You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्रिप्टोकरन्सी: बिटकॉईनचा शोध कुणी लावला? का लावला?
- Author, संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
- Role, संकलन, शब्दांकन - गुलशनकुमार वनकर, बीबीसी मराठी
22 मे, 2010.
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील जॅकसनविलमध्ये एका घरासमोर एक पिझ्झा डिलेव्हरी बॉय येऊन थांबला. पिझ्झा येणार म्हटल्यावर कुणालाही उत्साह चढलेला असतो, पण त्या पिझ्झाची वाट बघत असलेल्या व्यक्तीसाठी तो क्षण ऐतिहासिक होता.
का? कारण त्या घरात राहणाऱ्या लॅझलो हॅन्येक्झ याने त्या दोन लार्ज पिझ्झांसाठी एक वेगळ्याच पद्धतीने पेमेंट केलं होतं. त्याने दिले होते 10 हजार बिटकॉईन. हा जगातला पहिला व्यवहार होता, जो बिटकॉईनने करण्यात आला होता, एक असं नाणं ज्याचं मूल्य कंप्युटर कोडेड असतं आणि एका पासवर्डने सुरक्षित असतं.
लॅझलोने तेव्हा 10 हजार बिटकॉइन्स या दोन पिझ्झांसाठी मोजले होते, म्हणजे तेव्हाचे साधारण 40 डॉलर्स. दोन लार्ज पिझ्झांसाठीसुद्धा हे जरा जास्तच होतं. पण हो, आज 2022 मध्ये याच 10 हजार बिटकॉइन्सचं मूल्य अब्जावधी रुपयांमध्ये असेल. बिटकॉईनच्या मूल्याचा काही भरवसा नसतो, कधी अचानक वर जातं, कधी गडगडतं.
पण आपल्याकडे आधीच डॉलर्स, पाउंड्स आणि रुपयांसारखी चलनं असताना, हा बिटकॉईनने व्यवहार करण्याचा उद्योग का कुणी सुरू केला?
सायफरपंक्स
टिम मे सिलिकॉन व्हॅलीजवळच्या पर्वतांमध्ये राहायचे. या पर्वताच्या एका बाजूला मच्छिमारांच्या बोटी दिसतात, तर दुसरीकडे फेसबुक, गुगल, ॲपलचे हेडक्वार्टर्स आहेत. त्यांनी शेअर बाजारातून इतका पैसा कमवला की वयाच्या 34व्या वर्षी त्यांनी इंटेलमधून निवृत्ती घेत इथे घर घेतलं.
पूर्ण एक वर्ष त्यांनी इतर काही न करता बीचवर बीअर पिणं एन्जॉय केलं. जेव्हा बोर झाले, तेव्हा ते नवीन आयडियांवर काम करू लागले. त्यातलीच एक म्हणजे, क्रिप्टोग्राफीचा आणखी वेगळा काय वापर करता येईल. तुम्ही म्हणाल क्रिप्टोग्राफी म्हणजे काय? तर एखादा संदेश आणखी गूढ किंवा गोपनीय करून पाठवायची पद्धत, ज्यामुळे संपर्क व्यवस्था आणखी सुरक्षित होऊ शकते.
2017 मध्ये बीबीसीशी बोलताना त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी त्यांच्या एका मित्राला त्यांच्याकडे राहायलाच बोलावून घेतलं. ते म्हणाले होते, "आम्ही बरेच दिवस बीचवर बसून चर्चा करायचो. मग आम्ही बे एरियामधल्या आणखी काही खूप हुशार लोकांना सोबत घेतलं. ते कंप्युटर हॅकर्स होते, नॅनो टेकनोलॉजीवर काम करणारे लोक होते."
