You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खुशबू सुंदर : डीएमके ते भाजप व्हाया काँग्रेस असा प्रवास करणारा हा दाक्षिणात्य चेहरा कोण आहे?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
तमीळ अभिनेत्री खुशबू सुंदर या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सहभागी झाल्या आहेत.
खुशबू यांनी राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसने त्यांना पक्ष प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याची घोषणा केली होती.
काँग्रेस नेते प्रणव झा यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं होतं की, खुशबू सुंदर यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदावरून तात्काळ मुक्त करण्यात येत आहे.
दुसरीकडे खुशबू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या कार्यशैलीबद्दलचे आपले आक्षेप व्यक्त करून राजीनामा देत असल्याचं म्हटलं.
'2014 च्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पक्ष अतिशय कठीण काळात असताना मी पक्षप्रवेश केला. पक्षात मी पैसा, नाव किंवा प्रतिष्ठेच्या आशेनं आले नव्हते,' असं खुशबू यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं.
"जमिनीवरील वास्तवाशी कोणताही संबंध नसलेले, लोकांमध्ये ओळख नसलेले पक्षातील काही वरिष्ठ लोक आपला अधिकार गाजवत आहेत आणि पक्षाशी पूर्ण निष्ठा ठेवून काम करू इच्छिणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना डावललं जात आहे."
खुशबू स्वतःला इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधींच्या प्रशसंक म्हणवून घ्यायच्या. त्यांनी आपलं कुटुंबही काँग्रेसी असल्याचं म्हटलं होतं.
मात्र, अभिनयापासून राजकारणापर्यंतचा खुशबू यांचा प्रवास काँग्रेसपासून सुरू झाला नव्हता. खुशबू यांची राजकीय कारकीर्द द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षापासून झाली होती. राजकारणातील त्यांची ही वाटचाल जाणून घेण्यापूर्वी खुशबू आहेत कोण? त्यांची चित्रपटातील कारकीर्द कशी होती? याबद्दल जाणून घेऊया.
तमीळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा
खुशबू यांचा जन्म 1970 साली महाराष्ट्रात मुंबईमध्ये झाला. त्यांचा विवाह अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सुंदर सी यांच्यासोबत झाला आहे.
खुशबू या तमीळ फिल्म इंडस्ट्रीतलं प्रसिद्ध नाव असलं तरीही त्यांचं चित्रपटसृष्टीतलं पदार्पण हे हिंदी सिनेमामधून झालं होतं...तेही बालकलाकार म्हणून. 'द बर्निंग ट्रेन' चित्रपटातल्या एका गाण्यामध्ये खुशबूही होत्या. त्यांनी लावारिस, कालियासारख्या चित्रपटातूनही बाल कलाकार म्हणून काम केलं.
1985 साली त्या 'मेरी जंग' चित्रपटात अभिनेता जावेद जाफरीसोबत झळकल्या.
पुढच्याच वर्षी त्यांचं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आणि नंतर त्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच चमकल्या.
त्यांनी प्रामुख्यानं तमीळ चित्रपटांमधूनच काम केलं. त्यांनी काही मल्याळम तसंच कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला. त्यांनी जवळपास 150 चित्रपटांतून काम केलं. रजनीकांत, कमल हासन, मामुट्टी, मोहनलाल यांसारख्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं आहे.
राजकारणातला प्रवास
खुशबू यांनी 2010 साली द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) या पक्षात प्रवेश केला. 'कठोर परिश्रम हीच एकमेव गोष्ट डीएमकेमध्ये महत्त्वाची आहे,' असं खुशबू यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
पण चार वर्षांतच त्यांनी डीएमके पक्ष सोडला.
डीएमकेचे प्रमुख एम करूणानिधी यांनी आपला वारसदार म्हणून स्टॅलिन यांचं नाव पुढे केल्यानंतर खुशबू यांनी एका मुलाखतीत या निवडप्रक्रियेवर आक्षेप घेतले होते. त्यावरून वादही झाला होता.
"मी पक्षाला 100 टक्के दिलं, पण मला काहीच मिळालं नाही. मी डीएमकेसोबतचे माझे सर्व संबंध आता तोडत आहे, यापुढे माझा पक्षाशी संबंध नसेल. अतिशय जड अंतःकरणानं मी डीएमकेचं सदस्यत्व सोडत आहे," असं खुशबू यांनी तेव्हा म्हटलं होतं.
