अफगाणिस्तानात शिख आणि हिंदू राहाणारच नाहीत?

    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, काबूलहून

15 ऑगस्ट रोजी तालिबानला अफगाणिस्तानात सत्तेत येऊन 1 वर्षं पूर्ण झालं. या परिस्थितीत राजधानी काबूलसह अन्य भागात एक मोठा हल्ला झाल्यामुळे तणावाचं वातावरण आहे.

देशातील लढाई संपुष्टात आली असली तरी या देशात शांतता नाही असंच दिसून येतं.

या वातावरणातच आम्ही काबूलच्या मध्यभागी पोहोचलो. लोखंडी जाड पत्र्यानं बनवलेलं दार ठोठावल्यावर छोट्या जाळीच्या खिडकीतून एका व्यक्तीनं संशयास्पद नजरेनं आमच्याकडे पाहिलं.

ते प्राचीन असामाई मंदिराचे पुजारी आणि अफगाणिस्तानात राहिलेल्या मोजक्या हिंदूंपैकी एक हरजित सिंग चोप्रा होते.

या मंदिरात देवीची पूजा केली जाते, इथं अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. इथं शिवालय असून भोलेनाथाची पूजाही केली जाते. यासोबतच श्रीमद भागवत, रामायणही आहे.

मंदिराच्या या मोठ्या प्रांगणात गार्ड व्यतिरिक्त हरजित सिंग त्यांची पत्नी बिंदिया कौर यांच्यासोबत राहातात.

तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानातील सुरक्षेच्या कारणास्तव या दोघांची कुटुंबं भारतात आली आहेत, पण हरजित आणि बिंदिया इथंच राहिले.

संभाव्य हल्ल्यांच्या भीतीने या मंदिरातील पूजा अत्यंत शांततेनं केली जाते.

पुजेची माहिती मिळाल्यावर अतिरेकी हल्ला करू नये, म्हणून पूजा सुरू असताना चित्रीकरण करण्यास परवानगी दिली जात नाही.

एकेकाळी अफगाणिस्तानातील खोस्त भागात मसाले कामगार म्हणून काम करणारे हरजित सांगतात, "आम्ही देवीच्या पायाशी बसलो आहोत. आम्ही तिची सेवा करत आहोत. आम्ही घाबरणार नाही. आम्ही हे देवीचं मंदिर सोडणार नाही."

ते पुढे म्हणतात, "अफगाणिस्तानात किमान 8 ते11 हिंदू उरले आहेत. सात-आठ घरे आहेत. एक माझं घर आहे. एक राजाराम यांचं घर आहे, गझनीत. एक-दोन घरं कार्ती परवानमध्ये आहेत. एक दोन घरं शेर बाजारात आहेत. ते गरीब लोक आहेत. असेही काही लोक आहेत ज्यांना पासपोर्ट म्हणजे काय हे देखील माहित नाही. ते लोक सुशिक्षित नाहीत. ते सुरुवातीपासून इथं लहानाचे मोठे झाले आहेत.

"जलालाबादमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर जवळपास 600 ते 700 लोक भारतात गेले. शेर बाजार (काबुलमध्ये) बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्यात 30 घरं उद्ध्वस्त झाली. त्यामुळे 200 लोक पुन्हा भारतात गेले. जेव्हा तालिबान आलं, तेव्हा भीतीपोटी आणखी लोक भारतात गेले. कार्ती परवानमध्ये हल्ला झाला तेव्हा 50 ते 60 जण भारतात गेले. आम्ही इथं सेवेसाठी, मंदिरासाठी थांबलो आहोत. इथं हिंदू किंवा शीख यांचं मन लागत नाही. प्रत्येकाला भारतात जायचं आहे."

2018 मध्ये जलालाबादमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात आणि 2020 मध्ये काबूलमधील गुरुद्वारावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेक शीख मारले गेले होते.

या वर्षी जूनमध्ये काबूलमधील कार्ती परवान गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यात एका शीख व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

बिंदिया कौर यांचं संपूर्ण कुटुंब भारतात आहे. इथं त्यांचा संपूर्ण दिवस घरकाम आणि मंदिराची सेवा करण्यात जातो.

त्या सांगतात, "पूर्वी मंदिरात 20 कुटुंबं राहत होती. भीतीमुळे काही लोक निघून जाऊ लागले. नंतर 5 कुटुंबं इथं राहिली. नंतर ते सगळे हळूहळू इथून निघून गेले. आधी खूप स्फोट होत होते. गेल्या वर्षी तालिबानीचे लोक आले, मग राहिलेले लोकही निघून गेले आणि आम्ही एकटे राहिलो."

