You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहारच्या 'या' समाजातील कित्येक मुली आहेत अविवाहित...
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, सुपौल आणि कटिहार
बिहारच्या सुपौल गावात राहणारी शमा लग्नाची गाणी ऐकली की उदास होते.
27 वर्षांची शमा हिला निराश झाल्यासारखं वाटतं कारण तिचं अजून लग्न झालेलं नाही. लग्न न करण्याचा निर्णय तिचा स्वतःचा नाहीये. नाईलाजाने ती अविवाहित राहिली आहे.
शमाची 26 वर्षांची बहिण सकिना खातूनही अविवाहित आहे.
हे प्रकरण शमा आणि सकिना पुरत मर्यादित नाहीये. सुपौल मधील कोचगामा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये अशा जवळपास 15 अविवाहित तरुणी आहेत.
या स्त्रिया शेरशाहबादी समाजाच्या आहेत. या समाजात स्त्रियांना कोणतरी मागणी (अगुआ) घालेल याची वाट बघावी लागते.
या मुलींना मागणी घालायला कोणीच आलेलं नाही. मागणी घालण्यासाठी जे लोक येतात त्यांना मध्यस्थी किंवा अगुआ म्हटलं जातं.
वॉर्ड सदस्य अब्दुल माली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आमच्याकडे साधारणपणे मुलींची लग्न 15 ते 20 वयाच्या आत केली जातात. जर त्यांनी वयाची पंचविशी ओलांडली तर त्यांना वयस्कर किंवा म्हातारी समजलं जातं. अशा परिस्थितीत त्यांचं लग्न लावून देणं कठीण होऊन बसतं."
ते म्हणतात, "आमच्या समाजात मुलीच्या लग्नासाठी मुलाच्या बाजूने मागणी घालण्याची वाट पाहिली जाते. मुलीचं स्थळ घेऊन जाता येत नाही. जर मुलीकडच्या लोकांनी असं केलं तर मुलीमध्ये काहीतरी दोष आहे असं समजलं जातं."
27 वर्षांच्या शमापासून ते 76 वर्षांच्या जमीला खातूनपर्यंत अविवाहित असणाऱ्या स्त्रियांना एकच दुःख सहन करावं लागतंय.
सुपौलमध्ये जन्मलेल्या जमिला खातून यांनाही आपल्या लग्नाची वरात येईल, आपलाही संसार असेल वाटलं होतं. पण त्यांचं स्वप्न शेवटपर्यंत अधुरच राहिलं. जमिला त्यांच्या 57 वर्षीय बहीण शमसूनसोबत राहतात.
दोघी बहिणी अविवाहित असून पाच शेळ्या पाळून आपलं आयुष्य कंठत आहेत.
एवढे दिवस लग्न न होण्याचं कारण विचारलं असता दोघीही सांगतात, "कोणाच्याही घरून आम्हाला मागणी घालेल असा निरोप आला नाही."
शमसून बीबीसीला सांगतात, "माझ्या मनात खूप वेदना साठून राहिल्या आहेत. आता कोणाला काय सांगायचं?"
पण दोन्ही बहिणींची लग्न का झाली नाहीत? यावर त्या सांगतात की, शेरशाहबादी मुस्लिम असल्यामुळे आमची लग्न झाली नाहीत.
शेरशाहबादी मुस्लिमांची ओळख
बिहारमध्ये राहणारे शेरशाहबादी अतिमागास प्रवर्गात मोडतात. हे लोक बिहारमधील सुपौल, पूर्णिया, कटिहार, किशनगंज, अररिया जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.
त्यांच्यात अशी परंपरा आहे की मुलींच्या लग्नासाठी मुलांच्या बाजूने पैगाम म्हणजेच निरोप किंवा अगुआ म्हणजे मध्यस्थ पाठवला जातो
ही परंपरा इतक्या कठोरपणे पाळली जाते की, जर एखाद्या मुलीसाठी लग्नाचा निरोप आलाच नाही तर ती आयुष्यभर अविवाहित राहते.
याच कारणामुळे बिहारमध्ये शेरशाहबादी लोक राहत असलेल्या ठिकाणी अविवाहित महिला किंवा मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळते.
शेरशाहबादी मुस्लिमबहुल कोचगामा पंचायतीचे प्रमुख पती नुरुल होडा सांगतात की, "काही वर्षांपूर्वी आम्ही अशाच अविवाहित महिलांची यादी तयार केली होती. त्यावेळी ही संख्या 250 होती, आता ती वाढली असावी."