त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. "मला माझ्या घरी आल्यासारखं वाटत आहे," असं खुशबू यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
मार्च 2015 मध्ये काँग्रेसनं खुशबू यांची नियुक्ती प्रवक्त्या म्हणून केली. सोमवारी (12 ऑक्टोबर) काँग्रेसनं त्यांना या पदावरून दूर केलं.
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका अजून काही महिन्यांनी होणार आहेत. त्याआधी भाजपनं खुशबू यांना पक्षात प्रवेश दिला आहे. एक मुस्लिम, महिला आणि लोकप्रिय चेहरा असलेल्या खुशबू यांचा भाजपला निवडणुकीत फायदा होणार का?
'गर्दीचं रुपांतर मतात होण्याची शक्यता कमी'
गर्दी खेचण्यात खुशबू नक्कीच यशस्वी होतील, पण त्या गर्दीचं मतात रुपांतर होण्याची शक्यता फारच कमी आहे, असं मत बीबीसी तमीळचे संपादक थंगवेल अपाची यांनी व्यक्त केलं. पण खुशबू यांच्यामुळे भाजपला पक्षाचा ब्राह्मणी, हिंदुत्ववादी आणि उच्चभ्रू चेहरा बदलण्यास मदत होईल. महिला आणि ग्रामीण मतदारांना आकृष्ट करण्यासाठीही खुशबू महत्त्वापूर्ण ठरतील, असंही थंगवेल यांनी म्हटलं.
थंगवेल यांनी म्हटलं, "मुळात त्या आपली राजकीय विचारधारा आणि महत्त्वाकांक्षा यावर ठाम नाहीयेत. त्यामुळेच त्या आधी डीएमके आणि नंतर काँग्रेससोबत होत्या."
गेल्या दहा वर्षांत त्यांनी दोन राजकीय पक्ष बदलले असले, तरी त्या राजकारणापेक्षा त्यांच्या व्यावसायिक करिअरवरच लक्ष केंद्रित केलं असल्याचंही थंगवेल यांनी म्हटलं.
"त्यामुळेच लोकांमध्ये त्यांची राजकीय विश्वासार्हता किती आहे, हा प्रश्नच आहे."
रोखठोक भूमिकांसाठी प्रसिद्ध
खुशबू यांनी लग्नापूर्वी शारीरिक संबंधांचं समर्थन केल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. 2005 साली दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, आपली बायको 'व्हर्जिन' असायला हवी अशी अपेक्षा पुरूषांनी ठेवू नये. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवताना मुलींनीही खबरदारी घ्यायला हवी.
त्यांच्या या वक्तव्याविरोधात अनेकांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधातली सर्व प्रकरणं फेटाळून लावली होती.
दिल्ली बलात्काराच्या घटनेबद्दल चूक ही एका बाजूनंच होत नाही, असं वक्तव्य करणाऱ्या आसारामबापूंवर खुशबू यांनी कठोर टीका केली होती.
'आसारामबापूंची ही वक्तव्यं असंवेदनशील आहेत. त्यांच्या समर्थकांनी त्यांचं अनुसरण करणं थांबवावं,' असं खुशबू यांनी म्हटलं होतं. खुशबू यांच्या या वक्तव्यावरही अनेकांनी टीका केली होती.
खुशबू यांनी तामिळनाडूमधील बैलांच्या शर्यतींचं जलिकट्टूचं समर्थन केलं होतं.
पण खुशबू यांच्या अशा रोखठोक भूमिकांमुळे भाजप अडचणीत येईल का, या प्रश्नाचं उत्तर देताना थंगवेल यांनी म्हटलं, "ही अडचण दोन्ही बाजूंनी येईल. पण खुशबू यांना कधी, कोठे आणि काय बोलायचं याची कला अवगत आहे. पण समजा भाजप नेत्यांनी एखाद्या व्यक्ती किंवा धर्माविरोधात वक्तव्य केलं, जे खुशबू यांच्या विचारधारेच्या विरुद्ध असेल आणि त्यांना त्याची पाठराखण करावी लागणार असेल तर मात्र भाजपसाठी ते ओढवून घेतलेलं दुखणं ठरू शकतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)