शीख सैनिक : 'पगडी केवळ कापड नव्हे, तर डोक्यावरील मुकूट', बॅलिस्टिक हेल्मेटला विरोध

    • Author, शकील अख्तर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतीय लष्करात शीख सैनिकांनी हेल्मेट परिधान करणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला देशभरातील शीख धार्मिक संघटना आणि राजकीय नेत्यांकडून विरोध होताना दिसत आहे.

पारंपारिक पगडी ही शीखांच्या धार्मिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यावर अशा प्रकारे निर्बंध लावता येऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

भारतीय लष्कराने नुकतेच शीख सैनिकांसाठी विशेष असं बॅलिस्टिक हेल्मेट खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे.

भारतीय लष्करात शीख सैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. शीख धर्माच्या परंपरेनुसार त्यांना आतापर्यंत हेल्मेट वापरण्यापासून सूट देण्यात येत होती.

मात्र आता, संरक्षण मंत्रालयाने 400 मीटरपर्यंतच्या अंतरावरून झाडलेल्या गोळीपासून संरक्षण देण्यासाठी शीख सैनिकांसाठी विशेष डिझाईनचे 12 हजार 370 हेल्मेट खरेदी करण्याचं टेंडर जारी केलं.

यामध्ये 8911 लार्ज साईज तर 3819 एक्स्ट्रा लार्ज साईजचे हेल्मेट आहेत.

भारतीय लष्करात शीख रेजिमेंट, शीख लाईट इन्फेंट्री आणि पंजाब रेजिमेंटमध्ये शीख सैनिकांची संख्या मोठी आहे.

शीखांची धार्मिक परंपरा लक्षात घेता आजवर त्यांना हेल्मेट वापरण्यापासून सूट देण्यात होती. मात्र, आता इतर सैनिकांप्रमाणेच शीख सैनिकांनाही अधिक सुरक्षेसाठी विशेष हेल्मेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेल्मेटच्या या टेंडरसाठी अर्ज करण्याकरिता शेवटची तारीख 27 जानेवारी आहे. हेल्मेट खरेदीचा निर्णय टेंडर जमा झाल्यानंतर होईल. भारतीय लष्कर शीखांची परंपरा, विशेषतः पगडीबाबत अत्यंत संवेदनशील राहिलेलं आहे.

मात्र, आता गंभीर परिस्थितीत अत्याधिक सुरक्षा देण्याच्या हेतूने विशेष हेल्मेटचा वापर करण्याचा निर्णय लष्कराने घेतला.

हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा असून राजकीय दृष्टीने बरीच सल्लामसलत केल्यानंतर आणि शिफारसीनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

शीख धर्मस्थळांचं कामकाज पाहणारी संस्था शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी यासंदर्भात एक पत्र लिहिलं. शीखांबाबत हेल्मेटचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी धामी यांनी या पत्राद्वारे केली आहे.

ते म्हणाले, "एका शीख सैनिकाला सुरक्षेचं कारण दाखवत त्याची पगडी उतरवून त्या जागी हेल्मेट वापरण्याचा आदेश दिला जात आहे. हा निर्णय घेणाऱ्यांना शीखांची विचारसरणी माहीत नाही. शीखांची पगडीबाबत असलेली धार्मिक आस्थाही त्यांना माहीत नाहीत नाही, याचा हा पुरावा आहे.

'पगडी केवळ कापड नाही'

हरजिंदर सिंह धामी यांनी अमृतसरमध्ये याबाबत म्हटलं, "पगडी केवळ कापड नाही. अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्वाशिवाय हे शीखांच्या ओळखीचं प्रतिकसुद्धा आहे. शीखांचं त्यांच्या पगडीसोबतचं नातं हे शीख गौरव आणि गुरुंच्या आदेशाचं पालन करण्याचं प्रतिबिंब दर्शवतं."

