हिंदू-मुस्लीम विवाह : ब्राह्मण घरात वाढलेल्या रुपाला आई म्हणाली, ‘तो तुला तलाक, तलाक, तलाक बोलून घराबाहेर काढेल’

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतात जात किंवा धर्माबाहेर लग्न हे वादाचं कारण ठरू शकतं. भारतीय समाजात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना सहसा मान्यता मिळत नाही.

मात्र, इन्स्टाग्रामवर सध्या एक मोहीम सुरू आहे. प्रेमाला जात, धर्म, वंश आणि लैंगिकतेच्या वर स्थान देणाऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी इथं वाचायला मिळतात.

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाला रुढीवाद्यांचा कायम विरोध राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत देशात कट्टरता वाढली आहे.

काही दिवसांपूर्वीच 'तनिष्क' या दागिने बनवणाऱ्या कंपनीची एक जाहिरात आली होती. या जाहिरातीत एक मुस्लीम कुटुंब दाखवण्यात आलं होतं. ते आपल्या हिंदू सूनेसाठी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवतात आणि हे सरप्राईज बघून ती खूश होते.

मात्र, या जाहिरातीलाही मोठा विरोध झाला. अखेर त्यांना जाहिरात मागे घ्यावी लागली.

या जाहिरातीच्या माध्यमातून धार्मिक एकोपा जपण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, जाहिरातीवर टीका करण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

दुसरीकडे या जाहिरातीच्या माध्यमातून 'लव जिहाद'ला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं जाहिरातीचा विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होतं. विरोध करणाऱ्यांमध्ये कट्टर हिंदुत्त्वावाद्यांचा भरणा होता.

धर्मपरिवर्तनाच्या उद्देशाने मुस्लीम मुलं हिंदू मुलींशी लग्न करतात, असा एक समज आहे आणि त्याला 'लव्ह जिहाद' म्हणण्यात आलं आहे.

तनिष्कची जाहिरात आल्यानंतर तनिष्कवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात आलं आणि ट्विटरवर तो टॉप ट्रेंडही झाला. वाद वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा बघता आपण जाहिरात मागे घेत असल्याचं कंपनीने सांगितलं.

इंडिया लव्ह प्रोजेक्ट

तनिष्कच्या वादानंतर पत्रकार समर हलरंकर, त्यांच्या पत्रकार पत्नी प्रिया रमानी आणि त्यांच्या पत्रकार-लेखक मैत्रीण निलोफर व्यंकटरमन यांनी इंस्टाग्रामवर 'इंडिया लव्ह प्रोजेक्ट' सुरू केला.

या प्रोजेक्टचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे. सामाजिक बंधन मोडून प्रेम आणि लग्न करणारी जोडपी या अकाउंटवर आपली कहाणी शेअर करतात.

या द्वेषपूर्ण वातावरणात आंतरधर्मीय आणि आंतरजातीय प्रेम आणि लग्न सेलिब्रेट करण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू केल्याचं समर हलरंकर सांगतात.

बीबीसीशी बोलताना समर हलरंकर म्हणाले, "या प्रोजेक्टवर आम्ही गेल्या वर्षभरापासून विचार करत होतो. तनिष्कच्या जाहिरातीवरून वाद सुरू झाल्यावर हा प्रोजक्ट सुरू करण्यासाठीची ही सर्वोत्तम वेळ असल्याचं आम्हाला वाटलं."

"प्रेम आणि आंतरधर्मीय लग्नाविषयी जो दुष्प्रचार सुरू होता त्याची आम्हाला काळजी वाटत होती."

"प्रेमाचा अस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचा दुष्प्रचार सुरू होता. आम्ही अशा एकाही व्यक्तीला ओळखत नाही ज्याने प्रेम सोडून इतर कुठल्या कारणासाठी लग्न केलं."

ते म्हणतात, "आपली कहाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हाच इंडिया लव्ह प्रोजेक्टचा उद्देश आहे."

रोज एक प्रेम कहाणी

28 ऑक्टोबर रोजी निलोफर व्यंकटरमण यांच्या पारसी आई बख्तावर मास्टर आणि हिंदू पिता एस. व्यंकटरमण यांच्या प्रेमकहाणीने या प्रोजेक्टची सुरुवात झाली. आता या अकाउंटवरून रोज एक प्रेमकहाणी शेअर होते.

या अकाउंटला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं समर हलरंकर सांगतात. ते म्हणतात, "रोज अनेक लोक संपर्क करतात आणि स्वतःची, आई-वडिलांची, आजी-आजोबांची कहाणी शेअर करण्याची इच्छा असल्याचं सांगतात."

"प्रतिसाद इतका जास्त आहे की सांभाळणं अवघड आहे. यावरून भारतात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न नवीन नसल्याचंही कळतं. फार पूर्वीपासून भारतात अशी लग्न होत आहेत. असं असलं तरी आज या विषयी बोलणं कधी नव्हे इतकं महत्त्वाचं आहे."

भारतात 90% लग्न अरेंज्ड असतात. अशा अरेंज्ड मॅरिजमध्ये लोक आपल्याच जीत-धर्मातलं स्थळ शोधतात.