शेरशाह सूरीशी संबंधित असल्याचा दावा
ठेठी बंगाली (उर्दू आणि बंगालीचं मिश्रण) बोलणारे शेरशाहबादी स्वतःला सम्राट शेरशाह सूरीशी संबंधित असल्याचं मानतात.
या लोकांचा दावा आहे की, हे लोक शेरशाहच्या सैन्यात सैनिक म्हणून सामील झाले होते. शेरशाह हा सुरी घराण्याचा संस्थापक होता आणि त्याने मुघल सम्राट हुमायूनचा पराभव करून आपली सत्ता स्थापन केली.
ऑल बिहार शेरशाहबादी असोसिएशनचे अध्यक्ष सैय्यदुर्रहमान रहमान बीबीसीशी बोलताना सांगतात की, "या लोकांना शेरशाहने आसरा दिला होता. मजबूत, कष्टाळू आणि नदीच्या काठावर राहणारे हे लोक बिहार व्यतिरिक्त बंगाल, झारखंड आणि नेपाळच्या सीमेवर वास्तव्यास आहेत."
"बिहारमध्ये त्यांची लोकसंख्या सुमारे 40 लाख असून सीमांचलच्या 20 विधानसभा जागांवर हे लोक निर्णायक मतदार आहेत. बिहारमधील हे लोक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेले आहेत."
मुलींमध्ये लग्न न होण्याची भीती
सुपौलच्या कोचगामा ग्रामपंचायतीपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर, कटिहारच्या कोढा ब्लॉकच्या खैरिया गावातही शेरशाहबादी लोक राहायला आहेत.
धीमनगर गावातील रेफुल खातून सांगतात, "मी सुद्धा जातीने शेरशाहबादी मुस्लिम आहे. माझ्या वडिलांनी माझ्या लग्नासाठी मध्यस्थ्याला दहा हजार रुपये दिले होते."
रेफुलचा नवरा बंगालमध्ये मजूर म्हणून काम करतो.
त्या सांगतात, "आमच्याकडे हेच नियम आहेत. मुलाच्या बाजूनेच मध्यस्थी येतो. नाहीतर लग्न होत नाही. मुली घरीच बसून राहतात. माझ्या गावाकडे तर कित्येक मुली अविवाहित आहेत."
"लग्न होणार की नाही, याची इतकी भीती आहे की, 14 वर्षांच्या मुलींनाही लग्न न होण्याची चिंता सतावू लागली आहे."
पैसा आणि शिक्षणापेक्षा मुलीचा रंग महत्त्वाचा
आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या या समाजातील बहुतांश महिला पाचवीपर्यंत शिकलेल्या आहेत.
महिलांना घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नाहीये. या समाजातील पुरुष मजूर किंवा शिंपीकाम करण्यासाठी सुरत, जयपूर, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरात जातात.
लग्नासाठी निरोप देण्याव्यतिरिक्त या समाजात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलीच्या शरीराचा रंग.
शहनाज बेगम तिच्या 12 भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे. तिच्या दोन लहान बहिणींच लग्न झाली, पण ती अजूनही अविवाहितच आहे.
शहनाज सांगते, "माझ्या बहिणी रंगाला गोऱ्या होत्या म्हणून त्यांचं लग्न झालं. मी रंगाने काळी आहे मग माझ्याशी कोण लग्न करणार?"
मी विचारलेल्या एका प्रश्नावर पाचवी पास असलेली मरजना खातून थोड्या चिडक्या स्वरात म्हणते, "आम्ही जग पाहतोय. इथे काळ्या लोकांची लग्नं होत नाहीत. लहानपणापासूनच आम्हाला माहिती होतं की, आम्ही गरीब आणि काळे असे दोन्ही आहोत. त्यामुळे आमची लग्न होणं अवघड आहे."
अबू हिलाल हे शेरशाहबादी समाजाच्या हक्कांसाठी काम करतात. ते पेशाने शिक्षक आहेत.
ते सांगतात, "1980 च्या दशकात बिहारच्या शेरशाहाबादींची कोचगामामध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत असं ठरलं होतं की, मुलांच्या घरी मुलींची स्थळ देखील पाठवली जातील. "
"आता मुलीचा रंग खूप महत्त्वाचा ठरतोय. मुलीच्या वडिलांनी गुपचूप हुंडा जरी देऊ केला तरी मुलीचा रंग गोरा नसेल तर लग्न होणं अवघड आहे."