बिंदिया यांच्या घराशेजारच्या रिकाम्या खोल्या आणि दारांना लावलेली कुलूपं भूतकाळाची गोष्ट सांगतात.

हिंदू आणि शीख संपुष्टात येत आहेत

मंदिरापासून हाकेच्या अंतरावर कार्ती परवान परिसर आहे.

काबूलच्या इतर भागाप्रमाणेच इथंही सर्वत्र चेकपोस्ट आहेत आणि रस्त्यावर बंदुका घेऊन तालिबानी सैनिक दिसत आहेत.

एक काळ असा होता जेव्हा कार्ती परवान परिसर अफगाण हिंदू आणि शिखांची दुकानं आणि घरांनी वेढलेला होता.

स्थानिक रहिवासी राम सरन भसीन म्हणतात, "एकेकाळी हा संपूर्ण परिसर हिंदूंचा आणि सरदारांचा होता. चलन, कपड्यांचा व्यवसाय हिंदूंचा होता. इथं हिंदू डॉक्टर होते. सरकारी पदांवर हिंदू होते. हिंदू सैन्यातही होते."

त्यांना भूतकाळ आठवतो. त्यांना ते दिवस आठवतात जेव्हा काबुलवर रॉकेटचा पाऊस पडत होता आणि त्यांच्या घरावर रॉकेट पडले पण त्याचा स्फोट झाला नाही.

ते सांगतात, "मी घरी नव्हतो. माझी पत्नी घरीच होती. देवानं तिला वाचवलं. रॉकेटचा स्फोट झाला नाही ते चांगलं झालं. जर त्याचा स्फोट झाला तर ना माझं घर राहिले असते, ना माझी पत्नी."

पण आज तालिबानच्या अधिपत्याखालील अफगाणिस्तानात लोक भीतीच्या छायेखाली राहत आहे.

ते आपापल्या घरात कोंडले गेले आहेत किंवा फार महत्वाचं काम असेल तरच ते काही वेळासाठी बाहेर निघत आहेत.

एका शोधानुसार, 1992 पूर्वी अफगाणिस्तानात 2 लाख 20 हजारांहून अधिक हिंदू आणि शीख होते.

पण गेल्या 30 वर्षांत हिंदू आणि शीखांवर होणारे हल्ले, भारत किंवा इतर देशांत होणारं स्थलांतर यामुळे त्यांची संख्या आज 100 च्या आसपास आली आहे आणि ही संख्या सातत्यानं कमी होत आहे.

पोर्सेश रिसर्च अँड स्टडीज ऑर्गनायझेशन ही अफगाणिस्तानमधील स्थानिक संस्था अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर काम करते.

तालिबानच्या आगमनानंतर ही संघटना बंद झाली असून संघटनेत काम करणारे अनेक लोक देश सोडून गेले आहेत.

या संघटनेनं अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीखांच्या स्थितीबाबत नुकत्याच एका अहवालात म्हटलं, "अफगाणिस्तानातून हिंदू आणि शिखांच्या पलायनाचा इतिहास हा 1980 च्या दशकातील सोव्हिएतचा कब्जा आणि देशातील कम्युनिस्ट सरकाराविरोधातील जिहादविरोधी चळवळीशी संबंधित आहे. तेव्हापासून देशात दररोज निर्बंध, अत्याचार आणि अल्पसंख्याकांचे पलायन सुरूच आहे."

या अहवालानुसार, 1960 ते 1980 हा काळ अफगाणिस्तानच्या हिंदू आणि शीखांसाठी सर्वांत शांत होता.

या काळात त्यांना लाला किंवा मोठा भाऊ म्हटलं जात होतं. या काळात त्यांचे सामान्य लोकांशी चांगले संबंध होते.

पण या लोकांचं सामूहिक स्थलांतर 1988 मध्ये सुरू झालं.

13 एप्रिल 1988ला बैसाखीच्या दिवशी जलालाबादमध्ये 13 शीख यात्रेकरू आणि 4 मुस्लिम सुरक्षा रक्षकांना एका बंदूकधाऱ्यानं गोळ्या घालून ठार केलं होतं.

त्यानंतर हे स्थलांतर सुरू झालं.

अपहरण, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय छळ तसंच जमीन आणि मालमत्ता बळकावणं इत्यादी बाबींमुळे हिंदू आणि शिखांची आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थिती बिघडली.

