जेव्हा मुलांनीच विधवा आईचं लग्न लावून दिलं

    • Author, के. सुबागुनम
    • Role, बीबीसी तमिळ

"लग्नाचं वय झालेल्या माझ्या मुलानेच जेव्हा मला दुसरं लग्न करण्याविषयी सांगितलं तेव्हा मला धक्काच बसला."

सेल्वी सांगतात, "पण माझा मुलगा पुढारलेल्या विचारांचा आहे, शिवाय माझ्या मुलासारखी मानसिकता या समाजात इतर कोणाची नसल्याचा मला अभिमान वाटतो. समाजात अशा कित्येक स्त्रिया आहे, ज्यांनी आपले पती गमावलेत आणि त्या एकट्या आपल्या मुलांना वाढवतात."

भास्कर आणि त्याची आई सेल्वी तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथील प्रांगमपट्टू गावात राहतात.

भास्कर आणि त्याचा धाकटा भाऊ विवेक हे दोघे लहान असताना 2009 मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं.

त्यावेळी भास्कर वेल्लोरमध्ये इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षामध्ये शिकत होता तर धाकटा विवेक अकरावीत होता.

भास्कर सांगतो, "वडिलांचं निधन झाल्यावर माझ्या आईचं दुसरं लग्न लावून देण्याविषयी मी काहीच विचार केला नव्हता. पण बऱ्याच महिला आपल्या पतीच्या निधनानंतर एकट्याच मुलांची काळजी घेतात, त्यामुळे माझे विचार देखील तसेच होते."

"इंजिनीअरिंग तिसर्‍या वर्षाला असताना मी माझ्या एका शिक्षकाला भेटायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले की, अरे तुझी आई इतके वर्ष एकटीच राहते आहे, ती दुसरं लग्न का करत नाही? पण याविषयी आईशी बोलण्याचा प्रश्नच नव्हता."

आईच्या लग्नाची चर्चा कशी सुरू झाली?

यावर भास्करने फार काही विचार केला नाही. त्याचं कॉलेज पूर्ण झाल्यावर तो नोकरीला लागला.

त्याला पुस्तकं वाचण्याचा छंद असल्याने, जगभरात कुठं काय घडतंय याची त्याला माहिती असायची.

पेरियार यांचे पुनर्विवाहावरील काही लेख त्याच्या वाचनात आले होते. पुढं तो याविषयावर आपल्या मित्रांशीही चर्चा करू लागला.

त्याचवेळी भास्करला आपल्या आईचा विचार आला. आपली आईसुद्धा एकटीच आहे, तिने ही लग्न करायला हवं असं त्याला वाटू लागलं. त्याने याविषयावर आपल्या लहान भावाशीही बोलून पाहिलं. धाकट्या भावाला देखील यावर काही आक्षेप नव्हता.

त्यानंतर दोघा भावांनी मिळून आईची मनधरणी करायचं काम सुरू केलं.

भास्कर सांगतो, "आईचं सगळं आयुष्य आमच्या गोष्टी बघण्यातच गेलं. त्यामुळेच तिने याविषयावर बोलण्यास टाळाटाळ केली."

"पण आम्ही मात्र माघार घेतली नाही. आम्ही याविषयी बोलणं चालूच ठेवलं. अशातच एक दिवस ती मला म्हणाली की, तुझं लग्नाचं वय झालंय. यावर मी म्हटलं जोपर्यंत तू लग्न करणार नाहीस तोपर्यंत मी ही लग्न करणार नाही."

भास्कर सांगतो, "यानंतर मी बऱ्याचदा माझ्या आईशी याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. मी तिला सांगितलं की, तू खूप दिवसांपासून एकटीच लढते आहेस, तू लग्न करायला हवं."

कुटुंबीयांचा विरोध

दोन्ही मुलांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे सेल्वी पुन्हा लग्नासाठी तयार झाल्या. पण समाजात मात्र अशी पद्धत रुढ नाही.

ज्या महिलांच्या पतीचं निधन होतं त्यांना विधवा म्हणून आयुष्य काढावं लागतं. अशा महिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी नातेवाईक सहसा तयार नसतात.

सेल्वी सांगतात, "माझ्या मोठ्या मुलाने मला जेव्हा लग्नाचा विषय सांगितला तेव्हा मला धक्काच बसला. यावर मी त्याला ओरडले आणि म्हणाले की, माझ्या मुलाचं लग्नाचं वय झालेलं असताना जर मी लग्न केलं तर लोक काय म्हणतील?"

सेल्वी यांच्या मते, "माझ्या मुलांचं म्हणणं होतं की, तू अशीच एकटी किती दिवस राहणार आहेस. आम्हाला नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं. तेव्हा तुला आणखीन एकटं वाटेल, तुझंही आयुष्य आहे. त्यांनी हे सांगितल्यानंतर मी ही यावर विचार करू लागले."

पण नातेवाईकांचं काय? यावर माझी मुलं मला म्हणाली की, जेव्हा आपण अडचणीत होतो तेव्हा कोणीही आपल्याला मदत करायला आलं नाही, त्यामुळे आता त्यांची काळजी करण्याचं कारण नाही."

