच्या बाहेर ठरवल्या जातात."

"एका केसमध्ये त्या पुरुषाने त्यांची भेट शॉपिंग मॉल मध्ये ठरवली होती. पण त्या महिलेने आजारी असल्याचं आणि घर सोडून बाहेर येऊ शकत नसल्याचं ढोंग केलं. शेवटी तो पुरुष तिला भेटायला तिच्या घरी गेला आणि त्याला किडनॅप करण्यात आलं."

या अ‍ॅपवर पुरुष रिलेशनशिप शोधण्यासाठी येत नसतात. एखादी सहज भेट व्हावी एवढाच त्यांचा मुद्दा असतो, आणि अपहरणकर्ते बरोबर हीच गोष्ट हेरतात.

लेफ्टनंट सांगतात, "अ‍ॅपवर कॉन्टॅक्ट झाल्यानंतर, मॅसेज एक्सचेंज झाल्यानंतर पुढच्या दोन दिवसात भेटीसाठी गळ घातली जाते. यावरून त्या पुरुषांना महिला "त्यासाठी" तयार आहेत असं वाटतं."

या डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आपलं अपहरण झालंय म्हणून बऱ्याचदा तक्रार केली जात नाही, असं दुसरे एक पोलीस अधिकारी सांगतात.

यातलं पहिलं कारण म्हणजे ज्या पुरुषांचं अपहरण झालंय त्यांना पोलिसांकडे तक्रार नोंदवायला लाज वाटते. आणि दुसरं म्हणजे हे पुरुष एखाद्या रिलेशनशिपमध्ये असतात, आपल्या पार्टनरला या डेटिंग अ‍ॅपविषयी समजू नये म्हणून ते कॉमन किडनॅपींगच्या तक्रारी नोंदवतात.

अधिकारी सांगतात की, हे श्रीमंत आणि शिक्षित पुरुष अशा प्रकरणात सापडतात कारण त्यांना शहराबाहेर एखाद्या रोमँटिक डेटवर जायचं असतं.

पोलिसांना, पीडित व्यक्ती बेपत्ता झाल्याचं नातेवाईकांच्या माध्यमातून समजतं.

"कुटुंबातील सदस्यांना अमुक एखादा व्यक्ती गायब असल्याचं कळल्यावर त्यांच्या चिंतेत वाढ होते. मी आजवर एकाच शहरातील दोन व्यक्तींच एकाचवेळी अपहरण झाल्याचं पाहिलेलं नाही."

ब्राझिलियन एनजीओ सेफरनेटचे डिजिटल सिक्युरिटी स्पेशालिस्ट गुइल्हेर्म अल्वेस सांगतात की, या डेटिंग अॅप्सवर गुन्हे घडत नाहीत. त्याचा वापर करून गुन्हेगार प्रत्यक्षात फसवणूक करत असतात.

ते पुढे सांगतात, "म्हणजे हा प्लॅटफॉर्म कशासाठी आहे हे आपण समजून घ्यायला हवं. या प्लॅटफॉर्मच्या व्यतिरिक्त बाहेर काय घडतं यासाठी कंपनी जबाबदार नसते किंवा मग ते त्यांच्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे असतं. पण असा कोणताही गुन्हा घडल्यास, स्कॅमरच्या प्रोफाइलवरून त्याची माहिती मिळावी यासाठी न्यायालयात विनंती करता येऊ शकते."

अल्वेस असंही सांगतात की, "गुन्हेगार सहसा फेक प्रोफाइल आणि फोटो वापरत नाहीत. बऱ्याच केसेसमध्ये गुन्हेगार खरे फोटो वापरतात. म्हणजे ती व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असते, तिचे ऑडिओ मॅसेज आणि आणखीन फोटो पाठवले जातात."

"पण जर हा कॅटफिशिंग स्कॅम असेल तर प्रोफाइल बनावट समजलं जातं. कॅटफिशिंग स्कॅम म्हणजे इंटरनेटवर खोटी ओळख निर्माण केली जाते. या कॅटफिशिंग स्कॅमच्या माध्यमातून गुन्हेगार आपल्या सावजाला व्हॉट्सअॅपसारख्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर नेतो. आणि डेटिंग अॅपवरचं स्वतःचं प्रोफाइल डिलीट करतो."

अल्वेस यांनी डेटिंग अॅप वापरणाऱ्या लोकांसाठी काही वॉर्निंग साईन्स शोधून काढल्या आहेत.

सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट अल्वेस सांगतात, "तुमच्या पहिल्या मीटिंगनंतर जर संबंधित व्यक्तीने आपलं प्रोफाईल प्लॅटफॉर्मवरून डिलीट केलं तर त्या व्यक्तीला स्वतःची माहिती लपवायची आहे हे समजून घ्या. तसेच जे लोक लवकर भेटण्याचा तगादा लावतात किंवा लगेचच व्हॉट्सअॅपवर चॅट करायला भुलवतात त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज असते. तसेच एखादया खाजगी ठिकाणी भेटीसाठी जाणं टाळलं पाहिजे."

अल्वेस सांगतात की, "लोकांनी आपल्या संभाषणाच्या नोंदी ठेवाव्यात. भेटीसाठी जागा ठरवताना एखादं सार्वजनिक ठिकाण निवडावं. पहिल्याच भेटीत गळ टाकण्याऐवजी दुसऱ्या किंवा तिसऱ्या भेटीनंतर गुन्हेगार गळ टाकू शकतात."

"एका प्रकरणात एक पीडित महिला त्या पुरुषासोबत 2 वेळा डेटवर गेली. आणि तिसऱ्या भेटीत त्या पुरुषाने तिला लुटलं आणि तो गायब झाला."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)