You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोट्यवधीचे बिटकॉइन गुंतवून व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू, पासवर्ड कुणालाच माहीत नाही
कॅनडाच्या सर्वांत मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या संस्थापकाचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे कोट्यवधी डॉलर्स अडकून पडले आहेत. ते पुन्हा कसे मिळवायचे हा प्रश्न गुंतवणूकदार तसंच त्यांच्या पत्नी जेनिफर यांना पडला आहे.
गेराल्ड कॉटेन यांनी क्वाड्रिगा या कंपनीची स्थापना केली. बिटकॉइनच्या बदल्यात प्रत्यक्षात पैसे पुरवण्याचं काम क्वाड्रिगा करत असे. गेराल्ड हे गेल्या वर्षी भारतात आले होते. त्यांना क्रोह्न्स डिसीज नावाचा पोटाचा आजार झाला होता. त्यात त्यांचं निधन झालं.
बिटकॉइन स्वीकारून प्रत्यक्ष पैसे देण्याचं काम कॉटेन हेच करत असत. इतर कुणालाही ते काम कसं करतात किंवा त्यांच्या लॅपटॉपचा पासवर्ड काय आहे हे माहीत नाही. त्यामुळे किमान 140 दशलक्ष डॉलर अडकून पडले आहेत.
या कंपनीचे किमान 1.15 लाख ग्राहक आहेत. ग्राहक जे बिटकॉइन देत त्याबदल्यात त्यांच्या अकाउंटमध्ये वास्तविक चलन ठेवण्यात येत असे. ग्राहकांना हवं तेव्हा ते पैसे वापरता येत असत. पण आता संस्थापक नसल्यामुळे ते पैसे कसे मिळतील याची चिंता ग्राहकांना आहे.
दिवंगत कोटेन यांची पत्नी जेनिफर रॉबर्टसन या त्यांच्या वारसदार आहेत. त्यांनी कोर्टात एक शपथपत्र दिलं असून कोटेनच्या लॅपटॉपचे पासवर्ड माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
म्हणजेच कोट्यवधी डॉलर्सच्या विनियोगाचे हक्क त्यांच्याकडे आहेत, पण अकाउंटचे पासवर्ड नसल्यामुळे त्यांची गत किल्ली नसलेल्या भरलेल्या तिजोरीसारखी झाली आहे, असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
अर्थात, त्यांनी यावर तोडगा म्हणून काही तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. या कोंडीवर काही पर्याय काढता येईल का असा विचार केला जात आहे. या तज्ज्ञांनी काही बिटकॉइन रिकव्हर केले आहेत. पण अजून उरलेले बिटकॉइन कसे मिळवायचे यावर खल सुरू आहे.
जानेवारी 2018मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीचे अंदाजे 25 दशलक्ष कॅनेडियन डॉलर कॅनडाच्या CIBC बॅंकेनं फ्रीज केले होते. (ग्राहकांना ही रक्कम देता येणार नाही असं बॅंकेनी सांगितलं होतं.)
कंपनीचे आधी बरेच प्रश्न होते. त्यातच कोटेन यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे त्या प्रश्नांत आणखी भर पडली आहे. यावर तोडगा सुचवण्यात यावा असं कंपनीचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया कोर्टात धाव घेतली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)