You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
World Bicycle Day : 'स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्यांना मी सायकलवरून जेवण पुरवायचो'
- Author, संपत मोरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज 5 किमी सायकल चालवणाऱ्या गणपती आजोबांचं 101व्या वर्षी निधन झालं. बीबीसीने जून 2018मध्ये त्यांची गोष्ट सांगितली होती. ती आज जागतिक सायकल दिनानिमित्त पुन्हा शेयर करत आहोत.
सांगली जिल्ह्यातलं रामपूर गाव. मे महिन्याचं रखरखतं ऊन. या उन्हाच्या तडाख्यात फुफाट्यानं धूसर झालेल्या रस्त्यावर सायकल हाकत येणारी एक व्यक्ती दिसते. जवळ आल्यावर जाणवतं की या सायकलस्वारानं वयाचा मोठा टप्पा पार केला आहे. हे असतात शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले गणपती बाळा यादव.
वयाच्या 98व्या वर्षीही गणपा दादा रोज किमान पाच किलोमीटर सायकल चालवतात. जेव्हा केव्हा त्यांचा शोध घेत जाता तेव्हा त्यांची आणि तुमची भेट ते सायकलवर बसलेले किंवा सायकल हातात घेऊन चालतानाच होईल. त्याना सायकलवर बसताना पहाणं हा एक भन्नाट अनुभव असतो.
एका हातात धोतराचं टोक धरायचं, दुसऱ्या हातात सायकलचं हँडल धरायचं. हँडल धरून पाच-सहा पावलं चालत जायचं. एकदम डावा पाय डाव्या पँडलवर देत टुणकन उडी मारून सायकलवर बसायचं. ही त्यांची सायकलवर बसण्याची त्यांची पद्धत.
सायकलवर बसलं की, ते मागं वळून पहात नाहीत. खड्डे पडलेल्या रस्त्यात हळूहळू तर डांबरी रस्ता लागला की त्याची सायकल सुसाट धावते.
त्यांची भेट झाली रामपूर गावाच्या शिवारात. दुपारी साडेबाराच्या रणरणत्या उन्हात ते ऊसाला पाणी द्यायला गेले होते. डोक्यावर फेटा, तीन बटनांचा शर्ट, धोतर असा पोशाख असलेले दादा.
त्यांच्याशी बोलणं सुरू केल्यावर हा माणूस काय अफाट आयुष्य जगलाय ते लक्षात येतं. पोटासाठी या माणसाने नाना उद्योग केले आहेत. शेतमजुरीपासून ते अगदी गुळवी व्यवसायापर्यंत (गूळ तयार करणं) अनेक गोष्टी केल्या.
त्याच्या मनात सायकलचं वेड कधी तयार झालं? याची गोष्ट ते फार मिश्कीलपणे सांगतात.
"माझ्या लहानपणी आमच्या गावात एकानं सायकल आणली. तो सायकलवाला जेव्हा रस्त्यानं जायचा तेव्हा त्याला बघताना खूप गंमत वाटायची. ती सायकल बघायला लोकांचीही गर्दी व्हायची. लोखंड कसं पळतंय, असं लोक म्हणायची. तो माणूस त्याच्या रानात सायकलनं जायचा, तेव्हा त्याला बघायला गडी-बायका घराच्या बाहेर यायच्या. असा तो काळ होता."
"त्याची सायकल बघूनच माझ्या मनात सायकल चालवायची इच्छा झाली. मी सोळा वर्षांचा झालो तेव्हा एक जुनी सायकल घेतली. सायकल विकत घ्यावी अशी माझी तेव्हा ऐपत नव्हती तरीही चाळीस रुपयांना सायकल घेतली."
गणपा दादांची महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत ते हिरिरीने स्वातंत्र्य चळवळीत लढले.
या लढ्यात सायकलचा त्यांना कसा उपयोग झाला याविषयी यादव किस्से रंगवून सांगतात.
"तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. आमच्या भागातील क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. लाड, तुकादादा गायकवाड या लोकांनी इंग्रजी राजवटीच्या विरोधात बंड पुकारलं होतं. म्हणून त्यांना पकडण्यासाठी पोलीस फिरत होते. ती भूमिगत माणसं माझ्या गावच्या शिवारात असायची. त्यांना जेवण पोहोचवण्याचं काम मी करत होतो."
"माझ्या गावातील महादेव गायकवाड आणि त्याची आई भीमाबाई गायकवाड या दोघा मायलेकरांचा स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा होता. तेच माझ्याकडे जेवण द्यायचे आणि मी पोहोचतं करायचो. या काळात मला सायकलचा खूप उपयोग झाला. भूमिगत लोक जर खूप दूर अंतरावर असतील तर त्याना जेवण द्यायला सायकलवरून लवकर जाता येत होतं."
