You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा व्हीडिओ : 99 वर्षांच्या आजोबांनी मोडला स्विमिंगचा जागतिक विक्रम!
- Author, फ्रान्सीस माओ
- Role, बीबीसी न्यूज
ऑस्ट्रेलियाच्या 99 वर्षं वयाच्या स्विमरने 50 मीटर फ्रिस्टाइलमध्ये या वयोगटात जागतिक विक्रम नोंदवला आहे. भारी ना!
जॉर्ज कोरोन्स यांनी क्वीन्सलँडमध्ये आयोजित एका स्पर्धेत हे अंतर 56.12 सेंकदांमध्ये कापलं. 100-104 वयोगटात हा एक नवा विक्रम आहे.
2014 मध्ये नोंदवण्यात आलेला जागतिक विक्रम मोडायला त्यांना 35 सेकंद कमी लागले. आता या विक्रमाची क्रीडा प्रशासकीय संस्थेतर्फे पडताळणी केली जाईल.
एप्रिल महिन्यात कोरोन्स वयाची शंभरी पूर्ण करणार असल्याने ते या विक्रमसाठी पात्र ठरवण्यात आले. या निकालामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही, असं त्यांनी सांगितलं.
"माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता आणि ती शर्यत संपवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला," असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
गोल्ड कोस्टवर बुधवारी त्यांच्यासाठी होणाऱ्या घोषणांमुळे भारावून गेल्याचं ते म्हणाले. या स्पर्धेत ते फक्त एकमेव स्पर्धक जरी असले तरी जागतिक विक्रमाला आव्हान देण्यासाठी या स्पर्धेचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं.
आपण नुकताच इतिहास घडताना पाहिला आहे, असं ऑस्ट्रेलियन डॉल्फिन्स स्विम टीमने त्यांच्या फेसबुक पेजवर म्हटलं आहे.
'थोडासा वेळ लागला जरूर'
ब्रिस्बेन येथील रहिवासी कोरोन्स म्हणाले, ते तारुण्यात एक उत्साही जलतरणपटू होते. पण नंतर वयाच्या 80व्या वर्षानंतर त्यांनी पुन्हा पोहणं सुरू केली.
"दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी मी पोहणं सोडलं आणि सेवानिवृत्त होईपर्यंत एकदाही पोहलो नाही," ते म्हणाले. "नंतर व्यायाम म्हणून मी पुन्हा पोहायला सुरुवात केली." 80व्या वर्षी आजोबांनी नियमित सराव सुरू केला.
ते म्हणाले की, या स्पर्धेने नक्कीच त्यांच्या शरीराला आव्हान दिलं असलं तरी सरावामुळे ही कामगिरी शक्य झाली. ते आठवड्याला सरासरी तीन वेळा पोहायला जातात आणि जमेल तसं जिममध्ये व्यायामही करतात.
"वयाच्या या टप्प्यावर सरावाला थोडा वेळ लागतो. तुम्ही फार लवकर थकता. पण जर तुम्ही ते योग्य रीतीनं केलं तर निकाल चांगले येतात," असं ते म्हणाले.
त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय हे योग्य तंत्राला आणि सरावाला दिलं.
"माझे पहिले 10-12 स्ट्रोक्स हे संतुलित होते आणि त्यात सातत्य ठेवण्यासाठी मला प्रयत्न करायचे होते. प्रत्येक स्ट्रोकला मी जोर वाढवत गेलो," ते म्हणाले.
"मी अंतिम दहा मीटरपर्यंत गेलो. मी थकलो होतो आणि मध्येच थांबणार होतो, पण मी हार मानली नाही. विचलित न होता ही स्पर्धा पूर्ण केली."
याआधीचा जागतिक विक्रम हा 1:31.19 असा होता. ब्रिटीश स्विमर जॉन हॅरीसन यांनी 2014मध्ये हा विक्रम नोंदवला होता.
पुढील महिन्यात गोल्ड कोस्टवर कॉमनवेल्थ गेम्सकरिता ऑस्ट्रेलियन स्विमिंग ट्रायल सुरू होत आहेत. त्याआधी कोरोन्स यांची स्पर्धा घेण्यात आली.
इंटरनॅशनल स्विमिंग फेडरेशनकडे हा विक्रम पडताळणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलिया मास्टर्स स्विमिंगने म्हटलं आहे.
शनिवारी रात्री कोरोन्स हे 100 मीटर फ्रिस्टाइलमधील जागतिक विक्रमाला आव्हान देणार आहेत. 03:23.10 हा सध्याचा विक्रम हॅरीसन यांच्याच नावावर आहे. तोही आपण मोडीत काढू, असा विश्वास कोरोन्स यांना वाटतो.
"मी तरुण नसलो तरी मी चांगली कामगिरी करू शकेन असा मला विश्वास आहे," असं ते म्हणाले.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)