या अहवालाचे लेखक अली दाद मोहम्मदी हिंदू आणि शीख यांच्यावरील कथित भेदभावावर सांगतात, "जेव्हा हे लोकघरातून बाहेर पडत तेव्हा त्यांच्या मुलांना वाईट वागणूक दिली जात होती. त्यांना गैर-मुस्लिम, हिंदू कचालू असं म्हटलं जात होतं. ते अशा वातावरणात होते की त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता. एकतर अफगाणिस्तान सोडावं किंवा घराबाहेर जाऊ नये, इतकंच ते करू शकत होते. नंतर त्याची मालमत्ता आणि घरे ही बळकावण्यात आली."

काबूलमध्ये राहणाऱ्या मोहम्मदींच्या म्हणण्यानुसार, 10 प्रांतांमधील फील्डवर्कच्या आधारे त्यांना असं लक्षात आलं की, हिंदू मंदिरं आणि गुरुद्वारा नष्ट केले गेले आणि त्यांचा वापर कचरा किंवा जनावरे बांधण्यासाठीचा गोठा म्हणून केला गेला.

जे काही गुरुद्वारे हल्ल्यांपासून वाचले होते, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्यात आले.

कार्ती परवान गुरुद्वारावर हल्ला आणि दुरुस्ती

याच वर्षी जूनमध्ये कार्ती परवान भागातील अतिशय जुन्या गुरुद्वारावरील अतिरेकी हल्ल्यात एका शीख व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळं गुरुद्वाराचं बरंच नुकसान झालं होतं.

आम्ही कार्ती परवान गुरुद्वारात पोहोचलो तेव्हा तिथं तालिबानच्या आर्थिक मदतीनं दुरुस्तीचं काम चालू होतं.

गुरुद्वाराभोवती फिरल्यानंतर जूनमधील हल्ल्यामुळे गुरुद्वाराचे किती नुकसान झालंय हे दिसून आलं.

शिखांच्या इतिहासाशी संबंधित पुस्तके, खुर्ची, टेबल, सिक्युरिटी कॅमेरे, खिडक्या, गालिचे, कपाटे आणि इतर गोष्टी जळाल्याचं दिसून आलं. दुरुस्ती करणारे सर्व जण हे स्थानिक अफगाण होते, असं आम्हाला सांगण्यात आलं. गुरुद्वारात कुणी दगड घासत होतं, तर कुणी सफाई करत होतं.

ज्या दिवशी हल्ला झाला तेव्हा गुरुद्वाराचे केअरटेकर गुरनाम सिंग राजवंश तिथं आसपासच होते.

ते सांगतात, "आमचं घर गुरुद्वाराच्या मागं आहे. आम्ही तिथं राहतो. गुरुद्वारावर हल्ला झाल्याची बातमी समजल्यावर आम्ही इथं आलो. रस्ता बंद असल्याचं आम्ही पाहिलं. गुरुद्वारात 18 माणसं होती. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यात एक सविंदर सिंग होते जे बाथरूममध्येच शहीद झाले."

या मुलाखतीनंतर गुरनाम सिंग इतर हिंदू आणि शीख लोकांप्रमाणे भारतात गेले. पण अफगाणिस्तानमध्ये भारतीय व्हिसाची आतुरतेनं वाट पाहणारे अजूनही काही लोक आहेत.

काबूलला येण्यापूर्वी माझी दिल्लीतील टिळक नगर येथील गुरु अर्जुन देव जी गुरुद्वारामध्ये हरजीत कौर आणि त्यांच्या कुटुंबाशी भेट झाली.

त्या काही दिवसांपूर्वीच काबूलहून दिल्लीला पोहचल्या होत्या. त्यांच्या 3 मुलांपैकी सर्वांत लहान मुलाच्या हृदयात छिद्र आहे. दिल्लीला पोहचल्यानंतर त्या चिंताक्रांत अवस्थेत होत्या.

हरजीत यांनी सांगितलं, "तालिबान येण्याआधीही अफगाणिस्तानातील परिस्थिती वाईट होती आणि आता तर ती आणखी वाईट झाली आहे. तिथं बॉम्बस्फोट आणि सततच्या गोळीबारामुळे आमच्या जीवाला धोका जास्त होता. दिवसभर घराला कुलूप लावून बसावं लागायचं. यामुळे मुलांचं शिक्षण बंद झालं होतं."

गुरनाम सिंग पुढे सांगतात की, अफगाणिस्तानात असेही काही लोक आहेत जे भारतात गेले, पण त्यांना कुटुंब किंवा व्यवसायाशी संबंधीत गोष्टींमुळे अफगाणिस्तानात परत यावं लागलं.