कोचगामा ग्रामपंचायतीचे वॉर्ड सदस्य अब्दुल माली हे त्याचंच उदाहरण ठरलेत.
ते सांगतात, "माझी मुलगी शिकलेली आहे. तिच्या लग्नात पैसे खर्च करणं मला अवघड नाहीये. पण खूप प्रयत्न करून देखील मोठ्या मुलीचं लग्न झालेलं नाही. माझी धाकटी मुलगी गोरी असल्याने तिच्या लग्नात कोणतीही अडचण येणार नाही. "
याच परिसरात राहणारा फरहान सांगतो, "काळ्या मुलालाही गोरीच मुलगी हवी असते. तो सुद्धा त्याच्या भविष्याचा विचार करतो. मुलंबाळ गोरी होणं आवश्यक असतं."
जरठकुमारी लग्न
इथे जरठकुमारी लग्न होणं सामान्य गोष्ट आहे. या लग्नासाठी सुद्धा निरोप किंवा मध्यस्थाची वाट पाहिली जाते.
11 मुलांची आई असलेल्या अरफा खातून यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालेलं नाही. त्यांनी आपल्या धाकट्या मुलीचं लग्न 50 वर्षीय रेयाजुल्लाहसोबत लावून दिलं.
रुखसाना 18 वर्षांची आहे आणि तिचे पती रेयाजुल्लाह यांना पाच मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा 23 वर्षांचा आहे.
अरफा रडत-रडत सांगतात की, "काय करणार, जशी स्थळं येतात त्यातूनच एखादं स्थळ बघून मुलीचं लग्न लावून द्यावं लागतं."
अविवाहित स्त्रिया खर्चासाठी पैसे कुठून आणतात?
शेरशाहबादी समाजातील महिलांनी घराबाहेर पडून कामं करणं देखील अवघड आहे. त्यात प्रश्न पडतो की, या अविवाहित महिला आपल्या खर्चासाठी पैसे कुठून आणतात.
आर्थिकदृष्ट्या या स्त्रिया त्यांच्या आई-वडील किंवा भावांवर अवलंबून असतात.
आपल्या आईवडिलांच्या संपत्तीमध्ये मिळणारा वाटा आणि गावकऱ्यांनी अन्नधान्याच्या रूपात दिलेली सामूहिक मदत यातूनच त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागतो.
लग्न न झाल्याचा मानसिक आघात झेलणाऱ्या या स्त्रियांना आपल्याच कुटुंबीयांचे टोमणे ऐकावे लागतात.
लग्न न झाल्यामुळे हताश झालेल्या तस्करा ख़ातून सांगतात, "माझ्या भावाला सहा मुलं आहेत. माझा भाऊ आणि वहिनी सतत टोमणे मारतात, शिवीगाळ करतात. पण तरीही मी त्यांची मुलं आणि घर सांभाळते."
बदलाचं वारं
या समाजात समस्या आहेतच. पण आता मागील काही वर्षांपासून लहानसहान बदलही घडू लागलेत.
काही महिलांनी अंगणवाडी केंद्र आणि सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजन बनवण्याचं काम सुरू केलंय.
45 वर्षीय हमीदा खातून माध्यान्ह भोजन बनवण्याचं काम करतात. लग्ना विषयी हमीदा सांगतात, "मी 1500 रुपये कमवू लागले तशी मी भावापासून लांब वेगळी झोपडी बांधून राहू लागले. जर कोणी हुंडा न घेता लग्न करायला तयार असेल तर मी ही लग्न करीन."
आता इतर जातींमध्येही लग्न होऊ लागलेत. याशिवाय बिहार सोडून उत्तरप्रदेशपासून काश्मीरपर्यंत स्थळं येऊ लागली आहेत. अलिकडच्या वर्षांत एकट्या कोचगामामध्ये 100 पेक्षा जास्त लग्न पार पडली आहेत.
10 मुलांची आई असलेल्या नस्तारा खातून यांनी आपल्या 12 वी शिकलेल्या मुलीला काश्मीरचा नवरा शोधून दिला.
नस्तारा सांगतात, "मुलीचं शिक्षण झालं होतं पण रंग सावळा होता. इथे कोणतं स्थळच येत नव्हतं. शेवटी काश्मीरमधील एका 30 वर्षांच्या मुलाचं स्थळ आलं आणि लग्न पार पडलं."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)