You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशांत सिंह राजपूत प्रकरण : कालपर्यंत विभागलेलं बॉलीवुड अचानक एकत्र कसं आलं?
- Author, इक़बाल परवेज
- Role, सिने पत्रकार
हिंदी सिनेनिर्मात्यांची संघटना असलेल्या प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडियासह चार असोसिएशन आणि 34 सिनेनिर्मात्यांनी अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊचे राहुल शिवशंकर आणि नविका कुमार यांच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय.
बॉलीवुडविरोधात बेजबाबदार आणि अवमानकारक माहिती पसरवण्यापासून रोखण्याची मागणी या याचिकेतून केलीय.
शाहरूख खान, सलमान खान, अजय देवगन, रोहित शेट्टी, अनिल कपूर, विशाल भारद्वाज यांसाख्या 34 कलाकारांच्या निर्मितीसंस्था, तसंच यशराज फिल्म्स, विनोद चोप्रा फिल्म्स, एक्सेल इंटरटेनमेंट, रिलायन्स बिग एंटरटेन्मेंटसह टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन, द फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स काऊंन्सिल आणि स्क्रीन रायटर्स असोसिएशनने दिल्ली हायकोर्टात याचिकेद्वारे तक्रार दाखल केली आहे.
बॉलीवुड इंडस्ट्री आणि तिथे काम करणाऱ्या लोकांविरोधात अवमानकारक आणि बेजबाबदार वक्तव्य केलं गेलं आणि मीडिया ट्रायलही करण्यात आली.
इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन (IMPA) या याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये नाहीय. मात्र, IMPA चे अध्यक्ष आणि सिनेनिर्माते टी. पी. अग्रवाल यांनी बॉलीवुडमधील निर्मात्यांनी उचललेल्या या पावलाचं कौतुक केलं आहे.
टीपी अग्रवाल म्हणाले, "बॉलीवुडने हे पाऊल उचलल्याचा मला आनंद आहे. खूप आधीच हा निर्णय घेण्याची गरज होती. एका-दोघांमुळे माध्यमांनी पूर्ण इंडस्ट्रीला बदनाम केलं. सर्वांनी मिळून या पत्रकारांविरोधात उभं राहिलं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे."
मोठ्या कालावधीनंतर सिनेसृष्टीतील दिग्गज एकत्र
मोठ्या कालावधीनंतर हिंदी सिनेसृष्टीची एकजुट झाल्याची दिसून आली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ज्यांनी विशिष्ट पद्धतीनं मोहीम चालवली, त्यांच्याविरोधात सिनेसृष्टी एकवटल्याचं चित्र आहे.
सुशांत सिंह राजूपतच्या मृत्यूआधी आणि नंतरही बॉलीवुडमध्ये दोन गट पाहायला मिळत होते. माध्यमांमुळे या गट-तटांची चर्चाही झाली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा गुंता सुटेपर्यंत म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत हे असंच सुरू होतं.
एम्सच्या डॉक्टरांसह सीबीआयनेही सुशांतची हत्या नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर मग कंगना राणावत शांत होती, पण स्वरा भास्कर, फरहान अख्तर यांसारखे कलाकार पुढे येऊन बोलू लागले.
एम्सचा अहवाल आल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करनं ट्वीट करून म्हटलं, "आता तर सीबीआय आणि एम्स दोघेही या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत की, सुशांत सिंह राजपूत यांचं निधन आत्महत्या होती. काही लोक सरकारनं दिलेले पुरस्कार परत करण्याच्या गोष्टी करत होते ना?"
स्वराच्या या ट्वीटला उत्तर देताना कंगना राणावत म्हणाली, "ही माझी मुलाखत. जर स्मृती कमकुवत झाली असेल तर पुन्हा पाहा. जर मी एकतरी खोटा किंवा चुकीचा आरोप केला असेन, तर सर्व पुरस्कार परत करण्यास तयार आहे. हे एका क्षत्रियचं वचन आहे. रामभक्त आहे. प्राण देईन, पण वचन नाही."
सुशांतच्या मृत्यूनंतर भारतीय माध्यमांमधील एका गटाने रिया चक्रवर्तीला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे 'मीडिया ट्रायल' झाली.
ड्रग्जप्रकरणी रिया चक्रवर्ती तुरुंगातही गेली. मात्र, ती बाहेर आल्यानंतर फरहान अख्तरने ट्वीट करून प्रश्न विचारला, "ज्या अँकर्सनी रिया आणि तिच्या कुटुंबावर आरोप केले होते, ते आता माफी मागतील?"
सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवुडमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. कुणाच्याही मृत्यूनंतर इंडस्ट्रीत कधी वाद होत नाहीत, आरोप-प्रत्यारोप होत नाहीत, मात्र यावेळी गंगा उलटी वाहू लागली होती.
