You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Technology : स्मार्टफोन वापरणं या लोकांनी का सोडलं?
- Author, सुझान बीअर्न
- Role, बीबीसी
हल्ली अनेक जण स्मार्टफोनला चिकटून बसलेले असतात, अशा जगात डल्सी कावलिंग यांनी प्रवाहाविरोधात जाणारा निर्णय घेतलाय- तिने अलीकडेच स्मार्टफोनचा वापर बंद केला.
स्मार्टफोन वापरणं थांबवलं, तर आपलं मानसिक आरोग्य सुधारेल, असं 36 वर्षीय कावलिंग यांनी गेल्या वर्षअखेरीला ठरवलं. त्यानुसार, आता आपण फक्त कॉल आणि एसएमएस एवढ्याच पातळीवर संवाद साधता येईल असा जुना नोकियाचा फोन वापरायला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना सांगितलं.
कावलिंग यांना सहा आणि तीन वर्षांचे दोन मुलगे आहेत, त्यांच्या सोबत एकदा बागेत गेलेलं असताना हा निर्णय घेतल्याचं त्या सांगतात, "मी मुलांसोबत मैदानात गेले होते आणि मोबाइलमधे बघत होते. आणि मधेच एकदा मी वर बघितलं, तर आसपासचे सगळे पालक- तिथे साधारण 20 पालक होते- आपापल्या फोनमध्येच स्क्रोल करत बसल्याचं दिसलं."
"हे असं कधी झालं, असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला. प्रत्येक जण वास्तवातल्या जगण्याकडे पाठ फिरवतोय. आपण मृत्युशय्येवर जाऊ तेव्हा ट्विटरवर थोडा जास्त वेळ घालवायला हवा होता किंवा ऑनलाइन आणखी काही लेख वाचायला हवे होते, असा विचार नक्कीच केला जाणार नाही."
लंडनस्थित 'Hell Yeah!' या जाहिरातसंस्थेत क्रिएटिव्ह डायरेक्टर असणाऱ्या कावलिंग सांगतात की, कोव्हिडमुळे लादण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान त्यांच्या डोक्यात स्मार्टफोनचा वापर सोडून देण्याची कल्पना आली.
"माझ्या आयुष्याचा किती भाग फोनकडे बघत जातोय आणि मला याहून इतर काय-काय करता येईल, याचा मी विचार केला. अनेक सेवांच्या सतत संपर्कात राहिल्याने बऱ्याच विचलित करणाऱ्या गोष्टी समोर येत राहतात आणि मेंदूला एवढ्या घडामोडींवर प्रक्रिया करणंही अवघड होऊन जातं."
स्मार्टफोनचा वापर थांबवल्यामुळे हाताशी उरणारा वेळ वाचनासाठी नि झोपण्यासाठी वापरायचा, असं त्यांनी ठरवलं आहे.
युनायटेड किंगडममधील सुमारे 90 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहे. इतर विकसित देशांमध्ये सर्वसाधारणतः हीच आकडेवारी दिसते. सरासरी माणूस दिवसातील 4.8 तास स्मार्टफोनवर घालवत असतो, असं अलीकडे एका अभ्यासात दिसून आलं.
परंतु, काही लोकांनी मात्र आता यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे आणि अशा लोकांची संख्या वाढते आहे.
अलेक्स ड्यूनडिन यांनी दोन वर्षांपूर्वी स्मार्टफोनचा वापर थांबवला. "आपण सांस्कृतिकदृष्ट्या या उपकरणांच्या व्यसनात अडकलो आहोत," असं शैक्षणिक संशोधक व तंत्रज्ञानविषयक तज्ज्ञ असलेले ड्यूनडिन म्हणतात. "त्यातून आपली आकलनक्षमता बोथट होतेय आणि उत्पादकताही खालावतेय."
स्मार्टफोनचा वापर थांबवण्यामागे पर्यावरणविषयक कारणंही होती, असं स्कॉटलंडमध्ये राहणारे ड्यूनडिन म्हणतात. "प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन करण्यासाठी आपण प्रचंड प्रमाणात ऊर्जा वाया घालवतो आहोत," असं ते सांगतात.
स्मार्टफोनचा वापर थांबवल्यापासून ते अधिक आनंदी झाले असून त्यांची उत्पादकताही वाढली आहे, असं ते म्हणतात. आता ड्यूनडिन यांच्याकडे जुन्या पद्धतीचा मोबाइल फोनही नाही आणि लँडलाइन फोनसुद्धा नाही. आता त्यांना फक्त घरातील कम्प्युटरवर ई-मेलद्वारेच संपर्क साधता येतो.
"माझं जगणं त्यानंतर सुधारलं," असं ते म्हणतात. "सतत माझी ऊर्जा नि पैसा मागणाऱ्या मशिनशी जोडले गेलेले माझे विचार मुक्त झाले. तंत्रज्ञान आपलं जगणं पोकळ करत चाललंय, ही धोकादायक स्थिती आहे, असं मला वाटतं."
बर्मिंगहॅममधील 53 वर्षांच्या लेखिका व शिक्षिका लिन व्हॉयस यांनी पुन्हा उलटी दिशा पकडली आहे. सहा वर्षांच्या विरामानंतर त्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्मार्टफोनचा वापर पुन्हा सुरू केला.
रेस्टॉरंटमध्ये क्यूआर-कोड स्कॅन करावे लागणं, तथाकथित कोव्हिड पासपोर्ट सोबत बाळगावं लागणं आणि पॅरिसमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलीशी सहजपणे संपर्कात राहता यावं, अशा कारणांमुळे व्हायस यांना पुन्हा स्मार्टफोन विकत घेणं भाग पडलं.
