You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तान : तालिबाननं सैनिकांच्या नव्या पथकाला दिलं 'पानिपत' नाव
अफगाणिस्तानातील नानगरहर या पूर्वेकडील प्रांतात एक नवीन लष्करी पथक 'पानिपत ऑपरेशनल अँड सिक्युरिटी युनिट' स्थापन करण्यात आल्याचं तालिबानने जाहीर केलं आहे.
'नानगरहर मीडिया सेंटर' या स्थानिक गव्हर्नरच्या माध्यम कार्यालयाने 11 फेब्रुवारीला ट्विटरवरून या संदर्भात पार पडलेल्या सैनिकी समारोहाची छायाचित्रं प्रसिद्ध केली.
"पूर्व क्षेत्रीय संघटनेचे अध्यक्ष आणि नानगरहरचे गव्हर्नर मावलावी मोहम्मद दावूद मोझमील, उप-गव्हर्नर हाजी मुदस्सीर व हाजी मुल्ला साहिब, मौलवी निआझ मोहम्मद वहाझ आणि इतर अधिकारी या समारोहासाठी उपस्थित होते," असं माध्यम कार्यालयाने म्हटलं आहे.
यावेळी केलेल्या भाषणात गव्हर्नरांनी सैनिकांमधील ऐक्यासाठी आवाहन केलं.
"मुजाहिदिनां'नी म्हणजेच तालिबानी जवानांनी लोकांना चांगलं वागवावं आणि आपली कर्तव्यं व्यावसायिकतेने पार पाडावीत," असं त्यांनी सांगितलं.
उत्तर भारतातील पानिपत या शहरात अठराव्या शतकामध्ये मराठा साम्राज्याचं लष्कर आणि अफगाणी राजा अहमद शाह अब्दालीच्या फौजा यांच्यात लढाई झाली होती. या लढाईत अब्दालीच्या फौजा जिंकल्या.
तालिबानने हे पथक स्थापन केल्याबद्दल ट्विटरवरील त्यांच्या समर्थकांनी व इतर काही प्रभावी व्यक्तींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
"ईश्वराची कृपा असेल तर पानिपत पथकामुळे अब्दाली बाबाच्या जिहादाची स्मृती जागी होईल," असं @Abadel3030 या ट्विटर वापरकर्त्याने म्हटलं.
"नानगरहरमध्ये पानिपत पथक स्थापन होणं, हा गोभक्तांसाठी स्पष्ट संदेश आहे. आम्ही आमच्या पूर्वजांचा इतिहास विसरलेलो नाही, नानगरहर काश्मीरच्याही जवळ आहे," असं तालिबानसमर्थक आणि स्वतःला मुक्त समर्थक म्हणवणाऱ्या अब्दाली कुंदुझी याने म्हटलं आहे.
ट्विटरवर त्याचे 59 हजार 300 फॉलोअर आहेत.
"ईश्वराची कृपा असेल तर पानिपत पथकामुळे अहमद शहा अब्दाली आणि महमूद गझनी यांच्या जिहादी स्मृती नव्याने जाग्या होतील," असं आणखी एकाने ट्विटरवर म्हटलं.
तालिबान डेली शरियत या ट्विटर खात्यावरून (@dailyshariat) भारतातील मुस्लिमांच्या छळाचा उल्लेख करण्यात आला, "ईश्वराची कृपा आहे, म्हणून ईश्वराने आम्हाला ज्ञानी व हुशार नेते दिले.
पानिपतच्या लढाईचं नेतृत्व अहमद शहा बाबा (अल्लाह त्याच्यावर कृपा राहो) करत होते. भारतातील मुस्लिमांच्या पाठबळावर ते लढले. आज भारतीय मुस्लिमांचा छळ होतो आहे, त्यामुळे मुजाहिदिनांच्या या पथकाचं नाव पानिपतवरून ठेवण्यात आलं आहे."
इतर काहींनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.
"सध्याच्या संवेदनशीर परिस्थितीमध्ये अफगाणी इस्लामी अमिरातीवर विविध प्रकारचे दबाव आहेत, अशा वेळी या पथकाला पानिपतचं नाव देण्याची काय गरज होती, असा माझा प्रश्न आहे. अफगाणी इस्लामी अमिरातीने गतकाळाचा लाभ घ्यावा आणि जगाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेऊ नये. काय माहीत, कदाचित नेत्यांचा स्वतःचा काही वेगळा तर्क यामागे असेल," असं स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणाऱ्या @QASIMMAL2 याने ट्विटरवर म्हटलं आहे.
अफगाणिस्तानचा प्रदेश इतर कोणत्या देशाविरोधात वापरला जाणार नाही, या तालिबानी धोरणाविरोधात जाणारा हा निर्णय आहे, असंही ट्विटवरील काही प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)