सिनेसृष्टी दोन गटात विभागली गेली होती. सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीची मुंबई पोलिसांनी सुरुवात केली, त्यानंतर चौकशीत बिहार पोलिसांची एंट्री झाली आणि नंतर सुशांतच्या मृत्यूचा गुंता सोडवण्यासाठी सीबीआयला पाचारण करण्यात आलं. माध्यमांनी आपल्या स्क्रीन आणि वृत्तपत्रीय पानांवरून हे प्रकरण हटू दिलं नाही.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अनेकांची चौकशी
सुशांतच्या मृत्यूची चौकशी होत असतानाच कंगना राणावतने या प्रकरणाला घराणेशाहीचा मुद्दा जोडला. या मुद्द्यावरून सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये मोठा गोंधळ घालण्यात आला.
बॉलीवुडमधील दिग्गजांनी कशाप्रकारे सुशांतला हतबल केलं, असे आरोप होऊ लागले. मोठ्या कलाकारांनी कशाप्रकारे सुशांतचे सिनेमे हिसकावून घेतले वगैरे चर्चा होऊ लागल्या. सुशांत छोट्याशा शहरातून आल्याचा मुद्दा मांडून या चर्चा होत राहिल्या.
यशराज फिल्म्स आणि संजय लीला भन्साली यांच्यासारख्या सिनेनिर्मात्यांचीही चौकशी झाली. त्यानंतर तपासयंत्रणांनी सुशांतच्या प्रकरणात हत्येचा अँगल शोधला आणि मग ड्रग्जच्या दिशेनं तपासाची चक्र फिरू लागली. ड्रग्जचा मुद्दा अगदी देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच संसदेतही घुमला.
जोपर्यंत सुशांतसाठी न्यायाची मागणी होत होती, तोपर्यंत सर्वकाही ठीक होतं. मात्र, बॉलीवुड माफिया, नेपोटिझम, ड्रग्ज याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आणि फिल्म इंडस्ट्री दोन गटात विभागली गेली. एक गट कंगनाचा होता, जिला पहिल्या दिवसापासून भाजपचं समर्थन होतं आणि दुसरा गट होता, जया बच्चन, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप यांच्यासारख्यांचा.
याआधी सिनेसृष्टीत इतकी खळबळ उडाली नव्हती. इथून फक्त मनोरंजनच बाहेर येतं, असं वाटत होतं. किंबहुना, सिनेइंडस्ट्रीत ना कुठला धर्म असतो ना कुठली जात, इथे केवळ आपल्या अभिनयाने कुणी स्टार होतो, तर कुणी सुपरस्टार.
सलमान खान ईदला नमाज पढतो, तर गणेशोत्सवात गणपतीची स्थापनाही करतो. शाहरूख खानची पत्नी गौरी, आमीरची पत्नी किरण राव, तर सैफ अली खानची पत्नी करिना कपूर आहे.
बॉलीवुडचं राजकीय कनेक्शन
शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना यांसारखे अभिनेते भाजपचे खासदार होते, तर सुनील दत्त, दिलीप कुमार, राजेश खन्ना यांसारखे अभिनेते काँग्रेसचे खासदार होते.
मात्र, यांच्यामध्ये कधीच राजकीय ध्येयासाठी आरोप-प्रत्यारोप किंवा सामना झाला नाही. मात्र, आता इंडस्ट्रीत राजकीय पक्षनिहायही गट-तट दिसून येतात.
प्रसिद्ध अभिनेते सुशांत सिंह म्हणतात, "सिनेसृष्टीत जे होतंय तो खरा वाद आहे, असं मला वाटत नाही. हा सर्व वाद तयार केला गेलाय. या ध्रुवीकरणासाठी सोशल मीडियाचा वापर केला गेला. संपूर्ण जगभरात सध्या असंच होतंय."
"अमेरिकेत ब्लॅक लाईव्ह मॅटर्सचं आंदोलन झालं, तेव्हाही बरेचजण डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने असल्याचं दिसलं. मात्र, ज्याप्रकारची स्थिती आता आहे, तशी कधीच नव्हती. आता बॉलीवुड असो वा संपू्रण देश, प्रत्येक ठिकाणी विरोध किंवा समर्थनाच्याच गोष्टी होतात. विश्लेषण कुठेच होत नाहीय. संवाद संपत चालला आहे," असं सुशांत सिंह म्हणतात.
