आजी-आजोबा : असून अडचण, नसून खोळंबा?

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

"माझ्या मुलीने आमच्याशी संबंध तोडलेत."

"तिला कितीही वेळा फोन केला तरी ती सरळ बोलत नाही. नातवाला भेटू देत नाही," रेवती (नावं बदललं आहे) आवंढा गिळत सांगतात. त्यांचं वय साठच्या आसपास, त्यांच्या पतींनी सत्तरी ओलांडली असेल.

"भांडण म्हणाल तर काही नव्हतं. आपली मुलगी आपल्याला समजून घेईल, असं वाटलं आणि मनाचा हिय्या करून तिला सांगितलं, की तुझा साडेतीन वर्षांचा मुलगा आता आमच्याकडून नाही सांभाळला जाणार. आम्ही आपलं आमच्या गावी परत जातो. त्यानंतर जो गदारोळ उठला तो अजून थांबायचं नावं घेत नाही."

औरंगाबादमध्ये राहाणाऱ्या रेवती आजींची मुलगी पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत उच्चपदावर काम करते. ऑफिसमध्ये तिला प्रमोशन मिळालं आणि मग तिची जबाबदारीही वाढली.

"तिच्या सासू-सासऱ्यांनी आधीच सांगितलं की आमचा काही संबंध नाही. मग तिने आम्हाला बोलवून घेतलं काही महिन्यांकरिता. त्याची दोन वर्षं होऊन गेली तरी आम्हाला आमच्या घरी परत जाता येईना. गैरसमज नको, माझं माझ्या नातवावर खूप प्रेम आहे, पण त्याच्या मागे दिवसभर नाही नाचता येत मला."

रेवती आजींचे गुडघे आता त्यांना साथ देत नाही. एका डोळ्याने थोड्या अधू आहेत त्या. आणि रक्तदाबाचा त्रास पन्नाशीत लागला ते वेगळंच. त्यांच्या नवऱ्याला हृदयविकार आहे, त्यामुळे साडेतीन वर्षांचा प्रचंड अॅक्टिव्ह असणारा नातू त्यांच्याकडून सांभाळला जात नाही.

"सगळं आयुष्य कुणाचं न कुणाचं करण्यात गेलं. मुलं वाढवली, संसाराची गणित जमवली. आता कोणत्याही जबाबदाऱ्या नको वाटतात. मुलीला हे न सांगताच कळेल असं वाटलं होतं. नंतर आडून आडून सांगून पाहिलं, पण ती ऐकून न ऐकल्यासारखं करायची. मग स्पष्ट सांगितलं. तिचा खूप संताप झाला. मोठ भांडण उकरून काढलं तिने. आणि कायमचे संबंध तोडले."

गेल्याच आठवड्यात पुण्याच्या फॅमिली कोर्टाने 'नातवंडांचा सांभाळ ही आजी आजोबांची जबाबदारी नाही' असा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

अर्थात ही केस वेगळ्या संदर्भात होती. नवरा सोबत नसताना, मुलीला सांभाळण्यासाठी सासू सासरे मदत करत नाहीत. त्यामुळे पाळणाघरावर खर्च होतो, जो मला परवडत नाही, असं या महिलेचं म्हणणं होतं.

पण या निकालानंतर उलट-सुलट चर्चांना उधाण आलं. आम्ही अनेक जेष्ठ नागरिकांशी बोललो. अनेक जणांनी खासगीत मान्य केलं की नातवंडांचा सांभाळ करणं त्यांना आवडत नव्हतं किंवा जमत नव्हतं. अनेकांनी हेही मान्य केलं की याविषयावरून त्यांच्या घरात वाद होतात, अगदी टोकाचेही.

पण हा विषय कौंटुबिक असल्याने कुणीही उघडपणे यावर बोलण्यास तयार नव्हतं. नावानिशी तर नाहीच नाही. "घरात आधीच काही कमी वाद नाहीयेत. तुम्ही माझं नाव छापलंत तर घरच तुटेल आमचं," असंही एका आजोबांनी बोलून दाखवलं.

नात्यांचं सँडविच

दुसरीकडे, आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घेतली नाही तर सहा महिन्यांच्या शिक्षा करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

म्हणजे त्यांची काळजी तर घ्यायची पण त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवायची नाही का? अशा परिस्थितीत या आजी आजोबांचं करायचं काय? असे अनेक प्रश्न उद्भवतात.

तिशीतल्या गृहिणी असणाऱ्या स्मृती शेट्ये यावर परखड मत व्यक्त करतात.

"आताची ज्येष्ठांची पिढी विचित्र आहे. त्यांनी शिक्षक किंवा सरकारी अशांसारख्या नोकऱ्या करून स्वतःची मुलं आईबाप, सासू-सासऱ्यांकडून सांभाळून घेतली. नोकरीची तुलना मी फक्त कामाच्या ताणाच्या अनुषंगाने करते आहे."

