You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजघराण्यातले घटस्फोट : क्योंकि साँस भी कभी बहू थी
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एका घटस्फोटित बाईशी लग्न करायला 1936मध्ये ब्रिटनच्या राजाला राजपदाचा त्याग करावा लागला होता. एकेकाळी असा घटस्फोटांचा तिरस्कार करणाऱ्या राजघराण्याची सून घटस्फोटित असूनही मेगन मार्कल कशी झाली?
'सूट्स' या अमेरिकन टेलिव्हिजनवरील मालिकेतून लोकांपर्यंत पोहोचलेल्या रेचल झेन, म्हणजेच रेचल मेगन मार्कल अखेर ब्रिटनच्या शाही परिवाराचा एक भाग झाल्या. एक अमेरिकन, मिश्रवंशीय तसंच घटस्फोटित असलेल्या मेगन या प्रिन्स हेनरी ऑफ वेल्स म्हणजे प्रिन्स हॅरी यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्या.
प्रिन्स हॅरी हे राजपदासाठीचे सहाव्या क्रमांकाचे दावेदार आहेत. हे तेच राजपद ज्याचा आठव्या किंग एडवर्ड यांनी 1936 मध्ये त्याग केला होता कारण त्यांना एका अशा महिलेशी लग्न करायचं होतं जिचा दोन वेळा घटस्फोट झाला होता.
चर्च ऑफ इंग्लंडचं नेतृत्व राजपदावर विराजमान व्यक्तीकडे असतं आणि या चर्चला घटस्फोटासारख्या संकल्पना स्वीकारार्ह नाही. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हे चर्च घटस्फोटितांना पुन्हा लग्न करण्याची परवानगी नाकारत होतं. परवानगी मिळायची ती एका अटीवर. ती अट म्हणजे घटस्फोटित व्यक्तीच्या आधीच्या जोडीदाराचं निधन झालेलं हवं.
चर्चची ही असहिष्णुता बघता मेगन मार्कल शंभर वर्षांपूर्वी राजघराण्याचा भाग होण्याची कल्पनाही करू शकल्या नसत्या. आज मात्र त्या राजघराण्याचा भाग झाल्या आहेत. आणि त्यांच्या लग्नाचा दिमाखदार सोहळाही आपण पाहिला.
कालांतराने हा बदल झाला खरा, पण त्यासाठी राजघराण्याला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं.
वंशाच्या दिव्यासाठी घटस्फोट
16व्या शतकातली ही गोष्ट. ब्रिटिनचा राजा हेनरी आठवाला पहिली बायको कॅथरिन ऑफ अॅरगॉनपासून एक मुलगी होती. पण आपला राजघराण्याचा वंश पुढे नेण्यासाठी राजाला मुलगा हवा होता. म्हणून त्यानं दुसऱ्या लग्नाची पोपकडून कायदेशीर परवानगी मागितली. पोपने ती नाकारली.
वारंवार विनंत्या करूनही किंग हेनरीला यश आलं नाही तेव्हा त्याने 1534 साली स्वतःचं चर्च ऑफ इंग्लंड स्थापन केलं. 1521 साली पोपने राजाला धर्मरक्षकाची उपाधी दिली होती. तो मान राजाने अंमलात आणत स्वतःचा मार्ग मोकळा करून घेतला.
यानंतर त्याने कॅथरीनबरोबर काडीमोड करत अॅन नावाच्या एका प्रेयसीसोबत लग्न केलं.
हेनरीची ही बायको खूप हुशार, म्हणून थोडी बंडखोर प्रवृत्तीचीही. राजघराण्यातल्या बायका तशा नवऱ्याच्या आज्ञांचं पालन करणाऱ्या, एक शब्दही उलट उत्तर न देणाऱ्या. पण अॅनने राजदरबारातल्या काही लोकांशी आपलं वाकडं करून घेतलं. यामुळे केवळ राज्यकारभार चालवण्यातच नव्हे तर राजपदाच्या मानालाही हानी होत होती. अॅनचा अॅटिट्यूड राजाला खपेना. त्यात ती राजाला वंशाचा दिवाही देऊ शकली नाही.
अखेर राजा हेनरी आठव्याने 1536 साली तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि अवघ्या दहा दिवसांनी त्याने आणखी एक लग्न केलं. जेन सैमोर नावाच्या या बायकोनं अखेर 1537 साली इंग्लंडला पुढचा राजा दिला - एडवर्ड.
थोडक्यात सांगायचं झालं तर, वंशाच्या दिव्याच्या हट्टापायी राजावर घटस्फोट घेण्याची वेळ आली, आणि त्यातूनच चर्च ऑफ इंग्लंडची स्थापना झाली.
असं असलं तरी सतराव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत लोक उघडपणे घटस्फोट घेत-देत नव्हते. पण अनेकदा लोक अनौपचारिकपणे आणि गुपचूप वेगळे व्हायचेच.