सुशांत यांना वाटतं की, कलाकारांमध्येही आता दरी वाढलीय. ते म्हणतात, "सगळेजण सोशल मीडियावर आपापला ग्रुप करून बसलेत, ज्यात मीही सहभागी आहेच. आपल्या मुद्द्यांवर वाह वाह केलं जातं, तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं. मात्र, आपल्या विचारांचा विरोध करतात, तेव्हाही स्वत:च बरोबर असल्याचं वाटतं. चर्चा होत नसल्याचं वाटतं. हे खूप भयंकर आहे. कारण आपण एकमेकांपासून दूर जातोय. वेगवेगळे विभागलं जाणं यात चूक नाही, लोकशाहीत ते अपेक्षितच असतं. संवादच न होणं, हे भयंकर आहे."
सिनेनिर्माते अविनाश दास यांना वाटत की, "आधीही वेगवेगळ्या विचारांचे लोक सिनेसृष्टीत होते. मात्र, अशाप्रकारच्या टीका होत नव्हत्या. आता परिस्थिती फारच बदललीय."
अविनाश दास म्हणतात, "आपल्या समाजाप्रमाणेच सिनेसृष्टी आहे. पूर्वी राज कापूर यांच्यासारखे कलाकार होते, जे नेहरूंच्या विचारांचे होते आणि बिमल रॉय यांच्यासारखे लोक डाव्या विचारांचे होते. त्यांचे सिनेमेही तसे असायचे. मात्र, त्यांच्यात कधी वाद झाले नाहीत. आता वाईट हे आहे की, लोक द्वेषानं वाटले गेलेत, समाजातही आणि सिनेसृष्टीतही."
अभिनेते मुकेश खन्ना यांचं म्हणणं आहे की, "सिनेसृष्टीत कधीच गटतट पडले नाहीत. सिनेसृष्टी कुटुंबासारखी आहे. सुशांतच्या चौकशीदरम्यान ड्रग्जचा मुद्दा समोर आलाय आणि मला वाटतं, ड्रग्जसारख्या गोष्टी संपवल्या पाहिजेत. सिनेसृष्टीत ड्रग्ज नाहीत, असं कुणीही लिहून देऊ शकत नाही."
ड्रग्जबाबत ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनीही संसदेत मुद्दा उपस्थित केला. त्यावरून कंगना राणावतने जया बच्चन यांच्यावर व्यक्तिगत टीका केली. यावेळीही कंगनाच्या बाजूने भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन पुढे आले, तर जया बच्चन यांच्या समर्थनासाठी अनुराग कश्यप यांच्यासारखी मंडळी समोर आली.
त्यानंतर अनुराग कश्यपवरही लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप लावण्यात आला. मात्र, काही अभिनेत्री अनुरागच्या समर्थनासाठी पुढे आल्या.
दरम्यानच्या काळात कंगनाला केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आली. महाराष्ट्र सरकारविरोधात ती बोलू लागली. भाजपलाही महाराष्ट्र सरकारविरोधात बोलण्यासाठी कंगनाच्या निमित्ताने चेहरा सापडला.
अविनाश दास म्हणतात, "कंगनाच्या निमित्ताने भाजपाल बॉलीवुडमध्ये पक्षाचा चेहरा सापडलाय. कंगनाच्या आधी अनुपम खेर होते. सलमान खान, शाहरूख खान यांसारखे कलाकार सरकारचा आवाज बनले नाहीत. अशातच कंगना सापडली. भाजपने तिला पकडलं आणि आपलं राजकारण तिच्यामार्फत करत आहेत."
2014 साली मोदी सरकार केंद्रात सत्ते आल्यानंतर पहिल्यांदा सिनेसृष्टीत दोन गट दिसून आले होते. पुरस्कार वापसीवेळी कला, विचारवंत, साहित्य आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर पुरस्कार परत केले होते. त्यावेळी अभिनेते अनुपम खेर यांनी दिल्लीत सहिष्णुता मार्चही काढला होता. हा मार्च मोदी सरकारच्या समर्थनासाठी होता.
अभिनेते सुशांत सिंह म्हणतात, "पुरस्कार वापसीबाबत बोलायचं झाल्यास, तो मुद्दा असहिष्णुतेववरून सुरू झाला होता आणि मॉब लिंचिंगविरोधात तो आवाज उठवला गेला होता. मॉब लिंचिंगविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच असहिष्णु म्हटलं गेलं. हा कुठला तर्क आहे? सिनेसृष्टी असो वा उद्योगजगत, ही विभागणी प्रत्येक ठिकाणी होतेय आणि या विभागणीला प्रोत्साहन देण्याचं कामही काहीजण करत आहेत. कुणामध्ये संवाद व्हावा असं त्यांना वाटत नाही."