1992 मध्ये या सर्वांनी एक मोहीम सुरू केली, त्यांच्यापैकीच एकाच्या गर्लफ्रेंडने म्हटलं, 'तुम्ही सगळे नुसते सायफरपंक्स आहात.' त्यावरूनच या गटाचं नाव पडलं सायफरपंक्स. पण या गटात कोणत्या राजकीय विचारांचे लोक होते?
टीम मे यांच्यानुसार, "आमच्यापैकी काही लोक पक्के लिबरटेरियन्स (libertarians) होते. काही लोक अराजकीय होते तर काही समाजवादी, पण त्यांनाही मुक्त मार्केट हवं होतं."
टीम मे यांच्यासारख्या लिबरटेरियन लोकांना वाटतं की सरकारचा लोकांच्या आयुष्यात कमीत कमी हस्तक्षेप असावा. एक उदाहरण म्हणजे, कर व्यवस्था. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की तंत्रज्ञानाचा वापर करून ते त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात अमलात आणू शकतात. त्यांनी मग यावरच आधारीत एक 'Crypto Anarchist Manifesto' म्हणजे एकप्रक्रारे त्यांच्या विचारांवर आधारित एक जाहीरनामा.
"अधिकाधिक लोक ऑनलाईन येऊ लागले. एकमेकांशी संपर्क करू लागले. त्याचा उद्देश हाच, की क्रिप्टोग्राफीचा वापर करून एक नवीन संपर्क यंत्रणा तयार करायची, ज्याने सरकारची आपल्या आयुष्यात ढवळाढवळ कमी होईल," त्यांनी सांगितलं होतं.
या सायफरपंक्स मोहिमेला चांगलंच यश आलं. त्यांनी टॉर म्हणजे एक असं सॉफ्टवेअर ज्यावरून तुम्ही ऑनलाईन आपली ओळख लपवून अनेक गोष्टी करू शकता. याला डार्क वेबसुद्धा म्हटलं जातं. याशिवाय बिट टॉरंट, एक प्रायव्हेट माध्यम ज्यावरून सिनेमा किंवा गाण्यांसारख्या मोठ्या फाईल्स तातडीने पाठवता येतात.
विकिलीक्सने अमेरिकन सरकारची केलेली पोलखोलसुद्धा याच मोहिमेचं यश होतं, असं टिम मे म्हणाले होते. ज्युलियन असांज स्वतः सायफरपंक्सच्या नेटवर्कवर खूप सक्रीय असायचे, असं त्यांनी सांगितलं होतं.
डिजिटल चलनाचा उदय
या सगळ्याच गोष्टींचा जगावर मोठा परिणाम झाला. यातूनच पुढे डिजिटल करन्सीचा विचारही जन्मास आला.
टीम मे यांनी हे स्पष्ट करून सांगितलं होतं, "एखादी चलनी नोट तुम्ही पुन्हा पुन्हा डुप्लिकेट केली तर पकडले जाण्याची भीती असतेच. पण डिजिटल करन्सीला तुम्ही पुन्हा-पुन्हा डुप्लिकेट करू शकता. अशात एक डिजिटल नाणं एका वेळी एकदाच खर्च करण्यात आलंय, याची खात्री कशी पटवायची, हा एक मोठा प्रश्न होता."
या प्रश्नाचं उत्तर मिळालं ऑक्टोबर 2008 मध्ये, जेव्हा सातोशी नाकामोटो नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेला एक रिसर्च पेपर प्रकाशित झाला. त्यात टीम मे आणि सायफरपंक्स यांना पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं होती. याचं टायमिंगसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं, कारण जग 80 वर्षांतल्या सर्वांत भीषण आर्थिक संकटाला सामोरं जात होतं. त्यात एका अशा पर्यायी चलनाचा विचार क्रांतिकारी ठरू लागला. याचं नाव होतं - बिटकॉईन.
