आई-वडिलांच्या हत्येच्या आरोपात 17 वर्षे तुरुंगात काढली, बाहेर पडला ते वकील बनूनच...

    • Author, रफाईल अबुचाबे
    • Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड

1988 सालातील सप्टेंबर महिना. 17 वर्षांचा मार्टिन टँक्लिफच्या शाळेचा पहिलाच दिवस होता. तो सकाळी उठला तेव्हा त्यानं जे समोर पाहिलं, ते कुणालाही आतून-बाहेरून हादरवणारं ठरावं. मार्टिन टँक्लिफची आई मृतावस्थेत होती, तर वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. 

अशा स्थितीत अमेरिकेतील कुणीही समजूतदार व्यक्ती करेल, तेच मार्टिनने केलं. त्यानं 911 वर फोन केला. 

मार्टिनं बीबीसीच्या आऊटलूक कार्यक्रमात सांगितलं की, “समोरच्या दृश्यानं मला जबर धक्का बसला. त्या धक्क्यानं मी माझं भान हरपून बसलो. त्या क्षणी माझ्यासोबत काय घडलं, याचं वर्णनही मला आता करता येणार नाही, इतकं ते भयंकर होतं. ज्या प्रसंगातून मी गेलो, त्यातून ईश्वरानं कुणालाही जाऊ देऊ नये.” 

आपत्कालीन सेवांना मदतीसाठी फोन केल्यानंतर मार्टिनला कल्पनाही नव्हती, असं घडलं. ते म्हणजे, आई-वडिलांच्या हत्येचा मुख्य संशयित म्हणून मार्टिनकडेच पाहण्यात आलं आणि पुढे 17 वर्षे त्याला तुरुंगात काढावी लागली.

आई-वडिलांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ग्राह्य धरल्यानंतर मार्टिनवर रीतसर खटला चलला आणि 1990 साली त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. पुढे जेव्हा न्यायालयानं मार्टिनच्या खटल्याची पुनर्तपासणी केली, तेव्हा त्याच्यावरील आरोपात तथ्य आढळलं नाही. त्यामुले 2007 साली मार्टिनची तुरुंगातून सुटका करण्यात आली. 

मार्टिन टँक्लिफ त्याच्या या अग्निपरीक्षेची आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा नवीन आयुष्य सुरू करण्याची गोष्ट सांगताना क्षणोक्षणी भावनिक होत जातो.

बालपण

अर्लिन आणि सिमोर अशी मार्टिनच्या आई-वडिलांची नावं होती. मार्टिनचा जन्म होण्यापूर्वीच दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. पुढे मार्टिनचा जन्म झाला आणि प्रक्रियेनुसार तो अर्लिन आणि सिमोर यांच्याकडे दत्तक आला. त्याचं पालनपोषण सर्व न्यूयॉर्कच्या उपनगरीय भाग असलेल्या लाँग आयलंडमध्ये झालं. 

“माझ्या लहानपणी वडिलांकडे काहीच नव्हतं. पण मी मोठा होत असताना, ते आर्थिकदृष्ट्या स्थिर होत गेले. त्यामुळे लहानपणी मला जे काही हवं होतं, ते सर्व ते देत गेले,” असं मार्टिन सांगतात.

पण मार्टिन म्हणतात की, मला अजूनही कळलं नाही की, सप्टेंबरच्या त्या भयंकर सकाळी जेव्हा आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तेव्हा मला चौकशीसाठी का नेलं? 

“मला आधी वाटलेलं की, मला पीडित म्हणूनच ते पाहतील. पण ते तर मला या हत्येतील आरोपी म्हणून पाहत होते,” असं मार्टिन म्हणतात.

पोलीस तपास

चौकशीचा काळ आठवत मार्टिन सांगतात की, पोलीस आई-वडिलांशी माझे असलेल्या संबंधांबाबत प्रश्न विचारत होते. ते अधिक तपशील विचारून, संभाव्य संशयित कोण हे शोधू पाहत होते.

मार्टिन यांनी यांनी वडिलांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या जेरी स्ट्युअरमन यांचं नाव सांगितलं. कारण मार्टिनना संशय होते की, त्यांचा हात या हत्येमागू शकतो. 

