You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजप नेत्याने मुलीचं लग्न मुस्लिम मुलाशी ठरवलं आणि मग...
- Author, राजेश डोबरियाल
- Role, डेहराडूनहून, बीबीसी हिंदीसाठी
एक मुसलमान तरुण आणि भाजपच्या हिंदू नेत्याची मुलगी यांचं लग्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
उत्तराखंडमधल्या पौडी नगरपालिकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार यशपाल बेनाम यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका छापल्यानंतर व्हायरल झाली आणि हे लग्न वादाच्या भोवऱ्यात सापडलं.
शनिवारी बेनाम यांनी लग्नसोहळा स्थगित करत असल्याची घोषणा केली. यशपाल बेनाम यांच्या मुलीचं लग्न अमेठीतल्या एका मुस्लीम मुलीशी होत आहे. या लग्नाला दोन्हीकडच्या घरच्यांची परवानगी आहे. पौडी इथे 25, 26, 27 तारखेला लग्नसोहळा होणार होता.
लग्नासाठी योग्य वातावरण नसल्याचं कारण देत बेनाम यांनी लग्नसोहळा रद्द केला आहे.
21व्या शतकातली मुलं, आपापले निर्णय घेऊ शकतात
तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लग्नाची पत्रिका व्हायरल होऊ लागली. मोनिका आणि अमेठी इथे राहणारे मोनिस खान यांच्या लग्नसोहळ्यात उपस्थित राहण्याचं निमंत्रण वधूची आई उषा रावत आणि वडील यशपाल बेनाम यांनी दिलं होतं.
पत्रिका व्हायरल झाल्यानंतर यशपाल बेनाम यांना ट्रोल करण्यात येऊ लागलं. मुलीचं लग्न एका मुस्लीम मुलाशी करुन देत असल्याबद्दल लोक टीका करु लागले.
यशपाल बेनाम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मुलं 21व्या शतकातली आहेत आणि स्वत:चे निर्णय स्वत:च घेऊ शकतात.
मुलीचा आनंद लक्षात घेऊन आम्ही तिला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असं बेनाम यांनी सांगितलं. दोन्हीकडच्या घरच्यांच्या सहमतीनंतर लग्न ठरलं."
पण प्रकरण ट्रोलिंगपुरतं मर्यादित राहिलं नाही. बेनाम यांना धमक्याही मिळू लागल्या. या लग्नाविरोधात आंदोलनंही होऊ लागली.
का हिंदुत्ववादी संघटनेने बेनाम यांच्याशी फोनवर केलेली बातचीत व्हायरल झाली होत. हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता बेनाम यांना हे लग्न होऊ नये यासाठी धमकी देत असल्यचाचं स्पष्ट होतं.
बद्रीनाथ यात्रेसाठी निघालेले हरियाणाचे बजरंग दलाचे कार्यकर्ते शनिवारी पौडी इथे पोहोचले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत या लग्नाला विरोध केला.
कोटद्वार इथे बजरंग दलाने या लग्नाला विरोध केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी यासंदर्भात माहिती नसल्याचं सांगितलं आणि हा बेनाम यांचा वैयक्तिक विषय असल्याचं त्यांनी सांगितलं.
लग्नासाठी योग्य वातावरण नाही
मुलीच्या आवडीनिवडीचा आणि पसंतीचा विचार करणारे बेनाम यांनी युटर्न घेतला. सध्याचा काळ 21व्या शतकातल्या स्वतंत्र विचारांच्या मुलामुलींचं असल्याचं ते म्हणाले होते.
त्यांनी एका स्थानिक टेलिव्हिजन वाहिनीशी बोलताना सांगितलं, "जे वातावरण निर्माण झालं ते पाहता आम्ही आणि शुभचिंतकांनी एकत्र येत 25,26, 27 रोजी होणारा लग्नसोहळा आम्ही स्थगित केला आहे".
बेनाम म्हणाले, "मुलाकडची माणसंही लग्नसोहळ्याला इथे आली असती. त्यांच्या मनात साहजिकच भीतीचं वातावरण तयार होणं साहजिक आहे. पोलिसांच्या उपस्थितीत हे लग्न झालं असतं तर ते योग्य दिसणार नाही.
यामुळे आम्ही घरच्यांनी हे लग्न स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कारण सध्याचं वातावरण सौहार्दपूर्ण नाही. त्यामुळे हे लग्न तूर्तास होणार नाही".
"लोकांची संख्या खूप आहे आणि त्यांचे विचारही वेगवेगळे आहेत. माझी कोणाबद्दल काही तक्रार नाही. पण वातावरण असं नाही की लग्न होऊ शकेल.
ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत, उलटसुलट गोष्टी बोलल्या जात आहेत. अनेक संघटना आमच्याविरोधात आंदोलनं, निषेध करत आहेत. मला असं वाटत नाही की माझे पाहुणे तसंच माझ्या मतदारसंघात लोकांमध्ये चुकीचा संदेश जावा असं मला वाटत नाही".
ते पुढे म्हणतात, "आता पुढे काय होणार, कसं होणार हे बैठक घेऊन ठरवू. दोन्हीकडच्या घरच्यांनी एकत्र येऊन या लग्नाचा निर्णय घेतला होता. आता हीच मंडळी एकत्र बसतील आणि पुढचा मार्ग ठरवतील".
राजकारणावर परिणाम
यशपाल बेनाम यांची पौडीवरच्या राजकारणावर घट्ट पकड आहे. 2018 मध्ये ते पौडी नगरपालिकेचे तिसऱ्यांदा अध्यक्ष झाले. चौथ्यावेळीही या पदी विराजमान होण्याची त्यांची मनीषा होती. ते एकदा पौडीचे खासदारही राहिले आहेत.
हा वाद त्यांच्या राजकारणासाठी नुकसानदायी ठरू शकतो. पौडीचे स्थानिक पत्रकार डॉक्टर वी.पी.वलोदी यांनी सांगितलं की, "हे लग्न झालं असतं तर पौडीतली साडेतीन हजार मुस्लीम मतं एकगठ्ठा त्यांच्या पारड्यात पडली असती. हिंदू मतदार नाराज आहे. जर त्यांना भाजपचं तिकीट मिळालं असतं तर त्यांना भाजपच्या नावावर हिंदू मतंही मिळाली असती आणि त्यांचा विजय पक्का झाला असता".
वलोदी हेही सांगतात की पौडी इथे आता कोणताही तणाव नाही. मीडिया आणि सोशल मीडियावर जे दिसतं तसं प्रत्यक्षात काहीच नाही.
पत्रकार अजय रावत सांगतात, "प्रकरण इतकं पेटेल याची बेनाम यांना कल्पना नव्हती. या वादाचा थेट परिणाम त्यांच्या राजकारणावर होणार आहे".
ते पुढे सांगतात, "मुस्लीम मतांना घेऊन पुढे जाणारं त्यांचं नेतृत्व आहे. जेव्हापासून ते भाजपमध्ये आले आहेत तेव्हापासून त्यांची भाजपची मतं घटू लागली आहेत. म्हणून या लग्नसोहळ्याचं रुपांतर त्यांनी भव्य कॉन्सर्ट(संगीतरजनी) मध्ये करुन टाकलं. बेनाम यांचा हा विचार त्यांच्या राजकारणासाठी आत्मघातकी ठरू शकतो. ध्रुवीकरण झालंच तर ते दोन्ही बाजूंना होईल".
दुसरीकडे सोशल मीडियावर चर्चा आहे की सामाजिक कारणांमुळे नव्हे तर कौटुंबिक कारणांमुळे बेनाम यांनी हे पाऊल उचललं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)