You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तनिष्क: गुजरातमधील गांधीधाम शो-रूम मॅनेजरला धमकी, लेखी माफीची मागणी
प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड तनिष्कच्या आंतरधर्मीय विवाहाचं चित्रण दाखवणाऱ्या एका जाहिरातीवरून वाद उफाळल्यानंतर आता ही जाहिरातच मागे घेण्यात आली. पण अद्याप हा वाद थांबलेला नाही.
गुजरातमधील गांधीधाम या ठिकाणी तनिष्कच्या शोरूम मॅनेजरला धमकी देण्यात आली. तनिष्कने माफी मागावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती गांधी धाम पोलिसांनी दिली.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार गांधी धाम तनिष्क शो रूमच्या मॅनेजरने लेखी माफी दिली आणि त्या माफीची प्रत दरवाजावर लावण्यात आली आहे. तनिष्कने ही जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून घेतली आहे. तसेच त्यांनी या जाहिरातीमुळे कुणाच्या भावना दुखावणं आमचा उद्देश नव्हता असं स्पष्टीकरण दिलं आहे.
काय होती जाहिरात?
हिंदू सुनेचं डोहाळजेवण तिचे मुस्लिम सासू-सासरे करतात, अशी जाहिरात तनिष्कनं केली होती. मात्र उजव्या संघटनांकडून सोशल मीडियावर या जाहिरातीला प्रचंड विरोध झाला. ही जाहिरात 'लव्ह जिहाद'चं उदात्तीकरण करत असल्याचा आक्षेप उजव्या संघटनांनी घेतला.
मुस्लिम तरुण हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठीच त्यांच्याशी विवाह करतात, असा आरोप करत या प्रकाराला कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी 'लव्ह जिहाद' असं संबोधलं होतं.
भारतीय समाजात पहिल्यापासून हिंदू-मुस्लिम विवाहांना मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसायचा. पण त्याला 'लव्ह जिहाद' म्हणत त्याला एक घाबरवणारा हेतू जोडण्याचा प्रकार अलीकडच्या काळात घडू लागला.
सोशल मीडियावर या ब्रँडवर बहिष्कार घालावा असा ट्रेंड परंपरावाद्यांनी सोशल मीडियावर सुरू झाला. ट्विटरवर हा टॉप ट्रेंड होता. अनेकांनी आक्षेपार्ह शब्दांत पोस्ट लिहून या ब्रँडवर बहिष्कार घालण्याची मागणी केली.
युट्यूबवर पोस्ट केलेया या जाहिरातीच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे- "तिच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे माया करणाऱ्या घरात ती लग्न होऊन गेली. तिच्यासाठीच त्यांनी त्यांच्यात सहसा साजरा न होणारा सोहळाही साजरा केला. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीचा हा सुंदर मिलाफ आहे."
43 सेकंदांच्या ही जाहिरात दागिन्यांचा 'एकत्वम' हा ब्रँड प्रमोट करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, आता ती तनिष्कच्या सर्व सोशल मीडिया चॅनेल्सवरून हटविण्यात आली आहे. बीबीसीनं याबद्दल तनिष्कशी संपर्क साधला होता, मात्र त्यांच्याकडून अजून कोणतंही प्रत्युत्तर आलं नाहीये.
सुरूवातीला तनिष्कनं युट्यूब आणि फेसबुकवर कमेन्ट्स तसंच लाइक्स-डिसलाइक्स बंद केल्या. नंतर मात्र त्यांनी ती जाहिरातच काढून घेतली.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही जाहिरात पोस्ट केली आणि म्हटलं, "हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या या सुंदर जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली."
"जर हिंदू-मुस्लिम 'एकत्वम'चा या सर्वांना एवढा त्रास होत असेल, तर ते लोक हिंदू-मुस्लिम ऐक्याचं सदासर्वकाळ टिकून असलेल्या प्रतीकावरच बंदी का घालत नाहीत?- ते प्रतीक म्हणजे भारत," असं शशी थरुर यांनी म्हटलं.
बहुतांश भारतीय कुटुंबात आजही त्यांच्या धर्मात आणि जातीतच ठरवून लग्न करण्याला प्राधान्य दिलं जातं. जातीबाह्य विवाहामुळे 'ऑनर किलिंग'सारखे प्रकारही पहायला मिळाले आहेत.
इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हेच्या आकडेवारीनुसार आंतरजातीय विवाहांचं प्रमाण अवघं 5 टक्के आहे. आंतरधर्मीय विवाहांचं प्रमाण तर त्याहूनही अधिक कमी आहे.
2016 मध्ये 'सोशल अॅटिट्यूड्स रिसर्च फॉर इंडिया' नं (सारी) दिल्ली, मुंबई तसंच उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये एक सर्वे केला होता. या सर्वेमध्ये अनेकांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाला विरोध केला होता. किंबहुना अशा विवाहांवर बंदी घालण्यासाठी कायदाच करण्यात यावा, असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं.
लिंगविषयक अभ्यासकांच्या मते परंपरा, संस्कृती आणि 'शुद्धता' टिकविण्याची जबाबदारी स्त्रियांवरच असते. जर एखाद्या मुलीनं परंपरागत मर्यादा ओलांडून विवाह केला, तर तिनं कुटुंब आणि समाजाच्या इभ्रतीला धक्का लावला असंच समजलं जातं.
2018 मध्ये एक फेसबुक पेज बनविण्यात आलं होतं. या पेजवर 102 मुस्लिम पुरूषांची यादी दिली होती. या पुरूषांचे हिंदू महिलांसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्यांना धडा शिकवण्याचं आवाहनही केलं होतं. ऑनलाइनपद्धतीनं संघर्षाला खतपाणी घालण्याचाच हा एक प्रकार होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)