You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लिक्विड डाएटने वजन कमी होतं का? हे डाएट सुरक्षित असतं?
- Author, फिलिपा रॉक्स्बी
- Role, हेल्थ रिपोर्टर
लिक्विड डाएट्स वेगवेगळ्या प्रकारची असली तरी त्या सगळ्यांचं उद्दिष्टं एकच असतं - कमी कॅलरीजचं सेवन करून पटकन वजन घटवणं.
या डाएट्समध्ये शरीर 'डीटॉक्स' (Detox) करून आतून स्वच्छ (Cleanse) करण्याचा दावा करणाऱ्या फळं-भाज्यांच्या ज्युसेसपासून ते कमी कॅलरीजच्या शेक्स आणि सूप्सचा समावेश होतो.
पण अशाप्रकारची टोकाची डाएट्स करण्याचे काही धोके असून, बहुतेक लोकांनी अशी डाएट्स करणं योग्य नसल्याचा इशारा तज्ज्ञ देतात.
दिवसातून फक्त 800 कॅलरीजचं सेवन करण्याचं डाएट फक्त ठराविकच लोकांनी करावं असं युकेची NHS सेवा सांगते. अतिलठ्ठ आणि टाईप 2 डायबिटीस असणाऱ्या लोकांनी असा आहार घ्यावा असं NHS सांगते.
अशा लोकांना फक्त पातळ द्र्व्यांचा आहार सांगितल्या नंतर त्यांच्यावर वैद्यकीय दृष्ट्या लक्ष ठेवलं जातं. पण ऑनलाईन लिक्विड डाएट्सबाबत मात्र हे होत नाही.
"ज्यूस डाएट्सचा मोह लोकांना होतो कारण त्यांना पटकन परिणाम हवे असतात आणि इतर डाएट करणं कठीण असतं," ब्रिटीश डाएटिक असोसिएशनच्या एलिंग पिगॉट सांगतात.
"ही डाएट्स काही भूमिका निभावतात, पण एकच गोष्ट सगळ्यांना लागू होत नाही. वजन जास्त असणाऱ्या लोकांसाठी अशी डाएट्स सुचवली जाणं काळजीचं आहे."
फळं आणि भाज्यांमधून खनिजं आणि जीवनसत्त्वं मिळतात. पण यामधून प्रथिनं आणि फॅट्स अतिशय कमी प्रमाणात मिळतात.
जर ते फळ अख्खं म्हणजे साल - गर आणि बियांसकट खाल्लं तरच पुरेसं फायबर (Fiber) मिळू शकतं. पण रसांच्याबाबत ते घडत नाही.
"आठवड्याभरानंतर तुम्हाला थकल्यासारखं, गळून गेल्यासारखं वाटू लागतं," प्लायमाऊथ विद्यापीठातले मानवी पोषण विषयाच्या प्राध्यापक डॉ. गेल रीस सांगतात.
शरीराला वेगवेगळ्या प्रकारे पोषणाची गरज असते. पण जर एखाद्या डाएटमध्ये पोषणाचं संतुलन नसेल तर दीर्घकाळात त्याचे शरीरावर मोठे दुष्परिणाम दिसू शकतात.
शरीरातला लोहाचा साठा वापरला जातो. अशा वेळी महिलांमध्ये लोहाची कमी - Anaemia उद्भवतो, स्नायू कमी होतात आणि पचनसंस्था, फुफ्फुसं आणि यकृताला शरीराचं कार्य सामान्यपणे सुरू ठेवण्यासाठी अधिक काम करावं लागतं.
याशिवाय या डाएट्समुळे डोकेदुखी, गरगरणे, कमालीचा थकवा, डायरिया म्हणजेच अतिसार (diarrhoea) किंवा बद्धकोष्ठ (Constipation) असे दुष्परिणाम होऊ शकतात.
फळांच्या रसांत - ज्यूसमध्ये नैसर्गिकरित्याच अनेक अॅसिड्स असतात. यामुळे दातांवरचं आवरणं (Enamel) झिजू शकतं आणि पुरेशा कॅलरीजचं सेवन केलं नाही तर त्यामुळे तोंडाला वास येऊ शकतो.
लिक्विड डाएटमुळे पटकन वजन घटवणं शक्य आहे. पण त्याचे काही धोकेही असतात. आहार पूर्वीसारखाच झाल्यावर वजन पुन्हा वाढण्याचा धोका असतो.
"फॅड डाएट्स ही एका अतिशय टॉक्सिक डाएट कल्चरचा भाग आहेत आणि यामुळे अनेकदा वजन घटण्यापेक्षा वाढतं," एलिंग पिगॉट सांगतात.
यापेक्षा स्वतःचं शरीर देत असलेल्या संकेतांकडे लक्ष द्या, मूलभूत गोष्टी पाळा आणि फक्त आठवडाभराचा विचार न करता दीर्घकाळ पाळता येतील अशा सवयी लावून साध्य करण्याजोगी उद्दिष्टं ठेवा असं त्या सांगतात.
वजन कमी होणं आणि पुन्हा वाढणं
"टोकाची डाएट्स करणं हे वजन कमी करण्यासाठी दीर्घकाळ करता येण्याजोगं नसतं. कारण कमी होणारं वजन हे शरीरातल्या पाण्याच्या प्रमाणाचं किंवा स्नायूंचं असतं. अशा प्रकारच्या क्रॅश डाएट्समुळे पित्ताशयाचा खडा होण्यासारखे धोकेही निर्माण होऊ शकतात," असं ब्रिटीश न्यूट्रिशन फाऊंडेशनच्या डॉ. सिमॉन स्टीनसन सांगतात.
याशिवाय अशा फॅड डाएट्समुळे वजन घटून पुन्हा वाढण्याचं चक्र निर्माण होतं आणि त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तींवर होत असल्याचं डॉ. स्टीनसन म्हणतात.
म्हणूनच वजन कमी करण्यासाठी 'लिक्विड डाएटचा उतारा' शोधण्याऐवजी विविधांगी आणि संतुलित आहार घ्यावा. त्यात फळं, भाज्या, कडधान्यं, डाळी, नट्स (nuts) यांचा समावेश असावा आणि दिवसभर अॅक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करावा.
सोबतच आपल्याला अनावश्यक कॅलरीज ज्यातून मिळतात असे हॉटेलमधले वा तयार अन्नपदार्थ, वेफर्ससारख्या गोष्टी, दारू हे देखील बंद करावं.
जर तुम्हाला एखादी शारीरिक व्याधी असेल तर डाएट सुरू करण्याआधी तुमच्या डॉक्टरचा आणि डाएटिशियनचा सल्ला घ्या.
लिक्विड डाएट फार कमी जणांना लागू होतं आणि ते योग्य रीतीने केलं तरच परिणामकारक ठरतं. पण बहुतेकांसाठी ते आचरणात आणणं कठीण असतं आणि त्यामुळे अनावश्यक धोके निर्माण होऊ शकतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)