डिसेंबर 1988 ला खटल्याच्या सुनावणीदरम्यान सिमोर टँक्लिफच्या वकिलांनी दावा केला की, सिमोर टँक्लिफ यांचं जेरी स्ट्युअरमन यांच्यावर 9 लाख डॉलरचं कर्ज होतं.

पण हत्येच्या घटनेवेळी स्ट्युअरमन स्वत:च्या घरी होते. आई-वडील आणि इतर पाहुण्यांसोबत पहाटेपर्यंत पोकर खेळत होते.

आश्चर्याची बाब म्हणजे, “आरोप होऊनही स्ट्युअरमन यांना चौकशीचा भाग बनवलं गेलं नाही किंवा त्यांच्यावर कुठलेच आरोप ठेवले गेले नाहीत.” 

टँक्लिफ दाम्पत्याच्या हत्या प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी जेम्स मॅकक्रिडी यांचं 2015 साली निधन झालं. त्यांनी हयात असताना या हत्या प्रकरणावर अनेकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

सीबीएस या अमेरिकन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत मॅकक्रिडी यांनी तपासादरम्यान वापरलेल्या युक्त्यांचीही माहिती दिली होती.

जेम्स मॅकक्रिडींनी सांगितलं होतं की, “मार्टिनला सांगितलं की, अँड्रेनालाईनने वडील शुद्धीत आले होते आणि त्यांनी मुलावर गोळीबाराचा आरोप केला होता.” 

मार्टिन म्हणतात की, “अमेरिकेत तपास अधिकाऱ्याला संशयिताशी खोटे बोलण्याची परवानगी असते आणि मॅकक्रिडींनी तेच केलं.”

“माझ्या आईच्या हातात माझे केस सापडल्याचंही त्यांनी सांगितलं. पण त्यात काहीच तथ्य नव्हतं. शिवाय, माझ्या वडिलांना अँड्रेनालाईन दिलं गेलं आणि त्यांनी मला हल्लेखोर म्हटलं, हेही खरं नव्हतं,” असंही मार्टिन सांगतात. 

हत्येच्या घटनेच्या एका आठवड्यानंतर स्ट्युअरमन कॅलिफोर्नियाला परतले. मात्र, त्यांच्याकडे संशयित म्हणून पाहिलंच गेलं नाही. स्ट्युअरमन यांनी सांगितलं की, हत्येच्या आरोपाच्या भीतीनं आपण पळून गेलो होतो.

खटल्याची सुनावणी

मार्टिन म्हणतात की, तपास अधिकारी मला प्रश्न विचारून भांबावून सोडायचे आणि त्यांना हवी ती उत्तरं मिळवण्याचे प्रयत्न करायचे. 

खटल्यात सादर केलेल्या पुराव्यांपैकी एक महत्त्वाचं कागदपत्र होतं, ते तपास अधिकारी जेम्स मॅकक्रिडींनी घेतलेलंल जबाब. पण खरंतर त्यावर माझी स्वाक्षरी नव्हती. 

मार्टिन यांना चौकशीदरम्यान सांगितलेली माहिती आत नीट आठवत नाही.

मार्टिन म्हणतात की, “जर तुम्ही एखाद्या तरुणाला संशयित म्हणून चौकशीसाठी घेऊन गेलात, जो नुकतेच हादरवून टाकणाऱ्या घटनेला सामोरं गेला आहे. त्याला चौकशी करण्याचा खोलीत एकटं ठेवलंत, शिवीगाळ केलीत, त्याचा छळ केलात, तर त्या खोलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग त्याच्यापाशी उरतो, तो म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांना हवी असलेली उत्तरं देणं.”

स्ट्युअरमननं खटल्यादरम्यान साक्ष दिली की, “हत्या प्रकरणानंतर पळून गेलो होतो, कारण मार्टिननं माझ्यावर आरोप केला होता. तुरुंगात जाण्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्यापूर्वी विम्याचे पैसे मिळवून कुटुंबाला देण्याचा प्रयत्न होता. पण मी ही हत्या केली नाहीय.”