20वं शतक
एवढंच नव्हे, आज राणी एलिझाबेथ दुसऱ्या, राणी आहेत कारण एक मोठा घटस्फोट अलीकडच्या काळात घडला होता.
1936 साली राणींचे काका राजा एडवर्ड आठवे यांना वॉलिस सिम्पसन या घटस्फोटित अमेरिकन महिलेबरोबर लग्न करायचं होतं. तिचा आधीचा नवरा जिवंत होता, त्यामुळे राजा एडवर्ड तिच्याबरोबर लग्न करू शकत नव्हते. मग राजपदाचा मान जपावा की आपल्या प्रेमाचा त्याग करावा, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला.
अखेर त्यांनी 'मन की बात' ऐकून राजपद त्यागलं आणि त्यांचे धाकटे भाऊ जॉर्ज सहावे हे इंग्लंडचे राजे झाले.
त्यांनी 1952 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत राजाची जबाबदारी सांभाळली आणि मग त्यांची मोठी कन्या, एलिझाबेथ अॅलेक्झँड्रा मेरी राणी झाली.
तसा विचार केला तर राजे जॉर्ज यांच्याकडे हे राजपदाचे थेट दावेदारही नव्हते, पण एका घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर भावाभावांमध्ये सत्तापालट झालं आणि अखेर तो मुकूट एलिझाबेथच्या माथी आला.
पण राणींच्या काळात राजघराण्यातले घटस्फोट लपून राहिले असं काही नाही, उलट ते आणखी जास्त आणि जगजाहीरपणे होऊ लागले. त्यांच्या चार मुलांपैकी तिघांनी घटस्फोट घेऊन पुनर्विवाह केला आहे. आणि हे जगजाहीर केल्यानंतर मान ताठ करून आजही ते राजपरिवाराशी निगडीत राहत आहेत.
हा बदल होण्यामागे साहजिकच काही काळ आणि नक्कीच काही त्याग करण्यात आले.
आधुनिक काळातला पहिला घटस्फोट
जवळपास पाच दशकांपूर्वी राणी एलिझाबेथची लहान बहीण राजकुमारी मार्गारेट यांचं प्रेमप्रकरण खूप गाजलं होतं. राजघराण्यात तैनात ग्रुप कॅप्टन पीटर टाउनसेंड यांच्याबरोबर त्यांचं प्रेम गुपचूप फुलू लागलं.
पण टाउनसेंड घटस्फोटित होते आणि त्यांच्या बायको अजूनही या जगात होती.
राणीसमोर एक मोठा पेचप्रसंग उभा राहिला. बहिणीला तिच्या आवडीचा माणूस मिळाला, याचा आनंद व्यक्त करत तिला लग्नाची परवानगी द्यावी की एक घटस्फोटिताशी लग्नाची परवानगी देऊन चर्च ऑफ इंग्लंडची प्रमुख म्हणून कायदा हाती घ्यावा.
त्यांनी या प्रश्नाला काही काळासाठी टाळण्याचा प्रयत्न केला. काही वर्षांनी अखेर राजकुमारी मार्गारेट यांनी एका प्रसिद्धिपत्रकात आपलं टाउनसेंडबरोबरचं नातं मोडलं. पुढे 1960 साली मार्गारेट यांनी अँटोनी आर्मस्ट्राँगसोबत लग्नाची गाठ बांधली पण 18 वर्षांनी तीही सुटली.
आधुनिक काळातल्या राजघराण्यातला हा पहिलाच जगजाहीर घटस्फोट होता. याला दोन कारणं असावीत - राजकुमारी मार्गारेट खूप मनमोकळेपणाने राहणं पसंत करायच्या. राजेशाही प्रोटोकॉलच्या भानगडीत त्या पडत नव्हत्या.
आणि दुसरं म्हणजे बदलता काळ. 2014 साली द न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या एका आर्टिकलनुसार 1970 आणि 80च्या दशकात इंग्लंडमध्ये घटस्फोटांचा दर सर्वाधिक होता. त्यानंतरच्या तीन दशकांमध्ये यात सातत्याने घट झाली आहे.
मग या बदलत्या काळानुसार चर्चलाही थोडं नमतं घ्यावं लागलं, आणि अखेर 2002 साली कायद्यात एक मोठा बदल करण्यात आला. या सुधारित कायद्यानुसार "काही विशिष्ट परिस्थितींमध्ये" घटस्फोटितांना पुनर्विवाहासाठी चर्चकडून परवानगी मिळणार होती. पूर्वीच्या साथीदाराची मृत असण्याची अटही या सुधारणेदरम्यान काढण्यात आली.
कालचक्राचं शतक पालटलं तसं राजघराण्यात घटस्फोटितांचे लग्न आणि पुनर्विवाह सामान्य होऊ लागले. राणी एलिझाबेथ तरीही आपल्या चर्च ऑफ इंग्लंडच्या प्रमुखाच्या भूमिकेमुळे या सगळ्यापासून अंतर राखून राहिल्या.