ते पुढे म्हणाले, "शीख सैनिकांना हेल्मेट वापरण्यासाठी भाग पाडण्याचा निर्णय घेण्यात आला, यामुळे शीखांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे."

शीखांचं सर्वात पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी हरप्रित सिंह यांनीही हेल्मेटचा निर्णय 'शीख ओळखीवर हल्ला' असल्याचा आरोप केला.

केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पगडीऐवजी हेल्मेट घालायला लावण्याचा प्रयत्न हा शीख अस्मिता दाबण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जाईल, असंही त्यांनी म्हटलं.

हरप्रित सिंह पुढे म्हणाले, "दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश सैन्यानेही असाच प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळीही शीखांनी तो प्रयत्न मोडून काढला. कोणत्याही शीख व्यक्तीच्या डोक्यावरील पगडी हे काय केवळ 5-7 मीटरचं कापड नाही. तर आमच्या गुरुंनी दिलेला तो मुकूट आहे. आमच्या अस्मितेचं ते प्रतिक आहे."

पंजाबामधील अकाली दल या राजकीय पक्षानेही या निर्णयाचा विरोध दर्शवला.

पक्षाचे अध्यक्ष सुखविंदर सिंह बादल म्हणाले, "सरकारने शीखांना हेल्मेट अनिवार्य करण्याबाबत घेतलेला निर्णय हा धार्मिक ओळखीवरचा हल्ला आहे. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मी मागणी करतो."

शीख धर्मात अनुयायींसाठी पाच गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे केश (लांब न कापलेले केस), लाकडाचा कंगवा, कडा, कृपाण (एक प्रकारचं छोटं शस्त्र) आणि कशहरा (कॉटन अंतर्वस्त्र).

परंपरेचा भाग

शीख हे आपल्या डोक्याचे किंवा दाढीचे केस कधीच कापत नाहीत. केसांची निगा राखण्यासाठी ते नेहमी लाकडी कंगवा सोबत ठेवतात. हातात लोखंडाचा किंवा स्टीलचा कडा घालतात.

सुरक्षेसाठी कृपाण नामक शस्त्र बाळगतात. याशिवाय कशहरा म्हणजेच कॉटनचं अंतर्वस्त्र नेहमी परिधान करणंही शीख धर्मात अनिवार्य आहे.

डोक्यावरील केस बांधून व्यवस्थित ठेवण्यासाठी शीख लोक पगडी वापरतात. त्याला दस्तार असंही संबोधलं जातं.

केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह युरोपातील अनेक देशांमध्ये शीख धर्मीय वास्तव्यास आहेत. फ्रान्स सोडून जवळपास सर्व देशांमध्ये लष्करी सेवेत असलेल्या शीखांना पगडी वापरण्याची परवानगी आहे.

मात्र, सध्या नव्या पीढीचे काही शीख तरूण धार्मिक परंपरेविरुद्ध केस कापू लागले आहेत. शिवाय, ते पगडीही वापरत नाहीत .

शीखांच्या धार्मिक परंपरेनुसार, पुरुषांनी पगडी वापरणं तर स्त्रीयांनी ओढणीने आपले केस झाकणं अनिवार्य आहे. हेल्मेट किंवा इतर कोणत्याही वस्तूने डोकं झाकणं म्हणजे टोपी घालणं, असं शीख धर्मात मानलं जातं. त्यामुळे शीख अशा वस्तू न वापरता केवळ पगडी वापरण्याची परंपरा पाळतात.

1988 साली पंजाब हायकोर्टाने केवळ पगडी वापरणाऱ्या शीखांना हेल्मेट वापरण्यातून सूट दिली होती. त्यावेळी या निर्णयावर टीकाही मोठ्या प्रमाणात झाली होती.

तर 2018 साली चंदीगढ प्रशासनाने दुचाकीस्वार महिलांना हेल्मेट वापरणं अनिवार्य केलं होतं.

मात्र, त्यावेळी शीख धार्मिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या विरोधामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)