स्ट्युअरमनला या हत्या प्रकरणात शिक्षा झाली नाही. मार्टिनला मात्र दोनदा जन्मठेपेची शिक्षा झाली. 

“मला आठवतंय, काऊंटी तुरुंगात गेल्यानंतर तिथल्या लिपिकानं मला म्हटलं की, तू इथे काय करतोयेस? या गुन्ह्यात तुला दोषी ठरवावं असं काहीच नाहीय,” असं मार्टिन सांगतात. 

तुरुंगात असताना मार्टिन यांनी कायद्याचा अभ्यास केला, जेणेकरून स्वत:ची बाजू स्वत:च लढता येईल. अनेक निवृत्त वकिलांना पत्र पाठवून, खटल्याचा आढावा घेण्यास सांगितलं. 

यात मार्टिनच्या आयुष्यातील 14 वर्षे तुरुंगात गेली.

...आणि सुटका झाली

तुरुंगात 14 वर्षे काढल्यानंतर, 2004 साली मार्टिननं जवळपास 20 साक्षीदारांची निवेदनं आणि नवीन पुरावे गोळा केली. त्यानंतर नवीन वकिलांना हा खटला चालवण्याची विनंती केली. 

पुराव्यांव्यतिरिक्त वकिलांनी साक्षीदारांच्या साक्षी मिळवल्या, ज्यात सिमोर टँक्लिफ यांच्या साथीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. 

यापैकी ग्लेन हॅरिस नावाच्या व्यक्तीची साक्ष होती. या ग्लेन हॅरिसने साक्षीत दावा केला की, ज्या कारमधून जो क्रिडॉन आणि पिटर केंट या मारेकऱ्यांनी प्रवास केला, ती कार मी चालवली होती.

मात्र, ही साक्ष फेटाळण्यात आली.

त्यानंतर मार्टिनच्या वकिलांनी खटला दुसर्‍या अधिकारक्षेत्रात हलवण्याचा प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित केलं. कारण बचाव पक्षाचे वकील बॅरी पोलॉक यांनी म्हटल्याप्रमाणे, “सफोक काउंटीमध्ये मार्टिनला न्याय मिळण्याची कुठलीच शक्यता नाही.” 

मग ब्रुकलीन कोर्टमध्ये खटला चालला आणि मार्टिनची ‘पुराव्यांअभावी सुटका’ होण्यास आणखी तीन वर्षांचा कालावधी गेला. 

जेव्हा मार्टिनला सोडण्यात आले, तेव्हा आपल्यासोबत नक्की काय झालं, हे कळायला दिवस गेला. 

“दुसऱ्या दिवशी तुरुंगरक्षकाने माझ्यासाठी वृत्तपत्र आणलं. त्यात पहिल्या पानावर माझं छायाचित्र होतं, तेव्हा मला कळलं की नेमकं काय झालंय. या क्षणाची कितीतरी वर्षी मी वाट पाहत होतो,” असं मार्टिन म्हणाले.

मार्टिन यांची सुटका होईपर्यंत त्यांचं निम्मं आयुष्य तुरुंगात गेलं होतं. त्यामुळेच ते म्हणतात की, सुटकेनंतर उचललेली पहिली पावलं माझ्यासाठी विशेष होती. 

“जेव्हा तुरुंगातून बाहेर पडत होतो, तेव्हा माझ्यासोबत चालणाऱ्यांना हळू चालायला सांगितलं. त्यांनी त्याचं कारण विचारलं, तर मी सांगितलं की, स्वातंत्र्याच्या दिशेनं ही माझी पहिली पावलं आहेत आणि ती मला हळूहळू उचलायची आहेत.”

1990 ते 2007 या काळात जग बरंच बदललं होतं. आजूबाजूच्या लोकांचं जगणं बदललं होतं. 

17 व्या वर्षी आई-वडिलांच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले मार्टिन तुरुंगाबाहेर आले तेव्हा त्यांनी पस्तिशी ओलांडली होती. वयाच्या पस्तिशीत त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला होता. तुरुंगाबाहेर आल्यानंतर एका नव्या जगात, नव्या आयुष्यात त्यांनी पाऊल टाकलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)