लैंगिक अत्याचाराविरोधातलं कोट्यवधी महिलांचं जालीम हत्यार

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गर्दीत आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा लैंगिक छळ भारतात प्रत्येक महिलेनं सहन केला आहे. छाती दाबली जाणे, नितंबांना चिमटा घेतला जाणे, हाताच्या कोपराने छाती दाबली जाणे, अंगाला खेटून सर्वांगाला स्पर्श होणे, अशा अनेक प्रकारच्या लैंगिक छळांचा महिलांनी गर्दीमध्ये सामना केलेला असतो.

अशावेळा प्रतिकार करण्यासाठी महिला त्यांच्याकडे असलेल्या कुठल्याही वस्तूचा वापर करतात. उदाहरणार्थ मी आणि माझ्या मैत्रिणी कोलकात्यात दशकभरापूर्वी विद्यार्थीदशेत असताना बस किंवा ट्राममधून प्रवास करताना छत्रीचा वापर प्रतिकारासाठी करायचो.

काही मुली त्यांच्या वाढलेल्या नखांचा वापर करायच्या. गर्दीमध्ये स्वतःचं लिंग महिलेला घासणाऱ्या पुरुषांचा समाचार घेण्यासाठी अनेकदा महिला त्यांच्या सँडलच्या टोकदार हिलचादेखील वापर करतात.

पण अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक महिलेकडे असलेलं हक्काचं आणि जालीम हत्यार म्हणजे – सेफ्टी पिन

सेफ्टी पिनचा शोध 1849 मध्ये लागला. तेव्हा पासून महिला अंगावरचे कपडे जोडून ठेवण्यासाठी जगभरात सेफ्टी पिनचा वापर करत आहेत.

शिवाय सेफ्टी पिन महिलांचं लैंगिक छळाविरोधातलं सर्वांत मोठं हत्यार म्हणूनही जगभरात प्रसिद्ध आहे.

काही दिवसांपूर्वी ट्विटरवरच्या एका मोहिमेत अनेक महिलांनी हे मान्य केलं होतं की त्या त्यांच्या सुरक्षेसाठी पर्समध्ये एकतरी सेफ्टीपिन ठेवतातच.

त्यापैकीच एक आहेत – दीपिका शेरगील.

दीपिका यांनी त्यांच्याबरोबर घडलेला प्रकार ट्विटरवर मांडला. दहा वर्षांपूर्वी ऑफिसला जाताना बसमध्ये त्यांच्याबाबत जे घडलं होतं ते त्यांना आजही संपूर्णपणे आठवतं. बीबीसीशी बोलताना त्यांनी सविस्तरपणे त्याची माहिती दिली.

दीपिका तेव्हा साधारण 20 वर्षांच्या होत्या. आणि त्यांचा लौंगिक छळ करणारा पुरूष साधारण चाळिशीत होता. तो रोज करड्या रंगाची सफारी, पायात सँडल आणि काखेत बॅग घेऊन बसमध्ये चढायचा.

“तो रोज बसमध्ये माझ्या बाजूला येऊन उभा राहायचा. खेटायचा प्रयत्न करायचा. त्याचा गुडघा माझ्या अंगाला घासायचा. ड्रायव्हरने ब्रेक मारला की लगेच संधी साधून माझ्या अंगावर पडायचा.”

“त्यावेळी मी खूप घाबरायचे. उगाच लोकांच्या नजरा आपल्यावर नको, उगाच चर्चा नको म्हणून अनेक महिने मी ते सहन केलं.”

पण एकेदिवशी संध्याकाळच्या बसमध्ये त्याने हद्दच केली. “त्याने माझ्या खांद्यावर हस्तमैथुन केलं,” दीपिका सांगतात.

“मला खूपच घाण वाटलं. घरी पोहोचल्यानंतर मी खूप वेळ आंघोळ केली. पण, मी माझ्या आईला काहीच सांगितलं नाही.”

