You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी मी गरोदर राहिले, पण नवरा म्हणाला हे मूल माझं नाही’
- Author, तरहब असगर
- Role, बीबीसी उर्दू, लाहोर
"माझं पहिलं लग्न सात वर्षांपूर्वी झालं. ते कुटुंब आमच्या परिचयाचं होतं. मला आजही आठवतं, माझ्या सासरचे लोक भेटण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी आमचं चांगलं आदरातिथ्य केलं आणि आम्हाला खूप प्रेमही दिलं. तुला आमची मुलगी मानलं जाईल, तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असाही विश्वास त्यांनी दिला. असं बरंच काही ते बोलले होते," आयशा वकार (बदललेलं नाव) सांगत होत्या.
पहिलं लग्न त्यांच्यासाठी एखाद्या सुंदर स्वप्नाप्रमाणे होतं. सुरुवातीच्या दिवसांत आपल्या पतीचा स्वभाव पाहून त्यांना वाटलं की त्यांच्यापेक्षा अधिक प्रेम आपल्यावर दुसरं कोणीही करू शकत नाही.
आयशा यांनी या लग्नासाठी लगेच होकार दिला आणि त्या कराचीहून लाहोरला आल्या. "लग्नानंतर मी पुन्हा नोकरी करू लागले. पण लग्नाच्या एका महिन्याच्या आतच परिस्थिती बदलली."
पाकिस्तानसह अनेक दक्षिण आशियातील देशांमध्ये महिलांनी घटस्फोट घेतल्यास सहज स्वीकारत नाही. त्यामुळे अनेकदा महिलांना एका वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं आणि त्यांना मानसिक तणावाचा सामनाही करावा लागतो.
आयशा यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितंल, "सासू आणि पतीने मला विचारलं की मला आपल्या माहेरच्यांकडून संपत्तीत वाटा मागितला पाहिजे. माझा पगारही माझ्या पतीने घेतला.
"हे नेहमीच होऊ लागलं. मला ते खर्च करण्यासाठी पैसेही देत नसत. माझ्याकडून मात्र सर्व पैसे घेत होते. मी माझ्या घरातल्यांना हे सांगितलं तेव्हा ते म्हणाले ही बाब सामान्य आहे. पती-पत्नीचे पैसे एकच असतात. त्यामुळे यावर जास्त विचार करू नको."
'हे माझं मूल नाही'
आयशा आणि त्यांच्यासारख्या अनेक महिलांसाठी खरं तर लग्नाचा अनुभव तेवढा सुंदर नसतो जेवढा सहसा सांगितला जातो किंवा विचार केला जातो.
सासरच्या लोकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयशा यांच्या कुटुंबाने त्यांची संपत्ती आयशाच्या नावावर केली. पण सासरच्या लोकांच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. त्यांची वागणूक बदलली होती.
आयशा सांगतात, "माझ्या नावावर असलेला प्लॉट मी त्यांच्या नावावर करावा अशी मागणी माझ्या पतीने केली. त्यांना त्या जागेवर एक ऑफिस सुरू करायचे होते. पण मी याला विरोध केला. यानंतर त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला. माझी सासू आणि पती माझा अपमान करू लागले. घरकामासाठी घरात कर्मचाऱ्यांची फौज असूनही मी ऑफिसमधून घरी आल्यावर सर्व काम माझ्याकडून करवून घ्यायचे."
माझ्या माहेरीही सर्वांना याचा त्रास होत होता. आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना सतत वाटत होतं.
"मी माझ्या घरातल्यांना हे सांगितल्यानंतर ते मला एकच गोष्ट सारखी समजवत होते की, मुलींना संसार करण्यासाठी खूप काही सहन करावं लागतं."
कुटुंबियांच्या या सल्ल्याने आयशा यांना आणखी कमकुवत केलं. सासरी जसजसा अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला तशी आयशाची सहनशक्तीही कमी झाली.
आयशा सांगतात, "माझे पती दारू प्यायचे. दारू प्यायल्यानंतर ते माझ्याशी गैरवर्तणूक करायचे. लग्नाच्या काही महिन्यानंतरच मी गरोदर झाले. माझ्या पतीला ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले की हे मूल माझे नाही. हे ऐकताच माझ्या पायाखालून जमीन सरकली. त्यादिवसापासून हे घर माझ्यासाठी नरकाप्रमाणे बनलं."
एकेदिवशी पतीने माझ्यावर गलिच्छ आरोप केले आणि गरोदर असताना मला घराबाहेर काढलं, असंही आयशा सांगतात.
त्यावेळी आपण लाहोर शहरात पूर्णपणे एकटे आहोत याची जाणीव त्यांना झाली. माहेरच्यांनी त्यांना आपल्या पतीशी जुळवून घेण्यास सांगितल्यावर आयशा आणखी हैराण झाल्या.
आयशा यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या पतीने मात्र ही मुलगी आपली नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "ही मुलगी माझी नाही, तुमच्या मुलीचे बाहेर पुरुषांशी संबंध होते, ही त्यांच्यापैकीच कोणाची मुलगी असेल."