बिटकॉईन एक असं नाणं जे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एका पासवर्ड प्रोटेक्टेड ॲपवरून पाठवू शकते. ना तिसऱ्या कुठल्या व्यक्तीचा संबंध, ना बँकेचा. अगदी बिटकॉईनचीसुद्धा कुठलीच केंद्रीय बँक नव्हती, ना कुठला गव्हर्नर वा CEO. आणि यातून कुणी कुठे कधी बिटकॉईन पाठवलेयत, याचा एक पब्लिक रेकॉर्ड प्रत्येक बिटकॉईन युझरच्या कंप्युटरमध्ये उपलब्ध होता, त्यामुळे सगळ्यांकडे एकाच वेळला एकसारखंच वहिखातं दिसायचं. चोरीची शक्यताच नाही.
पण तो रिसर्च पेपर लिहिणाऱ्या व्यक्तीचं सातोशी नाकामोटो हे खरं नाव नव्हतं. ती व्यक्ती कोण होती, हे आजवर ठाऊक नाही. पण टीम मे यांच्या मते सातोशी नाकामुटो हा जो कुणी माणूस आहे, "तो नक्कीच आमच्यासारख्याच सायफरपंक्सच्या गटातला होता. किंवा असंही होऊ शकतं की त्या व्यक्तीला आम्ही ओळखतसुद्धा असू."
पण टीम मेंसारख्या सायफरपंक्ससाठी या बिटकॉईनचा हेतू तरी काय होता?
"आम्हाला बँकिंग व्यवस्थेला बायपास करायचं होतं, आणि सरकारांनासुद्धा," ते सांगतात. "आम्ही पक्के लिबरटेरियन आहोत, आम्हाला अराजक भाडंवलशाहीवादीसुद्धा म्हणू शकता. आम्हाला वाटतं की जगभरातल्या लोकांनी एकमेकांशी संपर्क साधावा, व्यवहार करावा, कुठल्याही सरकारी नियंत्रणाशिवाय."
बिटकॉईनचा भाव वाढतच राहणार का?
2010 मध्ये अँड्रिया ओ'सुलिवन यांनी पहिल्यांदा बिटकॉईनबद्दल ऐकलं तेव्हा त्या इकॉनॉमिक्सचं पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या. आज त्या जेम्स मॅडिसन इन्स्टिट्यूटच्या संचालिका आहेत आणि बिटकॉईनवर संशोधन करतात. त्या सांगतात की त्यांचा एक मित्र पबमधल्या कर्मचाऱ्यांना टिपमध्ये बिटकॉईन द्यायचा. त्या काळी ते सगळे स्वतःला बिटकॉईनचे प्रचारक म्हणायचे.
"मला आठवतं, मी आणि माझे मित्र पबमध्ये जायचो. सगळेच इकॉनॉमिक्स शिकणारे, लिबरटेरियन विचारांचे होते. माझा एक मित्र बारमध्ये काम करणाऱ्यांना बिटकॉईनच्या रूपात टिप द्यायचा. आणि ते विचारायचे 'हे काय आहे?'
"त्या वेळला हे स्वप्न पूर्णपणे पाहिलंसुद्धा गेलं नव्हतं. आम्ही फक्त प्रार्थना करत होतो की या बिटकॉईनला चांगला भाव मिळेल, आणि लोक खरोखरच इतर पैशांप्रमाणे यांचीसुद्धा देवाणघेवाण करतील, तेसुद्धा एका सुरक्षित वातावरणात," अँड्रिया सांगतात.
आता हे सारंकाही घडताना दिसतंय. पण हो, बिटकॉईनला आजही सरकारचं कुठलं संरक्षण आहे, ना कुठली हमी की याचे भाव वाढतच राहतील. 2017च्या अखेरीस एका बिटकॉईनचं मूल्य तब्बल 20 हजार डॉलर्सला टेकलं होतं. पण तिथून ते गडगडून वर्षभरात 3,200 डॉलर्सवर आलं होतं. मग 2021च्या मार्च महिन्यात एक बिटकॉईन तब्बल 61 हजारांपर्यंत पोहोचला होता. आणि आत्ता मार्च 2022चा ताजा भाव जवळजवळ 42 हजार डॉलर प्रति बिटकॉईन आहे. म्हणजे प्रचंड चढउतार आणि अनिश्चितता.