अल्पसंख्याकांवर हल्ले सुरूच

कार्ती परवान गुरुद्वारा हा रस्त्याच्या एका बाजूला आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शिखांची दुकानं आहेत.

त्यापैकी एका दुकानावर जुलै महिन्यात अज्ञात लोकांनी ग्रेनेडनं हल्ला केला होता.

हल्ल्यामुळे या औषध दुकानाचं 4 लाख अफगाण रुपयांपर्यंत नुकसान झालं. पण, सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही.

दुपारी हल्ला झाला त्यावेळी दुकान मालक अरिजित सिंग जवळच्या एका दुकानात जेवणासाठी गेले होते आणि तोच त्याना त्यांना मोठा आवाज ऐकू आला.

"काय झालं ते पाहण्यासाठी आम्ही बाहेर पडलो, तर मला माझ्या दुकानातून धूर निघताना दिसला. दुकानाचा काउंटर इथंच मधोमध पडलेला होता. तो इतका चिरडला गेला होता की विचारू नका. खालच्या बाजूस सगळे सामान विखुरले होते."

अरिजित यांच्या आयुष्यावर कट्टरवादाचा परिणाम याआधीपासूनच झाला आहे.

अरिजित सांगतात, कार्ती परवान गुरुद्वारा हल्ल्यात शहीद झालेला सविंदर सिंग हामाझा मेहुणाहोता. यापूर्वी 2018च्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबीयांचाही मृत्यू झाला होता.

त्यांच्या दुकानाशेजारी औषधांचं दुकान चालवणारे सुखबीर सिंग खालसा यांच्या म्हणण्यानुसार, ग्रेनेड हल्ल्यामुळे हिंदी आणि शीख लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे.

ते सांगतात, "काल तिथं हल्ला झाला होता. आज इथंही होऊ शकतो. माझी ड्युटी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आहे. मी नुकताच दुपारी साडेतीन वाजता दुकानात आलो आहे. बायको-मुलं मला घरून सोडत नाहीत. गुरुद्वाराही बंद आहे. आम्ही गुरुंचं दर्शन घेऊ शकत नाही. माझ्यावर काय परिस्थिती आहे, ते मलाच माहिती आहे."

सुखबीर सिंग खालसा यांच्या घरातील प्रत्येकाला भारतीय व्हिसा मिळाला आहे, पण त्यांच्या पत्नीचा व्हिसा अद्याप मिळालेला नाही. ते याची वाट पाहत आहेत. अशी काही कुटुंबे आहेत ज्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना व्हिसा मिळाला आहे, तर काही भारतीय व्हिसाच्या प्रतीक्षेत आहेत.

आमचं धोरण सर्वांचं संरक्षण करणारं आहे, असं अफगाणिस्तानातून पलायन करणार्‍या हिंदू आणि शिखांविषयी विचारल्यावर तालिबानचं म्हणणं आहे.

काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद झादरान यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितलं, "आमचं धोरण प्रत्येकाचं म्हणजे अफगाणिस्तानातील प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्याचं आहे आणि ते हिंदू आणि शीख अल्पसंख्याकांनाही लागू होतं. आम्ही त्यांना संरक्षण देत आहोत. जर त्यांना वाटत असेल की त्यांच्या जीवाला धोका आहे, तर त्यांनी ही माहिती आमच्या सैन्याला दिली पाहिजे. आमचं सैन्य त्यांच्या संरक्षणासाठी सज्ज आहे."

तालिबानी सैन्य मोठमोठ्या शस्त्रांसह रस्त्यावर गस्त घालताना दिसत आहेत.

अफगाणिस्तान अनेक दशकांपासून युद्ध, बॉम्बस्फोट, ठरवून केलेल्या हत्या यांच्या छायेत जगत आहे.

आंतरराष्‍ट्रीय निधी बंद पडली आहे, देशात गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये दुष्काळ आणि भूकंपाची स्थिती ओढवली आहे. त्यामुळे देशाची अर्थव्‍यवस्‍था बिघडली असून लोकांवर भीक मागायची वेळ आली आहे.

लोकांसाठी जेवण, औषधांची व्यवस्था करणं कठीण झालं आहे.

ज्याला शक्य आहे, तो प्रत्येक जण देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे.

ज्याप्रकारे बामियानमध्ये बौद्ध शिल्लक राहिले नाहीत किंवा पश्चिम अफगाणिस्तानमधून ख्रिश्चन स्थलांतरित झाले, त्याप्रकारे तो दिवस दूर नाही जेव्हा इतिहासकार म्हणतील की, एक काळ असा होता जेव्हा अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख लोक राहत होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)