"आणि आता सुनेला,मुलीला, मुलाला हायटेक जॉब्स, प्रचंड जागतिक चढाओढ असून त्यांची मुलं सांभाळायला ज्येष्ठ नाही म्हणतात किंवा बाळंतपणात परदेशात जाण्याच्या नावाने सहानुभूती मिळवतात. म्हणजे बघा ना, सध्याच्या ज्येष्ठांच्या आईवडिलांनी चार-चार, पाच-पाच मुलींची बाळंतपणं परंपरा म्हणून वाट्टेल त्या परिस्थितीत केली. पण यांना एका मुलीचं किंवा सुनेचं होत नाही."

आधुनिक म्हणून आपल्या आधीच्या पिढीचं करण्यातून सुटले आणि पुढच्या पिढीचंही. हे ज्येष्ठ स्वतःच्या आईवडिलांचं साधं साधं मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा करायला टाळाटाळ करायचे आणि त्यांना आता आपल्या मुलांनी उठता बसता आपल्याला विचारावं, असं वाटतंय."

पण नाण्याची दुसरी बाजूही आहे

आज आजी-आजोबा बनलेल्या पिढीचं सॅण्डविच झालेलं आहे. आधीची पिढी जुन्या विचारांची तर आताची पिढी एकदम नव्या विचारांची. अर्ध आयुष्य एका प्रकारे जगण्यात गेलं, तर उरलेलं दुसऱ्या प्रकारे. मग आम्ही स्वतःसाठी जगायचं कधी, हा प्रश्न आजी आजोबा विचारताना दिसतात.

आधी मुलाबरोबर पण आता स्वतंत्र राहाणारे पुण्यातले एक आजोबा पोटतिडकीने या विषयावर बोलतात.

"माझं आणि हिचंही सगळं आयुष्य ओढाताणीत गेलं. मुलांना वाढवा, जबाबदाऱ्या पार पाडा. आम्हाला इतक्या वर्षांत फक्त दोघांना कुठे जाताही आलं नाही. मुलांची लग्न झाल्यावर, ते स्थिरस्थावर झाल्यावर वाटलं की, आता आपण आरामात राहू, तर नातवंडांची जबाबदारी आली. आता त्यांचं करण्यात उरलेलं आयुष्य जाणार."

'मुलं आणखी कोण सांभाळणार?'

काहींना मात्र नातवंडांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य वाटतं. अर्थात ते हेही मान्य करतात की, वयामानाप्रमाणे ही हे कर्तव्य निभावणं कठीण जाऊ शकतं.

"माझी नातवंडांना सांभाळणं माझ्या आनंदाचा भाग आहे, पण त्याहीपेक्षा जास्त ती मी माझी नैतिक जबाबदारी समजते. माझ्या सुनेला मी नाही मदत करणार तर कोण करणार? फक्त नातवंडांना सांभाळण्यासाठी मी माझी सगळी कामं सोडली," असं औरंगाबादच्या शुभदा धारूरकर म्हणतात.

"मी आधी इतिहास हा विषय शिकवायचे, माझा अभिवाचनाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर करायचे. आमचा एक सोशल ग्रुपही होता. पण हे सगळं मी माझ्या नातवंडांना सांभाळण्यासाठी थांबवलं. पण मला हेही मान्य आहे की हे सगळेच करू शकत नाहीत. मीही आज करू शकतेय कारण मी साठी अजून गाठलेली नाही. कदाचित दहा वर्षांनी चित्र वेगळं असेल."

अर्थात बऱ्याचदा मुलं सांभळण्यावरून आजी आणि आईमध्ये तणाव वाढू शकतो, कारण आजही बऱ्याच कुटुंबांमध्ये मुलं सांभाळण्याची प्राथमिक जबाबदारी बायकांवरच येते, म्हणजे एकतर आजीने हे काम करावं किंवा आईने. त्यामुळे घराघरात विसंवाद वाढत आहेत.

"मुलं सांभाळण्याची जबाबदारी आजोबांनी आणि बाबांनी घेणंही तितकंच गरजेचं आहे," असं त्या म्हणतात.

कवियत्री आणि ब्लॉगर असणाऱ्या मोहिनी घारपुरेंचंही काहीसं असंच मत आहे. त्या म्हणतात, "मुलं सांभाळणं ही एकट्या स्त्रीची जबाबदारी असं मानायचे दिवस केव्हाच मागे सरले आहेत. घरातील सर्व ज्येष्ठांनी मुलांची जबाबदारी स्वखुशीने, आनंदाने पेलली पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे मुलाची आई घरात नाही म्हणून त्याला जेवायलाच दिलं नाही, मुलाचे वडील घरी नाहीत तर त्याला कोणी फिरायला, सायकल चालवायला वगैरे जाऊच दिलं नाही, अशी चालढकल करूच नये, असं मला वाटतं."