पण तरीही लोक आजही बिटकॉईन का वापरतात?
अँड्रिया सांगतात की अनेक लोक बिटकॉईन नुसते साठवतायत. त्यांना हॉडलर्स (hoddlers) म्हणतात. असं का? "एकदा कुणीतरी बिटकॉईन फोरमवर लिहिलं की त्याला त्याचे बिटकॉइन्स होल्ड करायचेत, पण त्याने h-o-l-d ऐवजी चुकून h-o-d-l लिहिलं, तेव्हा पासून साठेबाजी करणाऱ्यांना हॉडलर्सच म्हटलं जातं."
या हॉडलर्सना वाटतं की जर बिटकॉईन सोन्यासारखेच साठवून ठेवले की त्यांचे भाव वाढतात. बिटकॉईन सुरू करणाऱ्यांनी सुरुवातीला काही मर्यादितच बिटकॉईन बाजारात आणले. पण आता हे वितरित करणारी कोणतीही केंद्रीय बँक नाही, त्यामुळे या हॉडलर्सना आशा आहे की याचे भाव वधारतीलच.
अँड्रिया ओ'सुलिवन सांगतात की अनेकांना वाटतं की बिटकॉईन पुढे चालून राखीव जागतिक चलन म्हणून वापरात येईल. राखीव चलन म्हणजे सुरक्षित पैशाचा साठा. उदाहरणार्थ, अनेक मोठ्या जागतिक कंपन्या किंवा सरकारंसुद्धा डॉलर्समध्ये आपली संपत्ती राखीव ठेवतात. कारण त्यांच्या मते डॉलर जगातलं सर्वांत सुरक्षित आणि स्थिर चलन आहे. कारण त्याला जगातल्या सर्वांत शक्तिशाली सरकारचा पाठिंबा आहे.
पण त्या सांगतात की काही लोकांना अगदी शेवटचा पर्याय म्हणूनही बिटकॉईन वापरावे लागतात. "व्हेनेझुएलाचं उदाहरण घ्या. इथल्या आर्थिक धोरणांचा फटका सर्वसामान्यांना असा बसलाय की त्यांच्यापुढे आता बिटकॉईनच अखेरचा पर्याय उरलाय."
अँड्रिया सांगतात की यामुळे अनेक बड्या उद्योगपतींनीसुद्धा बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि अर्थातच या लाटेवर स्वार व्हायला अनेक सामान्य लोकसुद्धा बिटकॉईनमध्ये पैसे टाकू पाहतायत. त्या सांगतात, "मी अशा बातम्या पाहतेय ज्यात लोक अगदी घर गहाण ठेवून बिटकॉईन विकत घेत आहेत. मला लोक रँडमली कॉल करून विचारतात की मला बिटकॉईन घ्यायचाय, काय करू."
अँड्रिया यांचा अंदाज आहे की लोकांचा हाच हावरटपणा बिटकॉईनचा भाव उगाचाच फुगवतोय. त्यामुळे हीच सर्वांत सुरक्षित गुंतवणूक आहे, असंही म्हणता येणार नाही. मग लोक अजूनही बिटकॉईनमध्ये पैसे का गुंतवून आहेत?
लोकांना आशा आहे की बिटकॉईनचं मूल्य सतत वाढतच राहील, आणि यावर सरकारी नियंत्रण येण्याची शक्यताही फारच कमी आहे. अँड्रिया यांना वाटतं की ही खरोखरंच लोकांद्वारे आणि लोकांसाठी चालवली जाणारी चलन व्यवस्था आहे, त्यामुळे एकप्रकारे ते खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य अनुभवू शकतायत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)