You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बंदुकीच्या धाकावर मुलाचं अपहरण, मुलीशी लग्न लावलं, पहाटे संडासचं नाटक करून ‘तो’ पळाला
- Author, चंदनकुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी नवादा/लखीसराय, बिहार
पाटणा उच्च न्यायालयानं बिहारमधील दहा वर्षे जुना विवाह रद्द केला आहे. या प्रकरणी मुलाने आपलं अपहरण करून जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचा आरोप केला होता. बिहारमध्ये या प्रकारच्या लग्नाला ‘पकडौआ विवाह’ म्हणतात. म्हणजेच धरपकड करून लावलेलं लग्न.
बिहारमध्ये या प्रकारच्या लग्नाचा मोठा इतिहास आहे. पकडौआ विवाहात, मुलीच्या बाजूचे लोक एखाद्या मुलाचं अपहरण करतात आणि त्यांच्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडतातं
मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयाचा हा निर्णय मान्य नसून ते याविरोधात दाद मागण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत आहेत.
या निर्णयासाठी ते स्वत: त्यांच्या वकिलाला जबाबदार धरत असून त्यांच्या वकिलांनी सर्व पुरावे न्यायालयात सादर केले नसल्याचा आरोप करत आहेत.
काय प्रकरण आहे?
या प्रकरणी बिहारमधील दोन कुटुंबांमध्ये कायदेशीर लढाई सुरू होती.
हे प्रकरण नवादा जिल्ह्यातील रेवरा गावातील चंद्रमौलेश्वर सिंह यांचा मुलगा रविकांत आणि लखीसराय जिल्ह्यातील चौकी गावातील बिपीन सिंह यांची मुलगी बंदना कुमारी यांच्या लग्नाशी संबंधित आहे.
आरोपानुसार, रविकांत सिंह त्यांचे काका सत्येंद्र सिंह यांच्यासोबत लखीसराय येथील अशोक धाम मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते.
त्यादरम्यान त्यांचं बंदुकीच्या धाकावर अपहरण करून लखीसराय येथील बंदना कुमारी यांच्याशी जबरदस्तीनं लग्न केलं.
ही घटना 30 जून 2013 ची आहे. त्यावेळी रविकांत यांना सैन्यात नवीन नोकरी मिळाली होती.
सत्येंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, "जवळपास आठ लोक होते, त्यापैकी काहींकडे शस्त्रंही होती. त्यांनी रविकांतला ओढून नेलं. तर त्यांनी मलाही उचलून नेलं. पण मला लखीसराय इथं सोडलं आणि तुमच्या मुलाचं लग्न लावत असल्याचं सांगितलं. आम्ही घरी माहिती दिली, घरातील लोकही तिथं आले, मात्र त्याचा काही पत्ता लागला नाही."
सत्येंद्र सिंह यांचा दावा आहे की, ओलिस ठेवलेला रविकांत सकाळी चार वाजता शौचालयात जाण्याच्या बहाण्यानं बाहेर आले, त्यावेळी घरातील लोक झोपले होते. त्यांची मोटारसायकल मंदिराजवळ उभी होती आणि चावी त्यांच्याकडेच होती.
त्याच क्षणी रविकांत लखीसराय येथून मोटारसायकलवरून पळून गेले. लखीसरायचं अशोक धाम मंदिर मुलीच्या घरापासून अवघ्या काही पावलांवर आहे.
रविकांतचे वडील चंद्रमौलेश्वर सिंह म्हणतात की त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा जबरदस्तीचा विवाह कधीच मान्य केला नाही. मात्र, यासाठी नातेवाइकांकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला.
चंद्रमौलेश्वर सिंह म्हणतात, "एखाद्याचं अपहरण करून त्याला सिंदूर लावायला भाग पाडणं म्हणजे लग्न नाही. बिहारमध्ये 'पकडौआ लग्न' व्हायची आणि ती आत्ताही होत असतील आणि पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही, परंतु ज्यांना आम्ही कधीही भेटलो नाही, आम्ही त्यांना ओळखत नाही. ज्यांच्याशी आमचं मन जुळत नाही, त्यांच्याशी संबंध कसे स्वीकारायचे."