भारतीय मानव विकास सर्व्हेनुसार आंतरजातीय लग्नाचं प्रमाण केवळ 5% आहे आणि आंतरधर्मीय लग्नाचं प्रमाण तर अजूनही कमी आहे. एका सर्व्हेनुसार भारतात आंतरधर्मीय लग्नाचं प्रमाण 2.2% इतकं कमी आहे.

जे या सीमारेषेच्या पलिकडे जाऊन लग्न करतात त्यातल्या बहुतेक लोकांना हिंसेचा सामना करावा लागतो.

हळूहळू विचार परिवर्तन

गेल्या काही वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात आंतरधर्मीय विवाहांना विरोध वाढल्याचं दिसलं. विशेषतः हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा असेल तर अशा लग्नांना तर हमखास विरोध होतो.

समर हलरंकर म्हणतात,"फेब्रवारी महिन्यात कायद्यात 'लव्ह जिहाद'चा उल्लेख नसल्याचं आणि सरकारी संस्थांनाही अशी कुठली प्रकरणं आढळली नसल्याचं सरकारने संसदेत म्हटलं होतं. मात्र, लोकांना अजूनही असं वाटतं. गेल्या काही दिवसात भाजप शासित कमीत कमीत चार राज्यांना या 'सामाजिक किडी'ला आळा घालण्यासाठी कायदा बनवणार असल्याची घोषणा केली आहे."

इंडिया लव्ह प्रोजेक्टमध्ये लोक 150 शब्दांत प्रेम आणि आनंदाने आपली कहाणी सांगतात. मानवनिर्मित बेड्या प्रेमाच्या आड येऊ शकत नाहीत, हेच त्यांच्या अनुभवांवरून स्पष्ट होतं.

रुपा हिंदू ब्राह्मण आहेत. आपल्याला रझा अब्दी नावाचा मुस्लीम मुलगा आवडत असल्याचं जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, "तो तुला तलाक, तलाक, तलाक म्हणून घराबाहेर काढेल."

रुपाच्या आईला इस्लाममधल्या तीन तलाक पद्धतीची चिंता होती. मात्र, सध्या भारतात घटस्फोटाची ही पद्धत अमान्य आहे.

रुपा सांगतात, "मात्र, माझे आई-वडील रझाला भेटल्यावर ते व्यक्ती म्हणून किती उत्तम आहेत, याची प्रचिती त्यांना आली. माझ्या आई-वडिलांच्या सर्व शंका दूर झाल्या."

रुपा आणि रझा यांच्या लग्नाला 30 वर्षं झाली आहेत. ईद आणि दिवाळी हे दोन्ही सण ते उत्साहात साजरे करतात.

दहीभात विरुद्ध मटण बिर्याणी

सलमाशी झालेल्या लग्नाविषयी सांगताना पत्रकार टी. एम. वीरराघव म्हणतात, "माझ्या घरात धर्म 'दहीभात विरुद्ध मटण बिर्याणी' एवढा महत्त्वाचा नाही."

ते म्हणतात, "मी शाकाहारी आहे. ती मटण आवडीने खाते. आमचा मुलगा एनिशला या दोन्ही जगातल्या सर्वोत्तम गोष्टी मिळत आहेत. एनिश हिंदू आहे की मुस्लीम हे घरात स्वयंपाक काय बनलाय त्यावर ठरतं."

तनवीर एजाज आणि त्यांच्या हिंदू पत्नी विनिता शर्मा त्यांची मुलगी कुहू हिचं नाव ठेवण्यावेळी काय-काय घडलं ते सांगितलं आहे.

कुहू नाव हिंदू आहे की मुस्लीम आणि तुमची मुलगी मोठी झाल्यावर ती कोणता धर्म स्वीकारेल, अशी विचारणा त्यांना करण्यात आली.

केरळच्या मारिया मंजिल खुल्या विचारसरणीच्या कॅथलिक कुटुंबातून येतात. मारिया मांसाहारी आहेत. त्यांनी उत्तर भारतात राहणारे शाकाहारी संजय जैन यांच्याशी लग्न केलं. संदीप यांचं कुटुंब रुढीवादी विचारसरणीचं आहे.

त्यांनी लग्नाच्या 22 वर्षांत त्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागला त्याविषयी लिहिलं आहे. मात्र, संदीपशी लग्न करण्याचा निर्णय अगदी योग्य होता, असं त्यांचं ठाम मत आहे.

त्या लिहितात, "मी त्यांचा प्रामाणिकपणा, बौद्धिक समानता आणि माझ्याप्रती असलेला स्नेह हे बघून त्यांची निवड केली. ते दुसऱ्या ईश्वराची पूजा करतात किंवा दुसरी भाषा बोलतात, फक्त एवढ्या कारणावरून मी त्यांना सोडू शकत नव्हते."

अशा कहाण्या भारत आणि जगाविषयी तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करत असल्याचं समीर हलरंकर यांना वाटतं.

ते म्हणतात, "या सर्व भारताच्या अद्वितीय वास्तवाच्या सुंदर कथा आहेत. प्रेमासाठी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबतात. यातून भारत म्हणजे नेमकं काय, हे कळतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)