राणींचा मोठा मुलगा आणि राजपदाचे पुढचे दावेदार प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांनी अनेक वर्षं वेगळे राहिल्यानंतर अखेर 1996 साली आपला काडीमोड जाहीर केला. त्यानंतर पुढच्याच वर्षी एका कार अपघातात डायना यांचं निधन झालं.
त्यानंतर 2005 साली प्रिन्स चार्ल्स हे कॅमिला पार्कर-बॉल्स यांच्याबरोबर एका छोटेखानी समारंभात विवाहबद्ध झाले. पण राणी एलिझाबेथ या लग्न सोहळ्यापासून लांब राहिल्या, याचं कारण त्यांनी कधीच जाहीर केलं नाही, पण कॅमिला यांचं घटस्फोटित असणं, हे त्यामागचं सर्वांत मोठं कारण मानलं जातं.
या काळापर्यंत राणींची मुलगी राजकुमारी अॅन हिनेही नवऱ्यापासून कायदेशीररीत्या काडीमोड घेतला होता, तर प्रिन्स अँड्र्यू यांचासुद्धा सारा फर्ग्युसनबरोबर घटस्फोट झाला होता.
मग राणी हॅरी आणि मेगनच्या लग्नाला का गेल्या?
गेल्या महिन्यात अख्ख्या इंग्लंडमध्ये थाटामाटात शाही लग्न झालं. तुम्हाला माहितीये, नवरा मुलगा प्रिन्स हॅरी 33 वर्षांचा आणि नववधू मेगन 36 वर्षांची आहे.
आज इतक्या शतकांचा इतिहास जाणल्यावर राजघराण्याकडे पाहताना हा बदल कसा झाला, असा विचार येतो डोक्यात. याचं उत्तर काही तज्ज्ञांकडे आहे.
शिकागो ट्रिब्यूनच्या एका आर्टिकलमध्ये राजघराण्यांचे इतिहासकार हुगो विकर्स सांगतात, "1950च्या काळात मेगनला याच परिस्थितींमध्ये राजघराण्याची सून होताच आलं नसतं. तो काळच वेगळा होता."
नक्कीच. राजघराण्याकडे सगळ्यांच्या नजरा अशा असतात, जणू त्यांचं जीवन सामान्यांसाठी एखादी परीकथाच आहे. त्यांचे महाल, गाड्या, राजेशाही कपडे, ते मुकूट आणि तो थाट, सगळं काही एखाद्या स्वप्नवत आयुष्याचं प्रत्यक्षातलं सादरीकरण असतं. सामान्यांना हे सगळं हवंहवंसं असतं, म्हणूनच त्यांच्यावरही हे परफेक्ट आयुष्य जगण्याचं प्रेशर असतं.
याचं एक बोलकं उदाहरण गेल्या ऑक्टोबरमध्ये जगासमोर होतं, जेव्हा राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांनी लग्नाची 70 वर्षं यशस्वीपणे पूर्ण केली. हासुद्धा कदाचित एक विक्रमच असावा.
द व्होग हे लाईफस्टाईल मॅगझीन एक निरीक्षण नोंदवतं. "लग्न म्हणजे आयुष्यभराची गाठ. लग्नात पूर्णपणे एकमेकांसोबत एकनिष्ठ राहणे, असा एक समज इतक्या वर्षांमध्ये रूढ झाला आहे. त्याला बदलायला वेळ लागतोच."
म्हणून राणी आपल्या प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाला गेल्या नव्हत्या पण हॅरीच्या लग्नाला मस्तपैकी तो पोपटी ड्रेस घालून त्या प्रिन्स फिलिप यांच्याबरोबर गेल्या.
आणि हेही तेवढंच खरं आहे की एलिझाबेथ राजपदावर विराजमान असल्यामुळे मार्गारेट यांना ग्रुप कॅप्टन टाउनसेंडच्या प्रेमात पडता आलं, किंवा चार्ल्स यांना डायनापासून वेगळं होऊन कालांतराने का होईना, पुन्हा लग्न करता आलं.
आज प्रिन्स हॅरी हे राजपदासाठीच्या रांगेत सहाव्या क्रमांकावर आहेत. तार्किकदृष्ट्या ते कधीच सिंहासनावर बसणार नाहीत. म्हणून कदाचित मेगन यांच्याशी लग्न करताना त्यांना निदान असं काही टेन्शन नव्हतं, जे 15व्या शतकात त्या हेनरी राजाला किंवा 1936मध्ये राजा एडवर्डला होतं.
आणि यासाठी नक्कीच हॅरी यांनी पाचशे वर्षांपूर्वीच्या त्या पोपविरुद्ध बंड करणाऱ्या राजाचे आभार मानायला हवेत.
(या लेखात आधी 15व्या शतकातल्या राजाचं नाव हेनरी पाचवा असं लिहिलं गेलं होतं, तो राजा हेनरी आठवा होता. चूक दुरुस्त करण्यात आली आहे. क्षमस्व.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)