'पकडोआ' विवाह म्हणजे काय?
पकडवा किंवा पकडौआ विवाह हा एक असा विवाह आहे ज्यामध्ये विवाह योग्य मुलाचं अपहरण केलं जातं आणि जबरदस्तीनं लग्न केलं जातं. या लग्नावर चित्रपट आणि टीव्ही मालिकाही बनल्या आहेत.
1980 च्या दशकात आणि त्यापूर्वी बिहारमध्ये अशा विवाहांची अनेक प्रकरणं पाहायला मिळाली होती. उत्तर बिहारमध्ये असे विवाह अधिक प्रमाणात होत होते.
यासाठी गावात अपहरण करणाऱ्या टोळ्या देखील असल्याचं समजतं जे विवाह योग्य मुलांना पळवून नेत असत.
एकेकाळी उत्तर बिहारमध्ये नोकरी करणाऱ्या आणि विवाह योग्य मुलांना लग्नाच्या हंगामात घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात असे.
बिहार पोलिसांच्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी सुमारे तीन ते चार हजार बळजबरी विवाहाची प्रकरणं नोंदवली जातात.
मागील वर्षांवर नजर टाकली तरी सक्तीच्या विवाहाच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. प्रेमसंबंधांमुळे घरातून पळून जाणाऱ्या जोडप्यांच्या आकडेवारीचा यात समावेश नाही.
'पकडौआ नव्हे प्रेमविवाह'
सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की सक्तीचं लग्न हळूहळू मुलाच्या कुटुंबाकडून स्वीकारलं जातं आणि ते स्वीकारण्यात समाज किंवा समाजाचा दबाव महत्त्वाची भूमिका बजावतो.
चंद्रमौलेश्वर सिंह म्हणतात, "मी सैन्यात होतो आणि मला याबद्दल फारशी माहिती नाही, पण हल्ली असं घडत असेल तर ते मुलीच्या लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी आहे."
पण, बंदना कुमारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की हा 'पकडोआ शादी' नसून प्रेमविवाह होता आणि ते उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहेत.
त्यांच्याच वकिलानं न्यायालयात सर्व पुरावे सादर केले नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
बंदना कुमारी म्हणाल्या, "उच्च न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा आहे पण आमची न्यायालयाविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत.
आम्ही दोघांनीही स्वतःच्या इच्छेनं लग्न केलं. आमच्या वकिलाने उच्च न्यायालयात कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. ते आमचे फोनही उचलत नाहीत."
या संदर्भात आम्ही बंदना कुमारी यांच्या वकिलाशीही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वास्तविक बंदना सांगतात की, रविकांत हे तिच्या एका नात्यातील बहिणीचे दीर आहेत. आणि त्यामुळेच त्यांचं तिच्या घरी येणं जाणं असायचं. यादरम्यान दोघांनीही एकमेकांना पसंत करून अशोक धाम मंदिरात लग्न केलं, परंतु मुलाच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं.
दुसरं लग्न केल्याचा आरोप
बंदनाची आई शिरोमणी देवी यांनी आरोप केला आहे की, बंदनाच्या वकिलाने या प्रकरणात मदत केली नाही.
शिरोमणी देवी दावा करतात, " त्या दोघांनीही स्वतःच्या इच्छेने लग्न केलं आणि मुलानं आनंदाने लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले आणि मंत्रांचे पठण केलं. हा विवाह सर्व समाजासमोर पार पडला.
बंदनाच्या शेजारी राहणाऱ्या निशादेवी यांनी दावा केला आहे की, मुलाने स्वतःच्या मर्जीनुसार लग्न केलं होतं आणि हे लग्न ठरलेलं नव्हतं. मुलानं मुलीला पसंती दिल्यावर लग्न केलं होतं, त्याला कोणीही पकडून आणलं नव्हतं, पण हे लग्न मुलाच्या घरच्यांना मान्य नव्हतं.
