You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खलिस्तान चळवळ नेमकी काय आहे? जाणून घ्या 10 मुद्द्यातून...
पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या निमित्ताने खलिस्तानी चळवळीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
खलिस्तानची चळवळ 10 मुद्द्यांतून जाणून घेऊ या...
1. चळवळ काय आहे?
खलिस्तान चळवळ ही खलिस्तान नावाच्या वेगळ्या देशासाठी चालवलेली चळवळ आहे. त्यात सध्या भारत आणि पाकिस्तानमधील शीख लोकांचा वेगळा देश अस्तित्वात यावा असा या चळवळीचा उद्देश आहे. कालानुरूप या चळवळीचं रुप बदललं आहे.
1984 आणि 1986 मध्ये दोनदा ही चळवळ ऑपरेशन ब्लू स्टार आणि ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या माध्यमातून दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला होता. तरी या चळवळीबद्दल शीख समुदायाच्या काही वर्गात अद्यापही सहानुभूती आहे. विशेषत: कॅनडा, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये खलिस्तानी चळवळीबद्दल सहानूभूती आहे.
2. चळवळीचा उगम
स्वातंत्र्यपूर्व काळात 1940 मध्ये मुस्लीम लीगच्या लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मंजूर करण्यात आला. मग हिंदूंसाठी आणि मुस्लिमांसाठी तयार झालेल्या वेगवेगळ्या देशांमध्ये शिखांना स्वतंत्र स्थान मिळणार नाही, अशी भावना निर्माण झाली. आणि म्हणून शिखांचंही स्वतंत्र राष्ट्र हवं, या विचाराला वाचा फूटली.त्यानंतर मार्च 1940 मध्ये डॉ. वीरसिंग भट्टी यांनी पहिल्यांदा स्वतंत्र खलिस्तानची कल्पना मांडली.
पण स्वतंत्र भारतात शीख समुदायाला अर्ध-स्वायत्तता देण्याची ग्वाही महात्मा गांधी यांनी दिली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही 1946च्या कलकत्त्याच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत हीच भूमिका कायम ठेवली. त्यामुळं तेव्हा स्वतंत्र खलिस्तानचा मुद्दा मागे राहिला.
याच वर्षी एका पत्रकार परिषदेत नेहरू यांनी या भूमिकेत बदल केल्यानं शीख समुदाय नाराज झाला. हिंदूंच्या राज्यात आपल्यावर अन्याय होईल, ही भीती शिखांच्या मनात त्यामुळे आणखीनच बळावली.
3. स्वातंत्र्यानंतरच्या घडामोडी
1966 मध्ये पंजाबची स्थापना झाल्यावर अकाली दलाच्या नेत्यांनी खलिस्तानची मागणी लावून धरली होती. इंग्लंडमधील चरणसिंह पंथी आणि आणि डॉ. जगजित सिंह चौहान यांनी सत्तरच्या दशकात ही मागणी केली होती.
डॉ.चौहान सत्तरच्या दशकात ब्रिटनमध्ये राहत असत आणि अमेरिका आणि पाकिस्तानला भेटी देत असत. काही तरुणांनी 1978 मध्ये खलिस्तानच्या मागणीसाठी दाल खालसा या पक्षाची स्थापना केली होती.
1955 मध्ये हरमंदिर साहिब म्हणजेच अमृतसरच्या सुवर्णमंदिराजवळ स्वतंत्र पंजाबी सुभ्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर सरकारने पोलीस पाठवून कारवाई केली. या कारवाईमुळे शिखांच्या अस्मितेला धक्का पोहोचला, असं इतिहासकार डॉ. गुरबचनसिंग बच्चन सांगतात.
4. आनंदपूर साहिब ठराव
1973 मध्ये आनंदपूर साहिब शिरोमणी अकाली दलाने एक ठराव मंजूर केला त्यानुसार शीख धर्माला एक वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी असं सांगण्यात आलं. हिंदू धर्मापासून शीख धर्म वेगळा करावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
तसंच भारतीय राज्यघटनेत असलेल्या केंद्र-राज्य संबंधाचा पुनर्विचार करून राज्याला जास्त अधिकार मिळावेत अशीही मागणी करण्यात आली होती.
5. कोणत्या संघटना समर्थनात होत्या?
खलिस्तानी चळवळीसाठी खालील संस्था समर्थनात आहेत :
बब्बर खालसा (इंटरनॅशनल), इंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन, खलिस्तान कमांडो फोर्स, ऑल इंडिया शीख स्टुडंट फेडरेशन, भिंद्रनवाला टायगर फोर्स ऑफ खलिस्तान, खलिस्तान झिंदाबाद फोर्स, खलिस्तान लिबरेशन फोर्स, खलिस्तान लिबरेशन आर्मी, दशमेश रेजिमेंट, शहीद खालसा फोर्स या संस्था खलिस्तानच्या समर्थक होत्या. यापैकी बहुतांश संस्था सध्या अस्तित्वात नाहीत.
6. जर्नेलसिंग भिंद्रनवाले
स्वतंत्र खलिस्तानच्या चळवळीसाठी 1970 च्या दशकात जर्नैलसिंग भिंद्रनवालेचा उगम झाला. तो तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय होता. त्याने थेट याने सुवर्ण मंदिरात आपला डेरा हलवला.
70 आणि 80च्या दशकात पंजाबमधल्या हिंसक कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. यामागे भिंद्रनवाले यांचा हात होता, असं बोललं जात होतं.
'पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक लाला जगतनारायण यांची हत्या असो किंवा निरंकारी समाजाच्या लोकांवर होणारे हल्ले असोत, पंजाब अस्थिरतेच्या वाटेवर होता. त्यातही हिंदू समाज किंवा सामंजस्याची भूमिका घेणारे शीख यांना लक्ष्य केलं जात होतं', असं मार्क टुली यांच्या 'अमृतसर : इंदिरा गांधीज् लास्ट बॅटल'मध्ये नमूद केलं आहे.
