You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्यायाम : लग्न ठरलंय म्हणून जिम करत असाल तर हे वाचा
- Author, प्रमिला कृष्णन
- Role, बीबीसी तामिळ
लग्न ठरलं की, बऱ्याचदा तरुण मंडळी जिम गाठतात. यामागं बरीच कारणं असतात, जसं की फोटोत बांधा सुडौल दिसावा, आपण लग्नात चांगलं दिसावं.
पण डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे, अचानक उफाळून आलेलं हे जिमप्रेम तुम्हाला महागात पडू शकतं.
यासंबंधी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी तमिळने ऑर्थोपेडिशियन अश्विन विजय यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणतात की, लग्नाआधी अचानक जिमला जायला लागलं तर तुमच्या सांध्यांना इजा होऊ शकते. आणि यामुळे शरीर आणि मनाचा गोंधळ उडू शकतो.
बरेच तरुण तरुणी चांगलं दिसण्यासाठी, सुडौल दिसण्यासाठी लग्नाच्या आधी किमान 6 ते 8 आठवडे वर्कआऊट सुरू करतात.
त्यासाठी ते कठोर मेहनत घेतात, आणि त्यांच्या शरीरासाठी घातक ठरू असं डॉक्टर अश्विन विजय सांगतात.
डॉ. अश्विन विजय पुढं सांगतात की, "तुमच्या शरीराला एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने करायची सवय लागलेली असते. अशात जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी हार्डकोर ट्रेनिंग सुरू केलं तर तुम्हाला पाठीचा कणा किंवा सांध्याच्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागू शकतं. खूप जोराजोरात धावणं, एखादी एक्ससाईज रिपटेडली करणं यामुळे सांध्यांना त्रास होतो. मागच्या तीन वर्षात आम्ही असे तरुण पाहिलेत ज्यांना व्यायामामुळे पाठीच्या कण्यात, मानेवर, पायांच्या सांध्यांवर ताण आलाय."
ते पुढं असंही सांगतात की, अचानक मेदयुक्त आहार कमी केल्याने, कर्बोदके कमी केल्याने शरीराचं मोठं नुकसान होतं.
डॉ. अश्विन विजय म्हणतात की, "काही लोकांना असं वाटतं की आहार बदलला की वजन सुद्धा कमी होतं. जर तुम्ही डाएटिंग करून एक किंवा दोन महिन्यांत वजन कमी केलं आणि पुन्हा आधीसारखंच खायला सुरुवात केली तर तुम्ही जे वजन कमी केलं होतं ते पुन्हा दुप्पट वाढू शकतं. त्यामुळे आपल्याला रोज शक्य नसलेली आहारपद्धती अंमलात आणू नये, कारण ती फायदेशीर ठरत नाही."
डॉ. अश्विन विजय इशारा देताना सांगतात की, "लग्नानंतर तुम्हाला लंच आणि डिनरसाठी आमंत्रित केलं जातं. तुम्ही जिमला जाणं सोडून देता. तुम्ही दिवसातून तीनदा जेवणं कराल, पण व्यायाम करणार नाही. अशात मन गोंधळून जाईल आणि शरीर थकेल. या मेजवण्यांमध्ये तुम्हाला गोडधोड खाऊ घालतील. व्यायाम सुरू नसेल पण इकडे शुगर इनटेक वाढेल."
दररोज 45 मिनिटांचा व्यायाम आवश्यक असल्याचं ते सांगतात.
डॉ. अश्विन सांगतात, "अवयवांच्या नियमनासाठी व्यायाम आवश्यक आहे. जर आपण नियमितपणे शरीराची हालचाल केली, तर आपले अवयव नीट काम करतील. तुम्हाला ऊर्जा मिळेल, दिवसभर फ्रेश वाटेल. आणि ही सवय जर तुमच्या अंगवळणी पडली तर तुम्ही आनंदी आयुष्य जगाल. तुम्हाला सातत्याने शरीराची हालचाल ठेवावी लागेल. जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जास्तवेळ बसावं लागत असेल किंवा जास्त वेळ उभं राहावं लागत असेल तर तुमचे सांधे हलणार नाहीत, त्यांना विश्रांती द्यावी लागेल. नाहीतर शारीरिक त्रास निर्माण होईल."
ते निष्कर्षाप्रत येत म्हणतात, "त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की, की जे लोक त्यांच्या लग्नाआधी जिममध्ये जातात ते लग्नानंतरच्या काळात काळजी घेणं सोडून देतात. पण वजन कमी करणं हे ध्येय न ठेवता तुमचं आरोग्य हे तुमचं ध्येय असायला हवं.
यामुळे तुमचं मन देखील निरोगी राहील. यामुळे तुम्हाला व्यायाम आणि योग्य आहाराच्या सवयी लागण्यासाठी प्रेरणा मिळेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)