रविकांत हे लग्नानंतर तिला भेटण्यासाठी लखीसराय येथे यायचे, असा बंदना यांचा दावा आहे.
त्याही तीन वर्षांपूर्वी अनेक महिने सासरच्या घरी राहिल्या होत्या. सासरच्या घरी गैरवर्तन करण्यात आलं, त्यामुळे त्या तिथून परत आल्या, असा आरोप बंदना यांनी केला आहे.
पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रविकांत हे कसे तरी सासरच्या घरून पळून गेल्याचं रविकांत यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
वास्तविक, लग्नानंतर रविकांत यांनी लखीसरायच्या कौटुंबिक न्यायालयात तिच्याविरुद्ध खटला दाखल केला होता.
रविकांत यांनी घरच्यांच्या दबावाखाली हे कृत्य केल्याचा आरोप बंदना कुमारी यांनी केला आहे.
पण, जानेवारी 2020 मध्ये लखीसराय येथील न्यायालयाने रविकांत यांच्या विरोधात निकाल दिला होता आणि बंदनाला रविकांत यांच्या पत्नीचा दर्जा देण्यात आला होता.
मात्र रविकांत यांच्या कुटुंबीयांनी या निर्णयाविरोधात पाटणा उच्च न्यायालयात अपील केलं होतं.
त्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात 2013 चे लग्न रद्द करण्याचा निर्णय दिला. आपल्या निर्णयात न्यायालयानं मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत सादर केलेले पुरावे अपुरे मानले आहेत.
याशिवाय अशोक धाम मंदिरात लग्न लावण्याचा दावा करणाऱ्या पंडितावरही न्यायालयानं प्रश्न उपस्थित केलं आहे आणि हे सुद्धा सांगितलं आहे की हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नात सात फेरे होतात, लग्न लावल्याचा दावा करणाऱ्या पंडिताला याबाबत काही माहितच नाही.
बंदना कुमारी यांचं काय म्हणणं आहे?
लखीसराय कोर्टाच्या निर्णयानंतर रविकांत हे सासरच्या घरी आले होते आणि याचदरम्यान बंदना यांच्या भावाच्या लग्नालाही हजेरी लावली होती, असा बंदनाचा दावा आहे.
त्यानंतर बंदना या काही महिने सासरच्या घरी राहिल्या. बंदना यांची या काळातील काही छायाचित्रंही आहेत. पण, बीबीसी त्या चित्रांच्या सत्यतेची पुष्टी करू शकत नाही.
रविकांत यांचं दुसरं लग्न 2017 मध्ये झाल्याचा गंभीर आरोपही बंदना यांनी केला आहे. या लग्नाविरोधात त्यांनी केसही दाखल केल्याचं वंदना यांचं म्हणणं आहे.
झारखंडच्या देवघरमध्ये काही लोकांच्या उपस्थितीत हा विवाह आयोजित करण्यात आला होता, तर रविकांत आणि बंदना यांच्या लग्नाबाबत त्यावेळी न्यायालयाचा कोणताही निर्णय आला नव्हता, असा त्यांचा आरोप आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही रविकांतच्या लग्नाबाबत त्याच्या वडिलांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ही कौटुंबिक बाब असल्याचं सांगत यावर काहीही बोलण्यास नकार दिला.
रविकांत यांचं लग्न ज्या महिलेशी झाल्याचा दाव बंदना यांनी केला आहे, त्या महिलेशीही आम्ही संपर्क साधला. त्यांनी आम्हाला याबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी फोनवरून त्यांच्या एका भावाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून रविकांत यांचं 2017 साली लग्न झालं असून त्यांना मुलेही आहेत असं सांगितलं.
रविकांत सध्या जयपूरमध्ये नोकरीसाठी तैनात आहेत. पाटणा हायकोर्टात त्यांचा निश्चितच विजय झाला आहे, पण या प्रकरणातील गुंतागुंत अजूनही कायम आहे. दुसर्या लग्नाचं प्रकरण अजूनही कोर्टात आहे आणि त्या सर्वोच्च न्यायालयात केस नेणार असल्याचा दावा बंदना यांनी केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)