पण शक्य झालं तर स्मार्टफोनचा वापर परत थांबवायचा त्यांचा विचार आहे. "साथ संपली की, एला (त्यांची मोठी मुलगी) परदेशात राहणार नाही. मग मी पुन्हा स्मार्टफोन सोडायचा प्रयत्न करणार आहे. हे अगदीच व्यसनाधीन असल्यासारखं वाटतं ना?"
व्हॉयस यांनी 2016 साली पहिल्यांदा स्मार्टफोनचा वापर थांबवला. आपल्या मुलींना मोबाइलचा वापर कमी करण्यासाठी उद्युक्त करावं, हा त्यांचा तेव्हाचा उद्देश होता.
"त्या नुसत्या फोनला चिकटलेल्या असायच्या. त्यांना असं करण्यापासून थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मी स्वतःचा फोन बाजूला ठेवणं, असं मला वाटलं. आणि त्याने खरोखरच फरक पडला. उदाहरणार्थ, आम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, तर मी फोनवर काहीतरी करतेय असं त्यांना बघावं लागायचं नाही."
स्मार्टफोन सोबत नसल्यामुळे "माझ्या डोक्यावरचं बरंच ओझं हलकं झालं", असं त्या म्हणतात. "मला तत्काळ कोणाला उत्तर द्यायचंय किंवा बाहेर गेल्यावरही मी संपर्कक्षेत्रात राहायला हवंय, असा काही दबाव उरला नव्हता."
पण काही लोकांना फोनवर जाणारा स्वतःचा वेळ चिंताजनक वाटत असला तरी लाखो लोकांना स्मार्टफोन हे दैवी वरदान वाटतं.
"आरोग्यसेवा, शिक्षण, सामाजिक सेवा आणि अनेकदा आपले मित्रमैत्रिणी व कुटुंबिय, यांच्याशी असलेला आपला संपर्क अभूतपूर्वरित्या डिजिटल झालेला आहे आणि स्मार्टफोन हा लोकांसाठी जीवनवाहिनी ठरला आहे," असं व्होडाफोन या मोबाइल नेटवर्क कंपनीचे प्रवक्ते सांगतात.
"लोकांना त्यांच्याकडील तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग व्हावा, तसंच ऑनलाइन वावर सुरक्षित व्हावा, यासाठी संसाधनं निर्माण करायलाही आम्ही मदत करतो- हे खूपच महत्त्वाचं आहे."
सायकोथेरपिस्ट आणि 'द फोन अॅडिक्शन वर्कबुक' या पुस्तिकाच्या लेखिका हिल्डा बर्क म्हणतात की, तंत्रज्ञानीय उपकरणांचा अतिरेकी वापर आणि नातेसंबंधांमधील समस्या, झोपेची गुणवत्ता, उपकरणांपासून दूर राहून विश्रांती घेण्याची आपली क्षमता आणि एकाग्रतेची पातळी यांच्यात जवळचा संबंध आहे.
"अनेक लोकांना सतत अनेक प्रकारचे संपर्क साधले जात असतात, आणि अशा संपर्काला तातडीने प्रतिसाद देणं गरजेचं आहे, अशी भ्रामक स्थिती निर्माण होते.
"यामधील सीमारेषा त्यांना आखता येत नाही, त्यामुळे रात्री झोपेपर्यंत आणि सकाळी उठल्यावर लगेचच नवीन काही ई-मेल किंवा मेसेज आलाय का तपासणं, हे त्यांचं व्यसन होऊन जातं."
स्मार्टफोनचा वापर थांबवणं शक्य वाटत नाही, पण त्यावर आपला बराच वेळ जातोय याची चिंता मात्र वाटतेय, अशी तुमची स्थिती असेल तर हा वापर कमी करण्यासाठी इतर काही उपाय आहेत.
हे सुरुवातीला थोडं विरोधाभासी वाटू शकेल, पण अलीकडे निरर्थक स्क्रोलिंग कमी करणारी नवनवीन अॅप येत आहेत.
उदाहरणार्थ, इतर अॅप व वेबसाइट तात्पुरत्या बंद करून आपल्याला एखाद्या गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करता यावं, अशी तजवीज करणारं फ्रिडम हे अॅप आहे. ऑफ द ग्रिड या नावाचं अॅप काही कालावधीसाठी आपला फोन ब्लॉक करण्यासाठी वापरता येतं.
स्मार्टफोनवर आपला किती वेळ जातो यावर अधिकाधिक लोक नियंत्रण ठेवू लागले, तर ते हितकारक ठरेल, असं बर्क म्हणतात. "दर रोज फोनवर आपला नक्की किती वेळ वाया जातो, हे लक्षात घेण्यापासून सुरुवात करता येईल. त्यातून धोक्याचा इशारा मिळाला की बदलाची पावलं उचलणं शक्य होतं."
थोड्या वेळासाठी फोन बंद करणं किंवा घरीच ठेवून बाहेर जाणं, आणि मग हळूहळू फोन परत-परत वापरण्यामधला कालावधी वाढवत नेणं, हाही एक उपाय त्या सुचवतात.
अखेरीस, आपल्याकडे जास्त वेळ असेल तर आपण काय करू, याची आठवण करून देणारी एखादी प्रतिमा किंवा एखादा शब्द आपल्या फोनचा स्क्रिनसेव्हर म्हणून वापरावा, असंही त्या सुचवतात.
"आपल्यातील बहुतांश लोक दिवसातून ५५ वेळा फोन हातात घेतात आणि काही जण तर १०० वेळा फोन हातात घएतात. अशा वेळी आपण स्वतःचा अमूल्य वेळ अधिक मूल्यवान पद्धतीने कसा वापरू शकतो याची दृश्य आठवण खुद्द फोनवरूनच होणं उपयोगी पडतं," असं त्या म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)