दोन्ही मुलं सोबत असल्याने सेल्वीने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मुलांनी आईसाठी शोधला नवरदेव

आईची संमती मिळाल्यानंतर दोन्ही मुलांसमोर आईसाठी वर शोधण्याचं आव्हान होतं.

भास्कर सांगतो, "आम्हाला आमच्या आईचं लग्न अशा व्यक्तीशी करायचं नव्हतं ज्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं असेल."

भास्करने त्याच्या आईला सांगितलं की, त्यांनी आईसाठी जो वर शोधलाय त्यांच्याशी तिने थोडं बोलून बघावं, म्हणजे पुढच्या गोष्टी ठरवणं सोपं होईल. या प्रयत्नात त्या व्यक्तीचं आईवर प्रेम जडलं आणि त्यांनी नंतर तिच्याशी लग्न केलं."

सेल्वी सांगतात, "त्यावेळी मला बऱ्याच लोकांनी विचारलं की, मुलं काहीही म्हणोत पण तू या सगळ्यासाठी कशी काय तयार झालीस.घटस्फोटासाठी पुनर्विवाहाचा कायदा असताना मला भीती का वाटावी?"

त्या म्हणाल्या की, "मुलांवर ओझं न बनता स्वत:साठी आयुष्याचा साथीदार शोधण्यात काहीच गैर नाही. लग्न म्हणजे फक्त सेक्स नाही. मित्रासारखा जोडीदार मिळाल्याने तुम्हाला आधार मिळतो."

तुमच्या भावना लपवू नका...

सेल्वी सांगतात, "माझे पती वारल्यानंतर अनेक लोक माझ्याकडे वाईट उद्देशाने आले. त्यांना मी एकटी असल्याचं माहीत होतं. पण माझं लग्न करून द्यावं असा विचार कोणाच्याच मनात आला नाही."

"माझ्या पहिल्या पतीचं निधन झालं तेव्हा आमच्या घरात शौचालय नव्हतं. रात्रीच्या वेळी शौचास गेलं तर लोक काहीही प्रश्न विचारतील म्हणून मी बाहेर जाणं टाळायचे. अनेक पुरुष मला एकटं पाहून माझ्यासोबत सेक्सविषयी बोलायचे. यावर मी त्यांना विचारायचे की तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांना याबद्दल सांगाल का, तर ते पळून जायचे."

"माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अनेक महिलांनी सांगितलं की त्यांच्यात पुन्हा लग्न करण्याची हिंमत नाही. मी अशा अनेक तरुण विधवांशीही यासंबंधी बोलले होते. मी त्यांना नवी आशा देत आहे."

ज्या महिलांच्या पतीचं निधन झालंय अशा महिलांना आवाहन करताना सेल्वी म्हणतात, "ज्यांनी आपले पती गमावलेत त्यांनी स्वतःसाठी धाडसाने निर्णय घ्यायला हवेत. त्यांनी आपला संसार पुन्हा उभा केला पाहिजे. माझ्या सारख्या बऱ्याच महिला त्यांच्या खऱ्या भावना लपवतात आणि संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेत घालवतात."

"एकटं जगणं खूप अवघड असतं. आणि असं आयुष्य काढण्याची काहीच गरज नाही. मला वाटतं की, लोक काय म्हणतात याची पर्वा न करता लोकांनी स्वतःच्या आयुष्याला महत्व दिलं पाहिजे."

सेल्वीच्या कुटुंबातील एकही सदस्य त्यांच्या दुसऱ्या लग्नाला उपस्थित नव्हता. फक्त त्यांच्या दुसऱ्या पतीच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

भास्कर सांगतो की, माझ्या आईच्या कुटुंबीयांनी आमच्यावर बराच काळ बहिष्कार टाकला होता. पण यामुळे आमचं कसलंच नुकसान झालेलं नाही.

अशी किती मुलं असतात जी आपल्या आईसाठी असा विचार करतात?

सेल्वी म्हणतात, "माझ्या पतीच्या मृत्यूच्या वेळी मी माझ्या सासऱ्यांना, सासूबाईंना आणि आईला फोन केला होता. त्यावेळी दोन मुलांना एकटीने कसं वाढवायचं या संभ्रमात मी होते. पण कोणीही मदतीला आलं नाही. पण मी एकटीनेच माझ्या मुलांना वाढवलं. माझ्या मुलांनीही पार्ट टाईम नोकऱ्या करून घराला हातभार लावला."

कठीण प्रसंगांना सामोरं गेल्याने सेल्वी आणि त्यांच्या मुलांना समाजात आणखीन चांगल्या प्रकारे कसं वावरायचं याची समज आली. सेल्वीने यांनी येटुमलाई नावाच्या एका शेतमजुराशी लग्न केलंय. चेहऱ्यावर हसू आणून सेल्वी सांगतात की, "ते सगळी कामंही करतात आणि माझी काळजीही घेतात"

सेल्वी पुढे म्हणतात, "आपल्या आईला देखील एखाद्या जोडीदाराची गरज आहे असं किती मुलांना वाटतं. पण जेव्हा मी माझ्या मुलांचा विचार करते तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)