"घरात जो मोठा सदस्य ज्या वेळी उपस्थित असेल त्याने घरातल्या लहान मुलामुलींची त्या त्या वेळची गरज ओळखून ती पूर्ण करून मोकळं व्हायला पाहिजे," असं त्या सांगतात. "दुसरं म्हणजे घरात माणसं नसतील तर पर्यायी व्यवस्थाही निर्माण व्हायला हव्यात. पाळणाघरांकडे ज्या नकारात्मक दृष्टिकोनातून आजही पाहिलं जातं तो दृष्टिकोन बदलायला हवा."

स्पेस जपा, पण नातीही

आम्ही जेवढ्या आजी-आजोबांशी बोललो त्यातल्या बहुतांश जणांची तक्रार होती की त्यांना त्यांच्या मनासारखं जगायला स्पेस मिळत नाही. पण जेव्हा आम्ही नव्या पिढीतल्या आई-बाबांशी बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की, आमच्याही अडचणी समजून घ्या.

आधी कस्टमर केअर एक्झिकेटिव्ह असणाऱ्या आणि आता बाळाच्या जन्मानंतर पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या मैथिली अतुल म्हणतात, "मुलाचे आजी आजोबा बाळ सांभाळायला तयार नसतात, कारण आता निवृत्तीनंतर त्यांना त्यांची स्पेस हवी असते. एखाद्याला त्याची स्पेस हवी असणं यात चूक काहीच नाही. पण आपल्याला गरज होती, तेव्हा आपणही आपली मुलं सासू-सासऱ्यांकडे सांभाळायला दिली होती, हा विचार त्यांच्या मनात येत नाही का?"

"बरं, आणि आपल्या संसारात गुंतून पडल्यामुळे मुलं त्यांच्याशी बोलली नाहीत, त्यांना भेटली नाहीत तर लगेच नाराज होतात. म्हणतात, मुलांना माया नाही. अरे! टाळी एक हाताने वाजत नाही!"

"त्यांच्यावर जबरदस्ती नसते किंवा त्यांना कुणी गृहितही धरत नाही. पण निदान कशाची गरज जास्त आहे हे समजण्याइतके आजचे आजी आजोबा नक्कीच सूज्ञ आहेत. जर तुम्ही मुलांकडून सगळ्या अपेक्षा करता, आणि मुलं त्या अपेक्षा स्वतःचा संसार सांभाळून जमेल तसं पूर्णही करतात, तर किमान अडीअडचणीच्या वेळी तुम्ही नातवंडांना सांभाळलं तर मुलांना नात्यात सलोखा निर्माण होईल. नाहीतर काय आहेच रोजचं उठून रडगाणं!" असं सांगतात मैथिली अतुल.

एकत्र बसा, बोला आणि ठरवा

कोल्हापूरमध्ये काम करणाऱ्या रिलेशनशिप काउन्सिलर कल्याणी कुलकर्णींना वाटतं की सध्याच्या कुटुंबाना जे प्रश्न भेडसावतात त्यांचं उत्तर मिळवणं सोप आहे, फक्त कुटुंबातल्या सदस्यांनी आपले इगो बाजूला ठेवले पाहिजेत.

"मुळात हे आधी मान्य करा की, मुलं सांभाळण फक्त बाईचं काम नाही. त्याची जबाबदारी प्रत्येकाने उचललीच पाहिजे. आणि जर सांभाळायला घरात जेष्ठ नसतील, किंवा त्यांना जमत नसेल तर आईच्या बरोबरीने वडिलांचा वाटा असला पाहिजे."

"घरातले सगळे सदस्य आळीपाळीने मुलांची जबाबदारी घ्यायला लागले, की आजी-आजोबांवरचा ताण आपोआप कमी होईल. मग जेव्हा गरज पडेल तेव्हा आजी आजोबा आहेतच मदत करायला," असं मार्गदर्शन त्या करतात.

"कोणी किती जबाबदाऱ्या घ्यायच्या, कशा घ्यायच्या याचं एकत्र बसून प्लॅनिंग करा. उदाहरणार्थ, आजी आजोबांना फिरायला जायचं आहे, मग लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याचं आधीच प्लॅनिंग करा. मुख्य म्हणजे जुन्याचा आग्रह सोडून द्या. बदलती मूल्यं, बदलती लाईफस्टाईल स्वीकारा," त्या सुचवतात.

आपली कुटुंब सध्या एका मोठ्या बदलाच्या काळातून जात आहेत. एका बाजूला आपण आपली जुनी परंपरागत एकत्र कुटुंबपद्धती सोडून पुढे आलो आहोत, पण अजूनही पाश्चात्त्य देशांसारखी उत्तम चाईल्ड सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे नाही. सगळं त्रांगड आहे ते इथे.

आशेचा किरण हा आहे की काही कुटुंबांनी नव्या वाटा शोधल्या आहेत. जबाबदारी वाटून घेणं, work-from-home सारखे पर्याय शोधणं, आणि सक्षम पाळणाघरांचा आग्रह धरणं, ही त्याची काही उदाहरणं. येत्या काळात आणखीही कुटुंब हा कित्ता गिरवतील ही आशा.

हेही वाचलंत का?