“ती संपूर्ण रात्र मी जागीच होते. नोकरी सोडून देण्याचादेखील विचार केला. पण नंतर मात्र मी त्याचा बदला कसा घेता येईल हा विचार सुरू केला. मला त्याला असा धडा शिकवायचा होता की पुन्हा त्याची असं काही करण्याची हिंमतच होणार नाही.”

दुसऱ्या दिवशी सकाळी दिपिकांनी प्लॅट चप्पल ऐवजी टोकदार सँडल घातले. एक सेफ्टीपिन हातात घेतली आणि बसमध्ये चढल्या.

“जसा तो बसमध्ये आला मी त्याच्या समोरच उभी राहिले. माझ्या जागेवरून उभी राहात मी त्याच्या पायाचा अंगठा माझ्या सँडलच्या हिलने चांगलाच दाबला. त्याला दुखल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मला फार आनंद झाला. जसा त्याने माझ्या आंगावर येण्याचा प्रयत्न केला मी त्याला सेफ्टी पिन टोचली आणि लगेच बसमधून उतरले.”

त्यानंतर पुढे एक वर्ष दीपिका यांनी त्या बसने रोज प्रवास केला. पण दीपिकांनी त्याला धडा शिकवल्यानंतर तो पुरूष नंतर कधीच त्या बसमध्ये त्यांना दिसला नाही.

दीपिका यांची ही स्टोरी खूपच धक्कादायक आहे. पण ती दुर्मीळ अजिबात नाही.

माझ्या एका सहकारी महिलेनंदेखील अशाच प्रकाराचा सामना केला होता. आता ती 30 वर्षांची आहे. कोचीन वरून बेंगलुरूला ती रात्रीच्या बसने प्रवास करत होती. तेव्हा एक पुरूष सतत तिला पाय आणि हातांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता.

“सुरुवातीला मी खूप घाबरले आणि ते चुकून झालं असेल असं वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केलं.”

पण तो सतत तसंच करत राहिल्यानंतर मात्र तो हे जाणूनबुजून करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यावेळी तिने देखील स्वतःच्या बचावासाठी सेफ्टी पिनचा वापर केला आणि वेळ मारून नेली.

“मी त्याला पिन टोचली. पण तरी तो हात आणि पायाने स्पर्श करत राहिला, मीही त्याला पिन टोचत राहिले. शेवटी तो थांबला. बरं झालं तेव्हा माझ्याकडे सेफ्टी पिन होती. पण मला आता आश्चर्य वाटतं की मी तेव्हा त्याला मागे वळून थोबाडात का मारली नाही,” ती सांगत होती.

“पण मी जर आरडाओरडा केला असता तर लोकांनी मला साथ दिली नसती अशी भीती मला तेव्हा वाटली होती,” असंही ती सांगते.

महिलांमध्ये असलेली भीती आणि त्यांना वाटणाऱ्या लज्जेमुळे असं कृत्य करणाऱ्या पुरुषांना प्रोत्साहन मिळत असल्याचं महिला कार्यकर्त्या सांगतात.

2012मध्ये भारतातल्या 140 शहरामध्ये एक ऑलनाईन सर्व्हे घेण्यात आला होता. त्यानुसार, 56 टक्के महिलांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना लैंगिक छळाचा सामना केला आहे. पण, त्यापैकी केवळ 2 टक्के महिलांनी त्याची पोलिसात तक्रार केली आहे.

तर सर्वाधिक महिलांचं म्हणण होतं की त्यांनी स्वतःच याचा सामना केला आणि धडा शिकवला किंवा दुर्लक्ष केलं. तर दुर्लक्ष केलेल्या महिलांचं म्हणण होतं त्यांना प्रकरण वाढवायचं नव्हतं.

तब्बल 52 टक्के महिलांनी असुरक्षिततेच्या भावनेमुळे त्यांच्या शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये मर्यादा घालून घेतल्याचं या सर्व्हेमध्ये पुढे आलं होतं.

“प्रत्यक्ष लैंगिक हिंसेपेक्षा त्याचा भीतीनेच महिलांच्या वैचारिकतेवर आणि सांचारावर मोठी मर्यादा आणली आहे,” असं कल्पना विश्वनाथ सांगतात.

