You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समंथा-नाग चैतन्य : घटस्फोटासाठी कायम महिलेला जास्त दोष दिला जातो का?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"घटस्फोट हीच मुळात अतिशय वेदनादायी प्रक्रिया आहे. मला त्यातून सावरण्यासाठी वेळ देणं बाजूला राहिलं. माझ्यावर सातत्यानं व्यक्तीगत हल्ला होतो आहे. पण मी वचन देते, त्यांनी काहीही म्हटलं, तरी त्यामुळे मी स्वतःला मोडू देणार नाही."
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं या शब्दांत तिच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.
समंथा आणि अभिनेता नाग चैतन्य यांनी 2 ऑक्टोबर रोजी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर हा विषय चघळला जातो आहे आणि अनेकजण या घटस्फोटासाठी समंथा जबाबदार असल्याची टीका करत आहेत.
त्यामुळे समाजाकडून महिलांना घटस्फोटानंतर मिळणाऱ्या वागणुकीचा मुद्दाही पुन्हा अधोरेखित झाला आहे.
कोण आहे समंथा रूथ?
समंथा ही दक्षिण भारतातल्या सिनेमा इंडस्ट्रीतील स्टार अभिनेत्री आहे. तिचं बरचसं काम तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्ये केलं आहे. पण बॉलिवूडमध्ये फारसे सिनेमे न करताही तिचे भारतभर चाहते आहेत.
समंथानं 'द फॅमिली मॅन' या वेब सीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्येही भूमिका केली आहे.
2017 साली समंथानं दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी विवाह केला होता. त्याआधी दोघंजण जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. चैतन्य हा दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन आणि लक्ष्मी दागुबट्टी यांचा मुलगा.
चै-सॅम नावानं ओळखलं जाणाऱ्या या स्टार कपलनं काही फिल्म्समध्येही एकत्र काम केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यावरून अफवांचंही पेव फुटलं.
शेवटी दोघांनी आपण वेगळं होत असल्याचा निर्णय 2 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर केला. काळजीपूर्वक विचारविनिमय करून चैतन्य आणि ती वेगळे होत असल्याचं तसंच मैत्रीची बांधिलकी कायम ठेवू असं समंथानं त्यावेळी सोशल मीडियावर लिहिलं होतं.
चैतन्यनेही त्यावेळी या कठीण काळ्यात चाहत्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं आणि आमच्या खासगी आयुष्याचा आदर ठेवावा असं आवाहन केली होतं.
पण फॅन्स आणि ऑनलाईन कम्युनिटीत अनेकांचं वागणं त्या उलट होतं.
घटस्फोटासाठी फक्त समंथा जबाबदार?
'चै-सॅम' वेगळे होण्यामागचं कारण जाणून घेणं, हा आपला हक्कच आहे, अशा चर्चा रंगू लागल्या. गॉसिपला उधाण आलं.
प्रश्नांची थेट उत्तरं मिळाली नाहीत, तेव्हा अफवांसोबतच समंथाच यासाठी जबाबदार असल्याचं कुणी गृहीत धरू लागलं.
कोणी म्हटलं, 'समंथानं 50 कोटी रुपयांची पोटगी मागितली, पैशासाठीच तिनं लग्न केलं होतं'. तर दुसरीकडे समंथानं 200 कोटींची पोटगी नाकारली, अशीही चर्चा रंगली.
समंथाचं दुसऱ्या कुणाशी अफेयर होतं असा आरोप काहींनी केला. तिच्या कथित एक्स बॉयफ्रेंडलाही तिनं फसवलं होतं, अशी मल्लीनाथी केली.
इंटरनेटवर काही जणांनी मग अशी चर्चा सुरू केली, की 'समंथाला मूल नको होतं, तिनं अबॉर्शन्स केली होती आणि ती केवळ संधिसाधू आहे.'
शेवटी 8 ऑक्टोबरला समंथानं ट्विटरवरील पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. तिनं या सगळ्यामध्ये तिच्या बाजूनं उभं राहिलेल्यांचे आणि तिच्याविषयी काळजी व्यक्त करणाऱ्यांचे आभारही मानले.
पण या सगळ्यातून आणखी एक गोष्ट समोर आली. विरोधाभास.
एकीकडे लग्न मोडण्यासाठी समंथा कशी कारणीभूत आहे, यासाठी दोषांचा पाढा वाचला जाऊ लागला, तेव्हा तुलनेनं चैतन्यवर तेवढी टीका झाली नाही.
सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची 'चवदार चर्चा'
लग्न मोडल्यावर अशी एकांगी टीका झालेली समंथा एकटीच नाही.
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला, तेव्हा अनेक चाहत्यांनी सुझानलाच त्यासाठी जबाबदार धरलं. अभिनेता अर्जुन रामपालसोबत सुझानचं अफेयर होतं, म्हणूनच ती हृतिकला सोडून गेली, असा त्यांचा दावा होता.
सैफ अली खान आणि अमृता सिंग हे बॉलिवूडमधलं आणखी एक कपल 2004 साली विभक्त झालं, तेव्हाही दोष फक्त अमृताचाच असल्याचं चित्र सैफनंच दिलेल्या एका मुलाखतीतून उभं राहिलं. टेलिग्राफशी बोलताना सैफनं आपल्याला अमृताला द्याव्या लागत असलेल्या पोटगीचा उल्लेख केला होता.
मलायका अरोरा आणि अरबाझ खान यांनी घटस्फोट घेतला, तेव्हा मलायकानं अरबाझ आणि त्याच्या कुटुंबाचा केवळ वापर केल्याचा आरोप चाहत्यांनी केला होता.
घटस्फोटात दोष नेहमी बाईचाच?
सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर आणून त्यांची चर्चा होतच असते. प्रसिद्धीची ती एक काळी बाजू आहे. पण त्यातही पुरुषांपेक्षा बायकांना मिळणारी वागणूक वेगळी असते का, असा प्रश्न उभा राहतो.
लग्न मोडणं या गोष्टीचा समाजाला तिटकारा वाटतो. विशेषतः भारतासारख्या देशात लग्नसंस्था अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच एखाद्याचं लग्न मोडलं, की त्याची चर्चा एरवीही होते.
मॅरेज काऊंसिलर डॉ. डी.एस. कोरे सांगतात की याचं मूळ आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत आहे. "पुरुषी मानसिकतेतून अपेक्षा केली जाते की लग्नात स्त्रीनं टिकून राहावं, तिनंच प्रामाणिक राहावं, त्याला सोडायला नको, स्वतःचा स्वतंत्र विचार करू नये.
"घरचेही मुलींनाच सांगतात की तिने सहसा सोडू नये आणि सोडलंच तर आता 'बघ बाई, आता तुझं तू बघ' असं सांगितलं जातं. त्यामुळे ती महिला दोन पातळ्यांवर एकटी या संघर्षाला सामोरी जाते. समाजानं विचार करायला हवा आणि स्वत:ला तिच्या जागी ठेवून पाहायला हवं."
अगदी सामंजस्यानं दोघांनी वेगळं व्हायचं ठरवलं असेल, तरी त्यामागची कारणं खोदून खोदून विचारली जातात. घरातही आणि अनेकदा घराबाहेरही.
लग्न मोडलं की, त्यात नेमकी चूक कोणाची हे शोधण्याचा अट्टाहास समाजाकडून का केला जातो?
डॉ. कोरे सांगतात, "ही 'फॉल्ट फाईंडींग थिएरी' हा आपल्या कायदेशीर व्यवस्थेचाच भाग आहे. म्हणजे कुणाचं चुकलं हे शोधलं जातं आणि त्याआधारे न्याय दिला जातो. त्यामुळे कायद्यातही बदल प्रस्तावित आहेत."
कोणतंही नातं का टिकलं नाही, याची खरी कारणं त्या नात्यात असलेल्या दोन व्यक्तींनाच ठावूक असतात. आजच्या काळात, जगात सतत एवढे बदल होत असताना कोणतं नातं किती टिकेल हेही सांगता येत नाही. अगदी दोन्ही बाजू प्रामाणिक असल्या, तरीही एखादं नातं संपू शकतं हे समाजाला आजही मान्य नाही, हे वास्तव आहे.
स्वत: समंथानं इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. लेखिका फरिदा यांचं एक विधान समंथानं शेअर केलं होतं. त्याचा भावार्थ असा, "एखादी गोष्ट महिलांनी केल्यावर ते नैतिकदृष्ट्या बरोबर आहे का, असे प्रश्न विचारले जात असतील, पण तेच पुरुषांनी केल्यावर असे प्रश्न विचारले जात नसतील, तर समाज म्हणून आपल्यातच नैतिकता उरलेली नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)