ज्ञानी हरप्रीत सिंह : आम्ही शीख तरुणांना आधुनिक शस्त्र चालवण्याचं उघडउघड ट्रेनिंग देऊ

    • Author, रविंदर सिंह रॉबिन
    • Role, बीबीसीसाठी

'आता शीख संस्थांनी त्यांच्या लोकांना मॉडर्न हत्यारांचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी,' असं वक्तव्य अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी केलं आहे.

सोमवारी (6 जून) रोजी ते हजारोंच्या शीख समुदायाला संबोधित करत होते. याच दिवशी 1984ला अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार घडलं होतं. त्या पार्श्वभूमीवर सुवर्ण मंदिरात जमलेल्या समुदायाला ज्ञानी हरप्रीत सिंह संबोधित करत होते.

अमृतसरच्या सुवर्णमंदिरात असलेल्या अकाल तख्तला शीख धर्मात सर्वोच्च मानलं जातं आणि जत्थेदार त्याचे प्रमुख असतात. त्यांच्या शब्दाला शीख धर्मात मोठा मान असतो.

सोमवारी अयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तिथं उपस्थित असलेल्या तरुणांच्या हातात बोर्ड आणि नंग्या तलवारी होत्या.

यावेळ त्यांच्यासमोर भाषण करताना ज्ञानी हरप्रीत सिंह म्हणाले, "धन गुरू अंगद देव यांनी ज्या प्रकारे खडूर साहिबमध्ये मल्ल आखाड्याची स्थापना केली होती त्याच धर्तीवर शीख संस्थांनी गटका (शीख मार्शल आर्ट)चं शिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन कराव्यात.

शूटिंग रेंजसारखं अभ्यास केंद्रसुद्धा सुरू करावं. दुसरे लोक लपूनछपून शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देत आहेत आपण ते खुलेआम देऊ."

"ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये लहान मुलं आणि वयस्क शहिद झाले होते," असंसुद्धा ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. नेहरुंनी शीखाचं दमन केलं त्यातूनच पुढे ऑपरेशन ब्लू स्टार घडल्याचा आरोप त्यांनी केला.

"याची तयारी 1947 मध्येच झाली याची परिणती 1984 च्या अकाल तख्तावरील हल्ल्यात झाली."

पंजाबच्या गावांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असून चर्च त्याचे हातपाय पसरत असल्याचं त्यांनी म्हटलं.

"शिखांना धार्मिकदृष्ट्या कमजोर करण्यासाठी पंजाबच्या गावांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला जातोय," असा आरोप त्यांनी यावेळी केला.

शीख धर्म प्रसारकांनी त्यांच्या एसी रूममधून बाहेर येऊन धर्म प्रसाराच्या कामी लागण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले आहेत.

"पंजाबच्या तरुणांना नशेच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजेत. तसंच त्यांना पारंपरिक आणि आधुनिक हत्यारं चालवण्याचं प्रशिक्षण संस्थांनी द्यावं," असं त्यांनी पुढे म्हटलंय.

याआधी मे महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी 'आतावेळ आली आहे की प्रत्येक शिखाने स्वतःकडे एक लायसन्स अधुनिक हत्यार ठेवावं,' असं म्हटलं होतं.

शीख तरुणांनी गोळ्या चालवण्याचं प्रशिक्षण घेण्याचं वक्तव्यसुद्धा त्यांनी आधी केलं आहे.

सभ्य समाजात शस्त्रांना कुठेही जागा नाही, असं ज्ञानी हरप्रीत सिंह यांच्या वक्तव्यावर टीका करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलंय.

1984 मध्ये काय झालं होतं?

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जून 1984 मध्य भारतीय लष्कराकडून ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आलं होतं. सुवर्ण मंदिर आणि परिसरात 31 मे 1984ला भिंद्रनवाले आणि त्यांच्या लोकांनी संपूर्णपणे कब्जा केला होता.

70 आणि 80च्या दशकात पंजाबमधल्या हिंसक कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. यामागे भिंद्रनवाले यांचा हात होता, असं बोललं जात होतं.

'पंजाब केसरी' वृत्तपत्राचे संपादक लाला जगतनारायण यांची हत्या असो किंवा निरंकारी समाजाच्या लोकांवर होणारे हल्ले असोत, पंजाब अस्थिरतेच्या वाटेवर होता. त्यातही हिंदू समाज किंवा सामंजस्याची भूमिका घेणारे शीख यांना लक्ष्य केलं जात होतं', असं मार्क टुली यांच्या 'अमृतसर : इंदिरा गांधीज् लास्ट बॅटल' मध्ये नमूद केलं आहे.

अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं बघून भारत सरकारने लष्कराची मदत घेत ऑपरेशन ब्लू स्टार घडवलं. या मोहिमेत लष्कर सुवर्ण मंदिरात घुसलं. या कारवाईत भिंद्रनवाले आणि त्यांचे अनके अनुयायी मारले गेले.

या कारवाईदरम्यान मंदिरातल्या जुन्या लायब्ररीलाही आग लागली. त्यात अनेक जुनी हस्तलिखितं आणि ग्रंथ जळून राख झाले. प्रत्यक्ष सुवर्ण मंदिराच्या दिशेनेही गोळ्या मारल्या गेल्याने शीख समाजाचा भडका उडाला.

या संपूर्ण कारवाईदरम्यान पंजाबच्या गावागावांमधल्या शीख तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या तरुणांकडे संशयास्पद नजरेनं बघितलं जात होतं.

त्यावेळी पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते. पंजाब हातातून निघून जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. याबाबत तुम्ही इथं सविस्तर वाचू शकता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)