लग्नाआधी ‘ही’ चाचणी केल्यास होणाऱ्या नवरा-बायकोचा स्वभाव कळू शकतो का?

    • Author, तेजल प्रजापती
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

भारतीय समाजात लग्न जुळवण्यापूर्वी वधू वरांची कुंडली जुळवून पहिल्याचं तुमच्या ऐकण्यात आलं असेल. पण हल्ली लग्न जुळवण्यापूर्वी मुलामुलींचे बोटांचे ठसे जुळवून पाहिले जातात हे तुम्ही ऐकलंय का?

हे ऐकून तुम्हाला थोडंस आश्चर्यच वाटेल पण गुजरात मध्ये असे अनेक प्रकार घडू लागलेत. राजकोटमधील लेवा युवा पाटीदार समाजाने मुलींची लग्नापूर्वी डीएमआयटी चाचणी करायला सुरुवात केली आहे.

पण ही चाचणी नेमकी काय आहे? यातून खरंच भविष्य कळतं का? डीएमआयटी चाचणीचे फायदे - तोटे काय आहेत?

डीएमआयटी चाचणी म्हणजे नेमकं काय?

तर बोटांच्या ठशांवर आधारित असलेल्या या डीएमआयटी चाचणीला डर्माटोग्लिफिक्स मल्टिपल इंटेलिजेंस टेस्ट असं म्हटलं जातं.

या चाचणीसाठी अॅप्लिकेशन तयार करणारी कंपनी ब्रेनवॉंडर्सच्या म्हणण्यानुसार, या चाचणीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची 'उपजत बुद्धिमत्ता' ओळखता येते.

अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबाबत योग्य तो निर्णय घेता यावा यासाठी शैक्षणिक क्षेत्रात ही पद्धत वापरण्याचा ट्रेंड गेल्या दशकात दिसून आला होता.

त्यानंतर काही कंपन्यांनी त्यांच्या मानव संसाधन विभागातील कर्मचारी निवडण्यासाठी या चाचणीचा वापर केला होता.

2016 मध्ये मुंबईतील काही शाळांनी ही चाचणी वापरण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर या प्रकारावर टीका देखील करण्यात आली होती.

चीनमध्ये 2019 च्या दरम्यान या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.

त्याच वर्षी देशातील अनेक भागांत या चाचणीच्या मदतीने विद्यार्थ्यांचे 'करिअर समुपदेशन'ही करण्यात आलं होतं.

मात्र दुसऱ्या बाजूला इंडियन सायकियाट्रिक सोसायटीने पालक आणि शाळांना अशा प्रकारच्या चाचण्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं होतं.

डीएमआयटी या चाचणीवर टीका होते कारण...

डीएमआयटी चाचणीवर बऱ्याचदा टीका करण्यात आली आहे. शिवाय ही चाचणी वैज्ञानिक तथ्यांवर आधारित नसल्याचंही भारतीय मानसोपचार संस्थेने म्हटलंय.

इंडियन सायकियाट्रिक सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. मृगेश वैष्णव बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले की, "खाजगी शाळांमध्ये ही चाचणी अनिवार्य करण्यात आल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या राज्यांमधून आल्या होत्या. करिअर निवड आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती मिळवण्यासाठी ही चाचणी योग्य असल्याचं म्हटलं जात होतं."

"पण या चाचणीला कोणताही वैज्ञानिक आधार असल्याचे पुरावे आम्हाला सापडले नाहीत."

या संदर्भात 2019 मध्ये इंडियन सायकियाट्रिक सोसायटीने एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं.

त्यात असं म्हटलं होतं की, डीएमआयटी चाचणी कोणत्याही वैज्ञानिक आधाराला धरून नाही.

त्यामुळे डीएमआयटी चाचणी बुध्यांक मोजण्यासाठी, ब्रेन लोब फंक्शन चाचणी किंवा भविष्याचा अंदाज लावण्यासाठी उपयुक्त नसल्याचं या निवेदनात म्हटलं होतं.

पण आशिया पॅसिफिक जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी रिसर्चमधील एका शोधनिबंधात केलेल्या दाव्याप्रमाणे, "बोटांचे ठसे आणि अंगभूत बुद्धिमत्ता यांच्यात संबंध असल्याचे दावे 1823 पासून केले जात आहेत."

पण लेवा युवा पाटीदार समाजाने ही चाचणी करण्यामागे काय कारण आहे?

तर अशा प्रकारच्या चाचण्या घेणारे वर्षा फाउंडेशन - ब्रेन सर्व्हे कॅरिअरचे विनोदभाई देसाई सांगतात की, "

डॉ. हॅरोलने एक सिद्धांत मांडला होता की व्यक्तीच्या मेंदूतील खंड हे बोटांच्या ठशांसारखे असतात."

विनोदभाई देसाई हे लेवा पाटीदार समाजाचे नेते आहेत. बीबीसी गुजरातीच्या बिपिन टंकारिया यांच्याशी बोलताना ते म्हणाले, "माझ्या वाढदिवशी 21 मुलींचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित करण्याचं ठरलं होतं. हा सामूहिक विवाह इतर विवाहांपेक्षा वेगळा आहे."

लग्न ठरवताना शक्यतो कुंडली, पत्रिका जुळवली जाते. आम्ही कुंडली जुळवण्याऐवजी वधूची डीएमआयटी चाचणी करण्याचं ठरवलं.

विनोदभाईं पुढे म्हटले की, "डीएमआयटी चाचणीचा उपक्रम केवळ पाटीदार समाजासाठीच सुरू केलाय असं नाही तर संपूर्ण जातीतील लोकांना ही चाचणी करून घेता येईल.

तो सांगतात, "11 वर्षांपूर्वी मी लग्नाला उभा राहिलो तेव्हा माझ्या पत्नीने डीएमआयटी चाचणी करवून घेतली. यात माझा स्वभाव चांगला असल्याचं पाहून तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला."

तज्ज्ञ काय म्हणतात?

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमांशू चौहान या चाचणी विषयी म्हणाले की, "हा एक प्रसिद्धीचा प्रकार आहे. या चाचणीचा विशेष असा काही फायदा नाही."

वडोदरातील समुपदेशक डॉ. योगेश पटेल डॉ. चौहान यांच्या मताशी सहमत आहेत. ते सांगतात, "या चाचणीला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये."

डॉ. पटेल म्हणतात, "या चाचणीत बोटांच्या ठशांवर आधारित प्रतिभा, बुद्धिमत्ता तपासली जात असली तरी ती चाचणी अचूक असल्याचा कोणताही शास्त्रीय आधार नाही."

डॉ. चौहान सांगतात, "या चाचणीत बोटांचे ठसे स्कॅन केले जातात आणि त्यानंतर अहवाल तयार केला जातो. ही चाचणी खरं तर लहान मुलांसाठी आहे. मुलांना कोणत्या विषयात रस आहे आणि ते भविष्यात काय करतील हे शोधण्यासाठी ही चाचणी केली जाते."

मुलांना काय आवडतं, त्यांना कशात रस आहे, भविष्यात ते काय करतील हे देखील या चाचणीत तपासलं जातं. पण ही चाचणी विश्वासार्ह नाही.

डॉ. चौहान म्हणतात, "आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चाचणीचा आणि लग्नाचा काहीएक संबंध नाहीये. मुलाने आणि मुलीने लग्नासाठी अनुवांशिक, रक्ताशी संबंधित चाचण्या करायला हव्यात."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)