7.ऑपरेशन ब्लू स्टार
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं बघून भारत सरकारने लष्कराची मदत घेत ऑपरेशन ब्लू स्टार घडवलं. या मोहिमेत लष्कर सुवर्ण मंदिरात घुसलं. या कारवाईत भिंद्रनवाले आणि त्यांचे अनके अनुयायी मारले गेले.
या कारवाईदरम्यान मंदिरातल्या जुन्या लायब्ररीलाही आग लागली. त्यात अनेक जुनी हस्तलिखितं आणि ग्रंथ जळून राख झाले. प्रत्यक्ष सुवर्ण मंदिराच्या दिशेनेही गोळ्या मारल्या गेल्याने शीख समाजाचा भडका उडाला.
या संपूर्ण कारवाईदरम्यान पंजाबच्या गावागावांमधल्या शीख तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या तरुणांकडे संशयास्पद नजरेनं बघितलं जात होतं. भारताच्या इतिहासातली ही अतिशय धक्कादायक घटना होती. त्यामुळी शीख समुदायाच्या भावना प्रचंड दुखावल्या.
तसंच सुवर्णमंदिराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
8. इंदिरा गांधींची हत्या
ऑपरेशन ब्लू स्टारचा सूड उगवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 ला 1 सफदरजंग रोड या त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली. त्यांच्या शीख अंगरक्षकांनीच ही हत्या केली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत प्रचंड प्रमाणात दंगली उसळल्या आणि हजारो शीखांची हत्या झाली. या घटनेमुळे शीख आणि हिंदू यांच्यातली दरी आणखीनच रुंदावली.
त्यानंतर तब्बल एक तप शीख अतिरेक्यांच्या कारवायांमुळे पंजाबच नाही, तर देश अस्थिर होता. या 12 वर्षांमध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उफाळलेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या कोणावरही कारवाई झाली नाही.
त्यामुळे आपल्या विरोधात असलेल्या गटांना तत्कालीन केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, अशी सार्वत्रिक भावना शिखांच्या मनात निर्माण झाली
1985 मध्ये एअर इंडियाचं एआय-182 आयर्लंडच्या आकाशात असताना बाँबने उडवण्यात आलं. त्यामागेही शीख अतिरेक्यांचा हात होता. देशभरातही रेल्वेरूळ उखडून टाकणं, बसवर हल्ला करणं, रेल्वेवर हल्ला करणं अशा अनेक घटना सातत्याने घडत होत्या.
9.अमृतपाल सिंग
मागील काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात अमृतपाल सिंगच्या नावाची चर्चा जोरावर आहे. 29 वर्षीय अमृतपाल सिंग खलिस्तान समर्थक असल्याचं म्हटलं जातं. मागच्या वर्षी ॲक्टर-ॲक्टिविस्ट असलेल्या दीप सिंग सिद्धूचं निधन झालं.
दीप सिंग सिद्धूने ह्यात असताना 'वारीस पंजाब दे' या संघटनेची स्थापना केली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी अमृतपाल सिंगच्या खांद्यावर येऊन पडली. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी अमृतपाल सिंगला दुबईहून परतावं लागलं.
अभिनेता, कार्यकर्ता अशी ओळख असणारा दीप सिंग सिद्धू शेतकरी आंदोलनादरम्यान प्रकाशझोतात आला होता. पुढे रस्ता अपघातात त्याचा मृत्यू झाला.
मीडियाला दिलेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये अमृतपाल सिंग सांगतो की, अमृतसरच्या जादुखेडा गावात त्यांचं बालपण गेलं. 10 फेब्रुवारी 2023 मध्ये बाबा बकाला इथे त्याचा विवाह पार पडला.
गोपनीयतेचा मुद्दा पुढे करत त्याने आपल्या पत्नी आणि कुटुंबाबद्दल काहीही सांगणं टाळलं. शिवाय माध्यमांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणं टाळावं असंही पुढे सांगितलं.
अमृतपाल सिंगच्या म्हणण्यानुसार, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या शोधात त्याने अरबस्तान गाठलं.
आता अमृतपाल सिंग फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमृतपाल मुळे खलिस्तानचा हा सगळा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
10.सध्याची स्थिती
अमृतपाल सिंगला सध्या काही लोक भिंद्रनवाले 2.0 म्हणू लागल्यानंतर खलिस्तानच्या चर्चेने वेग पकडला.
ऑपरेशन ब्लू स्टारनंतर मंदावलेली खलिस्तानी चळवळ गेल्या काही वर्षांत पंजाबमध्ये पुन्हा एकदा जोर पकडताना दिसत आहे.
पंजाब पोलिसांच्या मुख्यालयावर झालेला ग्रेनेड हल्ला असेल किंवा मग गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबच्या अजनालामध्ये घडलेली घटना असेल. खलिस्तानी चळवळीशी त्याचा संबंध जोडून पाहिला जात आहे.
पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खलिस्तानी समर्थकांच्या मोर्चांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
शिवाय कॅनडा आणि यूकेमध्ये भारतीय उच्चायुक्तालयासमोर खलिस्तानी समर्थकांचे मोर्चे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आले होते.
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत अमृतपाल सिंग यांनी त्यांचा भारतीय संविधानावर विश्वास नसल्याचं म्हटलंय.
महत्त्वाचं म्हणजे यंदा पहिल्यांदा पंजाबमध्ये अकाली दल, भाजप आणि काँग्रेस या स्थानिक किंवा राष्ट्रीय पक्षापेक्षा दिल्लीतील आम आदमी पक्षाचं सरकार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)