सेफ्टीपिन नावाच्या संस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत. सार्वजनिक ठिकाणं महिलांसाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक करण्यासाठी ही संस्था काम करते.

“महिलांनी स्वतःवर बंधनं घालून घेतल्यामुळे त्या पुरुषांच्या तुलनेच समान नागरीहक्कांपासून वंचित राहतात. प्रत्यक्ष लैंगिक छळवणुकीपेक्षाही याचा त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला आहे.”

अशा प्रकारचा लैंगिक छळ ही फक्त भारतीय महिलांनाच भेडसावणारी समस्या नसल्याचं कल्पना विश्वनाथ सांगतात.

ही एक जागतिक समस्या आहे. थॉमस रॉयटर्स फाउंडेशनने जगभरातल्या 1000 महिलांचा सर्व्हे केला. लंडन, न्यूयॉर्क, मेक्सिको सिटी, टोकियो, कैरोसारख्या शहरातल्या महिलांचा त्यात सहभाग होता.

त्यानुसार, “सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा प्रकारे महिलांचं लैंगिक शोषण होणारी केंद्र ठरत आहेत जिथं गर्दीच्यावेळी छळ करणारे पुरूष संधी साधतात आणि पकडले गेल्यावर बाहाणे सांगतात.”

लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतदेखील महिला त्यांच्या सुरक्षेसाठी सेफ्टीपिन वापरत असल्याचं समोर आलं आहे, असं कल्पना सांगतात.

अमेरिकेतल्या स्मितसोनियान मासिकातील एका लेखानुसार 1990 च्या दशकात अनेक महिला अशा पुरुषांचा सामना करण्यासाठी त्यांच्या हॅटपिनचादेखील वापर करत.

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाची मोठी व्याप्ती वेगवेगळ्या जागतिक सर्व्हेतून समोर येऊनदेखील ही गंभीर समस्या असल्याचं भारत मान्य करण्यास तयार नाही.

याचा मोठं कारण अशा प्रकारच्या छळांच्या कमी येणाऱ्या तक्रारी असल्याचं कल्पना सांगतात. परिणामी ते गुन्ह्यांच्या आकड्यांमध्ये अजिबात दिसून येत नसल्याचं कल्पना यांना वाटतं.

महिलांना आकर्षिक करण्यासाठी, त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांची छेड काढणं हे फारच कॉमन असल्याचं सिनेमांमधून दाखवलं जातं, त्यामुळेदेखील त्याच्या तक्रारी होत नसल्याचं कल्पना सांगतात.

पण गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या अनेक शहरांमध्ये परिस्थिती खूप सुधारत असल्याचं कल्पना सांगतात.

दिल्लीसारख्या शहरामध्ये आता बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, पॅनिक बटन बसवण्यात आले आहेत. शिवाय जास्ती जास्त महिलांना ड्रायव्हर म्हणून कामावर घेण्यात आलं आहे. महिला प्रवाशांशी कसं वागावं याचं ट्रेनिंग आता ड्रायव्हर आणि कंडक्टरला दिलं जात आहे.

मुंबईतील लोकल ट्रेन आणि दिल्लीतील बसमध्ये आता मार्शल किंवा पोलीस जवानसुद्धा तैनात केले जात आहेत. तसंच वेगवेगळ्या शहरांमध्ये पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन आणि मोबाईल ऍप्स लॉन्च केले आहेत.

हा विषय फक्त पोलिसींगचा नाही, असं कल्पना यांना वाटतं.

“यावर जास्तीत जास्त बोललं गेलं पाहिजे. मीडियानं यावर मोहीम राबवली पाहिजे. जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी महिलांशी कुठलं वागणं योग्य आहे आणि कुठलं अयोग्य हे लोकांच्या डोक्यात फिट बसेल.”

जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत दीपिका शेरगील, माझी सहकारी आणि कोट्यवधी महिलांना त्यांची सेफ्टी पिन तयार ठेवावीच लागणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)