"नाना पाटील अनेकवेळा माझाकडे महत्त्वाचे निरोप द्यायचे. पोलिसांची नजर चुकवून मी ते निरोप योग्य ठिकाणी पोहोचते करत होतो. मी सायकल घेऊन मुख्य रस्त्याने कधीही प्रवास करत नव्हतो. मी सायकलसाठी आडमार्गाने जायचो. मी त्यांचा निरोप्या बनलो होतो. माझ्या सायकलचा स्वातंत्र्य चळवळीसाठी असा उपयोग झाला!"
"आजवर मी तीन सायकल वापरल्या आहेत. आताकडे माझ्याकडे जी सायकल आहे ती 25 वर्षांपूर्वी घेतली. तेव्हा तिची किंमत दोनशे रुपये होती. पहिली चाळीस रुपयांची होती."
सायकल आणि गणपती बाळा यादव यांचं एक नातं तयार झालं आहे. सायकल आहे म्हणून तर मी एवढी वर्षं जगलो असं त्याचं मत आहे. ते म्हणतात, "मला सायकलची सवयच झाली आहे. सायकल आहे म्हणूनच मी एवढी वर्षं जगलोय. सायकल नसती तर माझं काही खरं नव्हतं. मला सायकलशिवाय जमत नाही. चालायला लागलो तर धाप लागते पण सायकल कितीही चालवली तरी अजिबात थकवा जाणवत नाही. कसंही ऊन असू दे, मला सायकल चालवायचा कंटाळा येत नाही," असं ते सांगतात.
गणपती यादव सायकलवरून त्याच्या गावापासून 130 किलोमीटरवर असलेल्या पंढरपूरला किमान पन्नास वेळा गेले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या गावाला दादा अनेक वेळा गेले आहेतच, पण कर्नाटकमधल्या अथणी तालुक्यातील मंगसुळी येथे दरवर्षी खंडोबाच्या यात्रेला ते सायकलनं जात होते.
आता आसपासच्या दहा-वीस खेड्यात पै-पाहुण्यांकडे कसलाही कार्यक्रम असूदे दादा सायकलचाच वापर करतात. एखादा दिवस सायकल नसेल तर लोक त्यांना विचारतात "दादा, आज सायकल कुठाय?" सायकलशिवाय असणारे गणपा दादा पाहण्याची लोकांना सवय नाही.
त्यांच्या पत्नी वत्सला यादव सांगतात, "आमच्याकडं सायकल होती तेव्हा गावात एकदम कमी सायकल होत्या. जनावरांना शेतातून चारा आणायला, पोरांना घेऊन शाळेत जायला आमच्याकडं सायकल होती. सायकलमुळं आमची काम व्हायची. बाहेरच्या गावातून काहीही आणायचं म्हटलं तरी हे सायकल घेऊन जायचे. माझ्या नवऱ्याकडे सायकल होती हे तेव्हा मी सगळ्या पाहुण्यांना कौतुकानं सांगत होते."
गणपती बाळा यादव यांचं तर असं म्हणणं आहे की, "प्रत्येक माणसानं रोज किमान पाच किलोमीटर तरी सायकल चालवली पाहिजे. आजची पिढी सायकलपासून दूर आहे. पण त्यांनी सायकल चालवली पाहिजे, मी सायकल चालवल्यामुळेच तंदुरुस्त आहे. अजून दहा वर्षे तरी सायकल चालवू शकतो, असं मला वाटतं. केवळ सायकलमुळेच माझं आयुष्य वाढलं.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या गणपती यादव यांना स्वातंत्र्यसैनिकांची पेन्शन मिळत नाही. पण याबद्दल त्यांची तक्रार नाही. ते म्हणतात, "आम्ही काही पेन्शन मिळावं म्हणून हे काम केलेले नाही. इंग्रज गेला पाहिजे म्हणून आम्ही नाना पाटील यांना साथ दिली. इंग्रज गेला आमचं काम झालं."
वयाच्या शंभरीकडे वाटचाल करणारे दादा रोज पहाटे पाच वाजता उठतात. स्वतः चहा करतात. नंतर ते शेतात जातात. गाव जेव्हा झोपेत असतं तेव्हा दादा शिवारात असतात. आंब्याच्या झाडाखाली सायकल असली की समजायचं दादा ऊसाला पाणी देत आहेत.
त्यांना शेतीच्या कामाचा थकवा येत नाही. "उगवल्यावर घरात थांबायचं नसतं, रानात जायचं. रानात गेलं की रान तुमच्याशी बोलतं तुम्हाला काम सांगतं."
हे दादांचं तत्वज्ञान आहे आणि ते कुठल्याही पुस्तकात न वाचलेलं तत्वज्ञान दादा जगत आहेत.
हेही वाचलंत का?
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)