मुकेश खन्ना मात्र पुरस्कार वापसी करणाऱ्यांना डाव्या विचारधारेचा गट मानतात. ते म्हणतात, "पुरस्कार वापसी करणारा हा डावा गट आहे, जो हिंदुस्तान मुर्दाबाद म्हणण्याची हिंमत करतो. हे स्वत:ला विचारवंत म्हणवतात. मी त्यांना स्यूडो-इंटेलेक्च्युअल समजतो. श्याम बेनेगल आणि स्वरा बास्कर यांसारखे लोक जेएनयूत हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊ शकतात. तेव्हाच मी म्हटलं होतं की, पोलिसांकडून होत नसेल, तर सैन्याला बोलवा. अमेरिकेत कुणी असं बोलू शकतं का?"
2019 मध्ये देशात वाढलेल्या मॉब लिंचिंगच्या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती करणारं पत्र 49 कलाकारांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं होतं. त्यात श्याम बेनेगल, अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा, अनुराग कश्यप यांचा समावेश होता. समूहाकडून होणाऱ्या हत्या थांबवण्याचं आवाहन या पत्रातून करण्यात आलं होतं.
त्यावेळीही बॉलीवुडमधील 61 कलाकारांनी पलटवार केला होता. श्याम बेनेगल किंवा इतर कलाकारांचे आरोप खोटे ठरवत या कलाकारांनी जाहीर पत्र काढले होते. त्यात कंगना राणावत, मधुर भंडारकर, प्रसून जोशी यांचा समावेश होता.
सिनेनिर्माते श्याम बेनेगल यांच्या मते, सिनेसृष्टी दोन गटात विभागली गेली नाहीय, पण बरेच जण आमने-सामने उभे ठाकले आहेत.
श्याम बेनेगल म्हणतात, "2014 सालानंतर जे झालं, ते बऱ्याचदा होतं. अनेक सरकारं बदलतात, त्यांची धोरणं बदलतात. काही लोक विरोध करतात, तर काहीजण समर्थन. 2014 नंतरही हेच झालं. पण त्यामुळे मी दोन गटात विभागणी करणार नाही. या गोष्टी काळानुसार संपून जातात."
कॉमेडीयन कपिल शर्माच्या कार्यक्रमातही अर्णब गोस्वामीची खिल्ली उडवणारा प्रसंग सादर करण्यात आला. कपिल शर्माच्याच कार्यक्रमात एकदा महाभारत मालिकेतील कलाकारांना बोलवण्यात आलं होतं.
मात्र, भीष्म पितामहची भूमिका निभावणाऱ्या मुकेश खन्नांना बोलवलं नाही. त्यामुळेत ते नाराज झाले होते आणि या कार्यक्रमावर टीकाही केली होती. पुढे महाभारतात युधिष्ठिरची भूमिका निभावणाऱ्या गजेंद्र चौहान आणि मुकेश खन्ना यांच्यात सोशल मीडियावर वादही झाला.
मुकेश खन्ना यांनी अर्णब गोस्वामी यांच्या चर्चेत बऱ्याचदा सहभाग घेतला होता आणि सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.
मुकेश खन्ना यांनी एका चर्चेत म्हटलं होतं, "आरएसएसचा अर्थ भाजप आणि भाजप म्हणजे हिंदू. म्हणजे हिंदू असलो की चूक? आपल्याला मुघलांनी लुटलं, इंग्रजांनी लुटलं, तरीही आपली संस्कृती कायम आहे."
याच सिनेसृष्टीत युसुफ खानचं नाव दिलीप कुमार झालं आणि त्यांच्यावर संपूर्ण देश प्रेम करत राहिला. मात्र, अशा सिनेसृष्टीत आता गटतट दिसून येतात.
मात्र, इथे आणखी एक गटही दिसून येतो, जो कुठल्याच बाजूला असल्याचे दाखवत नाही. त्यात करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नाडियाडवाला, सलमान खान, शाहरूख खान, रणबीर कपूर यांसारखी मंडळी आहे.
ही कलाकार मंडळी सिनेसृष्टीच्या सर्वांत वरच्या स्तरावर पोहोचली आहे. ते आपल्यापासून राजकीय मुद्दे चार हात दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. सरकारं बदलतात, तसे हे सर्व सरकारांसोबत असतात.
सलमान खान कधी नरेंद्र मोदी यांच्यासोबत पतंग उडवताना दिसतो, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्याचे चांगले संबंध असतात. राज ठाकरे यांच्यासोबतची त्याची मैत्री तर जुनीच आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत राहिलेल्या अमिताभ बच्चन यांनी गुजारत पर्यटन विभागाचा प्रचारही केला आहे. करण जोहर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला शुभेच्छाही देतात आणि मोदीही त्यांचं कौतुक करतात.
मात्र, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ज्याप्रकारे टीका, आरोप झाले आहेत, त्यामुळे सिनेसृष्टी एकजुटीने सोबत आल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)