आयशा यांनी अखेर आपल्या माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. लग्न आणि नंतर घटस्फोटाने त्यांच्या आयुष्यातील तणाव वाढला आणि या परिस्थितीत त्यांना कोणाचीही मदत मिळत नव्हती.
घटस्फोट झाल्यानंतर अनेकांनी दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला असंही त्या सांगतात.
'तुम्ही माझ्या मुलीला कुबूल करणार का?'
पहिल्या लग्नाच्या अनुभवानंतर पुन्हा एकदा तोच त्रास आपल्याला होऊ नये, असं आयशा यांना वाटत होतं. दुसऱ्या लग्नासाठी त्यांची केवळ एकच अट होती, घटस्फोटानंतर आपल्याला आरोपी तर समजलं जाणार नाही ना?
"मला प्रश्न पडला की एका घटस्फोटित महिलेसाठी लग्नाचं स्थळ कसं आलं? कोणी आपल्या स्वार्थासाठी तर माझ्याशी लग्न करत नाहीये ना? अशीही शंका मला आली. मी मुलाला भेटण्याचं ठरवलं. त्यांना भेटल्यानंतर आणि चर्चा केल्यानंतर मी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला."
आयशा यांनी दुसरं लग्न करण्यापूर्वी आपल्या होणाऱ्या पतीला विचारलं की, "तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार करणार का?" त्यांचं उत्तर होतं, "मी त्या मुलीला आपलं मानतो." त्यामुळे आयशा लग्नासाठी तयार झाल्या.
एका घटस्फोटित महिलेशी लग्न केल्यानंतर त्यांच्या पतीला आणि कुटुंबाला "लोकांच्या कडव्या शब्दांचा सामना" करावा लागला.
"त्यांनी केवळ मला खूश ठेवलं नाही तर माझ्यापर्यंत कधीही कोणती समस्या येऊ दिली नाही. या नात्यामुळे माझ्यात पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण होऊ शकला. म्हणूनच मी आता एक समाधानी आयुष्य जगत आहे," असं आयशा म्हणाल्या.
'घटस्फोटित महिलेवर आरोप करणारे लोक'
मानसोपचारतज्ज्ञ रैहा आफताब यासंदर्भात बोलताना सांगतात, पाकिस्तान, भारत आणि इतर काही देशांमध्ये घटस्फोटानंतर महिलांना असं सांगितलं जातं की आता त्यांची स्वत:ची काही ओळख राहिली नाही.
आफताब म्हणाल्या, "आपल्या देशात मुलीच्या आयुष्याचे ध्येय केवळ लग्न करणं आहे असं मानलं जातं. लहानपणापासूनच मुलीचे आई-वडील तिच्या लग्नाच्या तयारीसाठी अनेक गोष्टी करत असतात. म्हणूनच लग्नाकडे एक गुंतवणूक म्हणूनही पाहिलं जातं. मुलीच्या कुटुंबाकडून लग्नासाठी खूप खर्च केला जातो आणि मुलीचा घटस्फोट झाला तर सगळे पैसे वाया गेले असं म्हटलं जातं."
लग्नाआधी मुलीचं नाव तिच्या वडिलांशी जोडलेले असते आणि लग्नानंतर आपल्या पतीशी. लग्नानंतर पतीचे घरच तिचे घर आहे, असंही मुलीच्या मनावर बिंबवलं जातं.
"कोणात्याही व्यक्तीसाठी मानसिकदृष्ट्या अशा गोष्टी स्वीकारणं कठीण असतं."
रैहा आफताब सांगतात की, घटस्फोटानंतर बहुतांश मुलींच्या माहेरी त्यांचं स्वागत केलं जात नाही. त्यामुळे त्यांना वाटतं की आता कोणतंही घर आपलं नाही.
"घटस्फोटित महिलांसाठी ही गोष्ट एक अस्तित्वाची लढाई बनते आणि यामुळे मानसिक समस्याही उद्भवतात," असंही त्या म्हणाल्या.
"आशियाई देशांत मुलीचा सासरचा संसार तिचे वास्तविक यश आहे असं मानलं जातं आणि तिला यात अपयश आलं तर तिचे आयुष्य व्यर्थ आहे असंही मानलं जातं."
रैहा यांचं म्हणणं आहे की, घटस्फोट हा काही दोष नाही तर एखाद्या अप्रिय नात्यातून बाहेर पडण्यासाठीचा एक कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुटुंबाने तिला सहकार्य केलं तर ती एका समस्येतून बाहेर पडताना दुसऱ्या समस्येत अडकणार नाही.
आफताब पुढे सांगतात, "दुसरा पती आणि सासरचे लोक चांगले असतील तर मुलीचाही नात्यावरील उडालेला विश्वास पुन्हा दृढ होतो. आत्मविश्वासही वाढतो आणि यामुळे आयुष्यातील वाईट अनुभवांना विसरण्यास मदत होते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)